विंडी डॉनिगर या अमेरिकेच्या शिकागो विद्यापिठातील प्राध्यापिकेने सिग्मंड फ्रॉईड या पाश्चात्त्य मानसशास्त्रज्ञाच्या मनोविश्लेषणाची पद्धत वापरून हिंदु देवता, धर्मग्रंथ आणि प्रतिके यांचे विकृत लैंगिक आणि अश्लील अर्थ लावून शैक्षणिक संशोधनाच्या नावाखाली ते कशा रितीने प्रसिद्ध केले, हे आपण या लेखमालिकेच्या ३ मे या दिवशीच्या भागात पाहिले. ही विकृती त्यांच्यापर्यंत मर्यादित न रहाता ती त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जगभर पसरली आहे. त्यांचे अनुयायीही ‘फ्रॉईडीयन मनोविश्लेषणा’ची पद्धत वापरून हिंदु देवता, ग्रंथ आणि प्रतिके यांचे संशोधनाच्या नावाखाली अश्लील अर्थ सातत्याने प्रसिद्ध करत आहेत. त्यांनी केलेले विकृत संशोधन हे अमेरिकेतील विद्यापिठातील शैक्षणिक वर्तुळापर्यंत मर्यादित नसून ते भारताचे शिक्षणक्षेत्र, राजकारण आणि दूरचित्रवाणीतील पौराणिक मालिका यांद्वारे हिंदूंच्या घरांपर्यंत कसे पोचत आहे ?, ते या भागात पहाणार आहोत. यावरून अमेरिकेच्या विद्यपिठातील हिंदु धर्माविषयीचे विकृत संशोधन हिंदु मनांचे कसे श्रद्धाहनन आणि बुद्धीभेद करत आहे ?, ते लक्षात येईल ! या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदूंनी त्याला सनदशीर मार्गाने विरोध करणे अपेक्षित आहे, हेही त्यांना यातून लक्षात येईल.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1036267.html

१. वेंडी डॉनिगर यांचे विकृत संशोधन ‘अधिकृत ज्ञान’ म्हणून सर्वत्र प्रसारित

वेंडी डॉनिगर यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाच्या ‘इनकार्टा इनसायक्लोपीडिया’मध्ये हिंदु धर्माचा भाग लिहिला होता. (‘मायक्रोसॉफ्ट एन्कार्टा’ हा मायक्रोसॉफ्ट आस्थापनाने प्रकाशित केलेला एक ‘डिजिटल मल्टीमिडिया’ ज्ञानकोश (एन्सायक्लोपिडिया) वर्ष १९९३ ते २००९ या काळात उपलब्ध होता. – संकलक) त्याला झालेल्या विरोधानंतर तो मागे घेण्यात आला; परंतु हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. एखाद्या बड्या तंत्रज्ञान आस्थापनाच्या ज्ञानकोशात हिंदु धर्माचे डॉनिगर यांनी केलेले विकृत विश्लेषण हे ‘अधिकृत ज्ञान’ म्हणून अनेक वर्षे मांडले गेले होते, हे अतिशय गंभीर आहे.
‘नॉर्टन अँथॉलॉजी ऑफ वर्ल्ड रेलिजनस’ ही पाठ्यपुस्तके (पुस्तक संच) जगभर वापरली जातात. या पाठ्यपुस्तकांत डॉनिगर यांनीच हिंदु धर्माचा भाग लिहिला आहे. ही पुस्तके भारतातील केंद्रीय लोकसेवा आयोग संस्थेच्या (‘यू.पी.एस्.सी.’च्या) अभ्यासक्रमातही वापरली जातात. यावरून भारतात घडणारे अधिकारी कुठल्या प्रकारचा अभ्यास करून येतात, हे लक्षात येईल.
आज संकेतस्थळांवर हिंदु धर्माविषयी अनेक लेख, विकिपीडिया नोंदी आणि शैक्षणिक संकेतस्थळांवरील माहिती, ही डॉनिगर यांच्याच विचारसरणीने प्रभावित आहे. ‘चॅट जीपीटी’, ‘जेमिनी’ यांसारखी कृत्रिम बुद्धीमत्तेची साधनेही हिंदु धर्माविषयी माहिती देण्याकरता डॉनिगर यांच्याच माहितीच्या आधारावर सिद्ध केली आहेत. त्यामुळेच घरात बसलेला जगातील कुठलाही किंवा एखादा (हिंदु) विद्यार्थी जेव्हा हिंदु धर्माविषयी संकेतस्थळावर आणि ‘चॅट जीपीटी’वर माहिती शोधतो, तेव्हा त्याच्यासमोर हेच हिंदु धर्माचे विकृत विश्लेषण समोर येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्याला होणारी ‘हिंदु धर्माची ओळख’ हीच विकृत स्वरूपामध्ये होऊ शकते.
२. डॉनिगर यांचे भारतातील अनुयायी – देवदत्त पट्टनायक !

देवदत्त पट्टनायक हे आज भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ‘पुराणकथा अभ्यासक’ (मायथॉलॉजिस्ट) म्हणून ओळखले जातात. (खरेतर पुराणकथांना ‘मायथॉलॉजी’ म्हणणे चुकीचे आहे; परंतु ‘पुराणकथांचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसल्याने त्यांना ‘इतिहास’ न म्हणता ‘मिथ’, म्हणजे खोटे म्हणण्या’ची एक विचारसरणी पाश्चात्त्यांनी पसरवली. हाही हिंदु धर्म आणि संस्कृती यावर एक मोठा आघात पाश्चात्त्यांनी केला आणि साम्यवाद्यांनी भारतातही त्याची ‘री’ ओढली. त्यामुळे आजही भारतातील शैक्षणिक व्यवस्थेपासून माध्यमांपर्यंत अनेक जण पुराणकथांना ‘मिथ’ (खोटे) म्हणतात आणि पट्टनायक यांच्यासारखे त्यांचे विकृत विश्लेषण सादर करून स्वतःला ‘मायथॉलॉजिस्ट’ म्हणवून घेतात ! – संकलक) त्यांची पुस्तके लाखो प्रतींमध्ये विकली जातात. त्यांचा आणि वेंडी डॉनिगर यांचा संबंध समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे; कारण हे नाते भारतीय माध्यमे आणि शिक्षण या क्षेत्रांवरील डॉनिगर यांच्या विकृत प्रभावाचे थेट उदाहरण आहे.
३. पट्टनायक यांनी वेंडी डॉनिगर यांचा केलेला पुरस्कार
अ. पट्टनायक यांनी स्वतःच लिहिले आहे, ‘हिंदु धर्माचा गंभीरपणे अभ्यास करू इच्छिणार्या प्रत्येकाला वेंडी डॉनिगर यांचे काम अभ्यासणे आवश्यक आहे. ज्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ हिंदु ग्रंथांचे संशोधन, भाषांतर आणि विश्लेषण केले आहे. त्यांच्याखेरीज हिंदु ग्रंथांमध्ये लपलेल्या अनेक कथांपर्यंत मी पोचलो नसतो.’ पट्टनायक यांनी उघडपणे सांगितले आहे की, त्यांची हिंदु पुराणकथांची समज मुख्यतः डॉनिगर यांच्या लेखनातून आली आहे. पट्टनायक यांनी स्वतःच म्हटले आहे, ‘मला डोनिगर आवडतात.’
आ. वर्ष २०१४ मध्ये ‘पेंग्विन इंडिया’ प्रकाशनाने डोनिगर यांचे पुस्तक मागे घेतले तेव्हा पट्टनायक यांनी लिहिले, ‘मी अमेरिकेत गेलो होतो, तेव्हा अनेक भारतीय कुटुंबांनी मला विचारले ‘तुम्हाला डोनिगर आवडतात ?’ आणि मी सांगितले,‘हो, मला त्या अत्यंत आवडतात.’ अशा प्रकारे त्यांचे महत्त्व पट्टनायक यांनी मान्य केले आहे.
भारतीय साम्यवाद्यांकडून डॉनिगर यांच्या विकृत संशोधनाचा उदो उदो आणि त्यांच्या लेखी भारतीय विद्वान मात्र कवडीमोल
भारतातील साम्यवादी आणि धर्मनिरपेक्ष बुद्धीजीवींना संस्कृत येत नाही; पण हिंदु धर्मावर टीका करायची असते. वेंडी डॉनिगर यांचे इंग्रजी लेखन या कमतरतेवर हातात मिळालेले सिद्ध उत्तर आहे. इथेच एक सोयीचे साटेलोटे जन्माला येते. हे नाते एकतर्फी नाही. डॉनिगरना भारतात प्रसिद्धी मिळते, ‘हिंदु धर्माचे सर्वोच्च अधिकारी’, अशी उपाधी देऊन त्यांना साम्यवादी विचारसरणीची प्रसारमाध्यमे आणि बुद्धीजीवी यांच्याकडून त्यांना प्रतिष्ठित केले जाते आणि साम्यवादी बुद्धीजीवींना हिंदु धर्मावर टीका करण्यासाठी पाश्चात्त्य शिक्क्याचा डॉनिगर यांच्या रूपाने ‘अधिकारीक स्रोत’ मिळतो. ‘डॉनिगर म्हणतात…’ हे एकच वाक्य पुरेसे ठरते ! मूळ ग्रंथ वाचण्याची आवश्यकताच उरत नाही !
यात खरी समस्या आहे ती हिंदु समाजासाठी इतिहास, समाज आणि संस्कृती शिकवणार्या भारतीय प्राध्यापकांच्या वर्गात डॉनिगर यांची व्याख्या ‘प्रमाण’ ठरते आणि भारतीय विद्वान परंपरेतील संस्कृत विद्वान, पंडित आणि धर्माचार्य यांच्या अनुभवजन्य मताला मात्र किंमत रहात नाही ! (भारतात प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्यासारखे अनेक वेद-पुराणांचा अभ्यास असणारे संत, अभ्यासक आणि विचारवंत होते अन् आहेत. त्यांच्याकडे जाण्याऐवजी पाश्चात्त्य हिंदुद्वेषी विचारवंताचा आधार घेणार्या मार्क्सवाद्यांना हिंदु धर्म कधी तरी कळेल का ? – संकलक)
– श्री. नागेश जोशी
४. डॉनिगर यांच्याप्रमाणे पट्टनायक यांनीही फ्रॉईडीय मनोविश्लेषण पद्धत वापरून भारतीय पुराणांतील कथांचा भारतात प्रसार करणे
डॉनिगर ज्या फ्रॉईडीय मनोविश्लेषण पद्धतीचा वापर करतात, तीच पद्धत पट्टनायक यांनी भारतात धर्मनिरपेक्षतावादी आणि इंग्रजीशिक्षित हिंदूंसाठी स्वीकारार्ह स्वरूपात मांडण्यासाठी वापरली आहे. डॉनिगर जे शैक्षणिक भाषेत अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये सांगतात, तेच पट्टनायक रंगीत चित्रांसह सहज भाषेत भारतीय उद्योगजगत, शाळा आणि दूरचित्रवाहिन्या यांवर सांगतात. देवदत्त पट्टनायक यांनी ‘महाभारत’, ‘सिया के राम’ आणि ‘देवों के देव…महादेव’ यांसारख्या दूरचित्रवाहिन्यांच्या मालिकांसाठी कथा सल्लागार (स्टोरी कन्सलटंट) म्हणून काम केले आहे. ज्या पौराणिक मालिका दूरचित्रवाहिनीवरून लाखो हिंदू बघतात, त्या डॉनिगर यांच्या विकृत फ्रॉईडीयन मनोविश्लेषणाच्या पद्धतीने प्रभावित आहेत. त्यामुळे त्यात कुठे ना कुठे त्यात चुकीचे अर्थ प्रसारित करणारा भाग दर्शवला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
५. भारतीय शिक्षणव्यवस्थेत शिरकाव
येथे एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे ‘अमेरिकेतील एका विद्यापिठातील प्राध्यापिकेच्या लेखनाचा भारतीय शिक्षण आणि माध्यमे यांच्याशी काय संबंध ?’ हा संबंध अत्यंत थेट आणि गंभीर आहे. जसे अमेरिकेतील रटगर्स विद्यापिठाशी संबंधित पहिल्या लेखाच्या भागात नमूद केले आहे की, अमेरिकेतील बड्या विद्यापिठांचे निष्कर्ष हे जागतिक ‘शैक्षणिक सत्य’ म्हणून स्वीकारले जातात. भारतातील अनेक विद्यापिठांमध्ये, ‘जे.एन्.यू.’सारख्या (‘जवाहरलाल नेहरू युनिर्व्हसिटी’सारख्या) संस्थांमध्ये, एन्.सी.ई.आर्.टी.च्या (‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थे’च्या) पाठ्यपुस्तकांमधील तज्ञ सल्लागार म्हणून ज्या विद्वानांना बोलावले जाते, त्यांपैकी अनेक जण थेट या ‘वेंडीज् चिल्ड्रन’च्या (‘वेंडी यांच्या अनुयायां’च्या) विचारवर्तुळाशी जोडलेले आहेत.
६. भारतातील प्रसारमाध्यमांत वेंडी डॉनिगर यांचे अनुयायी
भारतातील इंग्रजी माध्यमे, वर्तमानपत्रे, विविध वाहिन्या आणि ‘ऑनलाईन पोर्टल्स’ आदी माध्यमे डॉनिगर यांच्या पुस्तकांना किंवा विचारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ‘धाडसी संशोधन’ अन् ‘महत्त्वाचे योगदान’ किंवा ‘आधुनिक विचार’ म्हणून सातत्याने सादर करत आहेत. (अन्य पंथियांविषयी अशा प्रकारे जगात कुठे जरी विकृत किंवा अश्लाघ्य बोलले, लिहिले किंवा चित्रीत केले गेले तर खून आणि दंगली होतात, याची कित्येक उदाहरणे आपण आजही पहातो. – संकलक)
वर्ष २०१४ मध्ये डॉनिगर यांचे पुस्तक भारतात मागे घेतले गेले, तेव्हा ‘द हिंदु’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ यांसारख्या वृत्तपत्रांनी संपादकीय लिहून डॉनिगर यांची बाजू घेतली आणि विरोध करणार्या हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवले, म्हणजे ज्यांनी आपल्या श्रद्धांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच ‘विचारस्वातंत्र्याचे शत्रू’ म्हणून चित्रीत केले गेले. हा किती मोठा विरोधाभास आहे !
वेंडी डॉनिगर यांनी निर्माण केलेली हिंदु धर्मग्रंथ, देवता, प्रतिके यांना फ्रॉईडीय मनोविश्लेषणाच्या पद्धतीतून पहाण्याची संशोधनाची पद्धत कशा रितीने घातक ठरत आहे ? ते आपण पाहिले. पुढील भागामध्ये ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’ या दृष्टीकोनातून हिंदु धर्म ग्रंथांचा अर्थ लावून शेल्डन पोलॉक नावाचे कोलंबिया युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक हिंदु समाजामध्ये दुही पसरवण्यारी संशोधनाची परंपरा कशी निर्माण करत आहेत ? ते आपण पाहू.
(क्रमशः)
– श्री. नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती, पुणे.
‘वेंडीज् चिल्ड्रन’ – एका विषारी वृक्षाची फळे

डॉनिगर यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हे विद्यार्थी आज अमेरिका, युरोप आणि अगदी भारतातही हिंदु अभ्यासाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हिंदुत्वनिष्ठ विचारवंत राजीव मल्होत्रा यांनी या समूहाला ‘वेंडीज चिल्ड्रन’ (वेंडी यांची मुले, म्हणजे त्यांचे अनुयायी किंवा विद्यार्थी) असे संबोधले आहे आणि हे केवळ उपहासात्मक नाव नाही, तर एका अत्यंत गंभीर वास्तवाचे वर्णन आहे. या विद्यार्थ्यांनी डॉनिगर यांचा फ्रॉईडीय दृष्टीकोन पुढे नेला. त्यांतील काही प्रातिनिधिक उदाहरणे पाहू.
जेफ्री क्रिपल, धर्म आणि तत्त्वज्ञान अध्यासनाचे प्रमुख, राईस विद्यापीठ, अमेरिका : ‘कालीज् चाईल्ड’ (कालीमातेची मुले) या पुस्तकात फ्रॉईडियन मनोविश्लेषणाची पद्धत वापरून भारतीय परंपरेतील महान संत रामकृष्ण परमहंस यांना एक ‘लैंगिकरित्या विचलित समलैंगिक’ आणि ‘बाललैंगिक अत्याचार करणारे’ (pedophile) म्हणून चित्रित केले आहे. त्यांनी आध्यात्मिक अनुभूतींना ‘लैंगिक दडपशाही’चा परिणाम मानले आहे.
पॉल कोर्टराईट, धर्म विभाग प्राध्यापक, इमोरी विद्यापीठ, अमेरिका : यांनी हिंदूंचा कुठल्याही गोष्टीचा आरंभ ज्याच्या पूजनाशिवाय होत नाही, अशा श्री गणेशाच्या मूर्तीचे विश्लेषण करतांना फ्रॉईडीयन मनोविश्लेषणाची पद्धत वापरून त्यांनी श्री गणेशाची सोंड हे ‘शिथिल लिंगाचे’ (लिंप फॅलस) प्रतीक असल्याचे आणि मोदकांची आवड ही ‘मुखमैथुना’च्या इच्छेचे लक्षण असल्याचे अत्यंत अश्लाघ्य अन् निंदनीय दावे केले आहेत.
सारा कॅल्डवेल : यांनी ‘ओ टेरिफाईंग मदर : सेक्श्युॲलिटी, व्हायलन्स अँड वर्शिप ऑफ गॉडेस काली’ (‘हे उग्र माता : लैंगिकता, हिंसा आणि कालीमातेची उपासना) या पुस्तकात फ्रॉईडीयन मनोविश्लेषणाची पद्धत वापरून कालीमातेला ‘लिंग असलेली माता’ (मदर विईथ पेनीज्) अन् ‘पुरुषांचे खच्चीकरण करणारी’ म्हणून सादर केले आहे.
– श्री. नागेश जोशी
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
नियमित साधनेने मनाची शुद्धी, योग्य निर्णयक्षमता आणि अंतर्मनातील स्पष्टता वाढते ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !
जपमाळ
हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !