जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वैदिक सनातन धर्म आणि भारत यांचे महत्त्व !

१३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. खरेतर या महोत्सवाचे बोधवाक्य आहे, ‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’, म्हणजेच (सनातन) धर्मामुळे राष्ट्र विजयी होते.’ याच अनुषंगाने ‘धर्म आणि राष्ट्र यांचे अस्तित्व एकमेकांवर कसे अवलंबून आहे’, तसेच मनुष्यजीवनाचे महत्त्व यांविषयी ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

१० डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वैदिक धर्माचे महत्त्व, राष्ट्रीयत्व म्हणजे काय ? धर्म आणि राष्ट्र यांचे अस्तित्व आणि जगातील राष्ट्रांच्या इतिहासात मृत्यूवर विजय संपादन करणारे भारत हे एकच राष्ट्र’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/985189.html

१. राष्ट्राची अस्मिता आणि अस्तित्व !

व्यक्तीची जशी अस्मिता असते, तशीच राष्ट्राचीही अस्मिता असते. ‘अस्मिता’ याचा अर्थ इतर पदार्थांपेक्षा ज्या वैशिष्ट्यांमुळे आपले वेगळेपण उठून दिसते, त्या विशेषांसहित, म्हणजेच वैशिष्ट्यांसह असणारा आणि त्याने सिद्ध होणार्‍या आपल्या अस्तित्वाचा भाव म्हणजे अस्मिता ! हा आत्मा ज्या काही वैशिष्ट्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व आणि वेगळेपण सिद्ध करतो, त्याच्याच भरवशावर त्या राष्ट्राचे अस्तित्व अन् राष्ट्र या नात्याचे जीवित अवलंबून असते. एकात्म भावजीवन असलेला समाज म्हणजे राष्ट्र ! एखादे राष्ट्र जेव्हा या भावजीवनाचा किंवा अस्मितेच्या वैशिष्ट्यांचा परित्याग करते, तेव्हा ‘ते राष्ट्र नष्ट झाले’, असे म्हणतात. त्याच समाजाने अगदी वेगळ्या स्वरूपाच्या भावजीवनाचा स्वीकार केला, म्हणजे ‘नवे राष्ट्र त्या जागी जन्माला आले’, असे म्हटले जाते. जन्माला येणारे नवे राष्ट्र जुन्या राष्ट्रापेक्षा अधिक तेजस्वी आणि विकसित असले, तरी त्यामुळे ‘जुने राष्ट्र मेले, नष्ट पावले’, हे सत्य नाकारता येत नाही.

श्री. दुर्गेश परुळकर

२. भारतीय समाजाचे भावजीवन सहस्रो वर्षांपासून अस्तित्वात असणे

ग्रीक राष्ट्रापासून झारच्या रशियापर्यंतची राष्ट्रे मृत पावली, याचा हाच अर्थ आहे. भारतीय राष्ट्राने मृत्यूवर विजय मिळवला, याचाही अर्थ यावरून स्पष्ट होतो. आजच्या भारतीय समाजाचे जे भावजीवन आहे, ते सहस्रो वर्षांपासून जसेच्या तसे आहे. त्याच स्थितीत भारतीय समाज नांदत आहे, हे कोणत्याही निःपक्षपाती निरीक्षकाला मान्य करणे भाग पडते. अथर्ववेद आणि महाभारत यांत व्यक्त होणारी ‘गाय’ या विषयाची मातृत्वाची भावना भारतियांच्या मनात आजही तशीच जिवंत आहे.

३. भारतीय समाजाचे जुने भावजगत आणि एकात्मता !

श्रीराम आणि श्रीकृष्ण ज्या भावनेने गंगेच्या प्रवाहाकडे पहात होते, त्याच भावनेने आजचा हिंदु समाजही गंगेच्या प्रवाहाकडे पहातो. इतर समाजातील त्यांच्या प्राचीन इतिहासाचे अवशेष आज त्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक संग्रहालयातील प्रदर्शनीय वस्तू ठरत असतील; पण भारतीय राष्ट्रात आजचा समाज त्याच जुन्या भावजगताशी तितक्याच उत्कट संवेदनेने एकात्म झालेला आढळून येतो.

वैदिक सनातन धर्म आणि भारताचे अस्तित्व यांचे महत्त्व

सांप्रतकाळात जगात विशुद्ध तत्त्वज्ञान सांगून विश्वबंधुत्वाच्या गप्पा मारणारे अनेक देश मानवतेचा खाटिकखाना उघडून बसले आहेत. जिहादी वृत्ती, स्त्रियांवरील बलात्कार, स्वतःचा दबदबा जगात निर्माण झाला पाहिजे; म्हणून दादागिरी करणारे जगातील अनेक देश आज आपण अनुभवत आहोत. हे सारे पाशवी वृत्तीचे असून राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणारे आहेत. त्यांच्यापासून सर्वसामान्य मानवी समाजाचे रक्षण करण्यासाठी वैदिक सनातन धर्मच जगाचा सर्वांत मोठा आधार आहे. जगाचा हा आधारस्तंभ नष्ट करण्याच्या हेतूने जगातील अनेक राक्षसी आणि जिहादी प्रवृत्तीचे देश भारताच्या विरोधात संघटित होत असलेले दिसतात. दुर्दैवाने त्यांना आपल्या देशातील फुटीरतावाद्यांची साथ मिळत आहे. वैदिक सनातन धर्म आणि भारताचे अस्तित्व या दोनच गोष्टी पाशवी वृत्तीच्या अन् राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेल्या जिहादी प्रवृत्तीला नष्ट करून जगात शांतता प्रस्थापित करू शकतात. त्यासाठीच हिंदु धर्म आणि भारत यांना अबाधित राखणे, हे आपले परमकर्तव्य आहे !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

४. मनुष्यजीवनाचे महत्त्व !

४ अ. मनुष्यदेह आणि त्याचे साध्य ! : वैदिक काळातील ऋषिमुनींची तात्त्विक धारणा नि:संशय श्रेष्ठ प्रतीची आहे. सृष्टीकर्त्याने मानवी जीवन ही एक विशेष प्रकारची देणगी जिवाला दिली आहे. ‘तिचा उपयोग विशिष्ट पद्धतीने झाला पाहिजे’, अशी वैदिक काळातील ऋषिमुनींची दृढ धारणा आहे. लक्षावधी प्रकारचे देह या विश्वात आहेत. त्या सर्वांना गवसणी घालू शकणारी महान प्रतिभा आणि बुद्धीशक्ती यांचे विलास मंदिर असणारा माणसाचा देह, म्हणजे सृष्टीकर्त्याचे सर्वश्रेष्ठ कर्तृत्व होय. यावर ऋषिमुनींचा अनुभवसिद्ध विश्वास होता; कारण इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाचे शरीर अत्यंत दुर्बळ, अशक्त आणि असंरक्षित आहे; पण ही पशूसृष्टी नष्ट होऊ नये; म्हणून ‘पारध न करता हिंस्र पशूंना जीवदान द्यावे’, अशी योजना माणसाने आखली. त्यावरून बुद्धीशक्ती ही इतर सर्व सामर्थ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तिच्यामुळे माणसाला सर्व सृष्टीत श्रेष्ठ स्थान लाभले आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव ऋषिमुनींनी घेतला. ‘अशा श्रेष्ठ शक्तीचा उपयोग काही विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी झाला पाहिजे’, अशी इच्छा ज्याने ही शक्ती मानवाला प्रदान केली, त्याला असणे स्वाभाविक आहे.

४ आ. पाशवी वासना आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे, हा मानवी जीवनाचा हेतू नाही ! : ‘ईश्वराने दिलेली शक्ती निरर्थक नाही; म्हणून मानवी जीवनही निरर्थक आणि हेतूशून्य असू शकत नाही’, असा सिद्धांत ऋषिगणांनी मांडला. स्व्तःच्या पाशवी वासना आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे, हा मानवी जीवनाचा हेतू असू शकत नाही. हे तत्त्वज्ञान ऋषिगणांनी मानवी समाजाच्या अंतःकरणात ठसवण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले.

४ इ. नरदेहाला ईश्वराशी का जोडावे ? : मानवी समाजाला उपदेश करतांना समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘विविध प्रकारची रत्ने आपल्याला सहजपणे प्राप्त होतील; पण ‘चिंतामणी’ हाती लागणे कठीण आहे. त्याप्रमाणे अनेक योनींमध्ये आपल्याला जन्म प्राप्त होतो; पण मनुष्यदेह प्राप्त होणे दुर्लभ आहे. हा मनुष्यदेह श्रेष्ठ आहे; म्हणून विविध प्रकारच्या प्राणीसृष्टीत ‘मनुष्य’ हा सर्वांत श्रेष्ठ प्राणी आहे. त्याला जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त होण्याची संधी लाभली आहे; म्हणून या नरदेहाला ईश्वराशी जोडण्यासाठी माणसाने प्रयत्न केला पाहिजे.’

समर्थ रामदास स्वामी

४ ई. नरदेह निर्माण केल्यावर देवाला आनंद होणे : समर्थ रामदासस्वामी सांगतात, ‘भगवंताने एका पायाची, दोन पायांची, तीन पायांची, चार पायांची, अनेक पाय असलेली आणि पायाच नसलेली अशा अनेक नगरी निर्माण केल्या; पण त्या सर्वांत मनुष्यदेहाची नगरीच भगवंताला प्रिय आहे.’ ‘आपल्या श्रेष्ठ अशा अनादी आत्मशक्तीने वृक्ष, सरपटणारे प्राणी, पक्षी, मासे इत्यादी अनेक शरीररूपी नगरे निर्माण करून परमेश्वराला प्रसन्नता वाटली नाही; पण नरदेह निर्माण केल्यावर देवाला अतिशय आनंद झाला; कारण प्रत्यक्ष परब्रह्माचा साक्षात्कार करून घेणारी बुद्धीमत्तेची देणगी केवळ याच शरिराला लाभली आहे. अनेक प्रकारच्या योनींतून भ्रमण केल्यानंतर अतिशय दुर्लभ असा मनुष्यदेह कसाबसा प्राप्त होतो. तो अनित्य (क्षणभंगुर) असून मृत्यू हा या देहाच्या मागे सतत फिरतो. तथापि परमपुरुषार्थ केवळ याच शरिरात शक्य असतो; म्हणून धैर्यशील माणसाने सतत प्रयत्न करून परम पुरुषार्थाची प्राप्ती करून घ्यावी आणि स्वतःचर जन्म यशस्वी करावा’, अशा स्वरूपाचे मार्गदर्शन आपल्याला संत-महंतांनी केले आहे.

४ उ. परमपुरुषार्थ प्रत्यक्ष जीवनात उतरवणे, हे मनुष्याचे परमकर्तव्य ! : जीवनाचा हेतू अथवा ध्येयवाद ठरवण्याच्या तळमळीतून भारतीय तत्त्वज्ञान निर्माण झाले आहे. त्यामुळे ते तात्त्विक ध्येय प्रत्यक्ष जीवनात उमटवणे आणि जीवन तसे प्रत्यक्ष घडवून कृतकृत्य होणे, हेच तत्त्वज्ञानाचे खरे फलित अन् प्रयोजन आहे. मानवी जीविताचे तेच खरे साध्य आहे. अर्थात् तत्त्वज्ञान ‘परमपुरुषार्थ म्हणजे काय’, हे ठरवते. ‘तो परमपुरुषार्थ प्रत्यक्ष जीवनात उतरवणे, हे मनुष्याचे परमकर्तव्य आहे’, असे निश्चित ठरल्यावर तत्त्वज्ञान हा भारतात केवळ बौद्धिक चर्चेचा विषय राहिला नसून तो प्रत्यक्ष अनुभव आणि प्रयोग यांचा विषय ठरला. पाश्चात्त्य तत्त्वज्ञान हा केवळ बौद्धिक चर्चेचा विषय ठरला आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात ‘बौद्धिक मीमांसा’ या पलीकडे प्रत्यक्ष जीवन घडवणे, या गोष्टीला त्यांच्या तत्त्वविचारात कुठेही स्थान नाही. भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांत हाच मूलभूत भेद आहे.

५. ज्ञानीत्व आणि आदर्श मानवी जीवन

‘केवळ ज्ञान प्राप्त झाले, म्हणजे मानवी जीवन आदर्श होते’, यावर भारतीय तत्त्वज्ञानाचा विश्वास नाही. ज्ञानामुळे आदर्श कळतो, तो प्रत्यक्ष जीवनात आणण्यासाठी वेगवेगळी तपस्या आणि साधना यांची आवश्यकता असते. रावण ज्ञानी होता; पण त्याने ज्ञानाचा आदर्श स्वतःच्या जीवनात उतरवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यामुळे लोकांची संपत्ती हडप करण्याचा त्याचा क्रम कधी सुटला नाही. स्त्रियांची शिकार करण्याची त्याची प्रवृत्ती कधी थांबली नाही. त्यामुळे ज्ञानी असलेला रावण हा पाशवी वृत्तीचा आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेला क्रूरकर्माच राहिला.

६. अधर्माचरणी दुर्याेधन !

नुसते ज्ञान संपादन केले आणि ते जीवनात उतरवले नाही, तर काय होते ?, याचे दुसरे उदाहरण म्हणजे दुर्योधन आहे. दुर्योधन स्वतःच सांगतो, ‘जानामि धर्मं न च मे प्रवृतिः जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः ।’ (पाण्डवगीता, श्लोक २०) याचाच अर्थ मला धर्म काय आहे, ते कळते; पण माझी धर्माचरण करण्याकडे प्रवृत्ती नाही.  अधर्म काय हेही कळते; पण मी अधर्माचरण केल्यावाचून राहू शकत नाही. त्यापासून निवृत्त होऊ शकत नाही. (२३.११.२०२५)

(समाप्त)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक, डोंबिवली.