केंद्र सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि ‘पीएम्-श्री’ योजना यांना साम्यवाद्यांचा विरोध !

(टीप : पीएम्-श्री – प्राईम मिनिस्टर्स स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया – केंद्र सरकार /राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार किंवा स्थानिक संस्थांद्वारे व्यवस्थापित केलेल्या निवडक विद्यमान शाळांना सक्षम करून देशभरातील १४ सहस्र ५०० हून अधिक शाळांचा विकास करण्याविषयीची योजना.)

‘केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये देशभर ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ लागू केले. या अंतर्गत भारताच्या शैक्षणिक धोरणाची पुनर्मांडणी करण्यासाठी देशभरातील सर्व राज्यांमध्ये ‘पीएम्-श्री’ योजनेंतर्गत शाळा चालू करण्याचा निर्णय वर्ष २०२२ मध्ये घेतला. सरकारच्या या उपक्रमास साम्यवादी पक्ष आणि मार्क्सवादी इतिहासकार हे तीव्र विरोध करत आहेत. याद्वारे त्यांचा भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक चौकट यांविरोधातील वैचारिक संघर्ष उघड झाला आहे. ‘पीएम्-श्री’ योजना एकाअर्थी भारतीय कम्युनिस्ट पक्षामुळे (भाकपमुळे) सर्वज्ञात झाली, अन्यथा त्यास कदाचित् एवढी प्रसिद्धी मिळालीही नसती. भाकपचे राष्ट्रीय सचिव डी. राजा, पक्षाचे केरळ राज्य सचिव बिनॉय विश्वम आणि राजा यांची पत्नी एनी राजा हे जगभरातील कम्युनिस्ट पक्षांचे चेहरे असून ते जगभरातील त्यांच्या साथीदारांना मार्गदर्शन करणारे वरिष्ठ नेतेही आहेत.             

(पूर्वार्ध)

पीएम्.श्री – प्राईम मिनिस्टर्स स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया

१. ‘पीएम्-श्री’ योजनेद्वारे १४ सहस्र ५०० शाळा चालू करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस !

‘पीएम्-श्री’ योजनेद्वारे वर्ष २०२७ पर्यंत देशातील सर्व राज्यांमध्ये १४ सहस्र ५०० शाळा चालू  करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मानस आहे. ही योजना टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जात आहे. या योजनेंतर्गतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’चा भाग म्हणून सिद्ध केलेल्या अभ्यासक्रमानुसार शिकवले जाईल. केंद्र सरकारकडून या शाळांना पहिल्या ३ वर्षांसाठी अत्याधुनिक (स्मार्ट) वर्गांची निर्मिती, आधुनिक प्रयोगशाळा आणि भौतिक पायाभूत सुविधा, यांसाठी आर्थिक साहाय्य केले जाईल. या सर्व शाळांमध्ये विकसित देशांमधील शाळांप्रमाणे दर्जेदार क्रीडांगणे, ग्रंथालये आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना असतील.

श्री. कुमार चेल्लपन

२. इतिहासातील विसंगती दूर करण्यावर ‘पीएम्-श्री’ योजनेचा भर !

आज काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) यांची सत्ता असलेली राज्ये शिक्षणाद्वारे बाबर अन् औरंगजेब यांचे उदात्तीकरण करत असतांना ‘पीएम्-श्री’ शाळांमध्ये मात्र भारतीय ज्ञान आणि परंपरा यांचे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. अभ्यासक्रमातील विसंगती दूर करून इतिहास योग्य दृष्टीकोनातून शिकवला जाईल. त्याचप्रमाणे नेहरू-इंदिरा गांधी युगातील अभ्यासक्रमाने आतापर्यंत स्पर्श न केलेल्या मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनाही महत्त्व दिले जाईल. सर्व केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालये केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’चे पालन करतात; परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (भाकपला) मात्र ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ आणि ‘पीएम्-श्री’ शाळा, यांची भीती वाटते. ‘हा शिक्षण क्षेत्राचे भगवेकरण करण्याचे संघ परिवाराचा प्रयत्न आहे’, असा त्यांचा तथ्यहीन आरोप आहे.

३. प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर श्रद्धा नसणारे साम्यवादी !

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष (माकप) यांच्या दृष्टीने मूळ भारतीय असलेली कुठलीही गोष्ट निरुपयोगी आहे. ‘भगवान श्रीराम हे एक काल्पनिक पात्र आहे आणि रामायण ही एक काल्पनिक कथा आहे’, असा या दोन्ही पक्षांचा हिंदुद्वेषी दावा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भातही त्यांची अशीच भूमिका आहे.  त्यांच्यासाठी महाभारत हीदेखील एक काल्पनिक कथा आहे. कुरुक्षेत्र, गांधार (आजचे कंदहार) अयोध्या, हस्तिनापूर, मथुरा यांसारखी सर्व नावे त्यांच्या दृष्टीने निरर्थक आहेत. साम्यवाद्यांच्या म्हणण्यानुसार ‘दशरथ, माता सीता यांसारखी पात्रे काही लेखकांनी निर्माण केली आहेत.’ हेच कॉम्रेडवाले एकीकडे आयुर्वेदाचा द्वेष करतात आणि ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा मानतात, तर दुसरीकडे मात्र कट्टर कम्युनिस्ट नेते त्यांच्या आयुष्यातील भविष्याच्या संदर्भात जाणून घेण्यासाठी वारंवार ज्योतिषांचा सल्ला घेतात ! अलीकडेच केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव एम्.व्ही. गोविंदन् यांनी कन्नूर जिल्ह्यातील पय्यन्नूर येथील ज्योतिषी माधव पोथुवल यांची भेट घेऊन ‘नक्षत्रे काय भाकीत करतात ?’, हे जाणून घेतले. जेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना ‘तुम्ही ज्योतिषाचा सल्ला का घेतला ?’, असे विचारले, तेव्हा गोविंदन् म्हणाले, ‘माधव पोथुवल हे माझे दीर्घकाळापासूनचे मित्र असल्याने त्यादृष्टीने मी त्यांची भेट घेतली !’

४. शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा ‘पीएम्-श्री’ योजनेचा उद्देश !

संस्कृत विद्यापिठांमध्ये ज्योतिषशास्त्राचे पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि संशोधन अभ्यासक्रम असून हे अभ्यासक्रम शिकवल्या जाणार्‍या शाखांना सध्या मोठी मागणी आहे. ज्योतिषशास्त्रात केलेल्या संशोधन कार्यासाठी काही विद्वानांना विद्यावाचस्पती (पीएच्.डी.) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिका आणि युरोप येथील विद्यापिठांमध्ये ज्योतिषशास्त्रातील प्रमुख संशोधन कार्यक्रम आहेत आणि या विषयावर समवयस्कांनी पुनरावलोकन केलेले संशोधन लेख आहेत. आता ‘पीएम्-श्री’ योजनेकडे वळूयात. या शाळा देशभरातील निवडक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देतात, ज्यांत आधुनिक वर्ग आहेत. विशेष म्हणजे या शाळा ज्यांच्यासाठी दर्जेदार शिक्षण दुर्लक्षित आहे, अशा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समाजबांधवांना सार्वजनिक शालेय शिक्षण देतात. सर्व शाळांचा त्यांच्या कक्षेत समावेश करण्यासाठी टप्प्याटप्प्याने ‘पीएम-श्री’ शाळांची संख्या वाढवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.

५. सामान्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा साम्यवाद्यांचा कट !

