(म्हणे) ‘पाकने भारताविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवला असून आता आम्हाला शांतता हवी आहे !’ – Shehbaz Sharif

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये दावा !

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानने भारताविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवला आहे. पाकिस्तानला आता शांतता हवी आहे, असे विधान पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये केले. पंतप्रधान शरीफ यांनी भारताचा ‘शत्रू’ असा उल्लेख करत म्हटले की, पहलगाम आक्रमणाची निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशी व्हावी, अशी आम्ही भारताला विनंती केली होती; परंतु भारताने ती नाकारली आणि या घटनेचा राजकीय लाभ घेतला. शरीफ पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठावरून चेतावणी  दिली होती की, पाकिस्तान कोणतेही बाह्य आक्रमण सहन करणार नाही. ही चेतावणी खरी ठरली. यावर्षी मे महिन्यात पाकिस्तानवर कोणतीही चिथावणी दिली नसतांना आक्रमण करण्यात आले.

(म्हणे) ‘ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे संघर्ष टळला !’ – पंतप्रधान शरीफ यांचा दावा

शरीफ पुढे असेही म्हणाले की, ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता, तर संपूर्ण प्रदेशात मोठे युद्ध भडकले असते. पाकिस्तानने ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले; कारण त्यांच्या शांतता प्रयत्नांमुळे दक्षिण आशियातील विनाशकारी युद्ध टाळता आले.

भारतासमवेत चर्चा करण्यास सिद्ध !

पंतप्रधान शरीफ म्हणाले की, पाकिस्तान भारतासमवेत वादग्रस्त सूत्रांवर चर्चा करण्यास सिद्ध आहे. दक्षिण आशियाला प्रक्षोभक नेत्यांची नव्हे, तर समजूतदार नेत्यांची आवश्यकता आहे.

(म्हणे) ‘भारताने सिंधू जल वाटप करार एकतर्फी थांबवला !’

भारताने सिंधू जल वाटप करार एकतर्फी थांबवला. हे केवळ कराराचे उल्लंघन नाही, तर आंतरराष्ट्रीय कायद्याचेही उल्लंघन आहे, असा आरोप पंतप्रधान शरीफ यांनी केला. पाक त्याच्या २४ कोटी लोकांच्या जल अधिकारांचे रक्षण करेल आणि सिंधू जल वाटप कराराचे कोणतेही उल्लंघन युद्धाची कृती मानेल, असेही त्यांनी म्हटले.

काश्मीरमध्ये निष्पक्ष जनमत चाचणी होईल !

पंतप्रधान शरीफ काश्मीरविषयी म्हणाले की, मला विश्वास आहे की, एक दिवस संयुक्त राष्ट्रांच्या कायद्यानुसार काश्मीरमध्ये निष्पक्ष जनमत चाचणी होईल आणि काश्मिरींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल. (दिवास्वप्नात रमणारे शरीफ ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • याला म्हणतात ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ ! इतका निलाजरा देश आणि त्यांचे प्रमुख या जगात दुसरे कुणीच नसेल !
  • ज्या देशाची निर्मिती १० लाख हिंदूंचा वंशसंहार करून झाला आहे, जो देश आतंकवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना चालवतो, तो देश कधीतरी शांततेत राहू शकेल का ? आता या देशाचे अस्तित्वच मुळी धोक्यात आलेले आहे, हे त्याने लक्षात घ्यायला हवे !