Pakistan Airstrike Kabul : ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)’ संघटनेचा प्रमुख ठार झाल्याचा पाकचा खोटा दावा

काबुलमध्ये (अफगाणिस्तान) पाकिस्तानचे हवाई आक्रमण

काबुल (अफगाणिस्तान) – येथे पाककडून हवाई आक्रमण करण्यात आले. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार पाकिस्तानी वायूदलाने काबुलमध्ये केलेल्या आक्रमणात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मुफ्ती नूर वली मेहसूद मारला गेला, असा दावा करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात तो जिवंत असून त्याने या आक्रमणानंतर ध्वनीसंदेश प्रसारित करून हा पाकचा खोटारडेपणा असल्याचे म्हटले आहे. मेहसूद वर्ष २०१८ पासून टीटीपीचे नेतृत्व करत असून त्याच्यावर अफगाणिस्तानात तालिबानच्या पाठिंब्याने काम केल्याचा आरोप आहे.

मेहसूद समवेत टीटीपीचे २ कमांडर, कारी सैफुल्लाह मेहसूद आणि खालिद मेहसूद यांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच जवळपासच्या घरांची हानी आणि नागरिकांची जीवितहानी झाल्याचेही म्हटले जात आहे.

कोणतीही जीवितहानी नाही ! – तालिबान सरकारचा दावा

तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, काबुल शहरात स्फोटांचा आवाज ऐकू आला. तथापि सर्व काही नियंत्रणात असल्याने काळजी करण्याचे कारण नाही. घटनेची चौकशी चालू आहे. आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

तालिबानचे परराष्ट्रमंत्री मुत्ताकी आठवडाभराच्या भारत दौर्‍यावर आल्याने आक्रमण झाल्याची शक्यता

अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी ९ ऑक्टोबर या दिवशी आठवडाभराच्या दौर्‍यासाठी भारतात आले. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रणात मिळवल्यानंतर ९ ते १६ ऑक्टोबर २०२५ या कलावधीतला मुत्ताकी यांचा भारताचा पहिलाच उच्चस्तरीय शिष्टमंडळ दौरा आहे. ज्या दिवशी हा दौरा चालू झाला, त्याच दिवशी पाकने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर आक्रमण केले. भारत आणि अफगाणिस्तान यांना चेतावणी देण्यासाठीच हे आक्रमण केल्याचे म्हटले जात आहे.

संपादकीय भूमिका

टीटीपी पाकमध्ये आतंकवादी आक्रमण करतो; म्हणून पाकिस्तान टीटीपीच्या अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये असलेल्या तळावर आक्रमण करतो; मात्र हाच पाक भारताने अशीच कारवाई पाकमधील आतंकवादी तळांवर केल्यावर भारताला प्रत्युत्तर देतो. हा पाकचा दुटप्पीपणाच होय !