उत्पादनांच्या निर्मितीच्या वेळी आलेल्या अडचणींवर केवळ साधनेमुळे मात करून यश प्राप्त होते !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

मागील लेखात आपण मनुष्याने नेहमी स्वकर्मावर विश्वास ठेवून कार्याभिमुख जीवन कसे जगावे ? तसेच ग्राहकाला गोंविदारूप मानून सकारात्मक राहून उद्योगात प्रयत्नरत कसे रहायचे ? ते पाहिले. आजच्या लेखात नामजप आणि साधना यांमुळे उद्योगात नवीन कल्पना सुचणे, त्यातून नवीन उत्पादन साकारणे अन् ते साकारले जात असतांना साधनेमुळे त्यावर मात कशी करता येते, याविषयीचे विवेचन येथे दिले आहे.

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.

(भाग १०)

भाग ९ वाचण्याकरिता क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/981984.html

‘पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान’च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारतांना  डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

७. मन शांत आणि एकाग्र असल्यास आपण सूक्ष्म विचार करू शकतो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एका सत्संगात सांगितले होते, ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे.’ आपली पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी ही बहुतेक वेळा स्थूल स्तरावर कार्यरत असतात. आपण अनुमाने ९० टक्के स्थूल आणि केवळ १० टक्के सूक्ष्म या स्तरावर असतो; मात्र जेव्हा आपण शांतपणे बसून एकाग्र होतो, तेव्हाच आपण सूक्ष्म विचार करू शकतो.

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

८. साधनेमुळे विविध कल्पना सुचल्याने उद्योगात नवीन काही उत्पादने साकारली जाणे

एखादा शोध लावायचा असेल, नवीन उद्योगधंदा चालू करायचा असेल किंवा नवी दिशा शोधायची असेल, तर त्यामागे एक कल्पना निर्माण (आयडिया जनरेट) करावी लागते; कारण हे जग, म्हणजेच कल्पनेचे (‘आयडिया’चे) जग आहे. जर ती कल्पना (आयडिया) वेगळी, नाविन्यपूर्ण आणि एखाद्या ‘गॅप’ला (आवश्यकतेला) पूर्ण करणारी असेल, तरच ती यशस्वी होते. अन्यथा कोणताही उद्योग पुढे जात नाही. जेव्हा आपल्याला अशी कल्पना सुचते, तीच आपल्या प्रगतीचा पाया ठरते; पण ती सुचण्यासाठी मन शांत आणि एकाग्र असणे आवश्यक असते. यासाठी सर्वांत प्रभावी साधन म्हणजे ‘नामस्मरण’.

जेव्हा आपण कुलदेवी, श्री दत्तगुरु किंवा इष्टदेवता यांचा नामजप करतो, तेव्हा बुद्धी सूक्ष्म होते, मन स्थिर होते, एकाग्रता वाढते आणि नवनवीन कल्पना सुचतात. माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो की, आमच्या उद्योगातील जी काही उत्पादने निर्माण झाली आहेत, त्यामागे याच प्रकारचे सूक्ष्म चिंतन आणि साधना होती. गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा यांमुळे संशोधनाचे हे कार्य साध्य झाले. माझ्या मनात निर्माण झालेल्या कल्पना मी आमच्या ‘रिसर्च अँड डेव्हल्पमेंट विभागा’तील (संशोधन विभाग) सहकार्‍यांना सांगितल्या आणि त्यांनी त्या कल्पनांना आकार दिला. त्या ‘७ पी’, म्हणजेच १. ‘प्रॉडक्ट (उत्पादन), २. ‘पॅकेजिंग’ (बांधणी), ३. ‘प्राईस’ (मूल्य), ४. ‘प्लेस’ (ठिकाण), ५. ‘पीपल’ (लोक), ६. ‘प्रमोशन’ (वितरण वाढीसाठी विज्ञापन) आणि ७. ‘प्रॉफिट’ (लाभ) यांच्या आधारावर उत्पादन स्वरूपात ते साकार झाले.

९. साधनेमुळे मन आणि बुद्धी सूक्ष्म होऊन त्या विचारसरणीचा साकारलेला परिणाम, म्हणजे ‘िपतांबरी’ची उत्पादने !

आपण जेव्हा साधना वाढवत नेतो, तेव्हा ‘स्थुलातून सूक्ष्मात’ हा साधनेचा प्रवास घडत जातो. आरंभी आपण प्रवचने ऐकतो, कीर्तनांना जातो, नंतर वाचनाची सवय लागते, जसे ‘ज्ञानेश्वरी’, ‘श्रीमद्भगवद्गीता’ वाचणे, श्लोक म्हणणे, पूजा करणे, नामस्मरण करणे; पण जेव्हा आपण तोंडाने नव्हे, तर मनाने नामस्मरण करायला लागतो, मानसपूजा करतो, मनातूनच मंदिरात जाऊन प्रार्थना करतो, तेव्हा ती साधना सूक्ष्म रूप धारण करते. अशा सूक्ष्म साधनेमुळे मन आणि बुद्धी सूक्ष्म होते. आधी ज्या गोष्टी समजत नव्हत्या आणि ज्या विषयामध्ये संभ्रम होता, उदा. उद्योग कोणता करावा ? आणि कसा करावा, अशा प्रश्नांची उत्तरे आपोआप स्पष्ट होऊ लागतात, म्हणजेच साधनेमुळे विचारातील सूक्ष्मविषयक स्पष्टता येते आणि मार्गदर्शन मिळते.

आम्ही ‘पितांबरी’च्या अंतर्गत जे चालू केले ‘होमकेअर’ (गृहोपयोगी), ‘फूडकेअर’ (खाद्यविषयक), ‘ॲग्रो’ (शेती) असे विविध विभाग, त्यातील प्रत्येक उत्पादन ही याच सूक्ष्म विचारसरणीचा परिणाम आहे. एका मागून एक कल्पना सुचत गेली आणि त्यानुसार कृती, नियोजन (प्लॅनिंग), दिशानिर्देश (डायरेक्टिंग), आयोजन करणे (ऑर्गनायझिंग), नियंत्रण (कंट्रोलिंग) करणे अन् आमच्या पथकाला योग्य मार्गदर्शन देत आम्ही पुढे जात राहिलो. त्यामुळे ती कल्पना उद्योगाच्या रूपात साकार झाली.

१०. गोमूत्रावर आधारित उत्पादनांच्या निर्मितीच्या वेळी आलेल्या अडचणींवर साधनेमुळे मात करून यश प्राप्त होणे

‘स्थुलातून सूक्ष्मात’ हा आध्यात्मिक नियम केवळ साधनेसाठीच नव्हे, तर उद्योगक्षेत्रातसुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. जशी साधना करतांना सूक्ष्मतेकडे वाटचाल केल्याने आध्यात्मिक प्रगती होते, तशीच सूक्ष्म विचारसरणी अंगीकारल्याने उद्योगधंद्यातही प्रगती साधता येते. ‘नवीन उद्योग चालू करतांना किंवा समस्या यांवर उपाय शोधतांना ही सूक्ष्म विचारसरणी आपल्याला मार्गदर्शन करते’, अशी मला स्वतःला निश्चिती आहे, उदाहरणार्थ ‘गोमूत्रावर आधारित उत्पादने’ चालू करण्याचा विचार याच सूक्ष्म चिंतनातून आला; कारण गोमूत्र नुसते पिणे अनेकांसाठी अवघड असते. त्याचा वास तीव्र असतो. मी स्वतःही ते सहज पिऊ शकत नव्हतो; पण सनातन संस्थेच्या आश्रमात आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यातून गोमूत्राच्या गुणधर्मांविषयी माहिती मिळाली.

‘गोमूत्र ‘अँटी-कॅन्सर (कर्करोग प्रतिबंधक)’ आहे, विविध रोगांपासून दूर ठेवते, शरिरातील सूक्ष्म कृमी (जंत) नष्ट करते, ‘लिव्हर’साठी (यकृतासाठी) उपयुक्त आहे आणि ‘कॉलेस्ट्रॉल’ न्यून करते’, हे सर्व समजले; पण वास अन् चव यांमुळे लोक ते घेऊ शकत नव्हते. तेव्हा चिंतनातून विचार आला, ‘आपण याची भुकटी (पावडर) करू शकतो का ?’ आयुर्वेदानुसार गोमूत्र पचनसंस्था आणि शरीरशुद्धी यांसाठी अत्यंत गुणकारी आहे; म्हणून आम्ही ८० टक्के गोमूत्र पावडर अन् २० टक्के त्रिफळा चूर्ण एकत्र करून त्याची पावडर सिद्ध केली आणि ४०० मिलीग्रॅम कॅप्सूलच्या स्वरूपात ती बाजारात ग्राहकांसाठी आणली. या उत्पादन निर्मितीच्या काळात अनेक अडचणी आल्या; पण सतत साधना आणि नामजप यांमुळे त्या अडचणींचे निराकरण होत गेले अन् विचार अधिक सूक्ष्म झाले, तसेच उपाय मिळत गेले अन् सगळ्या गोष्टींना यश मिळत गेले.

११. ‘पितांबरी गोमूत्र प्लस टॅब्लेट्स’ या उत्पादनाची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने मिळालेला प्रतिसाद !

आमच्याकडे, म्हणजेच ‘पितांबरी’मध्ये डॉ. मंदार फाटक म्हणून आमचे सहकारी आहेत. ते या उत्पादन निर्मितीच्या प्रक्रियेत आरंभीपासून असल्यामुळे त्यांनी माझी एक मुलाखत घेतली. ज्यात ‘मी ‘पितांबरी गोमूत्र प्लस टॅब्लेट्स’ या उत्पादनाचा जन्म कसा झाला ?, त्यामागची कल्पना आणि तिचे प्रत्यक्ष उत्पादन यांत रूपांतर कसे झाले’, याविषयी सविस्तर सांगितले आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून ‘या उत्पादनाची माहिती सर्वदूर पोचावी’, हा उद्देश होता; म्हणूनच आम्ही या मुलाखतीची ‘सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स’वर (विविध सामाजिक माध्यमांवर) मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली.

याचा परिणाम असा झाला की, आज संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणांहून आम्हाला प्रतिदिन अनुमाने १०० संपर्क येतात. लोक या उत्पादनाविषयी विचारतात, माहिती घेतात आणि खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करतात. भ्रमणभाष करणार्‍या ग्राहकांना आम्ही ४ कॅप्सूल्स विनामूल्य पाठवत आहोत; कारण त्यांना उत्पादनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्या विनामूल्य कॅप्सूल्स वापरल्यानंतर ज्या लोकांना त्या आवडतात, ते ग्राहक स्वतः मागणी (ऑर्डर) करतात. कधी ‘स्ट्रिप्स’ (गोळ्यांची पट्टी), तर कधी संपूर्ण खोका खरेदी करतात.

ही एक साधी कल्पना होती; पण त्या कल्पनेचे रूपांतर उत्पादनामध्ये करण्यासाठी करावे लागलेले संशोधन, ते सिद्ध करतांना आलेल्या अडचणी, विक्रीतील अडथळे, मुलाखतीचे नियोजन आणि मग सामाजिक माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोचलेली माहिती या सगळ्या टप्प्यांमधून ही यशोगाथा घडत गेली. आज परिस्थिती अशी आहे की, लोक समाजमाध्यमांद्वारेच माहिती घेतात आणि आगाऊ पैसे पाठवून उत्पादन खरेदी करतात.

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

१२. ‘स्थुलातून सूक्ष्मात जाणे’ या नियमाचा अवलंब केल्याने प्रगती होत असणे

हे सर्व घडू शकले; कारण आपण ‘स्थुलातून सूक्ष्मात’ जाण्याचा मार्ग आत्मसात् केला. नामजपातून मिळालेली शांतता आणि एकाग्रता यांमुळे मिळालेल्या अनुभूतींमुळे हे कार्य शक्य झाले अन् त्याच अनुभवातून आज आपण उच्च स्तराचा आनंद अन् समाधान अनुभवत आहोत. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) सांगितल्याप्रमाणे ‘परमेश्वर प्राप्ती करणे’, हे मनुष्यजन्माचे अंतिम ध्येय आहे आणि ‘परमेश्वर तत्त्व’ हे सूक्ष्मतम आहे. त्यामुळे स्थुलातून सूक्ष्माकडे जाण्यासाठी अधिकाधिक साधना केली पाहिजे. ही साधना सूक्ष्म स्तरावर केल्यास व्यक्तीला त्याचे आध्यात्मिक, तसेच व्यावहारिक लाभ मिळू शकतात. साधना अधिक उच्च कोटीची आणि सूक्ष्म स्तरावर झाल्यास एखाद्याला सिद्धीही प्राप्त होऊ शकते. त्यामुळे गुरुदेवांनी सांगितलेला ‘स्थुलातून सूक्ष्मात जाणे’, हा नियम खरेच अतिशय मौल्यवान आहे. त्याचा आज असंख्य साधकांना प्रचंड लाभ होत आहे.

‘ही कृपा आणि मार्गदर्शन यांसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे. गुरुदेवांच्या चरणी मी मनःपूर्वक वंदन करतो आणि या भावातूनच आजचा लेख इथेच थांबवतो.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक