Com Govind Pansare Murder Case : कोल्हापूर येथे साखर वाटप !

शिवाजी चौक येथे राजमुद्रेला पुष्पहार घालतांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘सर्कीट बेंच’कडून या प्रकरणातील संशयित सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांसह अमोल काळे आणि शरद कळसकर यांना १४ ऑक्टोबर या दिवशी जामीन संमत केला. या पार्श्वभूमीवर येथील शिवाजी चौक येथे दुपारी २ वाजता हिंदुत्वनिष्ठांकडून नागरिकांना साखरवाटप करून आंनद व्यक्त करण्यात आला.

कॉ. पानसरे प्रकरणी आनंद व्यक्त करतांना हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ता

या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी हा खटला चालवणारे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता गुरुराज रसाळ यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. या वेळी शिवाजी चौकात येणार्‍या नागरिकांनाही साखर आणि पेढे वाटप करण्यात आले. हे करतांना ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी शिवाजी चौक परिसर दणाणून गेला.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर कोल्हापूर येथे साखर, पेढे वाटप करून आनंद साजरा करतांना हिंदुत्वनिष्ठ

हिंदुत्वनिष्ठांच्या प्रतिक्रिया…

१. हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी करणार्‍यांना धडा शिकवल्याविना आम्ही गप्प बसणार नाही ! : आज आनंदाचा क्षण आहे. डॉ. तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना जामीन मिळाला, तरी उद्या या तिघांची निर्दाेष मुक्तता झाल्यानंतर आम्ही याहून अधिक मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करू, तसेच भविष्यात या तिघांचा आम्ही नक्की सत्कार सोहळा आयोजित करू. हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी करणार्‍यांना धडा शिकवल्याविना आम्ही गप्प बसणार नाही. – श्री. सुनील सामंत, संस्थापक, शिवशाही फाऊंडेशन.

२. निरपराध्यांना गोवण्याचे काम पोलिसांनी केले ! : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संबंध नसतांना डॉ. तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना विनाकारण अटक करून कारागृहात ठेवले होते. या प्रकरणाचे खरे अन्वेषण केलेच नाही. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वाचे काम करतात. त्यांना गोवण्याचे काम पोलिसांनी केले आहे. त्यांना जामीन संमत झाला आहे. पुढे या तिघांची निर्दाेष सुटका होणार आहे, याची आम्हाला निश्चिती आहे. – श्री. राजू यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

३. आमचा न्यायदेवतेवर विश्वास ! : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली होती. त्यांचा कोणताही दोष नसतांना हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन संस्था यांना अपर्कीत करण्याच्या उद्देशाने कुणीतरी सनातन संस्थेचे नाव घेते आणि हिंदुत्वनिष्ठांना अटक केली जाते. पोलिसांचे अन्वेषण भरकटलेले होते. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. – श्री. किशोर घाटगे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.