उद्योगातील अडचणींवर मात करण्यासाठी साधनेचा होणारा उपयोग !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

आपला संपूर्ण जीवनप्रवास म्हणजे मनुष्यजन्माचे सार्थक करणारा मार्ग आहे. ‘परमेश्वरी गुण आपल्या अंगी रुजावेत’, यासाठी साधनेला विलक्षण महत्त्व आहे, हे आपण मागील काही लेखांमध्ये पाहिले आहे.   

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि., ठाणे.

(भाग ११)

‘या लेखाचा आधीचा/मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/984178.html

‘पितांबरी’ उद्योग समुहातील कर्मचार्‍यांसह  डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

१. कलियुगात आढळणारे त्रिगुणांचे प्रमाण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सांगतात, ‘‘युगांनुसार साधनेचे स्वरूप पालटत असते आणि आपण आज कलियुगाच्या मध्य किंवा शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत.’’ गुरुदेवांनी लिहिलेले ग्रंथ आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या लेखांतही हे वारंवार वाचायला मिळते की, कलियुगात सत्त्वगुण अत्यल्प, रजोगुण अधिक आणि तमगुण सर्वाधिक प्रमाणात आढळतात. साधारणपणे प्रत्येक व्यक्तीमध्ये १० टक्के सत्त्वगुण, ३० टक्के रजोगुण आणि ६० टक्के तमोगुण, असे प्रमाण दिसून येते. सत्त्वगुणी माणसे सतत देण्याचा प्रयत्न करतात. रजोगुणी माणसे देतात आणि दुसर्‍याकडून घेतातही. ज्यांच्यात तमोगुण प्रखर असतो, तर ती केवळ घेण्याचीच प्रवृत्ती बाळगतात, अशा व्यक्तींना ‘आसुरी प्रवृत्ती’चे म्हटले आहे.

२. आसुरी प्रवृत्ती समाजात वाढल्याने होणारी परिस्थिती

आज आपण पुस्तके, वर्तमानपत्रे, बातम्या किंवा समाजातील घटना पहातांना अथवा वाचतांना अनेकदा मनात भीती अन् असुरक्षितता निर्माण होते. ‘आपण एखाद्याशी चांगले वागलो, तरी समोरच्या व्यक्तीचे वर्तन तसेच असेल’, याची शाश्वती नसते. ‘भय इथले संपत नाही’, हे आपण अनुभवत रहातो. आसुरी प्रवृत्तीची माणसे समाजात वाढली, तर परिस्थिती भयावह होऊ शकते. काही ठिकाणी हिंसा, अशांतता आणि कायदा यांचा अभाव पसरलेलाच दिसतो. आपण अनेकदा म्हणतो, ‘इथे स्वर्गासारखे वातावरण आहे किंवा नरकासारखी परिस्थिती आहे’, उदा. काही नक्षलग्रस्त भागांमध्ये पोलीससुद्धा सहज पाऊल ठेवू शकत नाहीत.

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

३. भारतीय इतिहास हा संघर्षाचाच !

पूर्वीपासून सांगितले गेले आहे की, देव आणि असुर, म्हणजेच सज्जन अन् दुर्जन प्रवृत्तीची माणसे. ज्यांच्यात सत्त्वगुण प्रबळ आहे, ते देवस्वभावाचे आणि ज्यांच्यात तमोगुण अधिक आहेत, ते आसुरी प्रवृत्तीचे मानले गेले आहेत. सत्त्व आणि तम यांच्यातील संघर्ष मानवी समाजात प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. द्वापरयुग, त्याआधीचे युग आणि विशेषतः कलियुगात हा संघर्ष अधिक तीव्र होत गेलेला दिसतो. सहस्र वर्षांचा इतिहास पाहिला, तर तो संघर्षाचाच होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगल आक्रमणांना तोंड देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. नंतर इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला आणि अखेर भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले, जिथे सज्जन प्रवृत्ती, न्याय आणि शिस्त यांना प्राधान्य मिळाले.

४. उद्योजकाच्या स्वभावात रजोगुण आणि षड्रिपू यांचे प्रमाण आढळणे !

उद्योगामध्ये ‘उद्योजक’ हा ‘प्रॉफिट’कडे (लाभ मिळण्याकडे) पहात असतो. ‘प्रॉफिट’ आणि ‘मॅनेजमेंट’ची (व्यवस्थापनाची) तत्त्वे पाहून तो उद्योग व्यवस्थित चालवण्यासाठी प्रयत्नशील असतो. उद्योजक हा माणूसच असल्यामुळे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू त्याच्यातही असतात. जेव्हा आपण कुलदेवतेचे किंवा दत्तगुरूंचे नामस्मरण करतो, तेव्हा हळूहळू स्वतःतील सात्त्विकता ३० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढते. उद्योजक कायम सक्रीयपणे कार्य करत असतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावात साधारण ३० टक्के रजोगुण असतो आणि १० किंवा २० टक्के षड्रिपूंचे प्रमाण दिसते. हेच स्वभावदोष, अहंकार किंवा इतर प्रवृत्ती प्रतिदिनच्या व्यवहारामध्ये प्रकट होतात, उदा. उद्योजक एखादा महत्त्वाचा व्यवहार करतांनाही हे दोष दिसून येतात.


वाचकांना सूचना


या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.


५. उद्योजकाला सामोरे जावे लागणारे ‘इन्स्पेक्टर राज’ !

आता या स्वभावदोषांवर विजय कसा मिळवायचा ? तर उद्योजकालाही आसुरी शक्तींना सामोरे जावे लागते, म्हणजेच उद्योग क्षेत्रातील ‘इन्स्पेक्टर (उद्योग निरीक्षक) राज’ असे आम्ही म्हणतो. उद्योग क्षेत्रात विविध प्रकारचे ‘इन्स्पेक्टर’ (निरीक्षक) असतात. ‘फॅक्टरी ॲक्ट’ (कारखान्यांविषयीचा कायदा) योग्य प्रकारे पाळत आहोत का ?, ‘सेफ्टी ॲक्ट’चे (सुरक्षेविषयीचा कायदा) नियमानुसार पालन होत आहे का ?, ‘इन्कम टॅक्स’ (आयकर), ‘जी.एस्.टी.’ (वस्तू आणि सेवा कर), असे अनेक कायदे आणि ते पडताळणारे अधिकारी सतत येत असतात.

साधारण एक कारखाना (फॅक्टरी) चालवण्यासाठी  २४ प्रकारची ‘लायसन्स’ (परवाने) लागतात. त्यातील प्रत्येक घटक, नियमावली आणि प्रक्रिया यांचे संपूर्ण ज्ञान उद्योजकाला बहुतेक वेळा नसते; कारण तो विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा पदवीधर अथवा अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला असतो आणि त्याला उद्योग कसा करावा ?, तो चालवण्यासाठीची व्यावहारिक माहिती दिली जात नाही. ‘मॅनेजमेंट’मध्ये (व्यवस्थापनात) जरी ‘प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट’ (व्यवस्थापनाची तत्त्वे) शिकवली जात असली, तरी एखाद्या उद्योगासाठी कोणते परवाने लागतात ?, कोणते नियम लागू होतात ? याचे शैक्षणिक मार्गदर्शन फारसे उपलब्ध नाही. स्वतंत्र व्यावहारिक अभ्यासक्रमही क्वचितच दिसतो. त्यामुळे ‘उद्योग कसा करायचा ?’, हे तुम्हाला एखादा विशेष ‘कोर्स ’ (अभ्यासक्रम) केल्यावर अथवा एखाद्या अनुभवी उद्योजकाकडे प्रत्यक्ष काम शिकल्यावर किंवा वंशपरंपरागत व्यवसायातूनच कळू शकते.

उद्योगासाठी होणारे कायदेशीर पालट बर्‍याचदा महत्त्वाचे आणि उपयुक्त असतातच; पण अनेक वेळा उद्योजकाकडून पैसे काढण्यासाठी ‘इन्स्पेक्टर राज’ या परिस्थितीचा अपलाभ घेतात. अनावश्यक अडथळे निर्माण करतात. उदाहरणार्थ एका एकर जागेत उत्पादन करतांना ‘फायर फायटिंग’साठी (अग्नीशमन यंत्रणेसंबंधी) अनुमाने २५ लाख रुपयांचा व्यय येतो. छोट्या उद्योजकाला हा व्यय परवडत नाही. मग वारंवार मागण्या वाढू लागतात. उदाहरणार्थ तुमच्याकडे एक एकर जागा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही उत्पादन करत आहात. समजा चुकून तिथे आग लागली, तर ती विझवण्यासाठी दीड लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, पंप, पाईपलाईन अशी सर्व ‘फायर फायटिंग’ सामग्री सिद्ध ठेवावी लागते, तसेच त्यासंबंधीची उपकरणे लावावी लागतात आणि यासाठी साधारण २५ लाख रुपयांचा व्यय येतो. उद्योग छोटा असेल, तर इतका मोठा व्यय त्याला परवडत नाही. मग निरीक्षक प्रत्येक वेळी येऊन हप्ता मागतो किंवा वारंवार पैशांची मागणी करत रहातो. अशी अनेक उदाहरणे आहेत. ‘छोटे असोत किंवा मोठे बहुतेक उद्योजक या भीतीच्या वातावरणातच काम करत असतात’, असे मला वाटते.

६. साधनेमुळे अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग सापडून उद्योगातील आवश्यक ती सिद्धता पूर्ण होणे !

जसजशी तुम्ही साधना चालू करता, नामस्मरण करता, तेव्हा तुमची एकाग्रता वाढते. तुमची विचारशक्ती आणि निर्णयक्षमता प्रबळ होऊ लागते. साधनेतून सूक्ष्म विचार करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते आणि ‘स्थुलातून सूक्ष्म श्रेष्ठ’, या आध्यात्मिक नियमांनुसार तुम्ही वागू लागल्यानंतर तुमचा उद्योग मोठा होऊ लागतो. तसतसे उद्योगासाठी आवश्यक कायद्यातील बारकावेही तुम्हाला समजत जातात. त्यांचा बारकाईने विचार आणि कायद्याचा अभ्यास करू लागता. यामुळे आपल्याला नियम ठाऊक होतात आणि केवळ आवश्यक अन् न्यूनाधिक व्ययात होणार्‍या गोष्टीच आपल्या लक्षात येतात. अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग सापडू लागतात आणि मग निरीक्षक आले किंवा कुणीही अधिकारी आले, तरी स्वतःची संपूर्ण सिद्धता असते अन् आपण त्या सर्व गोष्टींची पूर्तता केलेली असते. त्याचा अखेरीस आपल्यालाच लाभ होतो. (१०.१२.२०२५)

(क्रमशः पुढच्या रविवारी)

भाग १२ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/991406.html

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक