धर्माच्या अस्तित्वावरच राष्ट्राचे अस्तित्व अवलंबून !

१३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. खरेतर या महोत्सवाचे बोधवाक्य आहे, ‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’, म्हणजेच (सनातन) धर्मामुळे राष्ट्र विजयी होते.’ याच अनुषंगाने ‘धर्म आणि राष्ट्र यांचे अस्तित्व एकमेकांवर कसे अवलंबून आहे’, याविषयी ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

वैदिक धर्माचे महत्त्व

जगात अनेक विद्वानांनी धर्माविषयी साधक-बाधक चर्चा केली आहे. त्यांनी केलेली चर्चा एकांगी आहे. जगात अस्तित्वात असलेले अनेक धर्म आणि हिंदु धर्म किंवा वैदिक धर्म यांमध्ये भूमी-आकाशाइतके अंतर आहे. आपल्या ऋषिमुनींनी धर्माची केलेली व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.

यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धि: स: धर्म: । -वैशेषिक दर्शन, अध्याय १, आह्निक १, सूत्र ३

अर्थ : ज्या योगाने स्वतःचा अभ्युदय होऊन आपल्याला निश्चितपणे मोक्षप्राप्ती होते, तो धर्म होय.

‘याचाच अर्थ मानवी जीवनाचे लौकिक आणि परमार्थिक जीवन असे २ भाग आहेत. दोन्ही भागांमध्ये मानवी जीवनाची प्रगती व्हावी; म्हणून मार्गदर्शन करणारा सनातन वैदिक धर्म आहे. जगातील विद्वानांनी धर्माच्या या व्याख्येचा आधार न घेता धर्मावर चर्चा केली आहे; म्हणून त्यांची चर्चा एकांगी आहे’, असा निष्कर्ष निघतो.

स्वभावतः अविनाशी असणार्‍या सुखाचा नाश कुणीही करू शकत नाही. अद्वितीय अशा शाश्वत सुखात समरसून टाकण्यातच वैदिक धर्माचे महत्त्व आहे. त्रिकालबाधित वस्तूला मात्र नाश नसतो. त्रिकालबाधित सुखच सर्वांत इष्ट आहे. त्रिकालबाधित वस्तूचा लाभ किंवा खर्‍या सुखाचा लाभ व्हावा आणि शाश्वत सुखाची ओळख पटवून देऊन त्याची सर्वश्रेष्ठता विश्वाला स्पष्ट करून सांगणे, हेच सनातन वैदिक धर्माचे वैशिष्ट्य आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

सनातन धर्माचे महत्त्व

‘सुख’ असा शब्द उच्चारताच त्याचा अर्थ ‘शाश्वत सुख’ असाच घेतला पाहिजे. प्रारंभी सुखकारक वाटणारी गोष्ट शेवटी दुःखात परिवर्तित होत असेल, तर अशा गोष्टीच्या प्राप्तीसाठी कुणीही प्रयत्न करणार नाही; म्हणून शाश्वत सुखाला प्राप्त करण्यासाठी योग्य प्रकारचे मार्गदर्शन करणारा सनातन धर्म आहे. ‘सनातन’ याच्या नावानेच वैदिक धर्माचे प्राचीनत्व आणि महत्त्व व्यक्त होते. हाच एक विश्वधर्म म्हणून विश्वलोकांच्या मनात त्याचे बीज सहजतेने रूजू शकते.

सत्य वस्तूचे किंवा सत्य सुखाचे ज्ञान यालाच ‘तत्त्वज्ञान’ असे म्हणतात. हे तत्त्वज्ञान श्रेष्ठ अशा सनातन धर्माचे सर्वोत्कृष्ट असे मुख्य लक्षण आहे. सनातन धर्माने अखिल मानवजातीला त्रिकालबाधित सुखाचा साक्षात्कार करून देण्याचा विडा उचललेला आहे. ही दीक्षा परमात्म्याकडून मिळाली आहे. त्यालाच श्रुति-स्मृति, पुराणे, इतिहास अशा ग्रंथांचे संपूर्ण साहाय्य लाभले आहे. सत्यसुखाच्या प्राप्तीला अवश्य असणार्‍या सकल साधनांनी हा अत्यंत परिशोभित आहे.

…तर मी भारताकडेच बोट दाखवीन !

प्रा. मॅक्समुल्लर या पाश्चात्त्य पंडिताने वर्ष १८५८ मध्ये व्हिक्टोरिया राणीला जे पत्र लिहिले, त्या पत्रात त्यांनी भारताला ‘तत्त्वज्ञानाची मातृभूमी’ असे म्हटले. याच पत्रात ते लिहितात, ‘‘सर्व नैसर्गिक संपत्ती, शक्ती आणि सौंदर्य यांनी ईश्वरदत्त अशा अखिल उत्कृष्ट देणगीने अतिशय समृद्ध असणारा देश कोणता ?

म्हणून सर्व सृष्टीचे पर्यावलोकन करून सांगण्याचा प्रसंग जर मला प्राप्त झाला, तर मी भारताकडेच केवळ बोट दाखवीन ! दिव्य सुखाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असणार्‍या सर्व देणग्या आणि गुण यांनी पराकाष्ठेचा विकास पावलेले मानवी मन ज्या देशात आपल्या पूर्ण कलेने शोभायामान आहे. मानवी जीवनाच्या निगूढ आणि अतीमहत्त्वपूर्ण विषयांवर खोल विचार करून ही सर्व कोडी ज्या देशात अत्यंत समाधानकारक रितीने पूर्णतः उलगडून दाखवली आहेत. ‘प्लेटो कान्ट’ यांसारख्या तत्त्वज्ञानाचा संपूर्ण अभ्यास करून समाधान मिळवलेल्या पाश्चात्त्य पंडितांची मनेसुद्धा ज्याच्याकडे आकर्षली जातात, अशा दिव्य तत्त्वज्ञानाचा जन्म ज्या देशात झाला आहे, त्या देशाचे नाव काय ? म्हणून मला कुणी विचारल्यास मी सरळ आर्यावर्त अथवा भारतवर्ष यांकडेच बोट दाखवीन. ग्रीक, रोमन, युनानी जीव इत्यादिकांच्या विचारसरणीनेच परिपोषित असे आम्ही युरोपियन ज्या एका वाङ्मयाचा आश्रय करून ठाम सिद्धांताला येऊन पोचू, आमचे परमार्थिक जीवन पूर्ण होण्यास ज्याची म्हणून आम्हास अधिक आवश्यकता आहे, ज्याच्यामुळे आमचे जीवन अधिक विश्वव्यापी होईल, ज्याच्यामुळे आमचे जीवन खरोखरच मानवी जीवनाला सर्वतोपरी अधिक अनुरूप ठरेल, आमच्या विद्यमान जीवनात अधिक सुधारणा घडून येईल; केवळ ऐहिकच नाही, तर अनादी सिद्ध दिव्य जीवनालासुद्धा जे कारणीभूत होईल, निरतिशय सुखाच्या प्राप्तीचे साधन म्हणून जे, ते वाङ्मय कोणत्या एका देशात आपल्या पूर्ण रूपाने अस्तित्वात आहे म्हणून जर मला कुणी विचारले, तर आपोआप माझे बोट पुन्हा एकदा भारताकडे किंवा हिंदुस्थानकडेच वळेल.’’ (साभार : ‘आर्य संस्कृती’ ग्रंथातून, लेखक : परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.) श्रीधर स्वामी, पृष्ठ ७ आणि ८)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

अलौकिक असे एकमेवाद्वितीय भारत राष्ट्र !

ग्रीक राष्ट्र भारत राष्ट्र

जन्म, विकास आणि मृत्यू या चक्रांतून पूर्णपणे सुटलेले एकमेव राष्ट्र म्हणजे भारत !

गतकाळात घडलेल्या जगातील घडामोडी लक्षात घेतल्यावर महर्षि योगी अरविंद आपल्याला काय सांगू इच्छितात ? ते सांगतांना बाळशास्त्री हरदास वेदांतातील ‘राष्ट्रदर्शन’ या ग्रंथाच्या पूर्वार्धात लिहितात, ‘‘आपल्या देशाच्या राष्ट्रीयत्वाचा विचार केला असता जगातील राष्ट्रांच्या इतिहासात त्याचे वेगळेपणाने उमटून दिसणारे स्वरूप आपल्या लक्षात आल्यावाचून रहात नाही. जगातील सर्व राष्ट्रांना जन्म-मरणाच्या चक्रांत सापडावे लागले आहे. उत्पत्ती, विकास आणि विनाश या निसर्गनियमाच्या चक्रांतून जशी व्यक्तीची सुटका होत नाही, तशीच जगातील कोणत्याही राष्ट्राची सुटका या चक्रांतून झालेली नाही. हे जगाच्या इतिहासाने सिद्ध केले आहे. असे असले, तरी जन्म, विकास आणि मृत्यू या चक्रांतून पूर्णपणे सुटलेले एकमेव राष्ट्र म्हणजे भारत आहे. या राष्ट्राचा आरंभ कधी झाला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार्‍या संशोधकांनी आणि त्यांच्या साधनांनी असमर्थता व्यक्त केली आहे. ‘हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर उभे राहून आमच्यापेक्षा वयाने वडील असणारा कुणी आमचा बंधू आहे का ?’, असे म्हणून भारतीय राष्ट्राने मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही.’’

धाकटे बंधू अल्पायुषी ठरले !

भारत राष्ट्राहून प्राचीन असे राष्ट्र जगात दुसरे नाही. आपल्या वडील बंधूंच्या संबंधात असणारी ही वस्तूस्थिती लक्षात आल्यावर आमचे कुणी धाकटे बंधू आहेत का ? म्हणून आम्ही जर शोधू लागलो, तर आमचे सर्वच्या सर्व धाकटे बंधू काही काळ इतिहासाच्या क्षेत्रात विजेप्रमाणे तळपून गेले असले, तरी ते अल्पायुषी ठरले आहेत, असा इतिहासाचा संकेत सिद्ध करत आहे.

जगातील राष्ट्रांच्या इतिहासात मृत्यूवर विजय संपादन करणारे भारत हे एकच राष्ट्र !

‘युरोपला तत्त्वज्ञानाची दीक्षा देणारे आम्हीच काय ते जगात राज्य करण्यासाठी जन्माला आलो असून इतर मानव समाजाने आमचे दास्यत्व पत्करणे, हेच नैसर्गिक आहे’, अशी गर्जना करणारे ॲरिस्टॉटल आणि प्लेटो यांचे अन् फिलिप, तसेच अलेक्झांडर यांचे ग्रीक राष्ट्र आपल्याला आज कुठेही दिसत नाही. संपूर्ण युरोपला आत्माभिमान आणि विधीविधान, म्हणजे कायदा यांची देणगी देणारे सीझरचे ते रोमन राष्ट्र आज जगाच्या नकाशात कुठेही आढळत नाही. जगाच्या कल्याणासाठी अहिंसेच्या नावावर मानवी रक्ताचा सडा संपूर्ण पृथ्वीवर शिंपडणारी ती जुनी ख्रिस्ती राष्ट्रेही काळाच्या ओघात गडप झाली आहेत. जडवादावर अधिष्ठित असलेली नवी भांडवलवादी आणि साम्यवादी राष्ट्रे जगात निर्माण झाली आहेत. झारचा रशिया संपला असून तिथे नव्या राष्ट्राने जन्म घेतला आहे. आमच्या इतकाच दीर्घकाळ जीवन जगलेला चीन बौद्ध धर्मीय होता. त्याच चीनची अस्मिता आम्हीच सिद्ध केली होती; पण साम्यवादाचा चीनने अंगीकार केला आणि त्याने नवीन जन्म घेतला. तेथे नवे राष्ट्र उत्पन्न झाले, हे जेवढे खरे आहे, तेवढेच जुने राष्ट्र मृत पावले, हेसुद्धा खरे आहे; म्हणून जगातील राष्ट्रांच्या इतिहासात मृत्यूवर विजय संपादन करणारे भारत हे एकच राष्ट्र आहे.’

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर


राष्ट्रीयत्व म्हणजे काय ?

परमेश्वरानेच मानवजातीच्या उद्धारासाठी या भावी जीवनाचा वारसा आमच्याकडे सोपवला असून या भूमीच्या प्रत्येक रजकणांशी त्याचा निकटचा संबंध आहे. हे भावजीवन, म्हणजेच आमचे राष्ट्रीयत्व होय. ‘संपूर्ण विश्व ‘आर्य’मय करणे, हेच भावजीवन आहे’, असे ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ हा वेदांचा मंत्र उच्चरवाने सांगतो.

धर्म आणि राष्ट्र यांचे अस्तित्व

महर्षि योगी अरविंद सांगतात, ‘आपल्या राष्ट्राचे अस्तित्व सनातन धर्मासाठीच आहे. त्याचे पुनरुत्थान करण्यासाठी नाही, तर विश्वाच्या कल्याणासाठी आहे; म्हणून भारताचे पुनरुत्थान होईल, असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा त्याचा खरा अर्थ सनातन धर्माचे पुनरुत्थान होईल, असाच असतो. जेव्हा ‘हिंदुस्थान थोर पदवीला चढेल’, असे म्हटले जाते, तेव्हा त्याचा अर्थ ‘सनातन धर्म श्रेष्ठ पदवीला चढेल’, असाच असतो. जेव्हा ‘हिंदुस्थान वाढेल आणि विकसित होईल’, असे म्हटले जाते, तेव्हा त्याचा खरा अर्थ ‘सनातन धर्म वाढेल आणि जगात प्रसरण पावेल’, असाच असतो. धर्मासाठी आणि धर्मामुळेच हिंदुस्थानचे अस्तित्व आहे.

धर्मात चैतन्य उत्पन्न करणे, म्हणजे वस्तूतः भारत देशात चैतन्य उत्पन्न करणे होय ! कल्याणकारी विश्वधर्म हाच आहे. याला ‘हिंदु धर्म’ असे म्हणतात. याचे खरे कारण हिंदु राष्ट्राने त्याचे संरक्षण केले आणि तो टिकवून धरला, हेच आहे. सागर आणि हिमालय यांच्या मध्यभागी असलेल्या पवित्र भूमीत या धर्माचे संवर्धन झाले. या प्राचीनतम आणि पवित्रतम भूमीत पवित्र कर्तव्य म्हणून आर्य लोकांवर संरक्षणाचे कार्य प्रागऐतिहासिक काळापासून सोपवण्यात आले; म्हणूनच त्याला ‘हिंदु धर्म’ असे म्हणतात.

राष्ट्रीय आंदोलन, म्हणजे राजकीय चळवळ नाही. राष्ट्रीयत्व म्हणजे राजकीय प्रक्रिया नाही, तर धर्म, कर्तव्यकर्म आणि एक महान श्रद्धासंपन्न ध्येयवाद अन् जीवननिष्ठा होय. आम्हा भारतियांसाठी सनातन धर्म म्हणजेच राष्ट्रवाद होय. या राष्ट्रात हिंदु राष्ट्राचा जन्म सनातन धर्मासह झाला. धर्मासह राष्ट्राला गती उत्पन्न होते आणि धर्माच्या विकसनातच या राष्ट्राचे विकसन घडून येते. ज्या वेळी सनातन धर्माचा मावळता काळ येतो, तेव्हा या राष्ट्रालाही ग्लानी येते.

जर सनातन धर्म नष्ट होण्याच्या योग्यतेचा असेल, तर त्या धर्मासह हे राष्ट्र नष्ट होईल. सनातन धर्म हेच आमचे राष्ट्रीयत्व होय.’ (साभार : ‘वेदांतातील राष्ट्रदर्शन भाग १’, लेखक : बाळशास्त्री हरदास, पृष्ठ १४ आणि १५)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर


भारतीय संस्कृतीची प्राचीनता !

ज्ञात जगातील देवी शारदेचा पहिला वीणाझंकार, म्हणजे भारतियांचा ऋग्वेद ! हे सर्व इतिहास संशोधकांनी आता मान्य केले आहे. ऋग्वेदातच भारतीय राष्ट्राच्या अस्मितेचे सिद्ध स्वरूप दृष्टोत्पत्तीला येते. जुन्या असुर राष्ट्राचा अथवा आजच्या पारसी लोकांचा धर्मग्रंथ ‘अवेस्ता’ हासुद्धा ऋग्वेदापेक्षा आधुनिक आहे. सुमेरियन, खाल्डियन या संस्कृतीसुद्धा भारतीय संस्कृतीपेक्षा प्राचीन संस्कृती ठरत नाहीत. ‘सिंधू संस्कृती, म्हणजेच हिंदु संस्कृती आहे’, हे आता सिद्ध झाले आहे. तेथील कितीतरी चिन्हांचा उलगडा भारतियांच्या सांस्कृतिक वर्णनावरून दिसून येतो.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२३.११.२०२५)

  लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/985467.html