पू. शिवाजी वटकर यांनी साधकांकडून करून घेतलेले मिठाईच्या रिकाम्या खोक्यांचे सूक्ष्मातील प्रयोग आणि त्या वेळी साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘१५ ते ३१.१.२०२५ या कालावधीत मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. देवद, पनवेल येथील आश्रमातून रामनाथी, गोवा येथील आश्रमात जाण्यापूर्वी मी ‘प्रत्येक प्रसंगात सूक्ष्मातून माझ्या मनाला काय जाणवते ? मला कोणती स्पंदने जाणवतात ?’, याचा साधनेच्या दृष्टीने अभ्यास करण्याचे ध्येय घेतले होते. त्या कालावधीत रामनाथी आश्रमात मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दैवी आणि चैतन्यमय सत्संग मिळाला. ‘ते साधकांना २० टक्के स्थुलातून शिकवतात, तर ८० टक्के सूक्ष्मातून शिकवून साधकांच्या अंतरात पालट घडवतात’, असे मला जाणवले. त्यांच्याच कृपेने मी मिठाईच्या रिकाम्या ३ खोक्यांचे प्रयोग साधकांकडून करून घेऊ शकलो. त्या प्रयोगातून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

पू. शिवाजी वटकर

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेला खोका (खोका क्र. ३)

(खोका क्र. ३) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेला खोका 

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेल्या मिठाईच्या खोक्यात पुष्कळ चैतन्य जाणवणे : १८.१.२०२५ या दिवशी झालेल्या सत्संगाच्या वेळी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रसाद म्हणून मिठाईचा एक ‘बॉक्स’ (खोका) दिला होता. त्यातील मिठाई मी काढून ठेवली. त्या खोक्याला (प्रयोगातील खोका क्र. ३ ला) चंदेरी रंगाचा कागद लावला होता. तो खोका दिसायला सर्वसाधारण होता; पण तो हातात धरल्यावर मला त्यामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवले. तेव्हा मला ‘मी हातात गुरुपादुका धरल्या आहेत’, असे जाणवले. त्यामुळे मी तो खोका काळजीपूर्वक कपाटात ठेवला.

१ आ. आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकाने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा हस्तस्पर्श झालेला खोका हातात धरून नामजप केल्यावर त्याचा त्रास दूर होणे : २०.१.२०२५ दिवशी सकाळी ७ वाजता तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले धैवत वाघमारे (मृत्यू दिनांक १७.६.२०२५, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि वय ४६ वर्षे) माझ्या खोलीत आले. माझ्या कपड्यांना इस्त्री करण्यासाठी ते माझे कपडे मागत होते. तेव्हा ते पुष्कळ थकलेले आणि धापा टाकत असलेले मला दिसले. ‘त्यांची प्राणशक्ती न्यून झाली आहे’, हे लक्षात घेऊन मी त्यांना ‘नामजपादी उपाय करून किंवा विश्रांती घेतल्यानंतर इस्त्री करण्याची सेवा करा’, असे सुचवत होतो; पण त्यांना तेव्हाच इस्त्रीची सेवा करायची होती. त्यामुळे मी त्यांना खोलीतील एका आसंदीवर बसवले. त्यांच्या हातात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी दिलेला मिठाईचा रिकामा खोका दिला आणि थोडा वेळ नामजप करण्यास सांगितले. आश्चर्य म्हणजे ३ – ४ मिनिटांतच धैवतदादांना पुष्कळ चांगले वाटले आणि नंतर त्यांनी कपड्यांना इस्त्री करण्याची सेवाही केली.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेला खोका (खोका क्र. २)

(खोका क्र. २) श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेला खोका

रामनाथी आश्रमात असतांना मला २९.१.२०२५ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग लाभला. त्यांनी मला प्रसाद म्हणून खाऊ दिला. त्या खोक्यातील मिठाई मी बाहेर काढून ठेवली. तो खोका (प्रयोगातील खोका क्र. २) पिवळसर रंगाचा आणि थोडी नक्षी असलेला होता. तो हातात धरल्यावर मला त्यामध्ये पुष्कळ शक्ती आणि चैतन्य जाणवले.

३. मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेला मिठाईचा खोका (खोका क्र. १) 

(खोका क्र. १) मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेला मिठाईचा खोका

माझ्याकडे पनवेल येथील मिठाईच्या एका चांगल्या दुकानातून काजूकतली विकत घेतलेला एक रिकामा खोका होता. (प्रयोगातील खोका क्र. १) त्या खोक्यावर सुंदर नक्षीकाम केले होते.

४. साधकांनी खोक्यांचा प्रयोग केल्यावर त्यांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

मी वैकुंठरूपी रामनाथी आश्रमातून देवद, पनवेल येथील आश्रमात परत आलो. साधकांना माझ्याकडून ‘रामनाथी आश्रमातील चैतन्य आणि गुरुदेवांची चैतन्यमय शिकवण’, यांविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा होती. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने या तिन्ही खोक्यांचा सूक्ष्मातील प्रयोग करण्याचे सुचले. फेब्रुवारी आणि मार्च या मासांत हा प्रयोग करण्यात आला. ‘आश्रमातील साधकाने एक-एक खोका हातात घेतल्यावर त्याला काय जाणवते ?’, असा हा प्रयोग होता. या प्रयोगाच्या वेळी साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

(चित्रावर क्लिक करा)

५. सूक्ष्मातील प्रयोगामुळे साधकांची भावजागृती होऊन आनंद मिळणे आणि साधनेसाठी प्रोत्साहन मिळणे

जेव्हा मी साधकांकडून हे प्रयोग करून घेत होतो, तेव्हा आमची पुष्कळ भावजागृती होऊन आनंद मिळत होता. प्रयोग करतांना आश्चर्यकारकरित्या सर्व साधकांची उत्तरे बरोबर आली. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर साधकांना घडवून त्यांना साधनेत कसे पुढे घेऊन जात आहेत’, याची आम्हाला जाणीव होत होती. नेहमीप्रमाणे मला साधकांना शब्दांतून साधना आणि अध्यात्म यांविषयी सांगणे किंवा पटवून देणे यांची आवश्यकताच भासली नाही. ‘साधकांनी सकारात्मक आणि आनंदी रहावे, तसेच शरणागत अन् कृतज्ञता भावात राहून साधना वाढवावी’, हे आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवले.

सनातनच्या साधकांमध्ये सूक्ष्मातून आंतरिक पालट घडवून साधकांची प्रगती करून घेणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.३.२०२५)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक