सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्यावर झालेल्या एका शस्त्रकर्माच्या वेळी पू. (सौ.) संगीता जाधव यांना रुग्णालयात सूक्ष्म जगताविषयी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

२७.७.२०२५ या दिवशी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे मुंबईतील एका रुग्णालयात एक लहानसे शस्त्रकर्म झाले. त्या वेळी रुग्णालयात त्यांच्या समवेत पू. (सौ.) संगीता जाधव होत्या. या कालावधीत पू. (सौ.) संगीता जाधव यांना सूक्ष्म जगताविषयी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

सद्गुरु अनुराधा वाडेकर

१. रुग्णालयातील शस्त्रकर्मगृहात गुरुदेवांचे अस्तित्व जाणवून ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे शस्त्रकर्म मीच करणार आहे’, असे सांगून त्यांनी आश्‍वस्त करणे 

‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना शस्त्रकर्म करण्यासाठी शस्त्रकर्मगृहात (‘ऑपेरेशन थिएटर’मध्ये) नेल्यावर ‘त्या देवच आहेत. त्यांची काळजी करायला नको’, असा विचार माझ्या मनात येत होता, तरी दुसरीकडे मला त्यांची काळजीही वाटत होती. त्या वेळी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मनात म्हटले, ‘गुरुदेव, तुम्ही आहात ना !’ तेव्हा मला शस्त्रकर्मगृहात गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले. शस्त्रकर्म करणार्‍या आधुनिक वैद्यांच्या हातांच्या ठिकाणी मला प्रत्यक्ष गुरुदेवांचेच हात दिसले. त्या वेळी ‘अनुचे (सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे) शस्त्रकर्म मीच करणार आहे’, असे गुरुदेव म्हणाले’, असे मला जाणवले.

२. शस्त्रकर्मगृहात तिन्ही मोक्षगुरूंचे (टीप) अस्तित्व जाणवणे 

त्यानंतर काही क्षणांतच मला सूक्ष्मातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ शस्त्रकर्मगृहात जातांना दिसल्या. तिन्ही मोक्षगुरु शस्त्रकर्मगृहात असल्याने मी निश्‍चिंत झाले. मला पुष्कळ आनंद वाटू लागला. (टीप : तीन मोक्षगुरु – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ)

३. शस्त्रकर्मानंतर सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे मुख पिवळे आणि तेजस्वी दिसणे  

दोन घंट्यांच्या शस्त्रकर्मानंतर सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना बाहेरच्या खोलीत आणण्यात आले. त्या वेळी त्या अजून शुद्धीवर आल्या नव्हत्या. तेव्हा मला त्यांचे मुख पिवळे आणि अतिशय तेजस्वी दिसत होते.

पू. (सौ.) संगीता जाधव

४. रुग्णालयात सद्गुरु अनुराधाताईंना भेटण्यासाठी सूक्ष्मातून ‘सनातनचे संत, सद्गुरु, देवता आणि ऋषीमुनी’ आल्याचे दिसणे 

४ अ. देवाने ‘सूक्ष्मातून सद्गुरु आणि संत रुग्णालयात आले आहेत’, हे दृश्य दाखवणे अन् त्या वेळी ‘वातावरणातील आनंद अन् चैतन्य वाढले आहे’, असेे जाणवणे : रुग्णालयात मी सद्गुरु अनुराधाताईंच्या बाजूच्या पलंगावर बसून नामजप करत होते. त्या वेळी अकस्मात् मला पुष्कळ वेगळे जाणवू लागले. ‘माझ्या हृदयातून नामजपाचा आवाज येत आहे आणि माझे शरीर हलके होऊन हवेत उंच जात आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी वातावरणातील आनंद आणि चैतन्य यांचा स्तर पुष्कळ वाढला होता. ‘मला एवढे हलके कसे वाटत आहे ?’, अशी जिज्ञासा माझ्या मनात निर्माण झाली. मी सूक्ष्मातून देवाला विचारले, ‘मला असे निराळे का जाणवत आहे ?’ त्या वेळी देवाने मला ‘कक्षामध्ये अनेक संत सूक्ष्मातून येत आहेत’, असे दृश्य दाखवले. ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सद्गुरु नंदकुमार जाधव, सद्गुरु राजेंद्र शिंदे, सद्गुरु सत्यवान कदम आणि पू. रमेश गडकरी हे सनातनचे सद्गुरु अन् संत रुग्णालयात सद्गुरु अनुराधाताई यांना भेटण्यासाठी सूक्ष्मातून आले आहेत’, असे दृश्य देवाने मला दाखवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

४ आ. ‘सद्गुरु अनुराधाताई यांच्या डोक्याजवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर उभे असून त्यांनी सद्गुरु आणि संत यांचे स्वागत केले अन् सद्गुरु अनुराधाताईंनी स्मितहास्य करून त्यांना नमस्कार केला’, असे सूक्ष्मातून दिसणे : या वेळी सद्गुरु अनुराधाताई यांच्या डोक्याजवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले उभे होते. ते सर्व सद्गुरु आणि संत यांना ‘या या ! अनूला (सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना) भेटा’, असे म्हणत होते. त्या वेळी सर्व सद्गुरु आणि संत गुरुदेवांना अन् सद्गुरु अनुराधाताईंना नमस्कार करत होते. ‘सर्व संत स्मितहास्य करून सद्गुरु अनुराधाताईंच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत’, असे मला सूक्ष्मातून जाणवले. प्रत्यक्षात त्या वेळी सद्गुरु अनुराधाताई झोपल्या होत्या; परंतु सूक्ष्मातील दृश्यात त्या पलंगावर उठून बसल्या होत्या आणि स्मितहास्य करून सर्व संतांना नमस्कार करून प्रतिसाद देत होत्या. अशा प्रकारे ‘सनातनचे अनेक सद्गुरु आणि संत त्यांना भेटून पुढे जात आहेत’, असे दृश्य मला दिसले.

४ इ. रुग्णालयातील खोलीत सूक्ष्मातून आलेल्या संतांनी खोलीतून बाहेर जाण्यासाठी स्वतःच सूक्ष्मातून एक प्रशस्त मार्ग निर्माण करणे : सद्गुरु अनुराधाताईंना भेटण्यासाठी येणार्‍या संतांचा ओघ पाहून ‘खोलीत गर्दी झाली, तर आलेले संत खोलीतून बाहेर कसे जातील ?’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा तेथून बाहेर जाण्यासाठी ‘सूक्ष्मातून एक मार्ग निर्माण झाला आहे’, असे मला दिसले. खोलीत भिंत इत्यादी न रहाता एक मोठा मार्ग निर्माण झाला आणि सर्व संत त्या मार्गातून बाहेर पडले. ‘संतांनीच परत जाण्याचा हा मार्ग निर्माण केला’, असे मला दिसले. त्या वेळी ‘सूक्ष्माला काहीच मर्यादा नसते’, हे माझ्या लक्षात आले.

४ ई. ‘आकाशातून देवता, ऋषीमुनी आणि संत मोठ्या समूहाने आले असून काही संत आकाशात अधांतरी उभे राहून सद्गुरु अनुराधाताईंची भेट घेत आहेत’, असे दिसणे : या वेळी आकाशातूनही देवता, ऋषीमुनी आणि संत मोठ्या समूहाने येत होते अन् सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना नमस्कार करत होते. सद्गुरु अनुराधाताईही स्मितहास्य करून सर्वांना नमस्कार करत होत्या. ‘जणू काही ते नेहमीच एकमेकांना भेटतात’, असे मला जाणवले. ‘सनातनचे काही संत दारातून खोलीत आले, तर अन्य काही संत आकाशात अधांतरी उभे राहून सद्गुरु अनुराधाताई यांची भेट घेत आहेत’, असे मला दिसले. सूक्ष्मातील हा प्रसंग बराच वेळ चालू होता आणि त्या वेळी मी एक वेगळीच स्थिती अनुभवत होते.

५. आधुनिक वैद्यांनी सद्गुरु अनुराधाताई यांच्याविषयी ‘शून्य टक्केही त्रास न देणारा पहिलाच रुग्ण !’, असे उद्गार काढणे 

शस्त्रकर्मानंतर सद्गुरु अनुराधाताई एक ते दीड घंट्यानी शुद्धीवर आल्यावर हसत होत्या. ‘झोपेतून जागे व्हावे’, अशी त्यांची सहजस्थिती होती. त्या वेळी ‘‘माझे शस्त्रकर्म झाले का ? मला काही कळलेच नाही’’, असे त्या म्हणाल्या. त्या एकदम व्यवस्थित होत्या. आधुनिक वैद्य १ – २ घंट्यांनी येऊन ‘काही त्रास होत आहे का ?’, असे सद्गुरु अनुराधाताईंना विचारत होत्या. त्यावर ‘मला काही त्रास होत नाही’, असे सद्गुरु ताई सांगत होत्या. दुसर्‍या दिवशीही आधुनिक वैद्यांनी असे विचारल्यावर सद्गुरु ताई यांनी ‘मला काहीच त्रास होत नाही’, असेे त्यांना सांगितले. त्या वेळी बोलतांना आधुनिक वैद्यांनी सद्गुरु अनुराधाताई यांच्याविषयी ‘शून्य टक्केही त्रास न देणारा माझा हा पहिलाच रुग्ण आहे’, असे उद्गार काढले.

६. अनुभूती 

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शस्त्रकर्मगृहात सूक्ष्मातून विभूती फुंकरली’, असे दृश्य दिसणे आणि त्यांनी ‘प्रत्यक्षातही मी विभूती फुंकरली होती’, असेे सांगणे : शस्त्रकर्माच्या आदल्या दिवशी मला रुग्णालयात दाब जाणवत होता. त्या वेळी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना भ्रमणभाष करून उपाययोजना विचारली. त्यावर त्यांनी ‘त्रासदायक आवरण काढणे आणि सूक्ष्मातून विभूती फुंकरणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला सांगितले. सद्गुरु अनुराधाताईंना शस्त्रकर्मगृहात नेण्यात आले. तेव्हा मला तेथेही दाब जाणवत होता. त्या वेळी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना ‘सूक्ष्मातून आध्यात्मिक उपाय करण्यासाठी तुम्हीच येथे या’, असे म्हणाले. मी असे म्हणताच ‘सद्गुरु गाडगीळकाका तेथे सूक्ष्मातून आले असून त्यांनी सद्गुरु अनुराधाताई यांच्यावर अन् चारही दिशांना विभूती फुंकरली’, असे दृश्य मला दिसले. त्यानंतर प्रत्यक्षातही शस्त्रकर्मगृहातील दाब न्यून झाला आणि चांगले वाटू लागले.

शस्त्रकर्म पूर्ण झाल्यावर मी जेव्हा सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांना ही अनुभूती सांगितली, तेव्हा ‘‘शस्त्रकर्म करण्यापूर्वी मी नकळत सद्गुरु अनुराधाताई यांच्यावर आणि चारही दिशांना विभूती फुंकरली होती. तेच दृश्य तुम्हाला त्या वेळी सूक्ष्मातून दिसले’’, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात सद्गुरु अनुराधाताई यांचे शस्त्रकर्म चालू असतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होते.

सद्गुरु अनुराधाताई यांच्या समवेत रहाण्याची संधी मिळाल्यामुळे मला या दिव्य आध्यात्मिक गोष्टींची अनुभूती आली. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (पू.) सौ. संगीता जाधव, ठाणे सेवाकेंद्र, ठाणे. (१२.८.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक