पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३ दिवसांचा ३ देशांचा नामांकित दौरा नुकताच पूर्ण झाला. १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीतील दौर्यामध्ये त्यांनी प्रथम जॉर्डनला भेट दिली. त्यानंतर ते इथिओपिया या देशाच्या भेटीवर गेले आणि या दौर्याचा शेवटचा टप्पा ओमान भेटीचा होता. या दौर्याचे आयोजन ज्याप्रमाणे व्यापारी आणि सामरिक दृष्टीकोनातून करण्यात आले होते, त्या दृष्टीकोनातून पाहिले असता हा दौरा नक्कीच यशस्वी ठरला, असे म्हणावे लागेल.
लेखक : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.

१. ‘सेपा’ : एक महत्त्वपूर्ण घडामोड
ओमानचे सुलतान महामहिम हैथम बिन तारिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत-ओमान संबंधांमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाविषयी आणि दूरदर्शी नेतृत्वासाठी ‘ऑर्डर ऑफ ओमान’ पुरस्काराने सन्मानित केले. दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत असतांना पार पडलेल्या या दौर्याचा सर्वांत मोठा सकारात्मक परिणाम किंवा फलनिष्पत्ती, म्हणजे भारत-ओमान या दोन देशांमध्ये झालेला मुक्त व्यापार करार. या कराराला ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट (सेपा)’, असे म्हटले जाते. या करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षर्या होणे, ही एक ऐतिहासिक घडामोड आहे.
२. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची वाहतूक होणार्या होर्मुझ सामुद्रधुनीच्या किनार्यावरील महत्त्वाचा देश ओमान
याचे कारण ओमान या देशाचे भौगोलिक स्थान सामरिक आणि व्यापारी दृष्ट्या भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ओमान हा होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या एका बाजूवर वसलेला देश आहे. ही सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी आणि पुढे अरबी समुद्राशी जोडते. भौगोलिकदृष्ट्या पाहिले, तर या सामुद्रधुनीच्या एका बाजूला इराण, तर दुसर्या बाजूला ओमानचा मुसंदम प्रांत आहे. ही सामुद्रधुनी तुलनेने अरुंद असून काही ठिकाणी ती अनुमाने ३० ते ४० किलोमीटरपर्यंत मर्यादित होते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत संवेदनशील मानला जातो.
रशिया आणि ओमान या देशांशी भारताचा करार, म्हणजे डॉनल्ड ट्रम्प यांना सणसणीत चपराक !

ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारताचा अमेरिकेसमवेतच्या अनुमाने ३२ अब्ज डॉलर्सच्या (२ सहस्र ८८० अब्ज रुपये) व्यापारावर अतिशय प्रतिकूल परिणाम पडला होता. या हानीची भरपाई करण्यासाठी भारताला नव्या बाजारपेठांची तातडीने आणि नितांत आवश्यकता निर्माण झाली होती. या दृष्टीकोनातून २ महत्त्वाच्या घडामोडी गेल्या मासात घडल्या. यांपैकी एक, म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा भारत दौरा. पुतिन यांच्या दौर्यामुळे लेखात उल्लेख केलेल्या चारही क्षेत्रांना अधिकाधिक पोच मिळणार आहे. त्यासह भारत आणि रशिया यांच्यातील ७६ टक्के व्यापार ‘रुबल’ (रशियाचे चलन) आणि रुपया यांमध्ये करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ही भारताला ‘डेड इकॉनॉमी’ (मृत अर्थव्यवस्था) म्हणणार्या आणि सूडबुद्धीने ‘टॅरिफ’ (आयात शुल्क) आकारणी करणार्या डॉनल्ड ट्रम्प यांना सणसणीत चपराक होती. अमेरिकेने शुल्कांची भीती दाखवून भारतीय मालासाठीची वाट अडथळ्यांची केली असली, तरी ‘भारत झुकेगा नही… (भारत झुकणार नाही)’, अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी ठामपणे घेतली. केवळ ही भूमिका घेऊन न थांबता भारताने पर्यायी बाजारपेठांचा शोध झपाट्याने चालू केला आणि प्रलंबित किंवा विचाराधीन असणारे ‘व्यापार करार’, ‘मुक्त व्यापार करार’ पूर्णत्वाला नेण्यास प्रारंभ केला.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर
जगातील मोठ्या प्रमाणावरील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची वाहतूक याच सामुद्रधुनीतून होते. सौदी अरेबिया, इराक, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि इराण या देशांकडून होणार्या तेल निर्यातीचा मोठा भाग होर्मुझ सामुद्रधुनीवर अवलंबून आहे. जागतिक तेल व्यापारातील अनुमाने ५ व्या भागाची वाहतूक या एकाच मार्गाने होते. त्यामुळे येथे निर्माण होणारा कोणताही तणाव थेट जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम करतो.
