उद्योजकांनी व्यष्टी आणि समष्टी साधना करून स्वतःची आध्यात्मिक अन् व्यावहारिक प्रगती साधणे महत्त्वाचे !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

मागील लेखांमध्ये आपण पाहिले, ‘उद्योग ही एक समष्टी साधना आहे.’ आध्यात्मिक दृष्टीने पाहिले, तर समष्टी साधनेला ७० टक्के आणि व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व दिले आहे. आपल्याला सत्संग आणि प्रवचन यांमधून हे वारंवार सांगितले जाते. त्यामुळे आपल्या सर्वांचा कल ‘समष्टी’ साधनेकडे असतो; कारण प्रत्येकालाच लवकर आध्यात्मिक प्रगती साधायची असते. मीसुद्धा याच प्रेरणेने समष्टी साधना करू लागलो. जेव्हा आपण समाजात जाऊन समष्टी साधना करतो, तेव्हा स्वभावदोषामुळे होणार्‍या चुका लक्षात येतात. स्वतःचे काम आणि मिळालेले यश यांमुळे स्वतःच्या स्वभावात काही दोष निर्माण होऊ शकतात, म्हणजे अहंकार वाढू शकतो. चुका सुधारण्यासाठी आणि अधिक प्रभावीपणे समष्टी साधना करायची असेल, तर व्यष्टी साधनेला पर्याय नाही. सनातन संस्थेचे सत्संग, प्रवचने आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख यांमधून हे अधिक स्पष्टपणे मला समजू लागले. व्यष्टी साधनेचा मुख्य भाग म्हणजे ‘नामस्मरण’ ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’चा पाया, म्हणजे ‘नामस्मरण’च आहे.

(भाग ७)

भाग ६ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/975062.html

नागरी अभिवादन सत्कार समितीकडून  डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा मानपत्र देऊन नागरी सत्कार करतांना मान्यवर

१. गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यास परमेश्वराचे दर्शन होणे

‘आतापर्यंत आपण सहस्रो वर्षांपासून संत-वाङ्मय वाचत आलो आहोत. अगदी आद्यशंकराचार्य यांच्यापासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्यापर्यंत सर्वांनी नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भारताची गुरु-शिष्य परंपरा आहे. प्रत्येक गुरूंनी त्यांच्या शिष्याला एखादा नामजप दिला आहे आणि त्या नामस्मरणाच्या सातत्यपूर्ण साधनेतून शिष्य विशिष्ट आध्यात्मिक पदाला पोचले अन् त्याला परमेश्वराचे दर्शन झाले आहे. जेव्हा नामस्मरण योग्य पद्धतीने केले जात नाही, तेव्हा ते कंटाळवाणे वाटते, तर कधी ते सोडूनही दिले जाते. त्यामुळे त्यांची पुढील टप्प्याची साधना योग्य रितीने होत नाही. अशा वेळी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. आपल्याला एखादे गुरु किंवा संस्थेचे मार्गदर्शक यांचे साहाय्य होऊ शकते. अनेकदा असे साहाय्य ‘आपल्याला कुठून आणि कुणाकडून मिळू शकते’, हेही आपल्याला ठाऊक नसते अन् मार्गदर्शनाविना केलेली साधना त्रासदायकही ठरू शकते.

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

२. साधना चांगली होण्यासाठी योग्य गुरु किंवा आध्यात्मिक संस्था मिळणे अत्यंत आवश्यक !

ब्राह्मणांमध्ये मुंज विधीच्या वेळी मुलाला गुरुजी किंवा वडील गायत्री मंत्राची उपासना सांगतात. ‘गायत्री मंत्र आणि उपासना’ हे स.कृ. देवधर, म्हणजेच माझ्या बहिणीच्या सासर्‍यांचे पुस्तक माझ्या वाचनात आले होते. त्या पुस्तकातून मला समजले, ‘गायत्री मंत्र, म्हणजे गायत्रीदेवी आणि सूर्य यांची उपासना आहे. ती आपल्या बुद्धीला तेज अन् प्रबोधन मिळवून देणारी साधना आहे.’ नंतर अभ्यास आणि अनुभव यांतून लक्षात आले, ‘गायत्री मंत्राची ही साधना अत्यंत उच्च कोटीची आहे आणि योग्य मार्गदर्शन किंवा पूर्वसिद्धता यांखेरीज ती केल्यास त्रास होऊ शकतो.’ अनेकांना असे अनुभवही आले आहेत. ‘काहींनी योग्य पद्धतीने प्रारंभीच्या टप्प्यातील साधना न केल्यामुळे शरिरातील उष्णता वाढणे, विचित्र अनुभव येणे, मानसिक अस्वस्थता जाणवणे’, असे परिणाम दिसून आले. हे सर्व अनुभव वाचन आणि प्रत्यक्ष काही साधक यांच्या भेटीतूनही समजले. त्यामुळे माझ्या हे लक्षात आले, ‘साधना चांगल्या प्रकारे करण्यासाठी योग्य गुरु किंवा आध्यात्मिक संस्था मिळणे अत्यंत आवश्यक आहे; कारण त्यांचे मार्गदर्शन मिळाल्यास साधना योग्य टप्प्याने आणि शास्त्रोक्त पद्धतीने होऊन खर्‍या अर्थाने आध्यात्मिक प्रगती साध्य होऊ शकते.’

३. विविध नामजपांतून शेवटी एका नामावर आणि एका तत्त्वावर स्थिर होण्याचे महत्त्व !

माझी आई (सनातनच्या पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई) प.पू. कलावती आईंची उपासना करायची. त्यांना तिथे ‘ॐ नमः शिवाय ।’, हा जप दिला होता. माझ्या लहानपणी मीसुद्धा आईसह ‘ॐ नमः शिवाय ।’, हा जप म्हणायचो. आपल्या मूळ देवतांमध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेव, म्हणजेच उत्पत्ती, स्थिती अन् लय या ३ तत्त्वांचा समावेश होतो. सामान्यतः ब्रह्मदेवाचे नामस्मरण केले जात नाही. श्रीविष्णूचे नामस्मरण व्यापक प्रमाणात केले जाते; कारण भगवान ‘श्रीकृष्ण’ हा सर्वांचा प्रिय देव आहे आणि प्रिय देवतेचे नामस्मरण करणे, हे स्वाभाविकच आहे; म्हणूनच ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हे नामस्मरण किंवा गुजराती समाजात प्रचलित असलेले ‘जय श्रीकृष्ण ।’ हे नामस्मरण अनेक ठिकाणी ऐकायला मिळते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप सांगितला. त्या वेळी १-२ वर्षे मी स्वतःही हा नामजप केला होता. त्यानंतर गजानन महाराजांनी ‘गण गण गणात बोते ।’, हा नामजप सांगितला, तर आमचे वाहनचालक ‘श्री स्वामी समर्थ’, हा नामजप सतत म्हणत असत आणि गाडी चालवतांना तो गाडीतही नेहमी लावत असत. या सगळ्याची पार्श्वभूमी, म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या आयुष्यात कुठला ना कुठला नामजप करत आलेला आहे. मी स्वतःही अनेक जप केले आहेत. भाद्रपद मासात गणपतीचे आगमन होते, तेव्हा ‘श्री गणेशाय नमः ।’ हा नामजप, नवरात्रीत देवीचा नामजप, श्रीरामनवमीला रामनामाचा नामजप असे अनेक प्रसंगी मी नामजप करत आलो; पण हळूहळू जाणवले, ‘या सगळ्या नामजपांच्या माध्यमातून आपल्याला शेवटी एका नामावर आणि एका तत्त्वावर स्थिर व्हायला हवे.’ असे अनेकदा वाचनात आले की, अनेक संतांना त्यांच्या गुरूंनी नामस्मरणाचा मंत्र दिला आणि त्या मंत्राने त्यांना खर्‍या अर्थाने आध्यात्मिक अनुभव आले.’

४. कुलदेवतेचा शोध घेऊन तिचा नामजप चालू केल्यामुळे आयुष्यात सकारात्मक पालट जाणवणे

वर्ष २००३–२००४ मध्ये मी सनातन संस्थेच्या सत्संगाला जायला आरंभ केला आणि त्या माध्यमातून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपाने साक्षात् गुरु लाभले, ज्यांनी मला आध्यात्मिकतेचा खरा आणि अचूक मार्ग दाखवला. साधनेचे महत्त्व पटवून दिले. तेव्हा सत्संगात कुलदेवतेचे नामस्मरण करण्याचे मार्गदर्शन मला मिळाले. त्या वेळी आम्हाला आमची कुलदेवता कोण ?, हेही ठाऊक नव्हते; पण सनातन संस्थेत आल्यानंतर आम्ही शोध घेतला. पुढे लक्षात आले की, आमची कुलदेवता, म्हणजे म्हार्दाेळ, फोंडा, गोवा येथे असलेली म्हाळसा नारायणीदेवी असून ती आम्हा कर्‍हाडे ब्राह्मणांची कुलदेवी आहे. मग मी ‘श्री म्हाळसा नारायणीदैव्ये नमः ।’, हा नामजप चालू केला. या नामजपामुळे हळूहळू आयुष्यात सकारात्मक पालट जाणवू लागले.

५. नामजपामुळे झालेल्या लाभाचे निरीक्षण केल्यास श्रद्धा दृढ होऊन नामजप अंतःकरणातून आपोआप होणे

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मी नियमित साधना करायला चालू केली. ‘नामजप केवळ उच्चाराने न होता तो एकाग्रतेने, तळमळीने आणि श्रद्धेने झाला पाहिजे’, हे मला जाणवले. ‘जोपर्यंत नाम आपल्या मनावर ठसत नाही किंवा भावपूर्वक आणि तळमळीने घेतले जात नाही, तोपर्यंत त्याची खरी अनुभूती येत नाही’, हे माझ्या लक्षात आले. नामजप करतांना ५ माळा, ६ माळा, १० माळा किंवा किमान १ घंटा एवढा वेळ नियमित देणे आवश्यक आहे. जेव्हा आपण योग्य पद्धतीने नाम घेतो, तेव्हा त्याची अनुभूती हळूहळू येऊ लागते. त्या नामस्मरणामुळे ‘व्यावहारिक, प्रापंचिक आणि आर्थिक अशा तिन्ही स्तरांवर प्रगती होत आहे’, हेही अनुभवातून दिसून येते.

आपण दिवसातील स्वतःचा १ घंटा तरी नामस्मरणाला द्यायला हवा. नियमित नामस्मरण करून नामामुळे ‘आपल्या आयुष्यात काय परिवर्तन घडत आहे, कोणते लाभ मिळत आहेत’, याचे स्वतः निरीक्षण करावे. असे केल्याने मिळालेल्या चांगल्या अनुभवांमुळे स्वतःची श्रद्धा दृढ होते आणि नामस्मरण आपोआप अंतःकरणातून होऊ लागते.

६. कुलदेवतेच्या नामातून मिळणार्‍या चैतन्यातून आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होणे

सनातन संस्थेने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, कुलदेवतेचे नामस्मरण हे स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण ज्या कुळामध्ये स्वतःचे देवाण-घेवाण (कर्मबंधनाचे) हिशोब अधिक असतात, त्या कुळातील कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने ते हिशोब लवकर फिटू शकतात अन् हिशोब फिटल्याखेरीज खरी आध्यात्मिक प्रगती होणे शक्य नसते. कुलदेवतेच्या नामातून मिळणारे चैतन्य, हे आपल्या अंतर्मनाला शुद्ध करून प्रगतीचा मार्ग मोकळा करते, तसेच कुलदेवतेचे नामस्मरण करणे, हे केवळ श्रद्धाच नव्हे, तर वैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे’, असेही सनातन संस्थेने सांगितले आहे. त्यामुळे कुलदेवतेच्या नामस्मरणाचा आध्यात्मिक दृष्टीकोनही समोर आला आणि माझे नामस्मरण अधिक चांगल्या प्रकारे होऊ लागले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे नेहमी प्रत्येक आध्यात्मिक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पहातात. ते म्हणतात, ‘‘आताचे युग ‘विज्ञानाधिष्ठित’ आहे. लोकांच्या मनात श्रद्धा आहेच; पण जेव्हा गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या समजावून सांगितल्या जातात, तेव्हा त्या अधिक सहजपणे पटतात आणि लोकांचा विश्वास अधिक दृढ होतो.’’

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

७. कुलदेवीच्या नामजपाने स्वतःमध्ये ब्रह्मांडातील ५ तत्त्वे वाढून आध्यात्मिक लाभ मिळतो !

आम्ही काही वर्षांपूर्वी गोव्यातील सनातन संस्थेच्या आश्रमात गेलो असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कुलदेवीच्या नामस्मरणाचे महत्त्व पटवून देतांना एक सुंदर उदाहरण दिले होते. ते म्हणाले, ‘‘ईश्वराने ब्रह्मा, विष्णु, शिव, प्रजापति आणि मीनाक्षी या ५ देवतांपासून (तत्त्वांपासून) विश्वाची निर्मिती केली. या ५ देवतांमध्ये ईश्वराची सर्व वैशिष्ट्ये आहेत. ही ५ तत्त्वे जर आपल्यात आली, तरच आपण ईश्वराशी एकरूप होतो. समजा एखाद्या व्यक्तीत ‘अ’ जीवनसत्त्व अल्प आहे आणि तो ‘ब’ जीवनसत्त्व घेत असेल, तर त्याला त्याचा काही उपयोग होत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीत शिवतत्त्व अल्प असेल आणि तो श्रीविष्णु तत्त्वाची उपासना करत असेल, तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचा मनुष्यजन्म वाया जातो. अ, ब, क, ड यांपैकी कोणते जीवनसत्त्व आपल्यात अल्प आहे, हे आपल्याला ठाऊक नसेल, तर आपण सर्व जीवनसत्त्वे असलेले एखादे बलवर्धक औषध (टॉनिक) घेतो. त्यामुळे आपल्या शरिरातील सर्व जीवनसत्त्वे वाढू लागतात तसेच कुलदेवतेचे महत्त्व आहे. कुलदेवतेचे नामस्मरण हे एक ‘जनरल टॉनिक’ (सर्वसामान्य शक्तीवर्धक) आहे. कुलदेवीचे नामस्मरण केल्याने ब्रह्मांडातील या सर्व पाचही तत्त्वांचे आध्यात्मिक पोषण आपल्याला मिळते. एवढी शक्ती तिच्या नामस्मरणात आहे. जेव्हा आपण कुलदेवतेची उपासना करतो, तेव्हा ही ५ तत्त्वे वाढायला लागतात आणि त्याचा आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतो.’’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.

भाग ८ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/979601.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक