उद्योजकांमध्ये साधनेमुळे नेतृत्व गुण वाढण्याची संधी आणि त्यांनी दानधर्म करण्याचे महत्त्व !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

जेव्हा मी सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात जात असे. (ही गोष्ट साधारण वर्ष २००८ ते २०१० मधील आहे.) त्या काळात तेथे परात्पर गुरु पांडे महाराज निवासाला होते. पनवेल आश्रमात गेल्यावर त्यांच्याशी भेटीगाठीचे योग नेहमीच यायचे. एका भेटीत त्यांनी मला उद्योजकतेची व्याख्या आध्यात्मिक दृष्टीकोनातून सांगितली. या अनुषंगाने २ नोव्हेंबर २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखात आपण ‘उद्योग केवळ व्यवसाय नसून तो उद्धाराचा मार्ग, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जगातील सर्वांत मोठे उद्योजक, समस्येतून संधी शोधून तिला आकार देण्यासाठी योग्य योजना आखणाराच खरा उद्योजक, उद्योजकाला नवीन गोष्टी सुचण्याची प्रक्रिया आणि परमेश्वराच्या कृपेनेच योग्य दिशा, साधन आणि संधी मिळाल्यास यशप्राप्तीच्या दिशेने खरा प्रवास चालू होतो’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहे. 

(भाग ६)

भाग ५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/972716.html

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

१. साधनेमुळेच नेतृत्व (लीडरशिप) गुणांची वाढ होते ! 

मला नेहमी वाटते, ‘लीडरशिप वाढायला हवी.’ लीडरविषयी मी असा विचार करतो, ‘L (एल्) म्हणजे Learning (लर्निंग – शिकणे), E (इ) म्हणजे Empowering (एम्पॉवरिंग – सक्षमीकरण), A (ए) म्हणजे Authenticity (ऑथेंटिसिटी – सत्यता), D (डी) म्हणजे Decision Making (डिसीजन मेकिंग – निर्णय घेणे), E (इ) म्हणजे Energy (एनर्जी – ऊर्जा) आणि R (आर्) म्हणजे Result (रिझल्ट – परिणाम). हे सर्व गुण खर्‍या ‘लीडर’मध्ये (नेतृत्व करणार्‍यामध्ये) असायला हवेत. जसजशी साधना वाढते, तसतशी तुमची ‘लीडरशिप’सुद्धा वाढायला लागते. तुम्ही अधिक कार्यक्षम, अधिक विचारशील, अधिक शांत होऊ लागता, तुमचा अहंकार न्यून होतो आणि तुमच्या लक्षात येते की, ही सर्व प्रगती केवळ स्वतःमुळे नाही, तर आपल्याशी संबंधित अनेकांच्या योगदानामुळे होते. साधनेमुळेच हे आपल्या लक्षात येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगानुसार आपल्याला साधनेचा मार्ग दाखवला आहे. ज्यामध्ये कर्म, योग, भक्ती आणि ज्ञान हे ४ मार्ग आपल्याला सांगितले आहेत. यासाठी खरोखरच त्यांच्या उपकारांची परतफेड कितीही जन्म घेऊन फेडता येणार नाही, हेच खरे ! साधनेमुळेच ‘लीडरशिप’ गुणांची वाढ होते. प्रामाणिकपणा, शूरता, विचारशीलता हे सर्व गुण आपोआप वाढू लागतात. मी स्वतः याच अनुभवातून हे लक्षात घेतले.

२. साधनेमुळे आंतरिक शुद्धी होते !  

स्टिफन कोव्ही यांनी ‘सेव्हन हॅबिट्स ऑफ टॉप लीडर्स’ हे पुस्तक लिहिले आहे, ज्यामध्ये जगभरातील ‘लीडर्स’चा अभ्यास करून ‘खर्‍या ‘लीडर’मध्ये कोणते गुण असायला हवेत’, याची सूची दिली आहे, उदाहरणार्थ आपल्यात जर प्रामाणिकपणा केवळ ५० टक्के आहे; पण तो १०० टक्के करायचा असेल, तर तो वाढवण्यासाठी काय करावे ? स्टिफन कोव्हीकडे त्याचे उत्तर नाही; पण माझ्याकडे त्याचे उत्तर आहे. ते सनातन संस्थेच्या माध्यमातून मला समजले आहे. सनातन सांगते, ‘कुणीही चांगल्या मार्गाने, योग्य कामाने पैसे मिळवा आणि चांगल्या कामासाठी ते व्यय करा. चांगले गुण आपल्यात वृद्धींगत करायचे असतील, तर त्यासाठी साधना वाढवावी लागेल; कारण साधनेमुळे आतून शुद्धता होते.’

दापोलीत झालेल्या उद्योजक बैठकीत डावीकडून सद्गुरु सत्यवान कदम, उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. रवींद्र प्रभुदेसाई (२३.१०.२०२४)

३. साधनेमुळे सात्त्विकता वाढल्यावर सर्व दुर्गुण न्यून होणे ! 

दान करतांना ते सत्पात्री दान करावे. पैसे मिळवतांना कुठल्याही चुकीच्या मार्गाने, उदाहरणार्थ गुटखा विकणे, दारू विकणे, कुणाला फसवणे, कर न भरणे किंवा इतर कोणत्याही अनुचित मार्गाने पैसे मिळवू नयेत. यामुळे खरा प्रामाणिकपणा आतून निर्माण होतो. ‘आपण ग्राहकांना योग्य दर्जाचे उत्पादन देतो, फसवत नाही’, हे तुमच्यातील प्रामाणिकपणा दर्शवतो, उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती मांसाहारी खाणे (नॉनव्हेज) थांबवण्याचा निर्णय घेत असेल, तर ती खात नाही. दारू पिणारे लोक असतात. त्यांना कितीही सांगितले, तरी ते दारू सोडत नाहीत; पण ‘साधनेमुळे त्यांना आतूनच दारू सोडावी’, असे वाटू लागते. जेव्हा तुमची सात्त्विकता वाढते, तेव्हा तुमचे सर्व दुर्गुण न्यून होऊ लागतात.

४. कोणत्याही समस्येवर साधनेने सहज आणि तात्काळ निर्णय घेता येणे 

अकिव मॉरिटा, जे ‘सोनी कॉर्पोरेशन’चे अध्यक्ष आहेत त्यांनी लिहिले आहे, ‘Every Street is Paved with Gold’, म्हणजे प्रत्येक मार्गावर तुम्हाला सोने दिसत असते, तसेच आमच्यासाठीही संधीमध्ये सोने दिसते. केवळ त्यासाठी स्वतःची क्षमता ओळखणे आणि ते मिळवण्याची क्षमता आपल्यात हवी. जर आपण साधना करायला आरंभ केला, तर स्वतःची क्षमता निश्चित वाढते. कोणतीही समस्या समोर आली की, निर्णय सहज आणि तात्काळ घेता येतात, जणू एखादी सिद्धी प्राप्त झाली आहे. अर्थात् आपण एखादी गोष्ट पहातो, जी लोकांना दिसत नाही किंवा आपल्या विचारातून समजते की, हे कसे करू शकतो. साधनेमुळेच हे सगळे शक्य होत असते. जेव्हा रज आणि तम गुण न्यून होतात, तेव्हा बुद्धी सात्त्विक होऊन सूक्ष्म अन् स्पष्ट कळत जाते, उदाहरणार्थ जेव्हा लेखक सात्त्विक वातावरणात असतात, तेव्हा ते शब्द आणि वाक्य यांची रचना अधिक सुंदरपणे करू शकतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळे आत्मविश्वास विकसित झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

माझ्या अनुभवातून मला हे लक्षात आले की, साधना वाढल्यानंतर आपोआप तुमची ‘लीडरशिप’(नेतृत्व गुण) वाढते. माझ्याविषयी पाहिले, तर आरंभी आमच्याकडे केवळ १० उत्पादने होती. पुढच्या वर्षांत ती २-३ ने वाढली. आज पितांबरीकडे ९० उत्पादने आहेत आणि मला प्रतिदिन काहीतरी नवीन सुचत रहाते. मला आत्मविश्वास आहे की, मी कितीही उत्पादने निर्माण करू शकतो. त्याला काही मर्यादा नाही, अमर्याद आहे. माझ्यातील हा आत्मविश्वास सनातन संस्थेने आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या साधना मार्गामुळेच विकसित झाला. याचा मी प्रत्यक्ष अनुभवसुद्धा घेतला.

– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

५. साधना आणि कला एकत्र करून परमेश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! 

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात संगीत विभागाच्या समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर नावाच्या साधिका आहेत. पूर्वी त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘गाणी रचतांना त्यातील सात्त्विक राग आणि भाव ओळखला, त्यानुसार गायन केले, तर गाण्यातून परमेश्वरप्राप्ती होऊ शकते.’’ यासह नृत्य करणार्‍या काही जणांनाही साधना आणि कला एकत्र करून परमेश्वरप्राप्तीचा मार्ग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दाखवला. आता तर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातून ‘कलेच्या माध्यमातून साधना करणे’, हेसुद्धा शक्य होणार आहे.

६. साधनेने नेतृत्वगुण वृद्धींगत होऊन खरी प्रगती दिसून येते ! 

एकदा तुमची बुद्धी सात्त्विक झाली की, तुम्हाला सर्वकाही सुसंगत दिसू लागते. तुम्ही बघाल तिथे सुसंधी आहे, म्हणजे खर्‍या अर्थाने ‘लीडरशिप’ वाढवायची असेल, तर साधना करावी लागेल. साधना वाढल्यावरच चांगली ‘लीडरशिप’ आणि त्यातून घडलेली तुमची खरी प्रगती दिसून येईल.

७. दानाचे महत्त्व आणि ते केल्याने होणारा लाभ ! 

आतापर्यंत मी अनेक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य करणार्‍या संस्था बघितल्या आहेत; पण सनातन संस्था ही एकमेव अशी आध्यात्मिक संस्था आहे, जिथे पैसा अन् शक्ती यांचा वापर पूर्णपणे अध्यात्माच्या प्रचार-प्रसारासाठी केला जातो. जगाच्या पाठीवर ही एकमेव अशी संस्था आहे. मग मी ठरवले की, या संस्थेला दानधर्म करायला हवा. आरंभी प्रत्येक मासाला कुठल्या कार्यक्रमासाठी गेल्यावर तिथे अर्पण करायचो; पण मला जाणवले की, परमेश्वर आपल्यावर प्रतिदिन जेवायला, खायला, गाडीतून फिरायला, तसेच साधना करण्याची क्षमता देतो आणि कृपा करतो. मग विचार आला, ‘प्रतिदिन अर्पण करता येईल का ?’ जर प्रतिदिन अर्पण करायचे असेल, तर त्यासाठी दानपेटी असावी. सनातन संस्थेला विचारले, ‘दानपेटी घरी देता येईल का ?’ आम्ही विनंती केल्यावर संस्थेने ती पेटी उपलब्ध करून दिली. आता आम्ही प्रतिदिन त्या पेटीत अर्पण करतो. भले तुम्ही १ रुपया दान करा, २ रुपये किंवा १०० रुपये करा.

जसजसे दान वाढेल, सत्संग वाढतील, सेवा वाढेल, नामस्मरण वाढेल, तसतशी तुमच्यावर भगवंताची कृपा वाढत जाईल. तुम्हाला जे अधिक जमत आहे, ते तुम्ही करावे. याविषयी मला असा अनुभव आला की, लहान असतांना आम्ही दत्तजयंती महोत्सवात गावात गेल्यावर देवळाच्या दानपेटीतील पैसे पहायचो. तेव्हा त्यात झिजलेले, फाटकी नोट, काळे झालेले छोटे नाणे, असे लोकांनी अर्पण केलेले असायचे. तेव्हा मनात विचार येत असे, ‘आपण देवाकडे एवढे सगळे मागायचे आणि ते अशा रूपात अर्पण होणे चुकीचे आहे.’ सत्संगात गेल्यानंतर लक्षात आले की, देवच आपल्याला सर्व काही देतो आणि जे परमेश्वराचे आहे, तेच आपण त्याला अर्पण करायला हवे. आपल्याला याचे ज्ञान नसल्यामुळे आपल्याला ते करणे जड होत असते.

८. उद्योजकांकडे आर्थिक क्षमता असल्याने त्यांनी अर्पण करणे महत्त्वाचे ! 

काही वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एका सत्संगात सांगितले होते, ‘‘जेव्हा तुम्ही तुमचे सर्वस्व, म्हणजे संपत्ती, मन, शरीर, आत्मा, बुद्धी, अहंकार हे सर्व गुरूंच्या चरणी अर्पण करता, तेव्हाच तुमच्यावर सद्गुरूंची कृपा होते.’’ म्हणून पुष्कळ दान-धर्म करून आपण त्या कृपेचा योग्य उपयोग करायला हवा. नंतर असे लक्षात येते की, तुम्ही कितीही दान दिले, तरी परमेश्वर तुम्हाला भरभरून देतच असतो. त्यातून वेगळीच अनुभूती येते. तुम्ही दिल्याने तुमचे काहीही न्यून होत नाही, उलट वाढत जाते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पूर्वी मला साधारणपणे असे सांगितले होते, ‘‘आरंभी सगळे नामस्मरण करायला लागतात. मग सत्संगात येतात, शरिराने सेवा करायला लागतात आणि सर्वांत शेवटी पैशांचे अर्पण होते; पण तुमचे उलट झाले, ‘तुम्ही नामस्मरण केल्यावर लगेच पैसेसुद्धा अर्पण केले. उद्योजकांसाठी हे महत्त्वाचे आहे; कारण त्यांच्याकडे आर्थिक क्षमता असते आणि ते देऊ शकतात.’

त्यामुळे जेवढे उद्योजक हा लेख वाचतील, त्यांनी अधिकाधिक अर्पण करण्याची सवय लावायला हवी; कारण संस्थेला सर्व गोष्टींमध्ये साहाय्याची आवश्यकता असते.

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

९. अर्पणाचे महत्त्व उद्योजकांनी समजून घेतल्यास त्यांना पुष्कळ लाभ होऊ शकतो !  

आध्यात्मिकदृष्ट्या परमेश्वराला किंवा गुरूंना कोणतीही आवश्यकता नाही; मात्र व्यावहारिकदृष्ट्या आध्यात्मिक संस्थेला साहाय्य होणे महत्त्वाचे असते, उदा. गोवर्धन पर्वताचा विचार करा. ‘जेव्हा इंद्राचा कोप झाला आणि पुष्कळ पाऊस पडायला लागला, तेव्हा श्रीकृष्णाने एका करंगळीवर पर्वत उचलला होता. इंद्रदेवाच्या कोपापासून मथुरा आणि ब्रजमधील लोकांना वाचवण्यासाठी त्याने कृती केली होती. संपूर्ण गावाचे रक्षण केले. त्याच प्रकारे आपण उद्योजकांनी अर्पणाचे महत्त्व समजून घेतले, तर त्याचा स्वतःला पुष्कळ लाभ होऊ शकतो. भजन, भक्तीगीत, शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम, तसेच स्पर्धात्मक आणि बौद्धीक कार्यक्रम यांनाही साहाय्य केले पाहिजे. आध्यात्मिक शक्ती तर प्रचंड आहेच; पण आपण  स्वतःच्या क्षमतेनुसार या कार्यात सहभागी झालो, तर त्यातून स्वतःचा उद्धार नक्कीच होऊ शकतो.

१०. कृतज्ञता 

हे सर्व ज्ञान मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून प्राप्त झाले, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः वंदन करतो आणि सनातन संस्थेप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

‘जो परमेश्वराचे सतत स्मरण करतो आणि लोकांकडून साधना करवून घेतो, तोच खरा मालक, पिता अन् पालक’, याच गोष्टीची आठवण सनातन संस्था करून देते, तसेच साधनेसाठी मार्गदर्शन करते. आपण सनातन संस्थेच्या कोणत्या ना कोणत्या उपक्रमाशी जोडून स्वतःचा, कुटुंबियांचा, तसेच कार्यस्थळावरील लोकांचा ऐहिक आणि आध्यात्मिक उद्धार साधू शकतो.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि., ठाणे.

भाग ७ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/977175.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक