Bangladesh Youth Murder :हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या वतीने झारखंडमध्ये दीपू दास यांच्या हत्येच्या विरोधात आंदोलने आणि निवेदन

बांगलादेशावर निर्बंध आणि कट्टर गटांवर कठोर कारवाईची मागणी

 धनबाद येथील रणधीर वर्मा चौकात आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

धनबाद (झारखंड) – बांगलादेशातील मयमनसिंह परिसरात हिंदु तरुण दीपू चंद्र दास यांना धर्मांधांनी झाडाला बांधून जिवंत जाळल्याच्या आणि हिंदु समाजाला लक्ष्य करून त्यांची घरे, दुकाने यांवर अन् धार्मिक स्थळांवर नियोजनबद्ध आक्रमण होण्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि इतर संघटना यांनी झारखंडमध्ये निदर्शने केली. या हिंदूविरोधी हिंसेचा तीव्र निषेध नोंदवत रणधीर वर्मा चौक येथे आंदोलन केले. त्यानंतर धनबादचे उपायुक्त आदित्य रंजन यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बांगलादेशाचे भारतातील उच्चायुक्त यांना उद्देशून कारवाईची मागणी असलेले निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात भारत सेवाश्रम संघाचे स्वामी प्रज्ञात्मानंद महाराज, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे डॉ. निशांत दास, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे, तरुण हिंदूचे श्री. उज्ज्वल, अधिवक्ता परिषदेतून अधिवक्ता पंचानंद सिंह, विश्व हिंदु परिषदेतून श्री. सुनील कुमार, तसेच विश्व नागरिक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी आदी धर्मनिष्ठ सहभागी झाले होते.