ओमान या संपूर्ण घडामोडींमध्ये एक वेगळी आणि महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ओमान हा तुलनेने स्थिर, शांतताप्रिय आणि संतुलित परराष्ट्र धोरण राखणारा देश आहे. होर्मुझ सामुद्रधुनीचा एक महत्त्वाचा किनारा ओमानकडे असल्यामुळे या भागातील सागरी सुरक्षेत त्याचा सहभाग अनिवार्य ठरतो. इराण आणि पश्चिमी देश यांच्यामधील तणावाच्या काळात ओमानने अनेकदा मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ओमानला मध्यपूर्वेतील ‘डिप्लोमॅटिक ब्रिज’ (राजनैतिक दुवा) म्हणूनही पाहिले जाते. मध्य आशियामधून भारताला होणार्या एकूण तेलपुरवठ्यापैकी अनुमाने २० टक्के तेलपुरवठा हा ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधून होतो. या ठिकाणी स्थैर्य आणि शांतता राहिली पाहिजे, ही भारताची प्रारंभीपासूनची भूमिका राहिली आहे अन् त्या दृष्टीकोनातून ओमान हा महत्त्वाचा देश आहे.
३. केवळ २ देशांशी मुक्त व्यापार करणारा ओमान !
ओमानची लोकसंख्या जेमतेम ५० लाख इतकी आहे. यांपैकी भारतियांचे प्रमाण ७ लाख आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर तेथे भारतीय वास्तव्याला आहेत. त्यामुळे तेथे भारतीय शाळा, हॉटेल्स, उपाहारगृहे मोठ्या संख्येने पहायला मिळतात. ओमानमध्ये राजेशाही आहे. या देशाने आपल्या इतिहासामध्ये केवळ
२ देशांसह मुक्त व्यापार करार केलेला आहे. यांपैकी पहिला देश आहे अमेरिका आणि आता दुसरा देश आहे भारत ! गेल्या २१ वर्षांमध्ये ओमानने एकाही देशाशी अशा प्रकारचा मुक्त व्यापार करार केलेला नव्हता. ओमान हा इस्लामी देश असून जगातील श्रीमंत अरब देशांच्या ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल (जीसीसी)’ या संघटनेचा सदस्य आहे. ‘जीसीसी’मध्ये संयुक्त अरब अमिरात, कुवेत, सौदी अरेबिया, ओमान आणि बहरीन या देशांचा समावेश आहे. आजघडीला भारत हा जगातील एकमेव असा देश बनला आहे, ज्याने ‘जीसीसी’मधील २ इस्लामी देशांशी ‘मुक्त व्यापार करार’ केलेला आहे. यापूर्वी संयुक्त अरब अमिरातसह भारताने ‘सेपा’, म्हणजेच मुक्त व्यापार करार केला होता. अशाच प्रकारचा ‘सेपा’ आता भारताने ओमानशी केला आहे.
४. ओमानशी करार केल्यामुळे भारताला होणारा लाभ
या ऐतिहासिक करारामुळे भारतातून आयात केल्या जाणार्या वस्तूंवर सध्या आकारले जात असलेले आयात शुल्क ओमानकडून पूर्णपणे रहित केले जाणार असून ते शून्य टक्क्यावर येणार आहे. त्याचप्रमाणे भारताने ओमानकडून आयात केल्या जाणार्या वस्तूंच्या किमतीवरील आयात शुल्कात ७८ टक्क्यांची कपात केली आहे. सध्याच्या स्थितीत भारत आणि ओमान यांच्यातील व्यापार अनुमाने १० अब्ज डॉलर्स (९०० अब्ज रुपये) इतका आहे. यांमध्ये ६ अब्ज डॉलर्सच्या (५०० अब्ज रुपये) वस्तूंची ओमानकडून भारतात आयात केली जाते, तर ४ अब्ज डॉलर्सच्या (३०० अब्ज रुपये) वस्तू आपण ओमानला निर्यात करतो. याचा अर्थ दोन्ही देशांतील व्यापारतूट २ अब्ज डॉलर्सची (अनुमाने १८० अब्ज रुपये) आहे. आता ताज्या करारामुळे ओमानला होणारी भारताची निर्यात ५० टक्क्यांनी वाढणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात केल्या जाणार्या वस्तूंवरील आयात शुल्क ५० टक्क्यांवर नेल्यामुळे देशातील जेम्स अँड ज्वेलरी, फिशरीज (मत्स्योत्पादन), ‘ऑटोमोबाईल’ (वाहन निर्मिती क्षेत्र), लेदर, गार्मेंट्स आणि कृषी उत्पादन या क्षेत्रांना फटका बसण्यास प्रारंभ झाला आहे. बारकाईने पाहिल्यास ही चारही क्षेत्रे ‘लेबर इंटेन्सिव्ह’ आहेत, म्हणजेच सर्वसामान्य कष्टकरी आणि श्रमिक वर्ग या क्षेत्रांशी जोडला गेलेला आहे. ओमानशी केलेल्या करारामुळे व्यापारतूट तर न्यून होईलच; पण या कष्टकरी समाजाला लाभ होणार आहे.
५. पंतप्रधानांचा दौरा विविध क्षेत्रांशी दूरगामी सकारात्मक परिणाम करणारा !
ओमानसमवेतचा मुक्त व्यापार करार हा या लेखात उल्लेख केलेल्या ‘ऑटोमोबाईल’ (वाहन निर्मिती क्षेत्र), फिशरीज, कृषी, लेदर, गार्मेंट या अमेरिकन ‘टॅरिफ’ने बाधित होणार्या क्षेत्रांसाठी नवी संधी उपलब्ध करून देणारा ठरणार आहे. ‘सेपा ॲग्रीमेंट’ वस्तूंची आयात-निर्यात आणि त्यावरील आयात शुल्क एवढ्यापुरताच मर्यादित नाही. या करारामध्ये सेवा क्षेत्रांचाही समावेश आहे. भारताच्या ‘जीडीपी’मध्ये (‘एकूण देशांतर्गत उत्पादना’मध्ये) सर्वाधिक योगदान सेवा क्षेत्राचे असून ते आजघडीला ५५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातही सेवा क्षेत्रातील व्यापार बराच मोठा आहे. ‘सेपा’मध्ये भारताच्या सेवा क्षेत्रालाही ओमानकडून मोठ्या प्रमाणावर सवलती मिळणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे ‘लेबर मोबिलिटी’ (कामगारांची गतीशीलता) ! ‘सेपा’ करारामुळे ओमानमध्ये भारतातील कुशल कामगारांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. भारतातून मध्य आशियामध्ये जाणार्यांमध्ये अर्धकुशल श्रेणीतील नागरिकांची संख्या मोठी आहे. तथापि या भारतियांकडून प्रतिवर्षी देशाला अनुमाने ४२ अब्ज डॉलर्सचा ‘फॉरेन रेमिटन्स’ (विदेशात काम करणारा भारतीय देशातील कुटुंबासाठी वा अन्य व्यक्तींसाठी पैसा पाठवतो, त्याला ‘फॉरेन रेमिटन्स’ (विदेशी वित्तप्रेषण) म्हणतात.) मिळतो. त्यामुळे भारताच्या दृष्टीने इस्लामी देश आणि मध्य आशिया यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजवर या देशांमध्ये पाकिस्तानच्या भूमिकेचा पुरस्कार करत भारताला एकटे पाडण्याचा प्रवाह रूढ झाला होता; परंतु गेल्या १० वर्षांमध्ये हा प्रवाह पूर्णतः उलटा फिरला असून अनेक इस्लामी देश आज भारताशी आर्थिक, व्यापारी दृष्ट्या सहकार्याची भूमिका घेत आहेत; कारण या देशांना आता पाकिस्तानचे खरे रूप कळले आहे. त्यांना आता विकासाच्या नव्या दिशांचा शोध घ्यायचा आहे. तेल आणि धर्म या दोन्हींच्या पुढे जाऊन त्यांना विकास साधायचा आहे.
या दृष्टीकोनातून ओमानशी झालेला मुक्त व्यापार करार हे एक मोठे पाऊल पडले आहे. आता मध्य आशियात भारत हा ‘सायलेंट ऑब्झर्व्हर’ (शांतपणे पहाणारा निरीक्षक) राहिलेला नाही, तर ‘मध्य आशियातील घडामोडींना आकार देणारा देश’ म्हणून पुढे आला आहे. मध्य आशियातील भारताची गुंतवणूक वाढत आहे. ‘मेक इन इंडिया’च्या (भारतात उत्पादन करण्याच्या) माध्यमातून भारताने संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने पुष्कळ मोठी उद्दिष्टे ठेवून मार्गक्रमण चालू केले आहे.
पूर्वेकडील देशांमध्ये भारताच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रांसह अन्य शस्त्रसामग्रीची निर्यात चालू झाली आहे. त्याच धर्तीवर आता मध्य आशिया हे भारताच्या संरक्षण निर्यातीसाठीचे एक मोठी बाजारपेठ ठरू शकते. या दृष्टीकोनातून ओमान आणि जॉर्डन या २ मध्य आशियायी देशांच्या पंतप्रधानांचा दौरा हा दूरगामी सकारात्मक परिणाम करणारा ठरला आहे.
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, २६.१२.२०२५)
संपादकीय भूमिकामहासत्ता असणार्या देशांसमोर न झुकता त्यांच्या विरोधात आक्रमक धोरण राबवून स्वतःचा विकास साधण्यातच भारताचे हित ! |
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग