ज्यामुळे लौकिक आणि परमार्थिक कल्याणाची सिद्धी प्राप्त होते, त्याला ‘धर्म’ असे म्हणतात. धर्माच्या या व्याख्येवरून आपली संस्कृती ऐहिक आणि पारमार्थिक जीवन यांमध्ये भेद करत नाही, ही गोष्ट स्पष्ट होते. भौतिक जीवन आणि पारलौकिक जीवन यांचा सुंदर समन्वय आपल्या वैदिक संस्कृतीने साधलेला आहे. याला अनुरूप अशी शिक्षणव्यवस्था आपल्याकडे निर्माण करण्यात आली होती. आपण आपल्या धर्माचे योग्य प्रकारे आचरण केले नाही, तर आपणच आपल्या धर्माच्या नाशाला कारणीभूत ठरतो. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही.
मागील लेखात नीतीमान समाजनिर्मितीत हिंदु धर्मग्रंथ कसे कार्य करतात ? याविषयी सूत्रे पाहिली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग ३)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/959794.html

९. अंतर्बाह्य शुद्धी सुराज्य निर्मितीला पोषक जसा आत्मनिर्णय महत्त्वाचा आहे, त्याप्रमाणे सगुणांचे सेवन आणि दुर्गुणांचा त्याग करणे, या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत.
याविषयी भगवान श्रीकृष्ण गीतेल्या १३ व्या अध्यायातील ७ व्या श्लोकात सांगतात…
अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।
आचार्याेपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ।। १३-७ ।।
अर्थ : मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही सजिवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादींविषयी सरळपणा, श्रद्धा आणि भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता अन् मन-इंद्रियांसह शरिराचा निग्रह, हे सर्व दैवीगुण माणसाने संपादन करावेत.
अंतर्बाह्य शुद्धी याचा अर्थ सत्यतापूर्वक शुद्ध व्यवहाराने धन प्राप्त करणे. हीच द्रव्यशुद्धी होय ! प्रामाणिकपणाने संपादन केलेल्या धनाचा उपयोग धान्य खरेदीसाठी केला जातो. त्यामुळे स्वाभाविकपणे आहारशुद्धी होते. यथायोग्य वर्तन केले की, आचारशुद्धी होते. पाण्याने शरिराची शुद्धी करायचीच आहे. या सर्वांनाच ‘बाह्यशुद्धी’ म्हणतात. त्यासह आसक्ती, द्वेष, कपट यांसारख्या विकारांचा दुर्गुणांचा नाश करून आपण स्वतःचे अंतःकरण स्वच्छ करणे याला ‘अंतर्शुद्धी’ असे म्हणतात.

अशा प्रकारे माणसाने सद्गुणांची वाढ करावी आणि स्वतःतील दुर्गुण हळूहळू निश्चयाने, दृढतेने नष्ट करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच विकारांपासून स्वतःची मुक्तता करण्यासाठी प्रयत्न करणे सुराज्य निर्मितीच्या कार्याला पोषक आहे. अशा प्रकारे नैतिक शिक्षण देणारी आणि सद्गुणांची वाढ करून दुर्गुणांचा अन् विकाराचा नाश करायला प्रवृत्त करणारी भगवद्गीता सुराज्य निर्मितीच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते; म्हणून गीतेचा अभ्यास करून ‘देशातील प्रत्येक नागरिकाने स्वतःचा, राष्ट्राचा आणि अखिल मानवजातीचा उद्धार करावा. मानवाचे हेच नैतिक कर्तव्य आहे’, असे गीता सांगते.
थोडक्यात ज्ञान, निष्ठा आणि कर्तव्यपरायणता या ३ तत्त्वांचा संगम मानवाच्या जीवनात झाला की, संपूर्ण मानवी समाज उन्नत होतो.
१०. विकृत मनोवृत्तीच्या बळावर संपूर्ण मानवी समाजाला वेठीला धरण्याचा साम्यवाद्यांचा प्रयत्न
आपल्या परिवारासह परंपरेने आलेल्या संस्कारांचा, संस्कृतीचा, धर्माचा वारसा जतन करत सुखात, आनंदात, जगणारा मानवी समाज साम्यवादी विचारसरणीच्या समाजाला सहन होत नाही. जिथे शांतता, सुव्यवस्था आहे, ती उद्ध्वस्त करण्यातच राक्षसी आनंद मानणारे आणि स्वतःला ‘विचारवंत’ म्हणून घेणार्या साम्यवादी विचारांचा बुद्धीजीवी वर्ग त्याच्या विकृत मनोवृत्तीच्या बळावर संपूर्ण मानवी समाजाला वेठीला धरण्यासाठी विशिष्ट प्रकारची विकृती जगभर पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.
