‘ग्राहकरूपी गोविंदा’चे समाधान होणे, हाच खरा उद्योगधर्म !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

मागील लेखात आपण उद्योजकांनी व्यष्टी आणि समष्टी साधना करून स्वतःची आध्यात्मिक अन् व्यावहारिक प्रगती साधणे महत्त्वाचे आहे, याविषयी वाचले. आजच्या लेखात आपण मनुष्याने नेहमी स्वकर्मावर विश्वास ठेवून कार्याभिमुख जीवन कसे जगावे, तसेच ग्राहकाला गोंविदरूप मानून सकारात्मक राहून उद्योगात प्रयत्नरत कसे रहायचे, ते पहाणार आहोत.

 लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी  ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि., ठाणे. 

(भाग ९)

भाग ८ वाचण्याकरिता क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/979601.html

तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘बिझिनेस लिडरशिप’ पुरस्कार स्वीकारतांना उजवीकडील डॉ. रवींद्र प्रभुदेसाई आणि डावीकडील श्री. परीक्षित प्रभुदेसाई

१. ‘कराग्रे वसते…’ हा केवळ श्लोक नसून जीवन घडवण्याचा एक मार्गदर्शक विचार !

‘आपण प्रतिदिन सकाळी दिवसाचा प्रारंभ पुढे दिलेल्या या पवित्र श्लोकाने करतो. या श्लोकाचा अर्थ अत्यंत गूढ आणि प्रेरणादायी आहे.

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनं ।।

अर्थ : हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे आणि मूळ भागात गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्यावर हाताचे दर्शन घ्यावे.

१ अ. कर्माचा सिद्धांत शिकवणारा श्लोक

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

१ अ १. कराग्रे वसते लक्ष्मीः – आपल्या हातांच्या टोकांवर लक्ष्मीचा निवास आहे, म्हणजेच संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक.

१ अ २. करमध्ये सरस्वती: – आपल्या हातांच्या मध्यभागी सरस्वतीचा वास आहे, म्हणजेच ज्ञान, विद्या आणि प्रज्ञा यांचे प्रतीक आहे.

१ अ ३. करमूले तु गोविंदः – आपल्या हातांच्या मुळाशी विष्णूचे (गोविंदाचे) स्थान सांगितलेले आहे, जो पालनकर्ता आणि व्यापकता याचे प्रतीक आहे.

१ अ ४. प्रभाते करदर्शनं:– अशा लक्ष्मीमाता, सरस्वतीमाता आणि भगवान विष्णु यांच्या पावन सान्निध्यात असलेल्या माझ्या हाताला मी नमस्कार करतो.

या श्लोकाचा एक अर्थ आहे की, जीवनात संपत्ती, ज्ञान आणि बुद्धी अन् देवाची कृपा मिळत रहावी. मनुष्याने नेहमी स्वकर्मावर विश्वास ठेवून कार्याभिमुख जीवन जगावे. याचा दुसरा अर्थ असाही आहे की, मनुष्य हा भगवंताशी जोडला गेला आहे आणि परमात्म्याशी संबंध कायम रहाणार आहे. हा श्लोक आपल्याला हे शिकवतो, ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस.’ त्यामुळे कर्माच्या सिद्धांतानुसार आपण ज्या परिस्थितीत किंवा ज्या घरी जन्माला आलो आहोत, त्याला दोष देऊ नये, तर स्वतःचे कर्तृत्व, प्रयत्न आणि ज्ञान यांद्वारे आपण स्वतःला मोठे करावे.

१ आ. ज्ञान, कर्म आणि समर्पण यांच्या एकत्रित शक्तीनेच खर्‍या अर्थाने लक्ष्मीची प्राप्ती

१ आ १. कराग्रे वसते लक्ष्मीः – हा श्लोक अंतर्मुख करणारा आहे; कारण तो आपल्याला स्मरण करून देतो, ‘लक्ष्मी (समृद्धी) प्राप्त करायची असेल, तर आपल्याला आवडणार्‍या क्षेत्रातील सखोल माहिती, ज्ञान आणि कौशल्य आपण आत्मसात् करणे आवश्यक आहे.’

१ आ २. करमध्ये सरस्वती : जसे की, जर आपल्याला बांधकाम (कन्स्ट्रक्शन) क्षेत्रात जायचे असेल, तर स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनीअरिंग) शिकायला हवे. ‘केमिकल्स’ (रसायने) किंवा औषधनिर्मिती क्षेत्रात आवड असेल, तर ‘बी.एस्सी.’ (बॅचलर ऑफ सायन्स – विज्ञान क्षेत्राची पदवी), ‘एम्.एस्सी. (मास्टर ऑफ सायन्स – विज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी) किंवा ‘पीएच्.डी.’ (विद्यावाचस्पति) केली पाहिजे. डॉक्टरेट (वैद्यकीय) क्षेत्रात काम करायचे असेल, तर ‘एम्.बी.बी.एस्.’, ‘बी.फार्म.’ (बॅचलर ऑफ फार्मसी – औषधनिर्मिती शास्त्राच्या अभ्यासातील पदवीपूर्व पदवी) किंवा ‘एम्.फार्म.’ (मास्टर ऑफ फार्मसी – औषधनिर्मिती शास्त्राची पदव्युत्तर पदवी) व्हायला हवे आणि जर वास्तूकलेच्या संदर्भात काम करायचे असेल, तर वास्तूविशारदचे (‘आर्किटेक्चर ’चे) ज्ञान घेणे अत्यावश्यक आहे.

थोडक्यात आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट  ज्ञान, मार्गदर्शन आणि प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा हे ज्ञान आत्मसात् केले जाते, तेव्हा त्याचे प्रयुक्त (अप्लाईड) स्वरूप, त्या ज्ञानाचे प्रत्यक्ष रूपांतर, म्हणजेच एखादा उद्योग निर्माण करणे आणि त्या क्षेत्रात प्राविण्य सिद्ध करून किंवा नवनिर्मितीच्या माध्यमातून ते साकार करणे होय.

१ आ ३. करमूले तु गोविंदः । – म्हणजे सर्व व्यापकता ज्यात आहे. त्याचप्रमाणे ‘पितांबरी’साठी व्यापक स्वरूपात असणारे विश्व म्हणजे ‘आमचे ग्राहक’.

१ आ ४. प्रभाते करदर्शनं – ‘पितांबरी’चे ‘ग्राहक देवो भव: ।’, हे ब्रीदवाक्य आहे. जेव्हा आपण ‘गोविंदरूपी देव’ ग्राहकांमध्ये पहातो, त्याच्या आवश्यकता समजतो; त्याला काय हवे आहे, हे जाणतो आणि त्या अपेक्षांप्रमाणे उत्पादने किंवा सेवा देतो, त्यातून ‘ग्राहकरूपी गोविंदाचे समाधान’ होते. स्वतःचे ज्ञान, विद्या आणि कौशल्य यांच्या आधारावर आपण जर ग्राहकाला समाधानकारक अनुभव दिला, तर तो आपल्याला ‘तथास्तु’ किंवा ‘तुमचे भले होवो’, असा आशीर्वाद देतो अन् हाच खरा उद्योगधर्म आहे.

मला वाटते, ‘हा श्लोक आपल्याला शिकवतो की, ज्ञान, कर्म आणि समर्पण यांच्या एकत्रित शक्तीनेच खर्‍या अर्थाने लक्ष्मीची प्राप्ती होते.’ यश, समृद्धी आणि समाधान ही सर्व स्वतःच्या हातात आहेत. त्यामुळे तो केवळ सकाळी उठून म्हणण्याचा किंवा पूजेसाठीचा श्लोक किंवा मंत्र नाही, तर जीवन घडवण्याचा एक मार्गदर्शक विचार आहे. त्यामुळे कायम या श्लोकाचे सकाळी आपण पठण केले पाहिजे.

२. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन आणि पूर्वसिद्धता आवश्यक !  

प्रतिदिन सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक प्रश्न असतो, ‘आजचा दिवस आपण कसा घालवणार आहोत ? आज काय शिकायचे ? काय ग्रहण करायचे ? कोणती गोष्ट विकायची आहे ? कोणती सेवा (सर्व्हिस) द्यायची आहे ?’, अशा अनेक गोष्टींचे विचार मनात येतात, म्हणजेच ‘आपल्या दिवसाची दिशा आणि उद्दिष्ट ठरवणे’, हेच खरे व्यवस्थापनाचे पहिले पाऊल आहे. व्यवस्थापन (‘मॅनेजमेंट’मध्ये) आपण शिकलो आहोत, १. ‘नियोजन (Planning), २. संघटन (Organizing), ३. दिशादर्शन (Directing) आणि ४. नियंत्रण (Controlling)’, ही ४ मूलभूत तत्त्वे यशस्वी व्यवस्थापनाची मुळे आहेत. एखादे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर त्यासाठी योग्य नियोजन आणि त्यामध्ये लागणार्‍या सर्व गोष्टींची पूर्वसिद्धता आवश्यक असते.

अ. नियोजन (Planning) : एखाद्या गोष्टीसाठी आधी उद्दिष्ट निश्चित करणे

आ. संघटन (Organizing) : त्या उद्दिष्टासाठी आवश्यक साधनसंपत्ती गोळा करणे, म्हणजेच माणसे (Men), यंत्रसामग्री (Machine) आणि साहित्य (Material) यांचे नियोजन करणे

इ. दिशादर्शन (Directing) : ‘काम कसे करायचे, तसेच कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे’, याची स्पष्ट दिशा ठरवणे

ई. नियंत्रण (Controlling) : संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणे, म्हणजे वेळ, व्यय, संसाधन (उपलब्ध साहित्य) आणि गुणवत्ता यांचे व्यवस्थापन करणे

३. ‘सतत शिकणे, नियोजन करणे आणि सुधारणा करत रहाणे’, हेच खरे व्यवस्थापनाचे चक्र ! 

याचेच एक सुंदर उदाहरण, म्हणजे सनातन संस्थेमध्ये एखादा सत्संग सोहळा आयोजित करतांना सर्वप्रथम आपण त्या कार्यक्रमाचा दिनांक ठरवतो. त्यानंतर त्या कार्यक्रमासाठी लागणारे सभागृह, प्रमुख अतिथी, वक्ते, प्रदर्शन कक्ष व्यवस्था आणि इतर सर्व घटक यांचे बारकाईने नियोजन केले जाते. यानंतर नियंत्रणाचा टप्पा येतो. किती माणसे बोलवायची, कार्यक्रमाचा व्यय किती, वेळेचे नियोजन काय आणि कार्यक्रम किती वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे’, या सर्वांचा विचार करून व्यवस्थापन केले जाते. या सर्व अनुभवातून आपल्याला बर्‍याच गोष्टी शिकायला मिळतात आणि पुढील नियोजन आणखी उत्तम करण्यासाठी आपण त्या अनुभवाचा उपयोग करतो. हेच खरे व्यवस्थापनाचे (‘मॅनेजमेंट’चे) चक्र आहे. ‘सतत शिकणे, नियोजन करणे आणि सुधारणा करत रहाणे’, हेच खरे व्यवस्थापनाचे चक्र आहे.

वाचकांना सूचना!

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

४. व्यवसायातून आर्थिक लाभ, तरआध्यात्मिक साधनेतून आनंद, हेच फळ असणे !

जसे सनातन संस्थेसारख्या ठिकाणी आपल्याला या सर्व कार्यातून आनंदाची प्राप्ती होते, तसेच व्यवसाय किंवा दैनंदिन कामकाज यांत आपल्याला आर्थिक लाभ मिळतो. दोन्ही ठिकाणी प्राप्त होणारे फळ वेगवेगळे असले, तरी प्रयत्न आणि नियोजन यांची मूलभूत रचना एकच आहे. आध्यात्मिक साधनेतून आपल्याला आनंद आणि शांती मिळते.

५. मनातील नकारात्मक विचार रोखून सकारात्मक होण्यासाठी ‘नामस्मरण’ हा सर्वांत प्रभावी उपाय ! 

‘सत्संग किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना आपल्याला ताणतणाव येता कामा नये’, हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे कोणताही व्यवसाय करतांना किंवा सेवा देतांना ‘स्वतःची मनःशांती जपली गेली पाहिजे आणि आपण तणावमुक्त रहाणेच आवश्यक आहे.’ यासाठी एकमेव उपाय म्हणजे ‘नामस्मरण’. नामस्मरणाचे महत्त्व आपण मागील भागात सविस्तर पाहिले आहे. जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात, तेव्हा ते रोखण्यासाठी नामस्मरण हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. जसे ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।’ हा नामजप, ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा दत्तगुरूंचा नामजप किंवा कुलदेवतेचा नामजप केला पाहिजे. त्यातून मन शांत होते, विचार शुद्ध होतात आणि आपण पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने नियोजन आणि कर्म यांकडे वळू शकतो.

६. लोकांची आवश्यकता बघून नवीन उत्पादन चालू केल्यास त्यात यश मिळणे !

मागील भागात आपण पाहिले की, आजकाल अनेक जण स्वतःचे ‘स्टार्टअप’ (नवीन उद्योग) चालू करत आहेत किंवा काही जण नवीन उद्योग चालू करण्याचा विचार करत आहेत. मागच्या लेखात आपण ‘गॅप ॲनालिसिस’ या संकल्पनेविषयी वाचले आहे, म्हणजेच बाजारात कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्या आवश्यकता अजून पूर्ण झालेल्या नाहीत’, ते लक्षात घेणे. उदाहरणार्थ ‘ओला’ आणि ‘उबेर’ यांसारख्या टॅक्सी सेवा, घरपोच सामान पोचवणारे विविध ‘स्टार्टअप्स’ किंवा ‘पितांबरी’च्या ‘क्लिनिंग प्रॉडक्टस्’ (स्वच्छता उत्पादने) या सगळ्यांनी लोकांच्या आवश्यकतांचा ‘गॅप ॲनालिसिस’ करून स्वतःचा व्यवसाय उभा केला; म्हणूनच बाजारात असलेला अपुरा पुरवठा लक्षात घेऊन आपणही नवीन उत्पादन (प्रॉडक्ट) किंवा सेवाही (‘सर्व्हिस’ही) चालू करू शकतो आणि त्यात यश मिळवू शकतो.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि., ठाणे.

भाग १० वाचण्याकरिता क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/984178.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक