‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !
मागील लेखांमध्ये आपण पाहिले की, ‘उद्योग ही एक समष्टी साधना आहे.’ आध्यात्मिक दृष्टीने पाहिले, तर समष्टी साधनेला ७० टक्के आणि व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व दिले आहे. जेव्हा आपण समाजात जाऊन समष्टी साधना करतो, तेव्हा स्वभावदोषामुळे होणार्या चुका लक्षात येतात. स्वतःचे काम आणि मिळालेले यश यांमुळे स्वतःच्या स्वभावात काही दोष निर्माण होऊ शकतात, म्हणजे अहंकार वाढू शकतो. चुका सुधारण्यासाठी आणि अधिक प्रभावीपणे समष्टी साधना करायची असेल, तर व्यष्टी साधनेला पर्याय नाही. १६ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यास परमेश्वराचे दर्शन होणे, साधना चांगली होण्यासाठी योग्य गुरु किंवा आध्यात्मिक संस्था मिळणे अत्यंत आवश्यक आणि कुलदेवतेच्या नामातून मिळणार्या चैतन्यातून आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग ८)
भाग ७ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/977175.html
लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि., ठाणे.

८. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी कच्चा माल आणि विक्रीयोग्य उत्पादन यांच्यासंबंधी लक्षात आलेला पंचमहाभूतांचा संबंध
‘आपला देह हा पृथ्वी, आप (पाणी), तेज (अग्नि), वायु आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेला आहे’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आहे. माझी सवय आहे, ‘मी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या उद्योगाशी जोडून पहाण्याचा प्रयत्न करत असतो.’ मी गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला गेलो. तिथे ‘नामस्मरण’ चालू असतांना त्या चैतन्यमय वातावरणात एक विचार मनात आला आणि लगेच वहीत लिहून ठेवला.
परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितले होते, ‘‘रॉ मटेरियल’ (कच्चा माल) यातसुद्धा परमेश्वर आहे आणि जे ‘फिनिश्ड प्रॉडक्ट’ (विक्रीसाठी सिद्ध झालेले अंतिम उत्पादन) तुम्ही लोकांना देता त्यातसुद्धा परमेश्वर आहे.’’ त्या वाक्यात प्रचंड गूढता होती. त्यांचा तो उच्च कोटीचा विचार समजण्याच्या पलीकडचा होता; पण तो विचार माझ्या अंतर्मनात उतरला होता. मी पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूते एका पानावर लिहिली अन् लक्षात आले की, ‘आपण जे काही सिद्ध करतो, त्याचा मूळ स्रोत हे या पंचमहाभूतांमध्येच आहे. जसे की ‘मॅनेजमेंट’मधील (व्यवस्थापनातील) प्रसिद्ध ‘5 Ms’ (५ एम्.एस्.), म्हणजेच Materials (मटेरिअल्स – कच्चा माल), Money (मनी – पैसा), Men (मेन – मनुष्य), Machines (मशीन्स – यंत्रे) आणि Market (मार्केट – बाजार) हीसुद्धा पंचमहाभूतांशी अगदी जोडलेली आहेत.
८ अ. पंचमहाभूत आणि ‘5 Ms’ यांचा संबंध
८ अ १. पृथ्वीतत्त्व : ‘पृथ्वीतत्त्व’, म्हणजे उद्योगात ‘मटेरियल’ असे म्हणता येईल; कारण आपल्या उद्योगात वापरला जाणारा सर्व कच्चा माल, माती, धातू, वनस्पती, तेल, धान्य हे सर्व पृथ्वी तत्त्वातूनच मिळते; म्हणून ‘मटेरिअल मॅनेजमेंट’ हे पृथ्वीतत्त्वाशी निगडित आहे.
