आपल्या पूर्वजांनी धर्माची व्याख्या केली आहे ती अशी….
यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः । – वैशेषिक दर्शन, अध्याय १, आह्निक १, सूत्र ३
अर्थ : ज्या योगाने आपला अभ्युदय होऊन आपल्याला निश्चितपणे मोक्षप्राप्ती होते, तो धर्म होय.
अर्थात् ज्यामुळे लौकिक आणि परमार्थिक कल्याणाची सिद्धी प्राप्त होते, त्याला ‘धर्म’ असे म्हणतात. धर्माच्या या व्याख्येवरून आपली संस्कृती ऐहिक आणि परमार्थिक जीवन यांमध्ये भेद करत नाही, ही गोष्ट स्पष्ट होते. भौतिक जीवन आणि पारलौकिक जीवन यांचा सुंदर समन्वय आपल्या वैदिक संस्कृतीने साधलेला आहे. याला अनुरूप अशी शिक्षणव्यवस्था आपल्याकडे निर्माण करण्यात आली होती. आपण आपल्या धर्माचे योग्य प्रकारे आचरण केले नाही, तर आपणच आपल्या धर्माच्या नाशाला कारणीभूत ठरतो. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही.
(भाग १)

१. भारताच्या स्वातंत्र्यानंतर शिक्षणव्यवस्थेच्या संदर्भात केलेला आत्मघात
दुर्दैवाने आपल्या देशात आपल्या संस्कृतीला आणि धर्माला अनुरूप अशी शिक्षणव्यवस्था देशाच्या स्वातंत्र्यानंतर निर्माण केली नाही, हा आपला सर्वांत मोठा दोष आहे. एवढेच नाही, तर परकीय आक्रमकांनी भारताचा इतिहास लिहिला आणि त्यांनी लिहिलेला इतिहासच आपण सत्य मानून तो आपल्या शिक्षणव्यवस्थेत समाविष्ट केला. ही आपली त्याहीपेक्षा मोठी चूक आहे, तसेच ‘शिक्षणसंस्थांमधून विद्यार्थ्यांना हिंदु धर्म, संस्कृती यांचे शिक्षण देता येणार नाही’, असा निर्बंध करून आपणच आपल्या संस्कृतीला फासावर लटकवण्याचा आत्मघातकी ठरणारा मूर्खपणा केला.
जगातील कोणत्याही देशाकडे आपण पाहिले, तर एक गोष्ट लक्षात येते की, जगातील देश स्वतःची संस्कृती आणि धर्म टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. याउलट आपण आपली संस्कृती आणि धर्म यांविषयी उदासीन वृत्ती धारण केली आहे. वास्तविक स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांनी आदर्श शिक्षणव्यवस्था कशी असावी ? याविषयी त्यांचे विचार वेळोवेळी मांडले. त्यांच्या त्या विचारांकडे आणि त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करण्याचा अक्षम्य अपराध आपल्या हातून घडला आहे.

२. परकियांची शिक्षणपद्धतीच्या दुराग्रहामुळे समाजघातक प्रवृत्तींना बळ आणि त्यावरील उपाय म्हणजे शिक्षणव्यवस्था पालटणे !
