मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. मंदिर अर्थव्यवस्थेमुळे प्राचीन भारताचा ‘सकल देशांतर्गत उत्पादना’त (‘जीडीपी’त) २७ टक्के सहभाग

‘आपल्या प्राचीन भारताची अर्थव्यवस्था आदर्श होती. गेल्या २००० वर्षांचा इतिहास काढून पाहिला, तर इतिहासात प्राचीन भारताच्या अर्थव्यवस्थेची तशी नोंद दिसून येते. मागील २००० वर्षाच्या इतिहासात गेल्या १८०० वर्षांपर्यंत भारताचा जगामध्ये ‘सकल देशांतर्गत उत्पादना’त सरासरी २७ टक्के सहभाग होता. इंग्रजांची राजवट आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा आकडा न्यून होत गेला. भारताला २७ टक्के सकल देशांतर्गत उत्पादन देण्यात मंदिर अर्थव्यवस्था महत्त्वाची होती. असे असतांना महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना जगात ॲडम स्मिथची भांडवलशाही आणि कार्ल मार्क्सचा साम्यवाद अर्थव्यवस्थेचे आदर्श नमुने असल्याचे सांगतात.

२. भारतीय अर्थशास्त्र आणि जगातील अन्य अर्थशास्त्र यांमधील भेद

भारतीय आणि जगातील अन्य अर्थशास्त्र यांमध्ये भेद आहे. विदेशी अर्थशास्त्र म्हणते, ‘आपण शरीर आहोत आणि आत्मा दुसरे कोणते तरी वाहन आहे. तुमचे एकच जीवन आहे; कारण की तुम्ही केवळ शरीर आहात.’ याउलट भारताचे सनातन अर्थशास्त्र म्हणते, ‘तुम्ही आत्मा आहात आणि शरीर तुम्हाला मिळालेले तात्पुरते वाहन आहे. या जन्मानंतरही दुसरा जन्म आहे. जीवन ही अनेक जन्मांची शृंखला आहे.’ अशा प्रकारे विदेशी अर्थशास्त्राचे आदर्श हे एकाच जीवनाच्या संकल्पनेवर आधारित आहेत.

ॲडम स्मिथच्या भांडवलशाहीमुळे जगातील ९० टक्के लोकांच्या हातात असलेली संपत्ती केवळ ५ टक्के लोकांच्या हातात केंद्रित झाली. मोठ्या प्रमाणात उद्योगीकरण आणि शोषण झाले. त्यानंतर कार्ल मार्क्सचा जन्म झाला. जगाचे शोषण केल्यावर त्यांना आता सर्व गोष्टी विनामूल्य हव्या आहेत. भारतीय अर्थशास्त्राच्या संकल्पनेत आत्मनिर्भरता, म्हणजे स्वयंरोजगार सांगितला आहे आणि जगाच्या अन्य संकल्पनेत नोकरीसाठी शिक्षण हे आदर्श (मॉडेल) ठरवले आहे, म्हणजे ते परावलंबी अर्थशास्त्राविषयी सांगत आहेत.

कार्ल मार्क्सच्या साम्यवादामध्ये मतपेटीचे राजकारण आहे, म्हणजे एकगठ्ठा मतांच्या आधारे विनामूल्य सवलती मागायच्या आणि सरकारने लोकांकडून कर गोळा करून त्या सवलती पुरवायच्या, असे चालले आहे. हे थांबवायचे असेल, तर मंदिराची अर्थव्यवस्था विकसित करावी लागेल. भारतीय मंदिर अर्थव्यवस्थेमध्ये कोणतीही गोष्ट विनामूल्य मिळणार नाही. सनातन अर्थव्यवस्था ‘कर्म’ करण्याचे महत्त्व सांगते. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी सक्षम बनावे लागेल आणि प्रत्यक्ष जाऊन कार्य करावे लागेल.

श्री. अंकित शहा यांचा परिचय

श्री. अंकित शहा

श्री. अंकित शहा हे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद’चे (आय.आय.एम्.चे) सर्वांत युवा प्राध्यापक आहेत. ते सुप्रसिद्ध लेखक, अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत आणि व्याख्याते आहेत. देश-विदेशातील वर्तमानपत्रे आणि नियतकालिके यांमध्ये त्यांचे लिखाण प्रकाशित होते. त्यांनी विविध पुस्तकांचेही लिखाण केले आहे. सामाजिक माध्यमांतून ते प्रभावीपणे मार्गदर्शन करतात.

३. आदर्श हिंदु संस्कृती

हिंदु ही एकच अशी संस्कृती आहे, जी नैतिक लाभ देते. ‘धनतेरस’ किंवा ‘धनत्रयोदशी’ या दिवशी सर्व हिंदु समाजातील लोक उत्सव साजरा करतात. शुभ-लाभाचे ‘स्टीकर्स’ दारावर लावतात. ही जगातील एकमेव हिंदु संस्कृती आहे, जी नैतिक लाभासाठी सामाजिक कृती म्हणून साजरा करते. आजही काही दुकानदार वजन केल्यानंतर एक मूठभर धान्य धर्मासाठी गोळा करतात. सनातनच्या आदर्श अर्थव्यवस्थेत अतिथीची संकल्पना आहे. अतिथी, म्हणजे तिथी न सांगता (अनाहुतपणे) जो पाहुणा कुणाच्याही घरी येतो.  त्याचे आदरातिथ्य करून त्याला आपण भोजन देतो. आपली अर्थव्यवस्था मंदिरांतून चालत होती. आजही उत्तरेकडील व्यावसायिक उत्तरेतून तिरुपतीला जातात, तेव्हा प्रत्येक तिमाहीमध्ये त्यांच्या वार्षिक लाभाचा काही वाटा तिरुपतीला भागीदाराच्या रूपात अर्पण करतात.

४. मंदिरांच्या अर्थव्यवस्थेतून शिक्षणव्यवस्था

मंदिर अर्थव्यवस्था सर्वांत महत्त्वाची आहे. प्राचीन भारतात राजांचा शिक्षण विभाग नव्हता. त्यांचा शिक्षणाशी कोणताही संबंध नसायचा. राजाचे मंत्रीमंडळ शिक्षणाचा अभ्यासक्रम बनवत नव्हते. त्या वेळी मंदिराच्या अर्थव्यवस्थेतून शिक्षणव्यवस्था चालवली जात होती. सगळीकडे गुरुकुल शिक्षणपद्धत होती. आपले ऋषिमुनी संशोधक होते आणि तेच शिक्षणव्यवस्था संचालित करत होते. ब्रिटीश त्यांच्यासह शिक्षण विभाग भारतात घेऊन आले. त्यांना भारतातील सर्वच गोष्टी पालटायच्या होत्या. येथील लोकांचे धर्मांतरही करायचे होते. त्यामुळे त्यांनी येथील सहस्रो गुरुकुले बंद पाडली आणि कारकून पद्धतीची शिक्षणपद्धत आणली. तेव्हापासून शिक्षणव्यवस्था शासनाच्या हातात गेली.

५. मंदिर अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवित होणे आवश्यक !

मंदिरे ही केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक संकल्पना नाही, तर ते शास्त्र, शिक्षण, कला, नृत्य, समाज कल्याण, व्यवसाय, शेती, स्वयंरोजगार यांची केंद्र होती. मंदिरांमुळेच नगरे स्थापन होत होती. आज हिंदु संस्कृतीचा संपूर्ण र्‍हास झाला आणि जगात आपली विविधता हरवली आहे. आपल्या एकेका देवतेशी पशू किंवा पक्षी यांचा संबंध जोडला आहे. प्रत्येकाला विशिष्ट फुले, धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे. मंदिर अर्थव्यवस्था विविधता टिकवून ठेवते. आजही काही मंदिरांमध्ये विविध प्राण्यांनाही प्रसाद दिला जातो. हिंदु धर्मात मानव आणि प्राणी अधिकार यांमध्ये कधी भेद केला नाही. आपल्या अनेक मंदिरांमध्ये पाणी व्यवस्थेचे नियोजन दिसून येते. अन्नाचा पुरवठा, शेतीसंस्कृती, पाणी पुरवठा, नदी या सर्वांचे गणित केल्यानंतर मनुष्य त्याचे निवासस्थान बनवू शकत होता. आता लोक उलट दिशेने जातात. आधी घर बांधतात. नंतर ३-४ वर्षांनी पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होते. काही दिवसांनी पर्यावरणवाले उठून उभे रहातात. साम्यवादी आणि भांडवलशाही यांचे हे सर्व परिणाम आहेत. त्यामुळे राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मंदिर अर्थव्यवस्था पुन्हा पुनरुज्जीवित करणे, हे हिंदूंचे उत्तरदायित्व आहे.’

– श्री. अंकित शहा, हिंदुत्वनिष्ठ आणि अर्थशास्त्रज्ञ, गुजरात.