खरा उद्योजक कोण ? आणि उद्योगामध्ये योग्य साधनेची आवश्यकता !

उद्योग हीच साधना !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित लेखमाला !

‘उद्योग हीच साधना’ या लेखमालिकेच्या २६ ऑक्टोबरच्या भागात आपण क्रियमाणाच्या आधारे साधना करून प्रारब्धावर विजय मिळवता येतो, हे पाहिले. प्रारब्ध आपल्या हातात नसते; पण क्रियमाण आपल्या हातात असते आणि हाच विचार मला अधिक स्पष्ट झाला. जेव्हा मी पनवेल येथील सनातनच्या आश्रमात जात असे. (ही गोष्ट साधारण वर्ष २००८ ते २०१० मधील आहे.) त्या काळात तेथे परात्पर गुरु पांडे महाराज निवासाला होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची त्यांच्यावर अपार कृपा होती आणि त्या वेळी पनवेलच्या आश्रमात त्यांच्या एवढे सत्पुरुष कुणीच नव्हते. पनवेल आश्रमात गेल्यावर त्यांच्याशी भेटीगाठीचे योग नेहमीच यायचे. एका भेटीत त्यांनी मला उद्योजकतेची व्याख्या आध्यात्मिक दृष्टीकोनातून सांगितली.

(भाग ५)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.

भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/970600.html


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जगातील सर्वांत मोठे उद्योजक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

उद्योजकातील ‘योजक’ म्हणजे ‘योजना करणारा’. ‘योजक’ या शब्दाचा अर्थ थोडा अधिक सखोलपणे घेतला, तर त्यामध्ये केवळ योजना आखणारा एवढाच अर्थ नाही, तर ‘जिथे समस्या आहे ती ओळखून त्यावर उपाययोजना करणारा’, असा अर्थही अंतर्भूत आहे. परात्पर गुरु पांडे महाराजांनी एकदा मला विचारले, ‘‘जगातील सर्वांत मोठा उद्योजक कोण ?’’ मी तात्काळ उत्तर दिले, ‘‘भारतामधील म्हटले, तर मुकेश अंबानी आणि जगातील म्हटले, तर बिल गेट्स किंवा इलॉन मस्क !’’

परात्पर गुरु पांडे महाराज

परात्पर गुरु पांडे महाराज माझ्याकडे पाहून मोठ्याने हसले आणि म्हणाले, ‘‘जे तू सांगितले, ते केवळ ‘अर्धेच’ उद्योजक आहेत. त्यांची केवळ ‘ऐहिक उन्नती’ झाली आहे; पण खरा उद्योजक तोच ज्याची ऐहिक आणि आध्यात्मिक अशी दोन्ही उन्नती झाली आहे. त्यालाच ‘पूर्ण उद्योजक’ म्हणतात.’’ मी त्यांना विचारले, ‘‘मग तुमच्या दृष्टीने खरा आणि सर्वांत मोठा उद्योजक कोण ?’’ त्यावर ते अत्यंत भावपूर्णपणे म्हणाले, ‘‘जगातील ८०० कोटी लोकांना ऐहिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही उन्नतींचा मार्ग दाखवणारे जगातील सर्वांत मोठे उद्योजक म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !’’ त्यांनी प्रारब्ध नष्ट करण्याची आणि क्रियमाण कर्मातून करण्‍याची साधना, म्हणजेच ‘व्यष्टी आणि समष्टी साधना’ या नियमानुसार ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा मंत्र अन् तंत्र दिला. त्यासह दैनिक ‘सनातन प्रभात’, ‘सनातन डॉट ओ.आर्.जी.’ (www.sanatan.org) ही वेबसाईट, विविध भाषांतील सत्संग आणि प्रवचने, ३६८ हून अधिक आध्यात्मिक ग्रंथ, तसेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक जिवाला ऐहिक अन् आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला करून दिला आहे. परात्पर गुरु पांडे महाराजांनी एवढ्या थोडक्यात; पण प्रभावी शब्दांत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी सांगितले, त्यामुळे माझे त्यांच्यावरील श्रद्धा, विश्वास आणि समर्पण सहस्रपटींनी वाढले.

– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

१. उद्योग केवळ व्यवसाय नसून तो उद्धाराचा मार्ग !

‘उद्योजक म्हणजे ‘उद (उद्धार करणारा) + योजक (योजना करणारा)’ हा संधीविग्रह मला परात्पर गुरु पांडे महाराजांनी समजावून सांगितला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शिकवणुकीप्रमाणे जसा गृहस्थ आपल्या कुटुंबाचा प्रमुख असतो आणि तो आपल्या कुटुंबातील सदस्यांचे पालन-पोषण, शिक्षण, शिस्त, तसेच त्यांची सांस्कृतिक, सामाजिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती यांचे दायित्व घेतो, तसाच उद्योजक हासुद्धा आपल्या संस्थेचा प्रमुख असतो; परंतु त्याचे दायित्व केवळ आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नसून संस्थेतील प्रत्येक सदस्याच्या आध्यात्मिक उन्नतीची काळजी घेणे, हेसुद्धा त्याचे कर्तव्य आहे. ‘केवळ वेतन देणे आणि शिस्त लावणे एवढ्यावर उद्योग संपत नाही; त्यामागे आध्यात्मिक दृष्टीकोनही असावा’, असे परात्पर गुरु पांडे महाराज नेहमी सांगायचे. त्यांचे हे शब्द माझ्या मनावर कायमचे कोरले गेले. आपण व्यवस्थापन, नेतृत्व आणि आर्थिक नियोजन या दृष्टीकोनातून उद्योगाकडे बघतो. त्यामुळे उद्योगाचा आध्यात्मिक दृष्टीकोन अनेकदा दुर्लक्षित रहातो. त्या काळात मला परात्पर गुरु पांडे महाराजांनी ‘उद्योग केवळ व्यवसाय नसून तो उद्धाराचा मार्ग आहे’, हा अमूल्य दृष्टीकोन दिला.

२. ‘आवश्यकता ओळखून त्यावर उपाय शोधणे’, हेच खर्‍या उद्योजकाचे कार्य !

आजच्या व्यवस्थापन भाषेत ‘गॅप ॲनालिसिस’ म्हणतात, म्हणजेच ‘एखाद्या आवश्यकतेचा (गरजेचा) शोध घेणे, आवश्यकता ओळखणे आणि त्यावर उपाय शोधणे’, हेच खर्‍या उद्योजकाचे कार्य असते. बाकी अनेकांना ती आवश्यकता दिसतही नाही; पण उद्योजक मात्र ती ‘दिसण्याची दृष्टी’ घेऊन जन्माला येतो. मला परात्पर गुरु पांडे महाराजांचे प्रेम आणि मार्गदर्शन लाभले अन् त्यांच्या कृपेनेच ‘उद्योजकतेचा आध्यात्मिक अर्थ’सुद्धा उलगडला. उद्योजकतेचा मूळ अर्थ समजल्यावर त्याचा अनुभव मला प्रत्यक्ष जीवनातही आला, उदाहरणार्थ एक काळ असा होता की, तांबे आणि पितळ याची भांडी स्वच्छ करण्यासाठी बाजारात एकही योग्य पावडर उपलब्ध नव्हती. ‘स्टेनलेस स्टील’साठी ‘ओडोपीक’, ‘शाईन इट’ अशी काही उत्पादने होती; पण तांबे आणि पितळ यांसाठी मात्र काहीच नव्हते. ग्राहकांची ही आवश्यकता मला जाणवली आणि त्या ‘गॅप’चे विश्लेषण म्हणजेच ‘गॅप ॲनालिसिस’ मी प्रत्यक्षात अनुभवले. त्या वेळी आम्ही ‘लिक्विड सोप’ (द्रवरूप साबण), ‘सॉईल फ्लुइड’ (मातीचे द्रवरूप), ‘क्लोरिनेशन पावडर’ (पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरण्यात येणारी भुकटी), अशी काही उत्पादने बनवत होतो. जेव्हा ही नवीन आवश्यकता लक्षात आली, तेव्हा आम्ही तांबे आणि पितळ यांना ‘नव्यासारखी चमक देणारी पावडर’, हे विशेष उत्पादन बनवले अन् त्याला ‘पितांबरी’ असे नाव दिले. आज ते उत्पादन घराघरांत पोचले आहे आणि सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे. खरे पहाता प्रत्येक शोधामागे अशीच एखादी ‘गॅप’ लपलेली असते. केवळ ती उद्योजकाला हेरता आली पाहिजे.

