‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ.

(लेखांक ८)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/974078.html

वादनकलेचा आध्यात्मिक इतिहास !

‘वादनकला’ हे असे एक दिव्य माध्यम आहे, जे नादाच्या माध्यमातून वादक आणि श्रोते यांना भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती देते. ‘नाद’ हा साक्षात् ‘ब्रह्मतत्त्वा’शी जोडला गेला आहे. त्यामुळेच नादाला ‘नादब्रह्म’, असे म्हटले जाते. वाद्यांतील नादामध्ये ईश्वराशी शब्दविरहित अन् शब्दांपलीकडचा संवाद साधण्याचे सामर्थ्य आहे. या लेखात आपण ‘प्राचीन काळापासून वाद्यवादनाचे उद्देश, देवतांशी संबंधित वाद्ये आणि वादनाची आध्यात्मिक पार्श्वभूमी’ जाणून घेणार आहोत.

१. वैदिक काळात अस्तित्वात असलेली विविध वाद्ये आणि त्यांचा होणारा उपयोग !

‘वैदिक काळात विविध उत्सव, मंगलकार्ये, यज्ञ, ध्वजपूजन इत्यादी प्रसंगी वाद्यवादन होत असे. वैदिक वाङ्मयात ‘आघाटी (कांडवीणा)’, ‘घाटलिका’, ‘पिच्छोरा’, ‘कर्करी’ इत्यादी प्रकारच्या वीणांचे उल्लेख आढळतात. त्या वेळी शततंत्री वीणा, म्हणजे १०० तारा असलेले वाद्यही होते. ‘यज्ञाच्या वेळी सामगायनासह वीणावादनही होत असे’, असे उल्लेख पुराणांत आढळतात. वैदिक काळात ‘वेणु, वंश, नाडी’, अशा सुषिर वाद्यांचे (टीप) वर्णनही आढळते.’ (साभार : भारतीय संगीत का इतिहास, लेखक : डॉ. ठाकुर जयदेव सिंह)

टीप – सुषिर वाद्ये : हवेचा वापर करून आवाज निर्माण करणारी वाद्ये.

२. देवता आणि त्यांच्याशी संबंधित वाद्ये

नादब्रह्माची अनुभूती देणारी प्राचीन आणि दैवी वाद्ये देवतांनीही धारण केली आहेत.

अ. भगवान शिवाच्या हातात डमरू आहे. ‘भगवान शंकराने डमरूच्या नादातून सृष्टीची निर्मिती केली’, असे शिवपुराणात सांगितले आहे.

आ. ‘भगवान श्री गणेश मृदंगवादन करतो’, असा उल्लेख शिवपुराणात अनेक ठिकाणी आढळतो.

इ. संगीताची आराध्यदेवता सरस्वतीदेवी हिने वीणा धारण केली आहे.

ई. भगवान श्रीकृष्णाने मुरली धारण केली आहे. ‘गोप-गोपी श्रीकृष्णाच्या मुरलीच्या दैवी नादातून उच्चतम अशा नादब्रह्माची अनुभूती घेत होत्या’, असे श्री भागवत पुराणामध्ये सांगितले आहे.

उ. भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य शंख धारण केला आहे. महाभारताच्या युद्धप्रसंगी या पांचजन्य शंखाच्या नादाने युद्धाचा आरंभ होत असे, तसेच या शंखनादामुळे युद्धात सहभागी झालेल्या विरांमध्ये लढण्याची स्फूर्ती निर्माण होत असे.

देवतांशी संबंधित वाद्यांच्या नादातून आपल्याला आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती घेता येतात.

‘आहतनादातून (आघाताने उत्पन्न होणार्‍या नादातून) अनाहतनादाची (आघाताविना ऐकू येणार्‍या दैवी नादाची) अनुभूती’ देणार्‍या भारतीय वाद्यांचा इतिहास हा दैवी आणि समृद्ध आहे.’

३. पुराणांमध्ये आढळणारी वाद्ये आणि वादनाचा उद्देश

अ. काही वाद्यांच्या नादाने मंगलमय वातावरणाची निर्मिती होते. त्यामुळेच पुरातन काळापासून आतापर्यंत यज्ञाच्या वेळी किंवा मंगलप्रसंगी विविध वाद्यांचे आनंद देणारे संगीत लावले जाते, उदा. वीणा, बासरी इत्यादी.

‘रावणाचा वध केल्यानंतर जेव्हा प्रभु श्रीरामाचे अयोध्येत आगमन झाले, तेव्हा अयोध्यावासियांनी श्रीरामाचे शंख, दुंदुभी (मोठा नगारा) आणि मंगल वाद्ये वाजवत स्वागत केले’, असा उल्लेख पुराणात आहे.’ (साभार : भारतीय संगीत का इतिहास, तृतीय अध्याय, रामायणकालीन संगीत. लेखक : डॉ. शरदचंद्र श्रीधर परांजपे)

आ. द्वापरयुगातही वाद्यवादनाचे उल्लेख आढळतात. स्वतः भगवान श्रीकृष्ण ‘मुरली’ वाजवायचा. भगवद्गीतेतील प्रथम अध्यायात ‘शंख, भेरी, पणवानक, गोमुख’, अशा रणवाद्यांची नावे दिलेली आहेत. त्या वेळी योद्ध्यांकडे स्वतःचे शंख होते. त्यांना युद्धकलेत विशिष्ट स्वरांत शंख वाजवण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. श्रीकृष्णाचा ‘पांचजन्य शंख’, अर्जुनाचा ‘देवदत्त शंख’, युधिष्ठिराचा ‘अनंतविजय शंख’, अशी शंखांची नावे होती. यावरून ‘त्या काळीही युद्धाच्या आरंभी शंखनादाचे अनन्यसाधारण महत्त्व होते’, हे लक्षात येते.

इ. काही पुराणांमध्ये उल्लेख आहे की, वाद्यांचा नाद हा शत्रूला घाबरवण्यासाठी आणि योद्ध्यांमध्ये वीररस जागृत होऊन शत्रूला पराजित करण्यासाठीची ऊर्जा निर्माण होण्यासाठी वापरला जात असे. यासाठी युद्धप्रसंगी मारकभाव निर्माण करणारी वाद्ये, उदा. दुंदुभी, भेरी, रणशिंग इत्यादी वाजवली जात असत.

४. पुराणकाळातील नादोपासनेचे उदाहरण

श्री. मनोज सहस्रबुद्धे

वाद्यांचा नाद हा केवळ श्रवणीय नाही, तर ते भगवंताच्या आराधनेसाठीही पूरक साधन आहे. त्यामुळेच अनेक ऋषिमुनी आणि संगीतातील प्रकांड पंडित यांनी केलेल्या नादोपासनेचे उल्लेख आपल्याला पुराणात आढळतात.

लंकापती रावण हा भगवान शिवाचा अनन्य भक्त होता. तो संगीताचा उपासक आणि तज्ञही होता. एक कथा सांगते की, भगवान शिवाचे प्राणलिंग मिळवण्यासाठी रावणाने संगीताच्या माध्यमातून शिवाची स्तुती करून उपासना केली होती. त्या वेळी त्याने स्वतःच्या शरिरातील नाड्यांचा उपयोग वीणेच्या तारांप्रमाणे वाजवण्यासाठी केला आणि त्यातून उत्पन्न होणार्‍या नादाने शिवाची कठोर आराधना केली. त्याच्या या नादोपासनेमुळे भगवान शंकर रावणावर प्रसन्न झाले होते. वाद्यांच्या नादाने ईश्वरोपासना करण्याविषयीचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

५. ऐतिहासिक काळातील वाद्ये

अजिंठा, वेरूळ, खजुराहो इत्यादी विविध लेण्यांमध्ये ऐतिहासिक काळी वापरल्या जाणार्‍या विविध वाद्यांचे वादन करतांनाची शिल्पे आहेत. त्या काळीही विविध प्रसंगी वाद्यांचा वापर होत असल्याचे आपल्या लक्षात येते.

६. कलियुगातील संतांनी भगवंताच्या आराधनेसाठी वाद्यांचा केलेला उपयोग !

अ. वाद्याच्या माध्यमातून उपासकाच्या मनातील भाव ‘नादा’द्वारे प्रगट होऊन त्याला ईश्वरी अनुभूती येते; म्हणूनच भारतभरातील अनेक संत-महात्म्यांनी विविध वाद्ये वाजवून भगवंताचे स्तुतीगान, भजन किंवा कीर्तन केल्याचे आपल्या लक्षात येते. संत मीराबाई श्रीकृष्णाचे गुणगान करण्यासाठी एकतारीचा उपयोग करत असत. संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या हातांमध्ये एकतारी, चिपळ्या, टाळ इत्यादी वाद्ये असत. या वाद्यांच्या नादाच्या साहाय्याने भगवंताचे गुणगान करण्यात ही संतमंडळी दंग झाली होती.

आ. वैष्णव संप्रदायात ‘मृदंग आणि करताल’, या वाद्यांचा वापर कीर्तनात होत असे.

७. सारांश

भारतीय वाद्यांचा इतिहास पहाता या वाद्यांच्या माध्यमातून नादब्रह्माची अनुभूती आपल्यालाही घेता येईल; परंतु सध्या वादनकलेकडे केवळ मनोरंजनात्मक किंवा कलाप्रस्तुतीच्या दृष्टीनेच पाहिले जात आहे. त्यामुळे वाद्यांतील नादाच्या माध्यमातून येणार्‍या दैवी अनुभूतींपासून वादक आणि श्रोते वंचित आहेत.

भारतीय वाद्यांचा ‘नाद’ हा संगीत-उपासकाला साधनेसाठी (ध्यान, भक्ती इत्यादींसाठी) पूरक असल्याचे अनेक प्रकारच्या संशोधनातून लक्षात आले आहे. त्यामुळेच वादकाने वादनकलेकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्या नादाच्या माध्यमातून भगवंताला अनुभवण्यासाठी प्रयत्न करावा. याविषयीचे मार्गदर्शन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून केले जाते.’

संग्राहक : श्री. मनोज सहस्रबुद्धे, वाद्य अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२४.१०.२०२५)

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/978611.html