आपल्या देशात पूर्वी मंदिरांतून धर्मशिक्षण दिले जात होते. तत्त्वज्ञान शिकवणे आणि आचरणाचे नियम समजावून देणे, हे विद्या मंदिराचे काम आहे. शिक्षणातून संस्कार केला जात होता. संस्कारांवाचून विद्येला कोणताही अर्थ नाही, हा मूलभूत सिद्धांत आपल्या पूर्वजांनी मांडला, आचरणात आणला आणि त्याला अनुरूप अशी गुरुकुल शिक्षणव्यवस्था निर्माण केली. वास्तविक तोच आदर्श आपण समोर ठेवून अशा प्रकारची शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याचा साधा विचारही आपल्या ध्यानात आला नाही. परकीय आक्रमकांनी, म्हणजेच इंग्रजांनी निर्माण केलेली शिक्षणपद्धतच आपण आंधळेपणाने पुढे चालू ठेवण्याचा दुराग्रह धरला. परिणामी शिक्षणातून संस्कार आणि संस्कारातून विद्या संपादन करणे, याचे महत्त्व आपण समजूनच घेतले नाही. या आणि अशा प्रकारच्या अनेक चुका आपल्या हातून घडल्या. त्यामुळे नीतीमान समाज आपण निर्माण करू शकलो नाही. परिणामी सांप्रतकाळात आपल्या देशात अपराधांची संख्या वाढली. बलात्कार, खून, दंगली, दरोडे, लबाड्या, कटकारस्थाने, फसवेगिरी, देशात अराजकसदृश वातावरण निर्माण करण्याची कुबुद्धी, स्वार्थांधता या आणि अशा प्रकारच्या अवगुणांमुळे समाजघातक अन् मानवतेला काळिमा फासणार्या घटना सातत्याने वाढत चालल्या आहेत. या समस्या दूर करण्याचे आव्हानही आपल्यासमोर आहे.
याच्या जोडीलाच सण आणि उत्सव साजरे करत असतांना कोणत्याही प्रकारचा संयम, समंजसपणा दाखवण्याचे सौजन्यही आपल्याकडे राहिलेले नाही. ‘नैतिक दायित्व’ याचा साधा विचारही आपल्या मनाला स्पर्श करत नाही. यावर सर्वोत्तम एकमात्र उपाय, म्हणजे सांप्रत काळातील शिक्षणव्यवस्था पालटणे, ही आहे.
३. संस्कारांची शास्त्रशुद्ध परंपरा हाच शिक्षणाचा पाया
माणूस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा त्याच्यावर कोणतेही संस्कार झालेले नसतात. अशा नवजात बालकावर जर कोणत्याही प्रकारचे संस्कार केले गेले नाहीत, तर ते बालक विकृत मनोवृत्ती धारण करणार हे निश्चित ! उत्तम विचारांचे, उत्तम आचाराचे संस्कार जेव्हा बालकावर होतात, तेव्हा त्या बालकाचा जणू पुनर्जन्म होतो. जन्माला आलेले बालक हे स्वाभाविकपणे संस्काररहित असते. त्याच्यावर संस्कार करून त्याच्या जीवनाचा उद्धार करण्याच्या हेतूने निर्माण केलेली संस्कारांची शास्त्रशुद्ध परंपरा, हाच शिक्षणव्यवस्थेचा पाया आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
४. अन्य देशांमधील नाही, तर आपली संस्कृती, धर्म, शैक्षणिक परंपरा जतन करणेच इष्ट !
भगवान श्रीकृष्णाने गीतेत ‘ज्ञानासारखे जगात दुसरे काहीही पवित्र नाही’, असे स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. महाभारतात ‘विद्येसारखे दुसरे कोणतेही नेत्र नाही’, असे महर्षि व्यास यांनी उद्घोषित केले आहे. अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. प्रत्येक राष्ट्राची जी जीवनदृष्टी आहे, त्या दृष्टीला अनुरूप असे एक जीवन लक्ष्य त्या राष्ट्रातील नागरिकांचे असते आणि तेच आदर्श निर्माण करते. त्याला अनुरूप अशी शिक्षणव्यवस्था त्या त्या देशात असावी. याला वर्ष १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण आयोगाने सादर केलेला अहवाल दुजोरा देणारा आहे.
‘Educational systems are the highest expression of each people’s national consciousness, culture and traditions. Since no one nation is identical to another, there are as many definations of educational problems as there are countries in the world.’ (शैक्षणिक व्यवस्था ही त्या त्या लोकांची राष्ट्रीय जाणिवा, संस्कृती आणि परंपरा यांची सर्वोच्च अभिव्यक्ती असते. कोणतेही एक राष्ट्र दुसर्या राष्ट्रासारखे नसल्यामुळे जगात जितके देश आहेत, तितक्याच शैक्षणिक समस्यांच्या व्याख्या आहेत.)
अन्य देशांमधील शिक्षणव्यवस्था ही कितीही चांगली असली, तरी ती आपल्या देशासाठी उपयुक्त असणार नाही. आपल्याला हिंदु संस्कृती, धर्म यांना अनुरूप अशीच शिक्षणव्यवस्था निर्माण करून त्यांच्यासह शैक्षणिक परंपरा जतन करणे, हेच इष्ट आहे.
५. आदर्श शिक्षणपद्धतीला उपयुक्त ठरणारी काही मार्गदर्शक तत्त्वे
अ. जी मुक्ती देते, ती विद्या ! : ‘सा विद्या या विमुक्तये ।’ ‘शिक्षणाचे हे बोधवाक्य आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या बोधवाक्याचा आशय, म्हणजे ‘सर्व प्रकारच्या विकारांच्या, वासनांच्या बंधनातून जी मुक्त करते, तिला विद्या म्हणतात.’
ज्ञान संपादनाच्या किंवा विद्याप्राप्तीच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या ५ गोष्टी म्हणजे व्यष्टी (व्यक्ती), समष्टी (समाज), सृष्टी, परमेष्ठी आणि विश्वात्मक जीवनदृष्टी यांना केंद्रस्थानी ठेवून शैक्षणिक धोरण आखले पाहिजे; कारण या गोष्टीच मानवी जीवनाचे पंचप्राण आहेत.
आ. विकृतीकडून संस्कृतीकडे ! : विकृतीकडून संस्कृतीकडे जाण्याचा मार्ग दाखवण्याचे काम शिक्षण करते. हेच शिक्षण ज्ञानलालसा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते. ज्ञानलालसा वाढणे, हीच बालब्रह्माची उपासना, सौंदर्याची साधना आणि सामर्थ्याची आराधना आहे. या ३ साधनांनी आपल्याला आपलीच ओळख करून घेणे शक्य होते.
इ. भक्तीभावाची निर्मिती : याच्या पुढची पायरी, म्हणजे बद्ध जीवाला मुक्त करण्यासाठी मुक्त परमात्म्याला बद्ध करण्याचे सामर्थ्य असलेला भक्तीभाव याच शिक्षणाने निर्माण करता येतो. हे आपली शिक्षणपद्धत आणि संस्कार यांचे सामर्थ्य आहे.
अशा प्रकारचे शिक्षण म्हणजे आचार, विचार आणि उच्चार यांचे उगमस्थान आहे. आचार, विचार आणि उच्चार यांच्या संस्कारांतूनच नराचा नारायणाच्या दिशेने प्रवास चालू होतो. अशा प्रकारे ज्ञानाने संपन्न झालेल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीत, कल्पकतेत, त्यांच्या मनाच्या विशालतेत, त्यांच्या वाणीच्या माधुर्यात, त्यांच्या वागण्यातील निर्मळतेत आणि त्यांच्या मुखावरच्या प्रसन्नतेत विद्येच्या या पंचप्राणांचे दर्शन घडते. अशा विद्यार्थ्यांना ‘विश्वाला जाणण्यासाठी बहिर्मुखतेची, तर स्वतःला जाणण्यासाठी अंतर्मुखतेची आवश्यकता असते’, याचे सहजतेने आकलन होते अन् त्या आकलनानुसार त्यांचा सहज स्वभाव होतो. अशा प्रकारचे शिक्षण घेऊन परिपक्व झालेल्या विद्यार्थ्याला शब्दातील अर्थ नेमकेपणाने उमगतो; कारण त्या अर्थाला त्याच्या स्वतःच्या जीवनाचा संदर्भ असतो.
थोडक्यात माहिती आणि अनुभूती यांच्या रसायनातूनच ज्ञानाची निर्मिती होत असते, ही शिकवण विद्यार्थ्यांच्या रक्तात सहजतेने भिनते.
(क्रमश: उद्याच्या दैनिकात)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१२.९.२०२५)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/959794.html
Hijab Exam : हिजाब घातल्यावरून परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थिनीला मिळणार अभियांत्रिकीसाठी प्रवेश !
सौंदळ (राजापूर) येथे आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !