दिवाळीचा सण दिव्यांच्या रोषणाईने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघतो; पण या सणाची खरी ओळख आणि गोडी आहे ती ’फराळा’मध्ये. लाडू, चिवडा, शंकरपाळे, चकली, करंजी अशा पदार्थांची लज्जतच (चवच) न्यारी ! पण हा केवळ खाद्यसंस्कृतीचा भाग आहे कि यामागे काही सखोल विचार दडलेला आहे ? उत्तर आहे, होय ! दिवाळीच्या फराळाची परंपरा ही भारतीय आयुर्वेदाच्या ‘ऋतूचर्या’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेशी जोडलेली आहे.

१. काय आहे आयुर्वेदाची ‘ऋतूचर्या’ ?
आयुर्वेदानुसार स्वतःचे आरोग्य हे निसर्गाच्या पालटांशी जोडलेले आहे. प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणात होणार्या पालटांनुसार स्वतःच्या शरिरातही पालट घडत असतात. या पालटांना सामोरे जाण्यासाठी आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी स्वतःच्या आहार-विहारात जे पालट करणे अपेक्षित असते, त्यालाच ‘ऋतूचर्या’ असे म्हणतात.

२. दिवाळी आणि पालटणारा ऋतू
दिवाळी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर मासात येते. हा शरद ऋतूचा शेवटचा आणि हेमंत ऋतूच्या प्रारंभीचा काळ असतो. शरद ऋतूमध्ये पावसाळ्यानंतर हवेत उष्णता वाढलेली असते, ज्यामुळे शरिरातील पित्तदोष वाढतो. यानंतर येणार्या हेमंत ऋतूमध्ये (थंडीच्या दिवसांत) वातावरणात गारठा वाढतो, हवा कोरडी होते आणि शरिरातील वातदोष वाढण्याची शक्यता असते. या काळात निसर्गच आपल्याला थंडीचा सामना करण्यासाठी सज्ज करत असतो. थंडीमुळे स्वतःची पचनशक्ती, म्हणजेच ‘जठराग्नी’ प्रबळ झालेली असते. त्यामुळे या काळात खाल्लेले जड आणि पौष्टिक अन्न सहज पचते. शरिराला येणार्या थंडीचा सामना करण्यासाठी अधिक ऊर्जा आणि स्निग्धता (तेल/तूप) यांची आवश्यकता असते.
३. फराळाचे आयुर्वेदाप्रमाणे महत्त्व
आता फराळाच्या पदार्थांकडे पाहिल्यास ही गोष्ट अधिक स्पष्ट होते :
अ. स्निग्ध पदार्थांचा वापर : फराळातील बहुतेक पदार्थ तुपात किंवा तेलात तळलेले अथवा भाजलेले असतात. चकली, शंकरपाळे, करंजी हे पदार्थ तळले जातात. तूपाचा वापर लाडू, करंजीचे सारण अशा अनेक पदार्थांमध्ये होतो. तेल आणि तूप हे स्निग्ध पदार्थ आहेत, जे वाढणार्या वातदोषाला शांत करतात. ते शरिराला आतून वंगण देतात आणि कोरडेपणा न्यून करून ऊर्जा प्रदान करतात.
आ. पौष्टिक घटकांचा समावेश : फराळामध्ये डाळीचे पीठ (बेसन), रवा, गहू, पोहे, गूळ, साखर, सुकामेवा यांचा पुष्कळ वापर होतो. हे सर्व पदार्थ ऊर्जा आणि पोषण देणारे आहेत. उदाहरणार्थ बेसनाचे लाडू किंवा चकली शरिराला शक्ती देतात. पोह्यांचा चिवडा पचायला हलका असला, तरी त्यात शेंगदाणे, सुकामेवा घातल्याने तो पौष्टिक बनतो.
इ. मधुर आणि उष्ण गुणधर्म : गूळ आणि साखर मधुर चव देतात, जी वात अन् पित्त दोषांना संतुलित करते. वेलची, जायफळ, सुंठ यांसारखे मसाल्याचे पदार्थ फराळात वापरले जातात. हे पदार्थ उष्ण गुणधर्माचे असून ते पचनशक्तीला साहाय्य करतात आणि शरिरात उबदारपणा निर्माण करतात.
४. दिवाळीचा फराळ खातांना घ्यावयाची काळजी
थोडक्यात सांगायचे, तर दिवाळीचा फराळ हा केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही, तर पालटत्या ऋतूमध्ये शरिराच्या वाढलेल्या ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, पचनशक्तीचा योग्य वापर करण्यासाठी आणि शरिराला आवश्यक स्निग्धता अन् पोषण देण्यासाठी सिद्ध केलेली एक परिपूर्ण आहारयोजना आहे. असे जरी असले, तरी दिवाळीत फराळ खाऊन भरमसाठ वजन वाढवणे, हेही योग्य नाही. याकरताच काही सोप्या ‘टिप्स’ (सूचना) पाहूया.
अ. येता-जाता सतत फराळाचे पदार्थ तोंडात कोंबू नका. हे पदार्थ पचायला जड असल्याने सकाळच्या वेळीच खाणे इष्ट.
आ. दिवाळीचा फराळ करतांना अधूनमधून कोमट पाणी प्या, जेणेकरून हे पदार्थ पचण्यास साहाय्य होईल आणि वजनात भर पडणार नाही.
इ. बाजारातील मिठाई आणि चॉकलेट यांच्यापासून दूर रहा. घरी बनवलेल्या फराळाच्या पदार्थांनी होणार नाही इतकी हानी या पदार्थांमुळे होत असते. (दिवाळीत मधुमेहींनी तर विशेष काळजी घ्यावी.)
ई. चण्याच्या डाळीच्या पिठाचा न्यूनतम वापर करा. शक्य तिथे मुगाची डाळ वापरा. लाडू करतांनाही बेसनापेक्षा रवा, मिश्र डाळींचे पीठ असे सिद्ध करा.
उ. नियमितपणे व्यायाम आणि भूक नसतांना काही न खाता भूक लागेपर्यंत अधूनमधून गरम पाणी पिणे, या दोन मार्गांचा अवलंब या काळात केला, तर अवाजवी वजन वाढण्याची भीती रहाणार नाही.
आपल्या पूर्वजांनी सण आणि आरोग्य यांची किती सुंदर सांगड घातली होती, याचे ‘दिवाळीचे फराळ’ हे उत्तम उदाहरण आहे. म्हणून या दिवाळीत फराळाचा आस्वाद घेतांना त्यामागील या आरोग्यदायी परंपरेचे स्मरण नक्की ठेवा आणि या पौष्टिक पदार्थांचा मर्यादेत राहून आनंद घ्या !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !