Pakistan Attacks Again : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा आक्रमण : तालिबानकडूनही प्रत्युत्तर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी सैन्याने ६ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अफगाणिस्तावर आक्रमण केले. या आक्रमणात ५ जणांचा मृत्यू झाला. एका अफगाण सैन्याधिकार्‍याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने थेट नागरिकांना लक्ष्य केले. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही पाकवर जोरदार आक्रमण केले.

विशेष म्हणजे हे आक्रमण झाले, त्याच दिवशी, म्हणजे ६ नोव्हेंबरला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या तुर्कीये येथे शांतता चर्चेची तिसरी बैठक होणार होती. १९ ऑक्टोबरला दोन्ही देशांनी कतारमध्ये युद्धबंदीवर स्वाक्षरी केली होती; परंतु गेल्या आठवड्यात तुर्कीयेतच झालेल्या चर्चेचा दुसरा टप्पा कोणत्याही कराराविना संपला.

पाकिस्तानकडून आय.एस्.आय.चे ( इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणेचे) प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक हे शांतता चर्चेचे नेतृत्व करत आहेत, तर तालिबानकडून गुप्तचर प्रमुख अब्दुल हक वसिक, उपगृहमंत्री रहमतुल्लाह नजीब आणि प्रवक्ते सुहेल शाहीन सहभागी आहेत.