८ अ २. आपतत्त्व : आप (जल) तत्त्व, म्हणजे पैसे; कारण पैसे हे जलतत्त्वासारखे चंचल, प्रवाही असतात. जसे पाणी उताराकडे वहाते, तसेच पैसेही एका ठिकाणाहून दुसर्याकडे जातात; म्हणूनच आपण म्हणतो, ‘लक्ष्मी ही चंचल आहे.’ पैसे योग्य दिशेने आले, तर समृद्धी मिळते; पण जर त्यांचे नियोजन नसेल, तर ते पाण्याच्या बाष्पीभवनासारखे नाहीसे होतात. व्यय, गुंतवणूक आणि बचत या तिन्ही प्रवाहांचा योग्य समतोल राखणे, म्हणजेच जलतत्त्वाचे संतुलन साधणे; म्हणून आर्थिक व्यवस्थापन (फायनान्शियल मॅनेजमेंट) हे थेट ‘आप’, म्हणजे जलतत्त्वाशी जोडलेले आहे.
८ अ ३. तेजतत्त्व : त्याचप्रमाणे ‘तेजतत्त्व’ म्हणजे ‘मेन’ (मनुष्य). माणसात तेज असते. उद्योगाचा खरा केंद्रबिंदू म्हणजे माणूस. ‘People do business’ (लोक व्यवसाय करतात), असे म्हणतात. यंत्र, ‘ऑटोमेशन’ (स्वयंचलन), कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आणि कितीही तंत्रज्ञान वाढले, तरी ‘माणसाला पर्याय नाही.’ तेज म्हणजे ऊर्जा, प्रेरणा आणि नेतृत्व, जे केवळ माणसामध्येच असते.
८ अ ४. वायुतत्त्व : ‘वायुतत्त्व’ म्हणजे ‘मशिन्स’. वायुतत्त्व हे गतीमान आहे. यंत्रेसुद्धा उद्योगात गती आणि वेग निर्माण करतात. कोणते यंत्र आणि कोणत्या प्रकारचे ‘ऑटोमेशन’ आवश्यक आहे, हे या वायुतत्त्वातून समजते.
८ अ ५. आकाशतत्त्व : ‘आकाशतत्त्व’ म्हणजे ‘मार्केट’ (बाजार); कारण आकाश, म्हणजे विस्तार, सर्वव्यापकता. जगभरातील ८०० कोटी लोकांच्या आवश्यकता आिण इच्छांची पूर्तता जेथे होते, तो म्हणजे बाजार. म्हणून बाजाराचे ठिकाण, म्हणजेच उद्योगातील आकाशतत्त्व’, असा विचार मी मांडला. शंखनादानंतर मला हे सखोलपणे लक्षात आले आणि मी ते वहीत उतरवले.

९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेच्या वेळी छोटीशी वही घेऊन बसण्याविषयी सांगितल्यामुळे साधनेला वेगळी दिशा आणि ऊर्जा लाभणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आहे, ‘साधनेच्या वेळी छोटी वही जवळ ठेवावी; कारण ध्यान, सत्संग आणि साधना हे करत असतांना कोणत्याही क्षणी परमेश्वराच्या कृपेने किंवा गुरुकृपेने काही महत्त्वपूर्ण विचार, दिशा किंवा अनुभूती मिळतात. त्या लगेच वहीत लिहून ठेवल्या पाहिजेत, त्यावर चिंतन केले पाहिजे; कारण त्यांचा योग्य उपयोग केला, तर तुमचा व्यवसाय, उद्योग कितीही मोठा होऊ शकतो.’ त्यामुळे मी खोलीत ध्यानाला किंवा नामजपाला बसतो, तेव्हा कायम छोटीशी वही घेऊन बसतो. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे माझ्या साधनेला वेगळी दिशा आणि ऊर्जा लाभली.
१०. व्यष्टी साधना भक्कम असल्यास समष्टी साधना सहजतेने घडते आणि त्यातून पुन्हा व्यष्टी साधनेसाठी प्रेरणा मिळणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे करतांना मला जाणवले, ‘व्यष्टी साधनेतून आपण पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकतो आणि त्या माध्यमातून स्वतःचा उद्योग, म्हणजेच ‘समष्टी’ साधना यशस्वी होऊ शकते. जेव्हा तुमचे व्यष्टी तत्त्व भक्कम असते, तेव्हा तुमची समष्टी साधना सहजतेने घडते आणि जेव्हा तुम्ही समष्टी साधना करू लागता, तेव्हा तुम्हाला आनंद अधिक मिळतो; कारण त्या मार्गाने तुमची ७० टक्के आध्यात्मिक उन्नती साध्य होते. त्या उन्नतीतून पुन्हा व्यष्टी साधनेसाठी प्रेरणा, उत्साह आणि आनंद मिळतो.’ यामुळेच कुलदेवतेच्या नामस्मरणाला अपार महत्त्व आहे. त्या नामस्मरणातून मला पुष्कळ चांगला आत्मिक आणि व्यावहारिक लाभ झाला अन् आध्यात्मिक साधनेच्या मार्गावर चांगल्या अनुभूती आल्या.
११. ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप केल्यामुळे विविध प्रकारचे त्रास न्यून होणे आणि आलेले विविध अनुभव
११ अ. श्री दत्तगुरूंच्या नामजपामुळे वाईट शक्तींचा त्रास होत नसल्याची जाणीव होणे : सनातन संस्थेने आणखी एक महत्त्वाचा नामजप सांगितला आहे तो, म्हणजे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ! आमच्या गावात गेली ३५–४० वर्षे न चुकता आम्ही दत्तजयंतीला जात आहोत. आम्हाला दत्त उपासना आणि त्याच्या नामस्मरणाचा अतिशय चांगला अनुभव आला आहे. ‘श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणामुळे कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा आपल्याला त्रास होत नाही’, हे आम्हाला जाणवले. आरंभी केवळ दत्तजयंतीच्या वेळी नामस्मरण करणे एवढेच ज्ञान आम्हाला होते. जेव्हा आम्ही सनातन संस्थेत आलो, तेव्हा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’, अशा प्रकारचे नामजप आम्ही करू लागलो. तेव्हा जाणवले की, ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हे नामस्मरण अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचे आहे.
११ आ. आपण पूर्वजांच्या ऋणाची परतफेड कधीच पूर्णपणे करू न शकणे ! : सनातन संस्थेच्या ‘श्री दत्त’ या ग्रंथात दिलेला ‘ज्ञानसार’ या विषयावर अधिक प्रकाश टाकतो. ‘ज्यांना या विषयाची सखोल माहिती हवी आहे, त्यांनी हा ग्रंथ नक्की वाचावा’, असे मला वाटते. त्यात सांगितले आहे, ‘मनुष्य जन्म हा देवाण-घेवाण हिशोब पूर्ण करण्यासाठी असतो.’ प्रत्यक्षात पहाता तो हिशोब कधीच पूर्ण होत नाही. आपले आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांनी आपल्याला दिलेले काही ‘डी.एन्.ए.’ स्वरूपात आपल्यात असते. (डी.एन्.ए.-‘डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड’ म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक. जनुकीय घटक (जेनेटिक मटेरियल) ज्यापासून बनतात, ते रेणू म्हणजे डी.एन्.ए.)
स्वतःचे शरीर, दिसणे, स्वभाव आणि हे सूक्ष्म रूप पुढच्या पिढीकडे ‘ट्रान्स्फर’ (हस्तांतरित) होत रहाते. त्यामुळे त्या ऋणाची परतफेड आपण कधीच पूर्णपणे करू शकत नाही. सनातन संस्थेने हेसुद्धा लक्षात आणून दिले की, आपले जे पूर्वज असतात, त्यांचे अतृप्त आत्मे आपल्या जागेत अडकलेले असतात. हे ‘दत्त’ या ग्रंथातून अधिक स्पष्ट होते.