साम्यवादी नेते स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवत असले, तरी गरीब आणि दलित वर्गाने अशा संस्थांमध्ये शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटत नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांचा मुलगा विवेक करुण याने ब्रिटीश विद्यापिठातून व्यवस्थापनाची पदवी मिळवली आणि तो संयुक्त अरब अमिरातीमधील एका बहुराष्ट्रीय अधिकोषात (बँकेत) व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या इतर नेत्यांच्या संदर्भातही असेच आहे. ते पक्षात नव्याने भरती झालेल्यांना बलपूर्वक देशी शाळांच्या उन्नतीकरणाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यास भाग पाडतात. ‘पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या आणि सामान्य माणसांच्या मुलांना जर ‘पीएम्-श्री’ शाळांप्रमाणे शिक्षण दिले गेले, तर ते त्यांच्या अभ्यासात अव्वल होण्याची आणि आमच्या मुलांना मागे टाकतील’, अशी भीती कम्युनिस्ट नेत्यांना वाटते. त्यामुळे त्यांना वंचितांना अज्ञानात ठेवायचे आहे. ‘सर्व समान आहेत; पण काही अधिक समान आहेत’, हे कम्युनिस्ट पक्षांचे बोधवाक्य आहे. कम्युनिस्ट नेत्यांची मुले नेतृत्व करण्यासाठी जन्माला येतात, तर इतरांना कायमच त्यांचे गुलाम म्हणून रहावे लागते.

६. पात्रता नसतांना स्वतःच्या कार्यकर्त्यांना पीएच्.डी. पदव्या वाटणारे साम्यवादी !

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांना चांगल्या पदांवर ठेवण्याचा ‘अभिनव’ मार्ग शोधला आहे. ज्यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करायची आहे, त्यांना पीएच्.डी. पदवी देऊन सन्मानित केले जाते, जेणेकरून ते त्यांच्या नावाअगोदर ‘डॉक्टर’ ही पदवी लावू शकतील. केरळमध्ये इंग्रजी, हिंदी, मल्याळम्, संस्कृत, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या भाषांमध्ये पीएच्.डी. पदवी प्रदान केली जाते. अशी पीएच्.डी. प्राप्त केलेल्या वरील पक्षांच्या कार्यकर्त्यांना राज्यातील कोणत्याही विद्यापिठात व्याख्याता किंवा सहयोगी प्राध्यापक म्हणून सहज नोकरी मिळते. तथापि त्यांच्या संशोधनाच्या विषयाविषयी त्यांना कुणीही काहीही विचारू शकत नाही. पीएच्.डी. मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या संशोधनाचे स्पष्टीकरण देण्यास ते स्वतःच असमर्थ असतात ! अलीकडेच केरळ विद्यापिठाने विजिथ विजयन् नावाच्या विद्यार्थ्याला संस्कृतमध्ये पीएच्.डी. प्रदान करण्याची शिफारस केली होती. या विद्यार्थ्याला संस्कृत कसे लिहायचे, बोलायचे किंवा वाचायचे ?, हेच ठाऊक नव्हते ! यावरून पीएच्.डी.साठी त्यांनी कशा प्रकारचे संशोधन केले असेल ?, हे लक्षात येते. ए. रहीम नावाचे राज्यसभेचे खासदारदेखील केरळ विद्यापिठाचे पीएच्.डी.धारक आहेत; पण त्यांच्या संशोधन प्रबंधांविषयी त्यांना काहीही न विचारणेच चांगले ! रहीम यांच्यावर विद्यापिठातील साहाय्यक प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याचा आरोप असून तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध ‘लूकआऊट नोटीस’ (फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रसारित केली जाणारी नोटीस) बजावली होती. हे खासदार मात्र राज्यसभेच्या अधिवेशनात दूरचित्रवाणीवर दिसतात !

(क्रमशः)

– श्री. कुमार चेल्लप्पन्, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.

संपादकीय भूमिका

७ दशकांहून अधिक काळ जनता योग्य इतिहासापासून वंचित रहाणे, हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांचे अपयश !

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –  https://sanatanprabhat.org/marathi/989887.html