३. समस्येतून संधी शोधून तिला आकार देण्यासाठी योग्य योजना आखणाराच खरा उद्योजक !

जसे आधी चाकाचा शोध लागला, मग ‘स्टीम इंजिन’ (वाफेवर चालणारे इंजिन), त्यानंतर ‘पेट्रोल-डिझेलचे इंजिन’ आणि आता ‘इलेक्ट्रिक इंजिन’. या सर्व शोधांचा आरंभ एखाद्या आवश्यकतेच्या जाणिवेतून झाला आणि त्या आवश्यकतेला पूर्ण करण्याची योजना जो आखतो, तोच खरा उद्योजक. ‘एखादे उत्पादन सिद्ध करण्यासाठी सगळ्यात आधी योग्य योजना (Planning) आवश्यक असते. कच्चा माल मिळवणे, त्याची प्रक्रिया करणे, ‘फिनिश’ (अंतिम चांगले) उत्पादन बनवणे, त्याला योग्य ‘पॅकेजिंग’ (बांधणी) देणे, त्याच्या किमती (Pricing) ठरवणे, उत्पादन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करणे, ते उत्पादन विज्ञापनांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोचवणे आणि ग्राहकांच्या आवडीनुसार सतत सुधारणा करत रहाणे’, या संपूर्ण प्रक्रियेलाच ‘योजना’ म्हणतात. म्हणूनच ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, जो समस्येतून संधी शोधतो आणि त्या संधीला आकार देण्यासाठी योग्य योजना आखतो, तोच खरा उद्योजक ! ही संकल्पना कुठल्याही उत्पादनाला लागू होते, मग ती ग्राहकोपयोगी वस्तू असो ज्याला ‘पॅकेजिंग’ असते, औद्योगिक उत्पादने (इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स) असो किंवा पेट्रोलियम उत्पादने. वरील उदाहरण हे विशेषतः ग्राहकोपयोगी वस्तूंच्या संदर्भात मी तुम्हाला दिले आहे.

४. शून्यातून अंकुर फुटून त्यातून सृष्टीचा विस्तार होणे आणि शून्यावस्थेतून चालू होत असलेली परमेश्वरप्राप्तीची दिशा !

परात्पर गुरु पांडे महाराजांनी आणखी एक अतिशय गूढ; पण सुंदर गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले, ‘‘हे संपूर्ण जग शून्यातून निर्माण झाले आहे.’’ त्या वेळी त्यांनी मला सांगतांना एक कागद घेतला आणि त्यावर शून्य काढले. मग त्या शून्याला ‘—’ अशी एक रेघ ओढली आणि म्हणाले, ‘‘बघ, आता हा एक (१) सिद्ध झाला.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘असे आधी हे जग शून्य अवस्थेत होते आणि मग परमेश्वराला इच्छा झाली. जसे एखादी बी फुटून त्यातून अंकुर निघतो, तसे त्या शून्यातून ‘एक’चा अंकुर फुटला आणि त्या अंकुरातून सृष्टीचा विस्तार झाला. पुढे दोन, तीन… असे क्रमाने करत प्राणी, पक्षी, मनुष्यापर्यंत सर्व निर्माण झाले.’’ यानंतर त्यांनी एक विलक्षण उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘आता सांग, जर आपण या शून्याला जोडलेली ही रेघ — म्हणजे तो एक — जर पुसली, तर काय उरेल ?’’ मी तात्काळ उत्तर दिले, ‘‘शून्य उरेल.’’ ते हसून म्हणाले, ‘‘नाही. शून्य नाही, तर ‘एकांत’ उरेल; कारण ‘१’ चा अंत झाला म्हणजे ‘एकांत’!’’ यानंतर त्यांनी स्पष्ट केले, ‘‘तुम्हाला जर शून्यावस्थेत, म्हणजे परमेश्वरप्राप्तीकडे जायचे असेल, तर सर्व बाह्य इंद्रियांची द्वारे बंद करून ध्यानावस्थेत जावे लागते, म्हणजेच ‘एक’चा ‘अंत’ झाला आणि त्यातून ‘एकांत’ मिळाला. यानंतरच शून्यावस्था आणि त्यातूनच परमेश्वरप्राप्तीची दिशा चालू होते.’’

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

५. उद्योजकाला नवीन गोष्टी सुचण्याची प्रक्रिया

मला परात्पर गुरु पांडे महाराजांचे पुष्कळ प्रेम अनुभवायला मिळाले. त्यांच्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. माझे बाबा गेल्यानंतर वडिलांची जी जागा होती, ती परात्पर गुरु पांडे महाराजांच्या रूपाने आणि त्यांच्या कृपेने मला प्राप्त झाली. मग त्या कृपेच्या प्रवाहातून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापर्यंत जाण्याचा योग आला. त्यांनी एकदा सांगितले, ‘‘जेव्हा आपण साधना करतो, तेव्हा मनात एक विचार येतो, ‘ज्या काही ‘गॅप ॲनालिसिस’ किंवा सूचना आहेत, त्यांचा शोध कसा घेतला जातो.’ जसे कवी किंवा लेखकांना नवीन कल्पना सुचतात, तसेच उद्योजकालाही काही गोष्टी दिसतात किंवा सुचतात.’’

६. साधनेने बुद्धी सात्त्विक आणि सूक्ष्म होत गेल्यामुळे चुका न्यून होऊन गोष्टी समजायला लागणे

एकदा मी नवीन कल्पना सुचण्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना एकदा भेटलो त्या वेळी प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सोपे आहे. जेव्हा तुम्ही ध्यान लावून बसता, तेव्हा तुम्हाला दैव अनुकूल व्हायला लागते. साधनेमुळे तुमच्यातील रज आणि तम गुण न्यून होतात अन् सात्त्विकता वाढते आणि तुमची बुद्धी सात्त्विक झाली की, तुमचे मन आणि बुद्धी सूक्ष्म होत जाते.’’ त्या वेळी त्यांनी ‘स्थुलातून सूक्ष्माकडे जाणे’, हा साधनेचा नियमही सांगितला. स्वतःची बुद्धी आरंभी जड असते. त्यामुळे अनेक गोष्टी समजत नाहीत. मलाही आठवते की, १० वर्षांपूर्वी मला विषयाचे आकलन होत नव्हते. विचार करायला गेलो की, डोके जड व्हायचे आणि काहीच सुचायचे नाही. नंतर मी साधना चालू केली. ५ वर्षांनी साधनेत प्रगती झाली आणि चुका न्यून होऊ लागल्या अन् नंतर गोष्टी समजायला लागल्या.

७. परमेश्वराच्या कृपेनेच योग्य दिशा, साधन आणि संधी मिळाल्यास यशप्राप्तीच्या दिशेने खरा प्रवास चालू होतो !

आज पितांबरीला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत; पण पहिल्या ५ वर्षांत आमचे एकही नवीन उत्पादन आले नव्हते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ चालू केल्यानंतर मला प्रश्नांची उत्तरे मिळायला लागली. पितांबरीच्या विक्रीतही वाढ झाली. साधना हळूहळू वाढवत गेल्यामुळे बुद्धी सात्त्विक होत गेली, तशी ती सूक्ष्म झाली आणि त्यासह परिस्थितीही अनुकूल घडत गेली. त्या गोष्टी कार्यवाहीत आणण्यासाठी परमेश्वराने योग्य माणसे, जागा, पुरवठादार आणि संधी निर्माण केल्या; म्हणूनच आपण म्हणतो, ‘मी केले’, ‘मी बनवले’; पण खरे पाहिले, तर असे काही होत नाही. हे सर्व परमेश्वराच्या कृपेनेच घडते. त्याच्या कृपेने योग्य दिशा, योग्य साधन आणि योग्य संधी मिळतात अन् तेव्हाच यशप्राप्तीच्या दिशेने स्वतःचा खरा प्रवास चालू होतो.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.

भाग ६ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/975062.html