महाराष्ट्रात १५ महिन्यांत १० सहस्रांहून अधिक सायबर चोर्‍या !

मुंबई, २३ जून (वार्ता.) – महाराष्ट्रात सायबर चोरट्यांनी अक्षरश: थैमान घातले आहे. जानेवारी २०२५ ते मे २०२६ या १५ महिन्यांत महाराष्ट्रात तब्बल १० सहस्र ५०५ सायबर चोर्‍या झाल्या आहेत. यात २ सहस्र ३७९ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे; परंतु चोर्‍यांच्या तुलनेत हे प्रमाण अतिशय अल्प आहे. २३ जून या दिवशी राज्यातील सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाविषयी आमदारांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर गृह विभागाने ही आकडेवारी दिली.

वर्ष २०२५ मध्ये मुंबईत ४ सहस्र ८२५ सायबर चोरीप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले असून १ सहस्र ४१० आरोपींना अटक झाली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये १ सहस्र ३१ कोटी रुपयांची चोरी झाली असून त्यांतील ११० कोटी रुपयांचा अधिकोषातील व्यवहार रोखण्यास पोलिसांना यश आले. ही आकडेवारी सायबर गुन्ह्यांचे भयावह वाढते प्रमाण आणि त्या तुलनेत कारवाईच्या मर्यादा उघड करते.

मोठी जनजागृती मात्र गुन्हे थांबत नाहीत !

महाराष्ट्रात ५० जिल्हा सायबर पोलीस ठाणी कार्यरत आहेत. सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी करण्यासाठी ‘१९३०’ हा हेल्पलाईन क्रमांकही आहे. सायबर गुन्ह्यांविषयी सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती, राज्यातील ३४ प्रमुख रेल्वेस्थानकांवर डिजिटल स्क्रीनद्वारे जागृती, पोलिसांद्वारे जनजागृती यांसह विविध प्रकारे जनजागृती चालू असूनही राज्यातील सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.