संस्कृती-संस्कारांवाचून सुराज्य अशक्य !

ज्यामुळे लौकिक आणि परमार्थिक कल्याणाची सिद्धी प्राप्त होते, त्याला ‘धर्म’ असे म्हणतात. धर्माच्या या व्याख्येवरून आपली संस्कृती ऐहिक आणि परमार्थिक जीवन यांमध्ये भेद करत नाही, ही गोष्ट स्पष्ट होते. भौतिक जीवन आणि पारलौकिक जीवन यांचा सुंदर समन्वय आपल्या वैदिक संस्कृतीने साधलेला आहे. याला अनुरूप अशी शिक्षणव्यवस्था आपल्याकडे निर्माण करण्यात आली होती. आपण आपल्या धर्माचे योग्य प्रकारे आचरण केले नाही, तर आपणच आपल्या धर्माच्या नाशाला कारणीभूत ठरतो. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. 

मागील लेखात भारतियांनी देशाला पोषक ठरणारी शिक्षणपद्धत का स्वीकारावी ? यासंबंधी सूत्रे पाहिली. या लेखात नीतीमान समाजनिर्मितीत हिंदु धर्मग्रंथ कसे कार्य करतात ? याविषयी जाणून घेऊया.     

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/959287.html

६. देशाला पोषक ठरणारी शिक्षणपद्धतीच स्वीकारली पाहिजे !

सर्वांगीण विकास करणारी अशी शिक्षणपद्धत आपण भारतात रूजवली पाहिजे. या शिक्षणपद्धतीला ‘शिक्षणाचे भगवेकरण’ म्हणून कुणी विरोध केला, तर त्या विरोधाला न जुमानता देशाला पोषक ठरणारी शिक्षणपद्धतच आपण स्वीकारली पाहिजे. ‘भारतीयत्व आणि भारताचे सांस्कृतिक राष्ट्रीयत्व हे हिंदुत्व आहे’ याविषयी वास्तविक दुमत असता कामा नये. हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी आणि थोर नेते विचारवंत राम मनोहर लोहिया यांनीसुद्धा हेच विचार मांडले आहेत. ‘भारतीयत्व म्हणजे हिंदुत्व’ हेच सत्य असल्याने या २ विद्वानांनी त्याचा स्वीकार केला, हे सत्य नाकारता येत नाही.

श्री. दुर्गेश परुळकर

७. गीता, उपनिषदे यांत नीतीमान मानवी समाज निर्माण करण्याची क्षमता

नीतीमान मानवी समाज ज्या देशात अस्तित्वात असतो, तोच देश सुराज्य म्हणून ओळखला जातो. असा नीतीमान समाज हा शिस्तबद्ध, तसेच तो स्वयंशासित असतो, म्हणजे असा समाज स्वतःच्या हातून जर एखादी अयोग्य गोष्ट घडली, तर तो स्वतःच स्वतःला शिक्षा देण्याएवढा न्यायनिष्ठ असतो. असा नीतीमान मानवी समाज निर्माण करण्याची क्षमता गीता, उपनिषदे यांसारख्या ग्रंथांमध्ये आहे.

७ अ. नीतीमान समाजनिर्मिती करण्यासाठी नम्रतेने ज्ञान संपादन करण्याचे महत्त्व : ‘जगामध्ये सर्वांत पवित्र असलेली एकमेव गोष्ट म्हणजे ज्ञान’, असे सांगणारी गीता म्हणते, ‘द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ असून यच्चयावत् सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात.’ अशा प्रकारचे ज्ञान संपादन करणार्‍या छात्राला गीता मोलाचा सल्ला देते.

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ।। (अध्याय ४, श्लोक ३४ )

अर्थ : ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रितीने जाणणारे ते ज्ञानीमहात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.

विद्या संपादन करायची असेल, तर नम्रता असणे नितांत आवश्यक आहे. नम्रतेवाचून ज्ञान मिळत नाही आणि मिळालेले ज्ञान टिकतही नाही. असे ज्ञान शोभून दिसत नाही.  ‘विद्या विनयेन शोभते ।’, असा सिद्धांत हेच सांगतो. नम्रता हा सद्गुण आहे. तो प्रत्येकाने अंगी बाणवावा. ‘विद्यार्थी जिज्ञासू असला पाहिजे’, असे गीता सांगते. ‘जिज्ञासा’ याचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा ! या इच्छेची पूर्तता करतांना सेवाभाव जागा असला पाहिजे. सेवाभावी वृत्ती ठेवून संपादन केलेल्या ज्ञानाला सुगंध येतो. नम्रता, जिज्ञासा आणि सेवाभाव या ३ गोष्टींवाचून संपादन केलेल्या ज्ञानाला महत्त्व रहात नाही. संपादन केलेल्या ज्ञानाची कीर्ती, सुगंध सर्वत्र दरवळण्यासाठी नम्रता, जिज्ञासा आणि सेवाभाव हे त्रिगुणच उपयुक्त ठरतात. त्यामुळेच जीवाचा उद्धार होतो; म्हणून गीतेतील हा मोलाचा संदेश अखिल मानवजातीला सुविद्य आणि सुसंस्कृत करणारा आहे.

७ आ. अनासक्त होऊन ज्ञान देण्याचे महत्त्व विशद करणारी ‘भगवद्गीता’ ! : ज्ञान संपादन करणार्‍या विद्यार्थ्याला ज्याप्रमाणे मोलाचा सल्ला भगवद्गीता देते, त्याचप्रमाणे ज्ञानदानाचे कार्य करणारे गुरु आणि शिक्षक यांनासुद्धा गीतेने मोलाचा सल्ला याच श्लोकातील उत्तरार्धात दिला आहे, ‘ज्ञानाचा उपदेश करणारा ज्ञानी हा तत्त्वदर्शी असला पाहिजे, ही महत्त्वाची अट आहे. ज्ञान देणारा स्वतः ज्ञानाने समृद्ध असला पाहिजे; कारण त्याच्या जीवनात तपश्चर्येचे पाठबळ, ज्ञानाची खोली आणि अनुभवाचे गाठोडे असणे नितांत आवश्यक आहे. ज्ञानाची खोली ज्याने गाठली आहे, ती खोली गाठण्यासाठी सर्व मानवी अनुभवांची चिकित्सा करून त्याद्वारे मूलभूत तत्त्व त्याने आत्मसात् केलेले असते. अशी तत्त्वदर्शी व्यक्ती गुरुपद प्राप्त करू शकते; कारण जीवनावश्यक तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन, निरूपण करण्याची क्षमता अशा गुरूंकडे असते. ‘विद्वान, सदाचरणी या गुणांनी संपन्न असलेली व्यक्ती गुरुपदासाठी योग्य असते’, असे गीता सांगते.

सर्वसामान्य माणूस विविध प्रकारची कर्मे करतो. ती करण्यामागे काही ना काही प्राप्त करण्याचा हेतू त्याच्या मनात असतो, म्हणजेच आसक्ती ठेवून तो कर्म करत असतो. अनासक्त होऊन कर्म कसे करायचे ? हे ज्याने जाणले आणि जो स्वतः अनासक्त होऊन कर्म करतो, तोच मानवी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी योग्य आहे. गीता कर्तव्य कर्म करण्यासाठी प्रवृत्त करते. ‘केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही’, असे अपेक्षारहित कर्म करणार्‍या समाजाची निर्मिती करण्यासाठी गीता मार्गदर्शक ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरतो.

७ इ. न्याय, नैतिकता आणि सत्य याआधारे योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्याचे सामर्थ्य गीतेत ! : निरलस आणि निरपेक्ष भावनेने केलेल्या कर्मामुळे मानसिक संतुलन साधले जाते, ताणतणावापासून मुक्तता मिळते, आत्मशांतीचा मार्ग सहजतेने प्राप्त होतो. जीवनातील अस्थिरता नष्ट होऊन जीवनाला स्थैर्य प्राप्त होते. असा मानसिक, बौद्धिक, वैचारिक आणि भावनिक स्थैर्य प्राप्त झालेला मानवी समाज नीतीमान समाज असतो. अशा नीतीमान समाजामुळे देशात सुराज्य सहजतेने उदयास येते.

न्याय, नैतिकता आणि सत्य यांच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता मानवी समाजात निर्माण करण्याचे सामर्थ्य गीतेत आहे, हेच गीतेचे वैशिष्ट्य आहे; कारण आत्मनिर्णय, परनिर्णय आणि ईश्वरीनिर्णय यांविषयीची चर्चा गीतेत करण्यात आलेली आहे. या ३ प्रकारच्या निर्णयांमध्ये आत्मनिर्णयाला महत्त्व देण्यात आले आहे.

भगवद्गीतेच्या १८ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,

इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ।। (अध्याय १८, श्लोक ६३)

अर्थ : अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अतीगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर.

याचा अर्थ एखादी गोष्ट आपल्याला तत्त्वतः पटलेली असेल, तर त्याचा स्वीकार करून आपण स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीचा उपयोग करून विवेकाची कास धरून निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात निर्माण करायची आहे. ही सर्व विचारांची क्रिया, प्रक्रिया सुसंगतपणे कशी करायची ? याचे ज्ञान गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाचा आधार घेऊन स्वतःच्या अनुभवाचा उपयोग करून निर्णय घ्यायचा आहे.

अर्जुनाने नेमके तेच केले आणि नंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, ‘‘हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला. मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशय रहित झालो आहे; म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन.’’

संपादन केलेले ज्ञान माणसाचा मोह दूर करते, तसेच काही गोष्टी जर विस्मृतीत गेल्या असतील, तर गुरूंनी केलेल्या उपदेशामुळे जे विस्मृतीत गेलेले आहे, त्याचे स्मरण होते. त्याने मन आणि बुद्धी चिंतारहित होते. सर्व संदेह दूर होतात आणि विवेक जागा होऊन योग्य तो निर्णय घेण्याची पात्रता आपल्या अंगी येते.

भगवंताने इथे अर्जुनाला सांगितले, ‘‘तुला आवडेल किंवा योग्य वाटेल ते तू कर.’’ त्यामागचे कारण हेच आहे की, एखाद्या गोष्टीचा योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता असतांना ज्याने आपल्याकडे मार्गदर्शन मागितले आहे, शंका विचारल्या आहेत, त्याच्या त्या शंका दूर झाल्या आहेत किंवा नाही त्याचीही परीक्षा घेता येते. ती घेण्यासाठीच ‘तुला आवडेल ते कर किंवा तुला योग्य वाटेल ते कर’, असे सांगितले जाते.

८. विवेकाच्या कसोटीवर आत्मनिर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण

या मागचा हेतू आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला तिचा स्वतःचा नैतिक मानदंड बनण्याची प्रेरणा देणे, हा आहे. प्रत्येक वेळी आपत्काळात कुणीतरी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याजवळ असेल, असे सांगता येत नाही; म्हणून स्वतःची बुद्धी परिपक्व करावी. बुद्धीची, विचारांची तेजस्विता निर्माण करण्याची आणि ती जतन करण्याची सवय आपणच आपल्याला लावायची आहे. त्यासाठी विवेकाची कास सातत्याने धरावी लागते आणि जे ज्ञान आपण संपादन केले आहे, त्या ज्ञानाचे विस्मरण होणार नाही, याचीही काळजी आपल्यालाच घ्यायची आहे; म्हणूनच गुरु किंवा भगवंतसुद्धा सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून कोणता निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयाप्रमाणे कृती करायची कि नाही ? याचे स्वातंत्र्य आपल्याला देतात. आपल्यात निर्णयक्षमता निर्माण व्हावी, यासाठीच ते असे सांगतात.

थोडक्यात दुसर्‍याच्या निर्णयावर विसंबून राहून त्याप्रमाणे निर्णय घेणे, हे घातक ठरू शकते. तसे होऊ नये, हाच त्यामागचा उद्देश आहे. कोणताही विचार न करता विवेकाच्या कसोटीवर घासून न पहाता अन्यांच्या निर्णयाप्रमाणे वागणे याचा अर्थ प्रवाहपतित होणे, असा आहे. बुद्धीची प्रगल्भता, विचारांची प्रगल्भता आणि विवेकाचे माहात्म्य ज्याला कळले आहे, तो प्रवाहपतित होऊ शकत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.                          (क्रमश:)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१२.९.२०२५)

________________________________________________

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/960010.html