‘ई-सिगारेट’चा वाढता सापळा : भारतातील बंदी, तरुण आणि काळा बाजार !

‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट’ (ई-सिगारेट किंवा ‘व्हेप्स’), ज्याला औपचारिकरित्या ‘इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टम (ई.एन्.डी.एस्.)’ म्हणून ओळखले जाते, ही अशी उपकरणे आहेत जी रासायनिक संयुगांसह ‘निकोटीन’ (तंबाखूतील एक विषारी द्रव्य) असलेले द्रव गरम करून ‘इनहेलेबल’ (श्‍वास घेण्यायोग्य) बाष्प तयार करतात. ही प्रक्रिया ‘व्हेपिंग’ म्हणून ओळखली जाते. वर्ष २००३ मध्ये चीनमध्ये धूम्रपानाचा पर्याय म्हणून शोध लावण्यात आलेले ‘इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टम (ई.एन्.डी.एस्.)’ हे वर्ष २००७ पर्यंत जागतिक बाजारपेठेत दिसू लागले आणि तेव्हापासून अल्पावधीतच त्यांचा वापर वाढला आहे.

इलेक्ट्रॉनिक सिगारेट

१. व्हेपिंग उद्योगाचे वाढते मूल्य आणि संभाव्य हानी

वर्ष २०२१ पर्यंत जगभरात एकूण ८ कोटी ५० लाख ‘व्हेपर’ वापरकर्ते असल्याचा अनुमाने आहे. सध्या जागतिक व्हेपिंग उद्योगाचे मूल्य अनुमाने ३८ अब्ज डॉलर (३ सहस्र ३४४ अब्ज रुपये) इतके आहे आणि वर्ष २०३२ पर्यंत ते अनुमाने १९९ अब्ज डॉलरपर्यंत (१७ सहस्र ५१२ अब्ज रुपये) पोचण्याचा अंदाज आहे. त्यांच्या वाढत्या वापराचे श्रेय आक्रमक मार्केटिंगला जाते, ज्यामध्ये व्हेपिंगला धूम्रपानाचा एक आरोग्यदायी पर्याय म्हणून चित्रित केले जाते. या मार्केटिंगमध्ये अनेक चवी, आकर्षक उपकरणांचे डिझाईन, निकोटीनचे वेगवेगळे स्तर, ‘डिस्पोजेबल’ (वापरून फेकण्यासारखे) / ‘रिफिल’ (पुनर्वापर) करण्यायोग्य ‘ई-लिक्विड सिस्टम’ आणि ‘रिचार्जेबल बॅटरी’ यांचा समावेश केलेला आहे.

या वाढत्या लोकप्रियतेसह या उद्योगाभोवती वादाचे वलयसुद्धा वाढत आहे. एकीकडे धूम्रपान करणार्‍यांसाठी हानी न्यून करण्याचे साधन म्हणून त्यांचा प्रचार केला जातो, तर दुसरीकडे ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्लू.एच्.ओ.) विशेषतः धूम्रपान न करणार्‍यांसाठी आणि तरुणांसाठी संभाव्य हानींविषयी चेतावणी दिली आहे. याचे प्रमुख कारण, म्हणजे बहुतेक राष्ट्रांमध्ये मुले आणि तरुण यांचे व्हेपिंगचे प्रमाण प्रौढांपेक्षा अधिक आहे.

२. ‘व्हेपिंग’ विरुद्ध ‘स्मोकिंग’ (धूम्रपान)

निमिषा चढ्ढा

सध्याच्या धूम्रपान करणार्‍यांनी व्हेपिंगकडे वळल्यास आरोग्याशी निगडीत धोके न्यून होऊ शकतात. ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’ (पी.एच्.इ.)च्या वर्ष २०१८ च्या अभ्यासातून असे आढळून आले की, ई-सिगारेट हे धूम्रपानापेक्षा किमान ९५ टक्के न्यून हानिकारक आहेत. यासह ‘पी.एच्.इ.’च्या निष्कर्षांमध्ये असे आढळून आले आहे की, व्हेपिंगचे व्यसन हा काळजीचा विषय असला, तरी ‘ई.एन्.डी.एस्.’ हा तरुणांना धूम्रपानाकडे नेण्याचा मार्ग नाही. याव्यतिरिक्त असे आढळून आले की, सर्व ‘निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीज’ (‘एन्.आर्.टी.’)मध्ये (तंबाखूच्या वापराच्या विकार असलेल्या लोकांवर तंबाखूव्यतिरिक्त निकोटीन घेऊन उपचार करण्याचा वैद्यकीयदृष्ट्या मान्यताप्राप्त मार्ग आहे.) लोकांना किमान ६ मास धूम्रपान सोडण्यास भाग पाडण्यासाठी ‘ई.एन्.डी.एस्.’ आणि वर्तणुकीय समर्थन यांचे संयोजन सर्वांत प्रभावी आहे.

धूम्रपान सोडून पूर्णपणे किंवा अंशतः व्हेपिंगकडे वळणार्‍या व्यक्तींच्या शारीरिक आणि फुफ्फुस यांच्या कार्यात सुधारणा झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. धूम्रपानातून बाहेर पडणार्‍या धुरातून दृश्यमान ‘टार’ साठा दिसून आला आहे; परंतु ई-सिगारेटच्या वाफेतून असा काही ‘टार’ दिसून न आल्याचे एका प्रयोगाद्वारे सिद्ध झाले आहे. एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, ई-सिगारेटमुळे ‘सेकंड हँड इनहेलेशन रिस्क्स’ आणि हवेतील कणांचेही प्रमाण न्यून आहे. यात व्हेपरच्या वापरामुळे घराच्या पृष्ठभागावरील निकोटीनचे प्रमाण २०० पट न्यून आढळले आहे. अर्थात् या व्हेपर्समुळे कर्करोगाचा धोका कायम आहे; परंतु यात धूम्रपान आणि व्हेपिंग वर्तनातील तफावत समजून घेणे महत्त्वाचे आहे. धूम्रपान करणार्‍यांमध्ये निकोटीन सेवनातील अंतर सहसा अधिक असते; परंतु व्हेपरमधील ‘पफ’मुळे निकोटीनचे व्यसन वाढू शकते आणि ते सतत वापरल्याने आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.

३. व्हेपिंगचे आरोग्यावरील परिणाम

‘निकोटीन’ हे मज्जासंस्थेवर परिणाम करते, हृदय आणि रक्तवाहिन्या यांसंबंधी रोगांचा धोका वाढवते अन् तरुणांमध्ये मेंदूच्या विकासावर परिणाम करते. यासह ‘ई.एन्.डी.एस्.’च्या दीर्घकालीन परिणामांच्या विस्तृत श्रेणीचा अजूनही अभ्यास केला जात आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासना (यू.एस. फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन – एफ्.डी.ए.)च्या मानकांनुसार बहुतेक ‘ई.एन्.डी.एस्.’ हे फ्लेव्हरिंग (चव) तोंडी सेवनासाठी सुरक्षित आहेत. असे असले, तरी ‘इनहेलेशन’मधील (श्‍वास आत घेण्यामधील) विषारीपणाचे मोठे प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. द्रवपदार्थांना गरम केल्यावर त्यांची रचना पालटते आणि ते हानिकारक संयुगे बाहेर टाकतात. १८० व्हेप फ्लेव्हर्सचे विश्‍लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, हे व्हेप १२७ तीव्र विषारी, १५३ धोकादायक आणि २२५ त्रासदायक रसायने सिद्ध करतात. ‘ई-सिगारेट’च्या परिणामाचे मूल्यांकन करण्यातील एक संशोधन अडचण अशी आहे की, या संशोधनात सहभागी असलेले बहुतेक व्हेपर हे पूर्वी धूम्रपान करणारे होते किंवा ‘ई.एन्.डी.एस्.’ आणि तंबाखूचे दुहेरी वापरकर्ते होते, ज्यामुळे ‘ई.एन्.डी.एस्.’चा परिणाम स्पष्ट करणे कठीण होते.

तरीसुद्धा अशा संशोधनातून समोर आलेल्या पुराव्यांमधून ‘ई.एन्.डी.एस्.’मधील रसायनांचा ‘ऑक्सिडेटिव्ह’ (ऑक्सिजनशी संबंधित) आणि हृदय अन् रक्तवाहिन्या यांसंबंधी ताण, फुफ्फुसांना दुखापत, ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी)’ (फुफ्फुसांना होणार्‍या जुनाट आजारामुळे श्‍वास घेण्यास त्रास होणारी एक गंभीर स्थिती), दमा आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाशी संबंध स्पष्ट झाला आहे. ‘ई.एन्.डी.एस्.’मधील ‘एरोसोल’मध्ये (एक प्रकारचा फवारा) धातू असतात. हे धातू कदाचित ‘कॉईल’मधून (विद्युत तारेचे वेटोळे) येतात. या कॉईलमध्ये ‘ई-लिक्विड (द्रव)’ आणि उपकरणाच्या इतर घटकांना गरम केले जाते. त्यामुळे या धातूंच्या दीर्घकालीन संपर्कात आल्यास मूत्रपिंडाचा आजार होतो.

‘ई.एन्.डी.एस्.’मधील रसायनांमुळे ‘पॉपकॉर्न फुफ्फुसे’ (ब्रॉन्कियोलायटिस ऑब्लिटेरन्स – या स्थितीमध्ये लहान श्‍वासवाहिन्यांमध्ये जळजळ होते आणि कालांतराने त्यामध्ये डाग पडून त्या कायमस्वरूपी अरुंद होतात.), ‘लिपॉईड न्यूमोनिया’ (फुफ्फुसांचा संसर्ग) आणि ‘कोलॅप्स्ड लंग’ (फुफ्फुस खराब होणे) होऊ शकतात. ‘व्हिटॅमिन ई-एसीटेट’ हे ‘ई.एन्.डी.एस्.’मधील एक ‘अ‍ॅडिटीव्ह’ (मिसळणारा पदार्थ) आहे. यात अनौपचारिक किंवा बेकायदेशीर स्रोतांकडून मिळवलेला गांजा समाविष्ट असतो. ई-सिगारेट किंवा व्हेपिंग वापराशी संबंधित फुफ्फुसांच्या दुखापतीशीही हा ‘अ‍ॅडिटीव्ह’ जोडलेला आहे. याच्याशी संबंधित अमेरिकेत रुग्णालयात भरती होण्याच्या किंवा मृत्यूच्या २ सहस्र ८०७ घटना घडल्या आहेत. यामुळे अनियंत्रित बाजारपेठांचे धोके अधोरेखित झाले आहेत.

याखेरीज अमेरिकेत वर्ष २०१५ ते २०१७ या दोन वर्षांमध्ये ई-सिगारेट स्फोटांच्या तब्बल २ सहस्र ३५ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनांमध्ये मोठी दुखापत झाल्याची चर्चा आहे. ई-लिक्विडच्या संपर्कात आल्याने आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम झाले आहेत. ‘ई.एन्.डी.एस्.’ची विल्हेवाट लावणे, ही आणखी एक मोठी समस्या आहे. एका अंदाजानुसार वर्ष २०२३ मध्ये अमेरिकन लोकांनी प्रति सेकंद ५.७ डिस्पोजेबल व्हेप टाकून दिले आहेत. जड धातूंचे मिश्रण असलेल्या या ‘व्हेपला रिसायकल’ (पुनर्वापर) करणे आव्हानात्मक आहेच; पण त्यासह पर्यावरणीय आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित चिंताही अधिक आहेत.

हा विषय चर्चेत असतांनाच व्हेपिंगच्या हानिकारक परिणामांचे पुरावे अजूनही समोर येत आहेत; परंतु बर्‍याच दाव्यांमधून संशोधन निष्कर्षांचे चुकीचे अर्थ लावण्यात आले आहेत, तसेच हे निष्कर्ष उपकरणाच्या वैशिष्ट्यांवर आणि वापरावर अवलंबून असतात, असे ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड (पी.एच्.इ.)’ने नोंदवले आहे.

४. भारतातील स्थिती

वर्ष २०१४ मध्ये ‘फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन टोबॅको कंट्रोल (एफ्.सी.टी.सी.)’ अंतर्गत जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व देशांना ‘ई.एन्.डी.एस्.’ला प्रतिबंधित करण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. स्वाक्षरी करणारा देश म्हणून भारताने भविष्यातील व्हेपिंगशी संबंधित सार्वजनिक आरोग्य संकटे टाळण्यासाठी सावधगिरीचा दृष्टीकोन स्वीकारला आहे, तसेच वर्ष २०१९ मध्ये ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आय.सी.एम्.आर्.)’ने प्रकाशित केलेल्या श्‍वेतपत्रिकेवर आधारित देशव्यापी बंदीही लादली आहे.

अशी बंदी असूनही शहरी भागांमध्ये बेकायदेशीर मार्गांनी सेवन चालूच आहे. वर्ष २०२४ मध्ये भारतीय ई-सिगारेट बाजारपेठ अनुमाने २.२० अब्ज अमेरिकन डॉलर्स (१७६ अब्ज रुपये) इतकी होती आणि वर्ष २०३३ पर्यंत ती ३.४० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत (३०० अब्ज रुपये) पोचण्याचा अंदाज आहे. वर्ष २०२२ च्या सर्वेक्षणानुसार वय १८ ते ३० वयोगटातील उच्च शिक्षण घेतलेल्या भारतियांमध्ये २३ टक्के लोकांनी ई-सिगारेट वापरल्याचे नोंदवले आहे. भारतीय महानगरांमध्ये १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्हेपरच्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले की, सर्वेक्षण केलेल्या ७१.४ टक्के लोकांमध्ये निकोटीनचा पहिला संपर्क धूम्रपानामधून आला आहे. यातील बहुतेक जण दुहेरी वापर करणारे होते, तसेच व्हेपिंगमुळे धूम्रपानाचे प्रमाण ७८.३ वरून ५८.४ टक्क्यांपर्यंत न्यून झाले आहे, तर ३० टक्के लोकांनी तंबाखूचे सेवन पूर्णपणे सोडले आहे.

या बंदीची प्रभाविता अन् सार्वजनिक आरोग्यावर होणारे परिणाम अद्याप पूर्णपणे समजलेले नसले, तरी प्रारंभीच्या विश्‍लेषणातून असे दिसून येते की, यामुळे जागतिक स्तरावर दिसणारा जलद वापर टाळता आला आहे. एका नमुना अभ्यासात ३३ टक्के लोकसंख्येला ‘ई.एन्.डी.एस्.’विषयी माहिती नसल्याचे समोर आले आहे.

(क्रमशः)

– निमिषा चढ्ढा, संशोधक साहाय्यक, ‘ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन’

(साभार : ‘ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन’चे संकेतस्थळ)

या पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/975658.html