केंद्र सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि ‘पीएम्-श्री’ योजना यांना साम्यवाद्यांचा विरोध !

(टीप : पीएम्-श्री – प्राईम मिनिस्टर्स स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया – केंद्र सरकार /राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार किंवा स्थानिक संस्थांद्वारे व्यवस्थापित केलेल्या निवडक विद्यमान शाळांना बळकट करून देशभरातील १४ सहस्र ५०० हून अधिक शाळांचा विकास करण्याविषयीची योजना.)

‘केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये देशभर ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ लागू केले. यांतर्गत भारताच्या शैक्षणिक धोरणाची पुनर्मांडणी करण्यासाठी देशभरातील सर्व राज्यांमध्ये ‘पीएम्-श्री’ योजनेंतर्गत शाळा चालू करण्याचा निर्णय वर्ष २०२२ मध्ये घेतला. सरकारच्या या उपक्रमास साम्यवादी पक्ष आणि मार्क्सवादी इतिहासकार हे तीव्र विरोध करत आहेत. याद्वारे त्यांचा भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक चौकट यांविरोधातील वैचारिक संघर्ष उघड झाला आहे. ‘पीएम्-श्री’ योजना एकाअर्थी भारतीय कम्युनिस्ट पक्षामुळे (भाकपमुळे) सर्वज्ञात झाली, अन्यथा त्यास कदाचित् एवढी प्रसिद्धी मिळालीही नसती. भाकपचे राष्ट्रीय सचिव डी. राजा, पक्षाचे केरळ राज्य सचिव बिनॉय विश्वम आणि राजा यांची पत्नी एनी राजा हे जगभरातील कम्युनिस्ट पक्षांचे चेहरे असून ते जगभरातील त्यांच्या साथीदारांना मार्गदर्शन करणारे वरिष्ठ नेतेही आहेत.

२३ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘इतिहासातील विसंगती दूर करण्यावर ‘पीएम्-श्री’ योजनेचा भर, प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर श्रद्धा नसणारे साम्यवादी, शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा ‘पीएम्-श्री’ योजनेचा उद्देश आणि सामान्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा साम्यवाद्यांचा कट’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.           

(उत्तरार्ध)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/989479.html

७. अमेरिकेतील ‘विद्वानां’च्या माध्यमातून खोटा इतिहास मांडण्याचा साम्यवाद्यांचा खटाटोप !

श्री. कुमार चेल्लपन

इरफान हबीब यांच्यासारख्या मार्क्सवादी इतिहासकारांनी स्वतःची पत गमावल्यानंतर साम्यवादी ‘विचारवंतां’नी भारताचा ५ सहस्र वर्षांचा इतिहास लिहिण्यासाठी अमेरिकेतील ‘विद्वानां’ची नियुक्ती केली. भारताचा इतिहास लिहिण्यासाठी ऑड्रे ट्रुश्के आणि वेंडी डॉनिगर या दोन महिलांना अमेरिकेतून बोलवण्यात आले. त्यांनी ‘निर्माण केलेला’ इतिहास साम्यवाद्यांना भावला. ट्रुश्के हिने मोगल शासक औरंगजेबाचा ‘औरंगजेबः द मॅन अँड द मिथ’ या शीर्षकाखाली इतिहास लिहिला. औरंगजेबाने काशीतील श्री विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर कसे उद्ध्वस्त केले ? आणि हिंदूंचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर कसे केले ?, हे सर्व उघड आहे. तरीही तिने लिहिलेल्या इतिहासात औरंगजेबाची इस्लामी धर्मांधता चांगल्या गोष्टींच्या रूपात सादर केली. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर तिने प्रकाशित केलेल्या ‘भारताचा ५ सहस्र वर्षांचा इतिहास’ या पुस्तकात औरंगजेबाला ‘सर्वशक्तीमान’ पदावर बढती दिली. याद्वारे तिने हिंदूंची दिशाभूल केली. असा खोटा इतिहास आपल्या मुलांना शाळा, महाविद्यालये आणि विद्यापिठे यांमध्ये शिकवला जातो.


चुकीच्या इतिहासाला ठामपणे विरोध करणारे राष्ट्राभिमानी इतिहासकार !

१. सत्य इतिहास समाजासमोर आणणारे कर्तव्यदक्ष इतिहासकार प्रा. आर्.सी. मुजूमदार !

‘भारतीय विद्या भवन’ने ‘द हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल’, ही ११ खंडांची मालिका प्रकाशित केली आहे, ज्याचे संपादन प्रख्यात इतिहासकार प्रा. आर्.सी. मुजूमदार यांनी केले आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे तत्कालीन अध्यक्ष के.एम्. मुन्शी यांच्या चिकाटीमुळे ही पुस्तके प्रकाशझोतात आली. त्यांना ‘श्रीकृष्णवर्धन चॅरिटी ट्रस्ट’चे अध्यक्ष तथा उद्योगपती जी.डी. बिर्ला यांनी साहाय्य केले. या जोडीने हा सत्य इतिहास प्रकाशित करण्यासाठी ‘भारतीय इतिहास अकादमी’ची स्थापना केली. सध्याच्या पिढीला भारतीय संस्कृती आणि इतिहास सांगितला पाहिजे . ‘प्राध्यापक मुजूमदार यांनी संपादित केलेली ही मालिका भारतीय इतिहासातील एक अभिजात कार्य ठरले’, असे म्हटले, तर ती अतिशयोक्ती होणार नाही. या पुस्तकांसाठी योगदान देणार्‍यांचा कसलाही स्वार्थ नव्हता. सध्याच्या काळातील बहुतेक इतिहासकार राजकीय नेत्यांपुढे हात पसरतात. त्यांना ‘ब्रेडच्या कोणत्या बाजूला लोणी आहे ?’, हे चांगलेच ठाऊक असते. अशात प्रा. मुजूमदार यांनी त्यांच्या पुस्तकांत औरंगजेबाने हिंदूंची कशा प्रकारे हत्या केली ?, याचे सविस्तर वर्णन केले आहे. दुसरीकडे मात्र साम्यवाद्यांनी मात्र अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्यासाठी, तसेच औरंगजेबाने हिंदूंच्या केलेल्या नरसंहारावर पडदा टाकण्यासाठी त्यांच्या मर्जीतील तथाकथित इतिहासकारांची नियुक्ती केली.

२. औरंगजेबाची हिंदुद्वेषी कृत्ये इतिहासातून वगळण्यास ठामपणे नकार देणारे हिंदु धर्माभिमानी बी.एल्. भैरप्पा !

अलीकडेच निधन झालेले बी.एल्. भैरप्पा यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’तील (‘एन.सी.ई.आर्.टी.’तील) त्यांचे अनुभवकथन केले आहे. जेव्हा इंदिरा गांधी यांच्या कुटुंबाचे हितचिंतक जी. पार्थसारथी यांनी भैरप्पा यांना ‘औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडले होते, त्याने अधिष्ठाता देवाला खाली खेचण्यासाठी हत्तीही सिद्ध केला आणि देवाला मंदिराच्या आवारातील विहिरीत फेकले’, या सत्य घटना वगळून इतिहास लिहिण्यास सांगितले. तथापि भैरप्पा यांनी त्यास ठाम नकार दिला. त्यामुळे त्यांना ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’तून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला अन् इतिहासाच्या लेखनासाठी त्यांच्या जागी एका मार्क्सवादी गुलामाची नियुक्ती करण्यात आली.

३. अयोग्य व्यक्तीकडून इतिहासाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करून घेण्यास स्वाभिमानी इतिहासतज्ञ प्रा. ए. श्रीधर मेनन यांचा नकार !

केरळच्या इतिहासावर पुस्तक लिहिणार्‍या प्रा. ए. श्रीधर मेनन यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते प्रकाशित करण्यापूर्वी ई.एम्.एस्. नंबुद्रीप्पाडू यांची अनुमती घेण्यास सांगितले होते. यावर मेनन यांनी त्यांना ‘चालते व्हा’, असे सांगितले. मद्रास विद्यापिठातून एम्.ए. (इतिहास) मध्ये सुवर्णपदक आणि प्रथम क्रमांक मिळवलेल्या, तसेच जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापिठातून ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ विषयात एम्.ए. पदवी प्राप्त करणार्‍या प्रा. मेनन यांनी लिहिलेल्या इतिहासाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या ई.एम्.एस्. नंबुद्रीप्पाडू यांनी करणे, हा एक मोठा विनोद ठरला असता. हेच मार्क्सवादी लोक ख्रिस्ती आणि इस्लाम यांच्याशी संबंधित गोष्टींत नेहमी गप्प बसतात. ‘जयपूर संवाद’ या कार्यक्रमात एक घटना घडली, जेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सध्याच्या सरचिटणीसांनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी ‘स्वतःचे पितळ उघडे पडेल’, या भीतीने घाईघाईने कार्यक्रमातून काढता पाय घेतला.’

– श्री. कुमार चेल्लप्पन

८. भारतीय संस्कृतीची जाण असलेल्यांनी लिहिलेला इतिहास, हा खरा इतिहास !

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला विरोध करणार्‍यांना तरुण पिढीला अज्ञानात ठेवायचे आहे. एकांगी नसलेल्या आणि भारताची संस्कृती अन् परंपरा यांची जाण असलेल्या लोकांनी लिहिलेला इतिहास हा उपखंडाचा खरा इतिहास आहे. भारतीय ज्ञानप्रणाली शाश्वत आहे आणि देवी सरस्वतीने तिला आशीर्वाद दिला आहे. जे तिच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि तिचा अपमान करतात, त्यांना शिक्षणाची देवी निश्चितच शाप देईल.’

– श्री. कुमार चेल्लप्पन्, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.