महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग

  • गृह विभागाचा अजब दावा !

  • वर्ष २०२५ मध्ये महाराष्ट्रात ८ सहस्र ६४३ बलात्कार !

मुंबई, २३ जून (वार्ता.) – वर्ष २०२६ मधील ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’मध्ये वर्ष २०२४ मधील महिलांवरील अत्याचारांची आकडेवारी देण्यात आली आहे. या अहवालानुसार वर्ष २०२४ मध्ये महिलांवरील अत्याचारांविषयी तब्बल ४७ सहस्र ९५४ गुन्हे नोंद झाले आहेत. या आकडेवारीनुसार महिलांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. २३ जून या दिवशी विधानसभेत विविध सदस्यांनी महिलांवरील अत्याचारांविषयी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याच्या गृह विभागाकडून दिलेल्या लेखी उत्तरात ही आकडेवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिलांवरील वाढते अत्याचार हे वाढलेली लोकसंख्या आणि महिलांमधील जागृती यांमुळे असल्याचा अजब दावा गृह विभागाने केला आहे.

महाराष्ट्राच्या वर्ष २०२५-२६ च्या आर्थिक पहाणी अहवालानुसार महाराष्ट्रात महिलांवरील बलात्काराच्या ८ सहस्र ६४३ दुर्दैवी घटना घडल्या आहेत. वर्ष २०२४ मध्ये महाराष्ट्रात ७ सहस्र ९४० महिलांवर बलात्कार झाले होते. वर्ष २०२४ च्या तुलनेत वर्ष २०२५ मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये ७०३ ने वाढ झाली. महिला आणि बाल अपराध प्रतिबंध विभागाच्या अहवालानुसारही वर्ष २०२४ च्या तुलनेत वर्ष २०२५ मध्ये बालकांवरील अत्याचारांमध्येही ४८२ ने वाढ झाली आहे.

अहिल्यानगरमध्ये ३ महिन्यांत ६४१ अल्पवयीन मुलींवर अत्याचार !

राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार कोल्हापूर परिक्षेत्रात वर्ष २०२४ आणि २०२५ या वर्षांत महिलांवरील अत्याचाराच्या २ सहस्र ३६२, तर विनयभंगाच्या ४ सहस्र ४८५ घटना घडल्या आहेत. अहिल्यानगरमध्ये वर्ष २०२२ ते २०२५ या कालावधीत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या ६४१ घटना घडल्या, तर जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत ४१ घटना घडल्या.