११ इ. ‘नारायण नागबळी’, ‘त्रिपिंडी श्राद्ध’ आणि दत्ताचा नामजप यांमुळे आलेला अनुभव ! : जेव्हा आमच्या घरात आम्हाला काही अडचणी जाणवू लागल्या, तेव्हा गुरुजींनी (पुरोहितांनी) आम्हाला त्र्यंबकेश्वर येथे ‘नारायण नागबळी’ आणि ‘त्रिपिंडी श्राद्ध’ करण्याचा सल्ला दिला. आम्ही तो उपाय केला. त्या वेळी जाणवले की, आपल्याकडून ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप नीटपणे होत नाही. यानंतर आम्ही तो नामजप नियमितपणे आणि श्रद्धेने चालू केला. आम्ही त्र्यंबकेश्वरहून परत आल्यानंतर आम्हाला एकदम हलके वाटायला लागले आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप वाढवल्यावर वेगवेगळ्या सुंदर अनुभूती येऊ लागल्या. काही जागांवर पूर्वजांच्या जीव अडकलेला असतो. विशेषतः कोकणात आजही काही वाईट शक्ती किंवा नकारात्मक अनुभव जाणवतात; कारण अनेक वर्षे त्यांनी त्यांचे आयुष्य त्या जागेत घालवलेले असते. जेव्हा आपण एखादी मालमत्ता घेतो, तेव्हा काही जागा आपल्याला लाभतात, तर काही जागांवर नकारात्मक ऊर्जा असल्याने अडचणी निर्माण होतात; म्हणूनच अशा ठिकाणी वास्तूशांत, सत्यनारायण पूजा, लघुरुद्र किंवा सांगितलेल्या इतर साधना करणे अत्यावश्यक असते. या साधनांमुळे त्या जागेतील नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मकता आणि शांत ऊर्जा निर्माण होते.
११ ई. देशाच्या विकासासाठी ग्रामीण भागाचा विकास महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन ताम्हाणे (राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथे भूमी खरेदी करणे ! : माझ्या निर्मलाकाकू (श्रीमती निर्मला प्रभुदेसाई) आणि बाबा (दिवंगत वामनराव प्रभुदेसाई) यांनी एकदा सांगितले होते, ‘कोकणात जाऊन काहीतरी उद्योग चालू कर.’ आज आपण ज्या मोठ्या शहरांचा उल्लेख करतो, त्यातील देहली, मद्रास, बेंगळुरू, कोलकाता, मुंबई आणि पुणे ही सगळी शहरे प्रचंड वेगाने पुढे जात आहेत; पण या विकासाच्या स्पर्धेत त्यांची स्थिती कोलमडलेली दिसते. ठाण्यातसुद्धा आपण पहातो, वाहने बाहेर काढली की, चालवायला जागा नसते. घोडबंदर रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी असते. कचर्याची समस्या आणि इतर शहरी त्रास वाढत चालले आहेत. म्हणूनच आता खेडी विकसित झाली पाहिजेत; कारण ही मोठी शहरे त्यांच्या मर्यादेपर्यंत पोचली आहेत. खेड्यांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे; कारण देशाच्या पुढील विकासासाठी ग्रामीण भागाचा विकास अत्यावश्यक आहे.
भारतात अनुमाने ६ लाख खेडी आहेत. रा.स्व. संघाचे प्रचारक प्रल्हादजी अभ्यंकर यांनीही नेहमी सांगितले, ‘जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तेव्हा तुमच्या गावात जाऊन तिथे उद्योग चालू करायला हवेत.’ म. गांधींनीही ‘खेडी विकसित करा’, असाच संदेश दिला आहे. सगळी लोक शहरातच गेली, तर शहरांवर ताण येईल आणि देशाचा समग्र विकास शक्य होणार नाही. त्यामुळे गाव-खेड्यांचा विकास अनिवार्य आहे. मी गावाला गेलो आणि उद्योगासाठी जागा विकत घेण्याचे ठरवले. बाबांनी मला सांगितले की, जुन्या पूर्वजांच्या जागा घेऊ नकोस, तर काकांच्या किंवा जवळच्या नातेवाईकांच्या जागा विकत घेऊनच उद्योग चालू कर. या काळात माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू होता. ताम्हाणे (राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथे बोल्हे नावाचे गृहस्थ होते. त्यांची जागा मी घेतली. ती जागा प्रभुदेसाई यांच्याकडून त्यांनी विकत घेतली होती आणि योगायोगाने तीच जागा मी विकत घेतली. त्या काळात ज्या ५–६ जागा मी विकत घेतल्या, त्यापूर्वी प्रभुदेसाई यांनी कुणाला तरी विकल्या होत्या आणि नंतर त्याच जागा पुन्हा आमच्याकडे आल्या, म्हणजेच प्रभुदेसाईंकडूनच त्या जागा पुन्हा प्रभुदेसाई यांच्याकडेच परत आल्या.
११ उ. श्री गुरुदेव दत्ताचा जप केल्यामुळे व्यवसायासंबंधी आलेली अनुभूती : मला तेव्हा एकदम जाणवले की, ‘कदाचित श्री गुरुदेव दत्ताचा जप चालू केल्यामुळेच वरील अनुभूती आली आणि त्या जागा मिळाल्या असाव्यात’, असा विचार मनात येऊन गेला. त्या भूमीवर नंतर आम्ही शेतीही केली. चाफ्याची झाडे लावली, बांबूची लागवड केली. उद्योगधंदा चालू करतांना भूमी, वास्तू आणि कार्यालय यांचा पुष्कळ मोठा वाटा असतो. खरेतर कोणताही उद्योगधंदा करतांना भूमी, वास्तू आणि कार्यालय या ३ गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात अन् जर या ठिकाणी आपण ‘श्री गुरुदेव दत्ता’चा जप करत राहिलो, तर काम करणार्या लोकांना, तसेच त्या वस्तूंना सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचा थेट परिणाम, म्हणजे ‘टर्नओव्हर’ (उलाढाल) वाढतो आणि उद्योग यशस्वी होण्यासाठी ती ऊर्जा महत्त्वाची ठरते.
वाचकांना सूचना
या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.
– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई
१२. ‘पितांबरी’च्या सर्व वास्तू आणि स्वतःच्या घरात नामपट्ट्या लावल्याने प्रगतीदृष्टीने अत्यंत चांगला परिणाम दिसून येणे !
जर वास्तू तुम्हाला लाभली नाही, तर समस्या वाढूही शकतात. सनातन संस्थेने वास्तूशुद्धीसाठी दिलेल्या नामपट्ट्यांचा संच आम्ही ‘पितांबरी’ आस्थापनाच्या सर्व वास्तूंमध्ये, तसेच घरात लावले आहेत. त्याचा आम्हाला आमच्या प्रगतीसाठी अत्यंत चांगला परिणाम होतांना दिसत आहे. त्यामुळे व्यष्टी साधनेच्या सुंदर आणि सकारात्मक अनुभूती मिळत आहेत, तसेच आम्ही आमच्या कुलदेवीकडे प्रत्येक ६ मासांनी जातो अन् तिची खणानारळाने ओटी भरतो. ही परंपरा श्रद्धेने पाळत आहोत.
सर्व उद्योजकांनी समष्टी आणि व्यष्टी साधना करून स्वतःची आध्यात्मिक अन् व्यावहारिक प्रगती साधली पाहिजे, नामस्मरण वाढवले पाहिजे. त्यामुळे स्वतःचा उद्योग आणि जीवन यांचा सर्वांगीण विकास होईल. नामस्मरणाचा हा दिव्य मार्ग आम्हाला दाखवून दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मी मनःपूर्वक आभार मानून कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
भाग ९ वाचण्या करिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/981984.html
लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि., ठाणे.
|

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !