व्यावसायिक पत्रकारितेच्या काळातील ‘सनातन प्रभात’ची वाटचाल !

वर्ष १९९९ मध्ये सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी चालू केलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशातील अग्रगण्य वृत्तपत्रांच्या तुलनेत हा काळ काही मोठा नाही; परंतु सेवाभावी वृत्तीने चालवल्या जाणार्‍या एखाद्या वृत्तपत्राने २६ वर्षे तग धरून रहाणे, हे काही सोपे नाही. सध्या पत्रकारितेला आलेले व्यावसायिक स्वरूप आणि त्यामुळे ढासळलेली पत्रकारिता, अशा स्थितीतही ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाने पत्रकारितेच्या मापदंडाच्या मर्यादा राखून पत्रकारिता केली. ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पत्रकारितेची सध्याची स्थिती आणि अशा स्थितीतही ‘सनातन प्रभात’ची चालू असलेली पत्रकारिता याचा गोषवारा या लेखातून घेऊया !

– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई.

१. पत्रकारिता हरवत आहे !

सध्या बहुतांश वृत्तवाहिन्यांचे पत्रकार राजकीय नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेचे भांडवल करून पत्रकारिता करतांना दिसतात, उदाहरणार्थ एका राजकारण्याने केलेल्या अभ्यासहीन टीकेविषयी दुसर्‍या राजकारण्याला प्रतिक्रिया विचारणे आणि त्याने टीका केल्यावर परत पहिल्या नेत्याची प्रतिक्रिया घेणे. अशा प्रकारे कोंबड्यांच्या झुंजी लावल्याप्रमाणे सध्याची पत्रकारिता दिसून येते. अनेक वृत्तवाहिन्यांवरील दिवसभरातील बहुतांश बातम्या अशाच प्रकारच्या असतात. अशा वृत्तांचा समाजहितासाठी काडीचाही उपयोग होत नाही. अशा वृत्तांमुळे जनतेच्या समस्यांना वाचा फोडणारी, भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारी शोधपत्रकारिता आणि अभ्यासू पत्रकारिता लोप पावत आहे.

श्री. प्रीतम नाचणकर

२. राजकीय वाद दाखवण्यामागील पत्रकारांची अगतिकता !

सद्य:स्थितीत अनेक वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांना प्रत्येक मासाला ठराविक रकमेची विज्ञापने प्राप्त करण्याचे ध्येय दिले जाते. हे उद्दिष्ट काही लाख रुपयांत असते. नोकरी टिकवण्यासाठी तेवढी विज्ञापने मिळवणे, हे त्यांना बंधनकारक असते. त्यासाठी पत्रकारांना राजकीय पक्ष आणि नेते मंडळी यांच्याशी हितसंबंध राखावे लागतात, त्यांना प्रसिद्धी द्यावी लागते. विज्ञापने मिळवण्यासाठी आणि त्याचे पैसे वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ द्यावा लागतो. संपादकांनाही वृत्तपत्राच्या मालकाला वृत्तपत्रातून ठराविक रक्कम द्यावी लागते. सद्य:स्थितीत वृत्तपत्रांच्या खपापेक्षा त्यातील  विज्ञापनांमुळे मोठ्या रकमा प्राप्त होतात. त्यामुळे सद्य:स्थितीत चांगली बातमी करणार्‍यांपेक्षा जो चांगल्या प्रकारे विज्ञापने मिळवू शकेल, अशांची पत्रकार म्हणून निवड करण्याचे प्रकार होतात आणि पत्रकारांना राजकीय नेत्यांकडून विज्ञापने मिळत असल्यामुळे त्यांच्या बातम्या प्रसिद्ध करणे, ही पत्रकारितेची अगतिकता झाली आहे. हा भाग विशेषत: वृत्तवाहिन्यांमध्ये दिसून येतो.

३. दिवसभर काय दाखवणार ?

वृत्तवाहिन्यांचे प्रसारण २४ घंटे असते, त्यामुळे एवढा काळ बातम्या प्रसारित करावयाच्या असल्यामुळे अनेक वृत्ते तिखटमीठ लावून आणि ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली (तात्काळ महत्त्वाची बातमी देण्याच्या नावाखाली) खपवली जातात. दीर्घकाळ प्रक्षेपण करावयाचे असल्यामुळे नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप दाखवण्यावर वृत्तवाहिन्यांचा भर असतो.

४. अभ्यासू पत्रकारिता लोप पावत आहे !

काही मासांपूर्वी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला महाराष्ट्राच्या विधीमंडळात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते जेव्हा पत्रकार परिषद घेण्यासाठी आले, त्या वेळी माझ्या बाजूला असलेल्या पत्रकारांनी ‘हे कोण आहेत’, असे विचारले. काही पत्रकार विधीमंडळामध्ये वृत्तांकन करण्यासाठी येतात; मात्र त्याविषयी कामकाजाचे नियम त्यांना ठाऊक नसतात. एखाद्या गोष्टीची माहिती नसणे, ही काही चूक नाही; मात्र वर्षानुवर्षे पत्रकार म्हणून काम करतांना आपण ज्या क्षेत्रात आहोत, त्याचा ते अभ्यास करत नाहीत. त्याचा एकूणच परिणाम पत्रकारितेच्या दर्जावर होतो.

५. पत्रकारितेच्या मागील विविध मुखवटे

पत्रकारांचा राज्यात मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री, अधिकारी यांच्याशी संपर्क असतो. याचा दुरुपयोग करत काही जण ‘पत्रकार’ म्हणून वावरतात; मात्र त्यांची धडपड स्वहित साधण्यासाठी असते. काही जण नेत्यांचे वा राजकीय पक्षांचे खबरे म्हणूनही काम करतात. काही जण स्वत:च्या वृत्तपत्रासाठी विज्ञापने आणि शासकीय सवलती पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत असतात. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पत्रकारितेचा दर्जा घसरला आहे.

व्यावसायिक काळात ध्येयाने पत्रकारिता करण्याचे दिव्य !

पत्रकारितेचा अनुभव नसतांनाही वृत्तपत्र चालू करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वत: ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे ‘समूह संपादक’ म्हणून कार्य पाहिले. सनातन संस्थेच्या साधकांमधून वार्ताहरांची फळी निर्माण केली. अशा प्रकारे पत्रकारिता व्यवसायिकतेकडे झुकली असतांना हिंदु राष्ट्राची स्थापना हे उद्दिष्ट बाळगून ‘सनातन प्रभात’ने २६ वर्षे सेवाभावी वृत्तीने केलेली पत्रकारिता निश्चितच दिव्य आहे. संपादकांपासून संरचनाकार, वार्ताहर आणि वितरण या सर्व स्तरांवर सेवाभावी वृत्तीने ‘सनातन प्रभात’ चालवले जात आहे. केवळ पान भरण्यासाठी बातम्या न देता समाज, राष्ट्र आणि धर्म हित साधणार्‍या बातम्या देण्याचे व्रत ‘सनातन प्रभात’ पाळत आहे.

राष्ट्र-धर्माची ढाल होऊन केली जाणारी पत्रकारिता !

या कालावधीत ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)च्या पाठ्यपुस्तकांतून परकीय आक्रमणकर्त्या मोगलांचा इतिहास वगळणे, गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवणे, चित्रपट आणि समाजमाध्यमे यांद्वारे होणारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे हनन रोखणे, प्लास्टिक अन् कागदी छोट्या राष्ट्रध्वजांमुळे होणारा अवमान रोखणे, लव्ह जिहादच्या घटनांविषयी हिंदूंमध्ये जागृती करणे आदी अनेक समाज, राष्ट्र आणि धर्म विषयक समस्यांना ‘सनातन प्रभात’ने वाचा फोडली. हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण करून त्यांना धर्मरक्षणासाठी प्रवृत्त केले. अशा प्रकारे राष्ट्र आणि धर्म यांची ढाल होऊन ‘सनातन प्रभात’ने पत्रकारिता केली.

सद्य:स्थितीत चार वृत्तपत्र आवृत्यांसमवेत ‘ऑनलाईन’ संकेतस्थळ, ‘यू ट्यूब चॅनेल’ ‘एक्स’ (X), ‘टेलिग्राम’ आणि ‘इंस्टाग्राम’ यांमाध्यमातूनही ‘सनातन प्रभात’ कार्यरत आहे. आधुनिक काळातील या माध्यमांचे बारकावे आत्मसात् करून ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांना वार्तांकनासाठी अधिक सक्षम व्हावे लागेल. ‘येत्या काळात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात पत्रकारितेच्या माध्यमातून प्रभावी योगदान देण्यासाठी आम्हाला बळ मिळावे’, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना ! (२८.१२.२०२५)

– श्री. प्रीतम नाचणकर

अशा स्थितीमुळे ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ या पत्रकारितेच्या बिरुदावलीला तडा जातो. अशी पत्रकारिता वांझोटी ठरते. समाजमन घडवण्याचे आणि समाज परिवर्तनाचे कार्य अशी पत्रकारिता करू शकत नाही. पत्रकारितेची ही एक काळी बाजू असली, तरी आजही असे पत्रकार आहेत, जे चांगल्या बातम्या मिळवण्यासाठी कष्ट घेतात. त्यांचा अभ्यास दांडगा आणि अवांतर वाचनही असते. सद्य:स्थितीत नोकरी म्हणूनही पत्रकारिता करावी लागत असली, तरी त्यांनी पत्रकारितेत कधी व्यावसायिकता आणली नाही. अशा पत्रकारांकडून अनेक गोष्टी शिकता येतात. अशा पत्रकारांची राजकीय नेत्यांनाही जरब असते. समाजहितकारी कार्याकरता पत्रकारितेची ही जरब आवश्यक असते. अशा पत्रकारांची संख्या मात्र न्यून होत आहे, ही वस्तूस्थिती आहे.