‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !
१४ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘उद्योजकाच्या स्वभावात रजोगुण आणि षड्रिपू यांचे प्रमाण आढळणे, उद्योजकाला सामोरे जावे लागणारे ‘इन्स्पेक्टर राज’ आणि साधनेमुळे अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग सापडून उद्योगातील आवश्यक ती सिद्धता पूर्ण होणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहे.
(भाग १२)
लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.
भाग ११ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/986708.html

१. प्रत्येक दिवसाचा आरंभ प्रार्थनेने करणे !
आमच्या आस्थापनामध्ये विविध विभाग आहेत आणि ‘आस्थापनातील प्रत्येक कर्मचार्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी, तसेच प्रत्येकातील षड्रिपू न्यून व्हावेत’, यासाठी आम्ही प्रत्येक दिवसाचा आरंभ प्रार्थनेने करतो. ‘वैयक्तिक प्रगती, व्यावसायिक उन्नती, एकमेकांना सहकार्य करून सामूहिक प्रगती साधणे आणि उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी ईश्वराला नमन करणे’, या आशयावर आधारित ही प्रार्थना प्रतिदिन सकाळी प्रत्येक विभागात सामूहिकपणे म्हटली जाते.
२. आस्थापनातील सर्वांनी साधना केल्यास परस्पर सहकार्य, प्रामाणिकता आणि समन्वय यांच्यात वृद्धी होणे !
जसजसा उद्योग मोठा होत जातो, तसतसे नवे विभाग निर्माण होतात आणि त्यामधील मनुष्यबळ वाढत जाते अन् प्रत्येक व्यक्तीमध्ये षड्रिपू असतातच. त्यामुळे अनेकदा आस्थापनाचा सर्वांगीण विचार करण्यापेक्षा ‘आपल्या विभागातील काम योग्य चालले आहे’, हे सिद्ध करण्याकडेच काहींचा अधिक कल असतो. अशा वेळी ‘आपल्यावर काही येता कामा नये’, या भावनेतून दुसर्यावर उत्तरदायित्वाची ढकलाढकली चालू होते. ‘मला याने कळवले नाही. त्याने पूर्तता केली नाही’, असे गार्हाणे आणि आरोप-प्रत्यारोप केले जातात अन् त्याचा थेट परिणाम कामाची गुणवत्ता, तसेच गती यांवर होतो. परिणामी वैयक्तिक, तसेच व्यावसायिक प्रगतीही मंदावते; पण आस्थापनातील सर्वांनी साधना आणि नामस्मरण आत्मसात् केल्यास परस्पर सहकार्य, प्रामाणिकता अन् समन्वय यांची भावना वृद्धींगत होते.
३. उद्योग करतांना अनेक मनःस्ताप सहन करावे लागत असतांना साधनेने चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता

वर्ष १९९५ मध्ये आम्ही एक मशीन (यंत्र) घेतले होते. एका आस्थापनाने ‘पितांबरी’ उत्पादनाच्या ‘पॅकेजिंग’साठी (बांधणीसाठी) ते आम्हाला दिले होते; परंतु ते यंत्र नीट काम करत नव्हते, हे आम्हाला नंतर लक्षात आले आणि त्यामुळे आमची ६ लाख रुपयांची हानी झाली. याविषयीचा खटला अजूनही मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. वर्ष १९९५ पासून आज वर्ष २०२५ पर्यंत तब्बल ३० वर्षांनंतरही त्याचा निकाल लागलेला नाही. यावरून न्यायप्रक्रियेची किचकट, वेळखाऊ आणि खर्चिक रचना स्पष्ट होते. म्हणूनच कोणताही उद्योजक शक्यतो न्यायालयीन प्रक्रियेत पडणे टाळतो. उद्योजकांना उद्योग करतांना अनेक प्रकारचे मनःस्ताप सहन करावे लागतात आणि या अशाच सापळ्यांमध्ये अडकत गेल्यामुळे उद्योग मोठा करण्याची धडपड मागे पडते. नवीन काही करण्याची उर्मी किंवा वेगळे काही निर्माण करण्याची ऊर्जा हळूहळू न्यून होते. मग तो जेमतेम आणि कसातरी चाललेला व्यवसाय रडतखडत सांभाळत रहातो; पण जेव्हा आपण साधना, नामस्मरण चालू करतो, तेव्हा चित्र पूर्ण पालटू लागते.
