‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !

मुंबई – ‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या काही विद्यार्थ्यांना २१ जून या दिवशी प्रवेश नाकारण्यात आला. परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्राबाहेर यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. विद्यार्थ्यांसह पालकांनीही प्रशासनाकडे वारंवार विनंती केली; मात्र अधिकार्‍यांनी नियमांमध्ये कोणताही अपवाद करता येणार नसल्याचे स्पष्ट करत प्रवेश दिला नाही. डोंबिवली येथून आलेल्या दोघांना २ ते ५ मिनिटे असा विलंब झाला होता. गर्दी, वाहतूक कोंडी आणि बेस्टचा संप ही कारणे विद्यार्थ्यांनी दिली.

प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थिनीने संताप व्यक्त करतांना सांगितले, ‘‘प्रश्नपत्रिका फुटली, तेव्हा ही यंत्रणा कुठे होती ? त्या वेळी सहस्रो विद्यार्थ्यांची हानी झाली. आता केवळ २ मिनिटांच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.’’