१० अ. वैविध्यतेला ‘विषमता’ म्हणणे : जगातील प्रत्येक माणसाची वैचारिक, बौद्धिक, मानसिक, आर्थिक, शारीरिक क्षमता एकसारखी नसते. त्यात वैविध्य आढळते. या वैविध्यतेला ‘विषमता’ असे या साम्यवादी विचारांच्या गटाने घोषित केले. जगातील सुविद्य सुसंस्कृत समाजात वैचारिक, भावनिक गोंधळ निर्माण करण्याचा पद्धतशीर डाव टाकण्यात आला. या साम्यवादी विचारांच्या मंडळींनी मार्क्सवादाचा प्रचार-प्रसार करत पूर्वी असाच गोंधळ घातला. या गोंधळाला त्यांनी ‘जागतिक कम्युनिस्ट (साम्यवादी) क्रांती’ असे नाव दिले. वास्तविक ही क्रांती नसून संपूर्ण जगात अशांतता पसरवण्याचा कुटील डाव होता.
१० आ. मालक आणि कामगार संघर्षाचा बेबनाव : यांच्यात कोणताही प्रकारचा बेबनाव नसतांना कामगारांच्या मनावर ‘मालक तुमच्यावर अन्याय करतो’, असा अपसमज निर्माण करण्यात आला. ‘लोकशाही आणि भांडवलशाही देशांमधील सरकार जनतेवर अन्याय करत आहे, त्यांचे शोषण करत आहे’, असा अपप्रचार करण्यास आरंभ केला. नागरिकांच्या मनात असलेली राष्ट्रभक्ती या साम्यवादी विचारसरणीच्या लोकांना अस्वस्थ करत होती. धर्म, कुटुंब, लोकशाही, संस्कार, संस्कृती, परंपरा या आणि अशा प्रकारची एक परिपूर्ण व्यवस्था जी मानवी समाजाच्या उत्कर्षासाठी निर्माण करण्यात आली होती, तिच्याकडे या विकृत विचारसरणीच्या मंडळींनी सकारात्मक दृष्टीने बघण्याऐवजी नकारात्मक दृष्टीने बघण्यास लोकांना भाग पाडले, ते स्वतःची अस्वस्थता दूर करण्यासाठी !
१० इ. देशप्रेम, सैनिक, राष्ट्रगीत, श्रद्धास्थाने यांविषयी बुद्धीभेद : देशप्रेम, सीमेवर लढणारे सैनिक, राष्ट्रगीत आणि मानवी समाजामध्ये असलेली श्रद्धास्थाने यांना धक्का देण्यास त्यांनी आरंभ केला. ‘शोषकांनी शोषितांची फसवणूक करण्यासाठी रचलेला हा एक सापळा आहे’, असा अपप्रचार करण्यास आरंभ केला. त्यामागचा हेतू देव, देश, धर्म, संस्कृती, परंपरा, कुटुंबसंस्था, भावना, परस्परांवरील विश्वास या सर्व गोष्टींना नष्ट करण्यासाठी बुद्धीभेद चालू केला. त्यासाठी त्यांनी शिक्षणसंस्था, वृत्तपत्रे, विविध प्रकारच्या सामाजिक संस्था अशा क्षेत्रांत हळूहळू स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले.
१० ई. जे सत्य ते असत्य, अशी विकृत भावना निर्माण करणे : कोणत्याही शस्त्राचा उपयोग न करता सर्वसामान्य जनतेच्या बुद्धीवर नियंत्रण मिळवले आणि त्यांच्या बुद्धीत विकृत भावना निर्माण केल्या. जे जे चांगले आहे, ते सारेच वाईट आहे, टाकाऊ आहे. जे सत्य म्हणून सांगितले जाते, तेच असत्य आहे. ‘समाजातील उच्च स्तरावर रहाणारा वर्ग हा निम्नस्तरावर रहाणार्या मानवी समाजाला स्वतःचा गुलाम समजतो, त्याच्यावर अन्याय करतो’, असा समज जाणीवपूर्वक निर्माण करून दिला. जगात काळा-गोरा भेद निर्माण करून ‘गोरे लोक काळ्या लोकांवर अन्याय करतात’, असे चित्र उभे केले. आपल्या देशात असलेल्या जातीव्यवस्थेवर टीका करून जातीजातींत वैमनस्य निर्माण केले आणि एकसंघ असलेला समाज तुकड्या-तुकड्यांत विभागला जावा; म्हणून प्रयत्न चालू केला.
१० उ. स्त्री-पुरुषांमध्ये तेढ : स्त्री-पुरुषांमध्ये असलेला नैसर्गिक भेद स्वीकारावाच लागतो; पण या मंडळींनी पुरुषाला स्त्री ठरवण्याचा आणि स्त्रीला पुरुष ठरवण्याचा अनैसर्गिक प्रयत्न चालू केला. शस्त्रक्रिया करून पुरुष स्त्री होऊ शकतो आणि स्त्रीला पुरुष होता येते. ‘पुरुषांनी स्त्रियांवर अन्याय केला आहे, पुरुषांनी स्त्रियांना स्वतःची दासी बनवले आहे’, अशा प्रकारचा समज निर्माण करून स्त्री-पुरुषांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी । हृदयी अमृत नयनी पाणी ।।’ याचा ‘स्त्रियांच्या हृदयात अमृत असूनही अहंकारी पुरुषांनी स्त्रियांच्या डोळ्यांत पाणी आणले’, असा अर्थ लावून पुरुष आणि स्त्री यांच्यात संघर्ष उभा केला. वास्तविक वरील दोन पंक्तींचा अर्थ ‘स्त्रीच्या हृदयामध्ये आपल्या बांधवांविषयी प्रेमाचा, आपुलकीचा, वात्सल्याचा, अमृतमय झरा वहात असल्यामुळे कुणालाही कोणत्याही प्रकारचे दुःख झाले, वेदना झाल्या की, तिच्या डोळ्यांत सहजतेने पाणी तरळते’, असा आहे.
थोडक्यात विविधतेकडे विषमता म्हणून पहाण्याची दृष्टी स्वतःला बुद्धीजीवी समजणार्या साम्यवादी विचारांच्या मंडळींनी निर्माण केली. त्यांच्या विचारांना विरोध करणार्यांना त्यांनी अन्यायी, क्रूर, स्वार्थी, लबाड, दुष्ट ठरवले. साम्यवादी विचारांच्या मंडळींना साथ देणारे लोक मात्र दुष्ट असले, गुन्हेगारी प्रवृत्तीचे असले, मानवतेला काळिमा फासणारे असले, तरी त्यांची बाजू घेऊन त्यांना नायक ठरवण्यात आले.
१० ऊ. भक्तीभाव, श्रद्धा, निष्ठा यांना अंधश्रद्धा ठरवणे : आपल्या देशात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद निर्माण केला गेला, तो हिंदुस्थानातील मानवी समाजात फूट पाडण्यासाठीच !
येथील वर्णव्यवस्थेला जातीव्यवस्था म्हणून दोषी ठरवले. भक्तीभाव, श्रद्धाभाव, निष्ठा यांना अंधश्रद्धा ठरवून त्यांचा धिक्कार केला. विज्ञानाचे अवास्तव स्तोम माजवून हिंदु धर्मातील परंपरा, चालीरिती यांच्यावर जोरदार आघात याच मंडळींकडून होऊ लागले. रामायण, महाभारत यांसारख्या ऐतिहासिक ग्रंथांना ‘काल्पनिक ग्रंथ’ म्हणून अव्हेरण्यात आले. ‘धर्म, संस्कृती, देशप्रेम या सर्वच गोष्टी निरर्थक आणि त्याज्य आहेत’, असा अपप्रचार करून मानवी समाजातील आध्यात्मिक अन् संस्कृती यांची पोकळी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जगातील सर्व धर्म नष्ट करून केवळ साम्यवादी विचारांच्या विकृत धर्माचे अस्तित्व टिकून रहावे, यासाठी त्यांची ही धडपड चालू आहे.
(क्रमश:)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१२.९.२०२५)
_______________________________________
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/960325,html
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच आयोजित केलेले आणि गुरुकृपेने यशस्वी झालेले ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’, हे २ दिवसांचे चर्चासत्र !
पालकांचे दिवस !
‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’च्या वतीने गयागदाधर मंदिराची स्वच्छता !
भारतीय सिनेमा आणि त्याच्या प्रभावाचे उत्तरदायित्व !