यासह तथाकथित ‘इन्स्पेक्टर (उद्योग निरीक्षक) राज’च्या वातावरणातही आपल्याभोवती एक सकारात्मक वलय निर्माण होते. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो की, साधना आणि सात्त्विक पद्धतीने काम करणार्या उद्योजकांकडे इन्स्पेक्टरही न्यूनतम येतात; कारण अशा ठिकाणी सात्त्विकता, शुचिर्भूत वातावरण आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवते. देवतांची चित्रे, शांत वातावरण, नीटनेटकेपणा हे सर्व पाहून त्यांच्यातही एकप्रकारचा संकोच निर्माण होतो. जसे अनिष्ट शक्तींनाही देवाची भीती असते, तसेच चुकीचा मार्ग अवलंबू पहाणार्या लोकांनाही सात्त्विक वातावरणात एक अदृश्य मर्यादा जाणवते. त्यामुळे ते अधिक मागण्या करणे, चुकीच्या पद्धतीने वागणे किंवा अनुचित दबाव टाकणे टाळतात. परिणामी उद्योजक अधिक निडर, स्थिर आणि शांतपणे स्वतःचा उद्योग चालवू शकतो.
४. कर्मचार्यांचे संरक्षण आणि त्यांची प्रगती यांसाठी उद्योजकांनी दायित्वाने लढत रहाणे महत्त्वाचे !
दुसरे म्हणजे लढाऊ वृत्तीविषयी आपल्याला ‘भगवद्गीते’मध्ये आणि सनातन संस्थेनेही सांगितली आहे. देव आणि असुर यांच्यातील चांगल्या वाईटाविषयीची लढाई चालतच आली आहे. त्यामुळे आताच्या काळात स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यकच आहे. जसे आपल्या शरिरात प्रतिदिन अंतर्गत लढाया चालू असतात. अन्नातून, रक्तातून आलेले घटक, रोगजंतू, घातक कण यांच्याशी शरिरातील पांढर्या पेशी सतत युद्ध करत असतात. शरीर निरोगी रहाण्यासाठी या अदृश्य लढाया चालूच असतात. केवळ त्या आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला ठाऊक आहे की, भगवान विष्णु, शिव आणि गणपति यांनी वेगवेगळ्या असुरांचा संहार करून धर्मरक्षण केले. त्याचप्रमाणे आपण उद्योग करतो आहोत आणि सहस्र-२ सहस्र लोक आपल्यावर अवलंबून आहेत. त्यांचे संरक्षण करणे, तसेच त्यांची प्रगती होणे, हे उद्योजकाचे दायित्व आहे. त्यासाठी उद्योजकाने लढत राहिले पाहिजे; कारण ‘उद्योगाची हानी झाली, तर सगळ्यांची हानी होणार आहे आणि उद्योगाचा लाभ झाला, तर सगळ्यांचा लाभ आहे’, याची जाणीव प्रत्येक उद्योजकाला झाली पाहिजे.
५. आस्थापनात विधी विभाग असणे आवश्यक !
आपल्या उद्योगात ‘विधी (लीगल – कायदा) विभागा’ची स्थापना करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे व्यवस्थापन (ॲडमिनिस्ट्रेशन) विभाग, मानव संसाधन (ह्युमन रिसोर्स – एच्.आर्.) विभाग असतो; परंतु विधी विभाग बहुतेक ठिकाणी नसतो. विविध कायद्यांशी संबंधित ज्या लढाया आहेत, त्या कायदेशीर पातळीवर सक्षमपणे लढता आल्या पाहिजेत आणि त्याला योग्यरित्या तोंड देता आले पाहिजे. विधी विभाग असल्यास वेगवेगळ्या नोटिसा, सामंजस्य करार, विविध करारपत्रे आणि इतर कायदेशीर गोष्टी सहजतेने, तसेच अचूकतेने कार्यवाहीत आणणे शक्य होते.
गुरुकृपा असेल, तर सर्व सहज साध्य होऊ शकते !

मनुष्यजन्म आहे, तर दुष्प्रवृत्तीही असणार आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला वैध मार्गाने लढा द्यावाच लागणार. सनातन संस्थेचे उच्च दर्जाचे संत आणि सद्गुरु आपल्याला साधनेविषयी मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे आताच्या काळात शारीरिक (वैयक्तिक) त्रासाला जसे वैद्य औषध देऊ शकतात, तसे सनातनचे उच्च दर्जाचे संत, सद्गुरु आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात अन् आनंदी जीवनासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो.
याच भावनेतून जर प्रत्येक उद्योजकाने साधना, नामस्मरण आणि सात्त्विकता अंगीकारली, तर उद्योगही वाढेल अन् प्रगतीचे सारे मार्ग अगदी सहज उघडतील. अखेरीस ‘प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक निर्णयामध्ये, प्रत्येक यशामागे एकच सत्य आहे’, याची जाणीव होईल. गुरुकृपा असेल, तर सर्व साध्य आहे.
– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई
६. षडरिपूंवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व आणि त्यामुळे उद्योगाला होणारा लाभ
अनेकदा उद्योगात मोठ्या प्रमाणावर खरेदी (पर्चेस) केली जाते; पण ‘स्वस्तात वस्तू घेण्याच्या मोहापेक्षा उत्तम गुणवत्ता असलेल्या वस्तू घेणे अधिक लाभदायक असते’, हा दृष्टीकोन आपल्या खरेदी विभागाला शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण अल्प गुणवत्तेच्या वस्तू आपण मोहापोटी घेतल्या, तर उत्पादनात हानी होते, गुणवत्ता टिकत नाही आणि ‘ब्रँड’ची (आस्थापनाच्या उत्पादनाची प्रत) प्रतिमा खालावते. त्यामुळे ‘मोह’ हा षड्रिपू उद्योगाच्या निर्णयप्रक्रियेत येता कामा नये. त्याचप्रमाणे ग्राहकांवर किंवा ‘कस्टमर’वर ‘क्रोध’ (रागावणे) दाखवणे योग्य नाही.
ग्राहक काहीतरी सांगत असतांना ऐकून घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. षड्रिपूंवर नियंत्रण ठेवल्यास कोणत्याही गोष्टीत आपल्याला हानी होत नाही.
आपले जे स्पर्धक आहेत, त्यांच्याविषयी ‘मत्सर’ ठेवून काही उपयोग नसतो. उलट त्यांनी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत, त्यातून शिकून आपण आपल्या उद्योगात, उत्पादनात किंवा सेवेत त्याहून उत्कृष्ट गुणवत्ता, उत्तम सेवा दिली, तर त्याचा निश्चितच अधिक लाभ होतो. उदाहरणार्थ आमच्या दापोली आणि तळवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील पर्यटन विभागात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येतात. ‘ज्येष्ठ नागरिकांची योग्य काळजी कशी घ्यावी’, याचे प्रशिक्षण आम्ही आमच्या कर्मचार्यांना दिले आहे. गाडीतून उतरतांना किंवा चढतांना, देवळात जातांना, करमणुकीच्या ठिकाणी ते त्यांना हात देतात, आवश्यक तेवढे साहाय्य करतात आणि त्यांच्या आवश्यकता ओळखून सेवा देतात. त्यामुळे आमच्याकडे येणारे लोक अत्यंत समाधानी असतात आणि याचा आमच्या पर्यटन विभागाला मोठा लाभ झाला आहे.
७. ‘उद्योगात काम करणारे सेवाभावी लोक’, हेच आस्थापनाचे खरे आधारस्तंभ !
इतर आस्थापनांकडे पाहून आणि त्यातून शिकूनच आम्ही आमच्याकडे सुधारणा केल्या; म्हणूनच उद्योगात अशा प्रकारचे संवेदनशील, गुणवत्तापूर्ण अन् सेवाभावी लोक आपण निवडले पाहिजेत. आपल्या उद्योगात काम करणारे लोक, हेच आस्थापनाचे खरे आधारस्तंभ असतात. ते ग्राहकांना कशी सेवा देतात, त्यांची वृत्ती, त्यांचा दृष्टीकोन यांवरच उद्योगाची प्रतिष्ठा अन् प्रगती अवलंबून असते. त्यामुळे त्यांचे कामकाज, सेवा आणि वर्तन यांकडे अत्यंत बारकाईने लक्ष दिले पाहिजे. हे सर्व करतांना षड्रिपूंवर नियंत्रण ठेवून काम करणे महत्त्वाचे आहे.
वाचकांना सूचना
या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.
८. मनात अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी…
स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे, ‘एखादी रेषा छोटी करायची असेल, तर ती पुसण्यापेक्षा तिच्या शेजारी मोठी रेषा काढावी.’ त्याचप्रमाणे आपणही गुणवत्ता, उत्कृष्ट सेवा, उत्तम वातावरण आणि नामस्मरण यांची मोठी रेषा काढली पाहिजे. त्यामुळे ‘परमेश्वर आपल्या समवेत आहे आणि आपण सर्व कायद्यांचे पालन करत आहोत’, ही जाणीव आपल्या मनात अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.
९. प्रतिदिन धोकादायक परिस्थितींमधून जात असतांना स्वतःभोवती एक सुप्त दैवी शक्ती कार्यरत असणे !
कधी चुकीचे लोक किंवा परिस्थिती आपल्यासमोर आलीच, तर लढाई टाळण्यापेक्षा ती केली पाहिजे. ही लढाई नेहमीच शारीरिक असते, असे नाही. ती कायदेशीर असू शकते, करारातील अटींची असू शकते, चर्चा आणि संवाद यांविषयीचीही असू शकते. भगवान श्रीकृष्ण स्वतः युद्धभूमीवर उपस्थित होते, तेव्हा अर्जुन तर केवळ निमित्तमात्र होता. महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा पांडव जिंकले, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आधी रथातून उतरायला सांगितले. अर्जुन सिद्ध नव्हता; परंतु आज्ञा मानून तो उतरला. तो उतरताच जसा श्रीकृष्णही रथातून उतरला, तेव्हा क्षणात पूर्ण रथ भस्मसात् झाला. श्रीकृष्ण म्हणाला, ‘मी रथावर होतो, तोपर्यंत शत्रूंची अस्त्रे, श्राप, आक्रमणे हे काहीच त्या रथाला स्पर्श करू शकत नव्हते; कारण माझे दैवी संरक्षककवच त्या रथाभोवती होते.’ तसेच गुरुकृपेचे कवच आपल्या आयुष्याभोवती असते.
प्रतिदिन आपण किती धोकादायक परिस्थितींमधून जातो, प्रवास, गोंधळ, ताण, संकटे सहन करतो, तरी आपल्याला काहीच होत नाही; कारण आपल्याभोवती एक सुप्त दैवी शक्ती कार्यरत असते. ‘गुरूंवरचा आपला विश्वास’, हेच त्या शक्तीचे केंद्र आहे. जेव्हा याची आपल्याला जाणीव होते, तेव्हा आपला ‘अहंकार’ आपोआप न्यून होतो; कारण तेव्हा आपण जाणतो, ‘आपले काहीच नाही आहे. जे काही आहे ती परमेश्वराचे देणे आहे. आपण स्वतः काहीच करत नाही, हे गुरूंचे संरक्षककवच आहे.’
जसे आपण नामस्मरण वाढवत जातो, तसे हे संरक्षककवच अधिक बळकट होते. मन अधिक सकारात्मक होते. भीती न्यून होते. संकटांची तीव्रता न्यून होते. स्वतःचा आत्मविश्वास वाढतो, सकारात्मकता वाढते आणि त्यामुळे आपोआप उद्योग मोठा करण्याची प्रेरणा मिळते. या प्रेरणेने तुमचा उद्योगही टप्प्याटप्प्याने प्रगती करत जातो. अशा वेळी ‘स्वतःपुरतेच काही ठेवावे’, असा मोह रहात नाही, तर सर्वांना समवेत घेऊन चालण्याची भावना निर्माण होते आणि त्यामुळे उद्योग सर्वांगाने विस्तारतांना दिसतो.
‘गुरुदेवांनी हे ज्ञान दिले’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः नमन !’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे. (१०.१२.२०२५)
भाग १३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/993925.html
|
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !