देवीचे जागृत स्थान आणि भाविकांची काळजी घेणारे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील श्री जीवदानीदेवी संस्थान !

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील विरार येथे एका डोंगरावर श्री जीवदानीदेवीचे स्थान आहे. श्री जीवदानीदेवी ही श्री पार्वतीमातेचे स्वरूप मानले जाते. हे स्थान निसर्गरम्य आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागात असूनही देवीच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आदी विविध राज्यांतूनही भाविक मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी येतात. नवस फेडण्यासाठी आणि प्रतिवर्षी परंपरागत सहकुटुंब देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. भाविकांसाठी आवश्यक सुविधा, देवस्थानचे पावित्र्य जपणे, आर्थिक व्यवहारात सुसूत्रता राखणे, कर्मचार्‍यांमधील सेवाभाव, सामाजिक दायित्वाचे भान ठेवून उपक्रम राबवणे, संस्कृती टिकून रहाण्यासाठीचे प्रयत्न हे देवस्थानचे कार्य उल्लेखनीय आहे. श्री जीवदानीदेवी संस्थानचे कार्य अन्य देवस्थानांसाठी प्रोत्साहन देणारे आणि मार्गदर्शक ठरेल. या लेखाद्वारे श्री जीवदानीदेवी स्थानाच्या आध्यात्मिक महत्त्वासह देवस्थानाचे सुव्यवस्थापन समजून घेऊया !

संकलक :  श्री.प्रीतम नाचणकर, मुंबई 

विरार येथील डोंगरावरील श्री जीवदानीदेवीचे स्थान

१. अशी आहे आख्यायिका !

राजा दक्ष प्रजापति याने अश्वमेध यज्ञ आयोजित केला. त्या यज्ञाला जावई भगवान शिव आणि मुलगी सती हिला निमंत्रण दिले नाही. या वेळी निमंत्रण नसतांनाही सती यज्ञाला गेली. तेथे दक्ष प्रजापतीने भगवान शिवाविषयी अवमानजनक वक्तव्य केले. पतीचा अवमान सहन न झाल्यामुळे सती हिने तपसामर्थ्याने अग्नी प्रज्वलित करून त्यात स्वत:ला समर्पित केले. हे भगवान शिवाला समजताच ते तात्काळ तेथे प्रकट झाले आणि सती हिचे शरीर खांद्यावर घेऊन तांडव नृत्य केले. या वेळी भगवान शिवाचा क्रोध शांत व्हावा, यासाठी भगवान श्रीविष्णूने सुदर्शनचक्राने माता सतीच्या पार्थिवाचे ५१ तुकडे केले. पार्थिवाचे तुकडे पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडले ती ‘आदिशक्तीची शक्तीपीठे’ म्हणून ओळखली जातात. श्री जीवदानीदेवी स्थान त्यांपैकीच एक आहे. वनवासामध्ये असतांना पांडवांना याच ठिकाणी देवीचे दर्शन झाल्याची आख्यायिका आहे. पुढील काळात एका गुराख्याला आणि त्याच वेळी एका मूल नसलेल्या महिलेलाही देवीचे दर्शन झाले. देवीने या महिलेला मूल होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे अनेक महिला मूल होण्यासाठी देवीला नवस करतात.

श्री. प्रीतम नाचणकर

२. भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था

प्रसादालय

मंदिराच्या परिसरामध्ये देवस्थानाचे प्रसादालय आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था असते. भाविकांना १५ रुपये इतक्या नाममात्र मूल्यामध्ये वरण, भात, भाजी, लोणचे असे सात्त्विक भोजन पोटभर दिले जाते. महाप्रसादासाठी कूपनव्यवस्था, कूपन देण्यासाठी खिडकी, रांगेची व्यवस्था; अन्न वाया जाऊ नये यासाठी प्रसादालयात ठिकठिकाणी सूचना, प्रत्येक पंगतीनंतर बाकांची स्वच्छता, कर्मचार्‍यांची स्वच्छता आणि सेवाभावी वृत्ती, शिस्त या सर्वांकडे देवस्थानकडून बारकाईने पाहिले जाते. एका वेळी ४०० जण पंगतीला बसू शकतील, अशी या प्रसादालयाची क्षमता आहे. येथे नियमित १२०० ते १५०० भाविक, तर सुट्टीच्या दिवशी २५०० पर्यंत भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. नवरात्रीच्या काळात महाप्रसाद घेणार्‍या भाविकांची संख्या २५ सहस्रांपर्यंत असते. नवरात्रीच्या काळात सर्व भाविकांना विनामूल्य भोजन दिले जाते. यासह सकाळी १० रुपयांमध्ये न्याहारीचीही व्यवस्था प्रसादालयात आहे. अशा या प्रसादालयात सात्त्विक आणि स्वादिष्ट भोजन ग्रहण करून भाविक तृप्त होतात.

ईश्वराचा आशीर्वाद, भक्तांचा सहभाग आणि विश्वस्तांचा संघटितपणा यांमुळेच शक्य ! – प्रदीप तेंडोलकर, अध्यक्ष, श्री जीवदानीदेवी संस्थान

प्रदीप तेंडोलकर

श्री जीवदानीदेवीला ‘पहाडवाली माता’ या नावानेही ओळखले जाते. हे ठिकाण ग्रामीण आणि दुर्गम भागात असूनही अनेक भाविक देवीच्या दर्शनाला येतात. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांचा देवस्थानाच्या कार्यात सक्रीय सहभाग असतो. मंदिरासाठी प्राप्त झालेल्या अर्पणाचा योग्य प्रकारे विनियोग केला जातो. धर्मकार्यासह सामाजिक कार्यातही देवस्थानाचा यथाशक्ती सहभाग असतो. मंदिर व्यवस्थापन हे एका व्यक्तीचे काम नाही, तर ईश्वराचा आशीर्वाद, भक्तांचा सहभाग आणि विश्वस्तांचा संघटितपणा यांमुळेच ते बघणे शक्य आहे.

हे आहे श्री जीवदानीदेवी संस्थानचे विश्वस्त मंडळ !

अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर, उपाध्यक्ष श्री. पंकज ठाकूर, कार्यवाह डॉ. वसंत मांगेला, कोषाध्यक्ष श्री. परशुराम वासुदेव पाटील, विश्वस्त सर्वश्री राजीव पाटील, काशिनाथ पाटील, प्रणय नेरूरकर, रामचंद्र गावडे, परशुराम मोरेश्वर पाटील, हेमंत म्हात्रे, मुकेश सावे, संजय पिंगुळकर आणि राजेश एडवनकर या विश्वस्तांच्या योगदानामुळेच मंदिराचे हे सुव्यवस्थापन शक्य आहे.

४. अर्पण श्रीफळांपासून प्रसादाची स्तुत्य संकल्पना !

भाविक देवीला मोठ्या प्रमाणात श्रीफळ अर्पण करतात. या श्रीफळांपासून संस्थानाच्या प्रसादालयात नारळाच्या स्वादिष्ट वड्या बनवल्या जातात. त्यांना आकर्षक वेष्टन करून तो देवीचा प्रसाद म्हणून भाविकांना दिला जातो. नारळाच्या वड्या करतांना गुणवत्तेकडे बारकाईने लक्ष दिले जाते. भाविकांनी अर्पण केलेल्या श्रीफळांचा प्रसाद करण्याची संस्थानची ही संकल्पना नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे. यामुळे देवस्थानच्या उत्पन्नातही भर पडते. नियमित सर्वसाधारण ८०० किलो नारळाच्या वड्या सिद्ध केल्या जातात. वड्यांच्या प्रसादाचे वेष्टन इतरत्र टाकल्याने देवीची विटंबना होईल; म्हणून या वेष्टनावर देवीचे चित्र किंवा नाव न छापता केवळ ‘प्रसाद’ असा उल्लेख केला आहे. यातून देवतांची विटंबना होऊ नये, याविषयीची विश्वस्तांची सतर्कता दिसून येते.

५. सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन

सामुदायिक विवाह सोहळा

देवस्थानाच्या वतीने वर्षातून २ वेळा सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. यामध्ये गरीब आणि गरजू कुटुंबातील युवक-युवतींचा विवाहसोहळा विनामूल्य करून दिला जातो. या वेळी प्रत्येक वधूला देवस्थानाकडून देवीचे प्रसादस्वरूप १ ग्रॅम सोने असलेले मणी मंगळसूत्र आणि साडी दिली जाते, तसेच वधू-वरांना कपडे, संसारोपयोगी भांडी यांसह अन्य वस्तू दिल्या जातात. या वेळी वधू-वरांकडील मंडळींना लग्नाचे साग्रसंगीत जेवणही दिले जाते. लग्नविधीसाठी भटजींची दक्षिणा, तसेच विवाहाचा सर्व व्यय श्री जीवदानीदेवी संस्थानकडूनच केला जातो. संस्थानने आतापर्यंत दीड सहस्र जोडप्यांचे विवाह यशस्वीपणे केले आहेत. यासाठी अनेक दानशूर व्यक्तींकडून साहाय्य केले जाते. श्री जीवदानीदेवी संस्थानाचा सामूहिक विवाह सोहळा, म्हणजे गरीब आणि गरजू लोकांसाठी मोठा आधार आहे.

देवस्थानाद्वारे देण्यात येणार्‍या अन्य सुविधा !

सौरऊर्जा प्रकल्प

अ. चप्पल व्यवस्था, दर्शनाची रांग, स्तनदा मातांसाठी स्तनपान कक्ष, पिण्याचे पाणी, शौचालय यांची चांगली व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

आ. इलेक्ट्रिक वाहनांसाठी मंदिराच्या परिसरात चार्जिंगची व्यवस्था विनामूल्य आहे.

इ. मंदिराच्या परिसरात २३० किलो वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला आहे. यामुळे वीजदेयकामध्ये बचत होते.

ई. बळीसाठी आणण्यात येणारी कोंबडी आणि बकरे यांच्या संगोपनाची व्यवस्था देवस्थानाकडून करण्यात आली आहे.

उ. संस्थानच्या वतीने आदिवासी पाड्यांतील महिलांना साड्या, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य यांचे वाटप विनामूल्य केले जाते.

ऊ. संस्थानची स्वत:ची गोशाळा आहे. भविष्यात गोशाळेची व्याप्ती वाढवण्याचा संस्थानचा मनोदय आहे.

ए. शिर्डीपासून २ किलोमीटर अंतरावर श्री साईधाम मंदिर ट्रस्टने धर्मशाळा उभारली आहे. तेथे येणार्‍या पदयात्रींसाठी भोजन अन् निवास यांची विनामूल्य सोय केली जाते. यासाठी श्री जीवदानीदेवी संस्थानकडूनही आर्थिक साहाय्य करून खारीचा वाटा उचलला जातो.

ऐ. देवस्थानची अग्नीशमन यंत्रणा सुसज्ज आहे.

६. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानही महत्त्वाचे !

डायलिसीस सेंटरची इमारत

काही वर्षांपूर्वी श्री जीवदानीदेवी संस्थानच्या वतीने मंदिरापासून काही अंतरावर ‘डायलिसीस’(‘डायलिसीस’ म्हणजे मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया) केंद्र चालवण्यात येते. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देवस्थानाच्या परिसरात स्वतंत्र डायलिसीस सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये अवघ्या ५० रुपयांमध्ये ‘डायलिसीस’ची सुविधा देण्यात येते. पूर्वी विरार पश्चिम येथे संजीवनी रुग्णालयाच्या जवळ आणि नालासोपारा (पूर्व) येथे संस्थानद्वारे ‘डायलिसीस सेंटर’ उभारण्यात आले; परंतु रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्री जीवदानीदेवीच्या गडाच्या पायथ्याशी आणखी एक ‘डायलिसीस सेंटर’ उभारण्यात आले आहे. येथील जागा संस्थानकडून वसई विरार शहर महानगरपालिकेला बाह्य रुग्ण विभाग चालवण्यासाठी देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत येथे वैद्यकीय सुविधा दिली जाते. आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना देवस्थानाच्या या वैद्यकीय सेवेचा मोठा लाभ होतो. श्री साईधाम मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागामध्ये श्री जीवदानीदेवी संस्थानने फिरते दवाखाने चालू केले. यामध्ये डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिका यांद्वारे रुग्णांची तपासणी करून त्यांना विनामूल्य औषधे देण्यात आली. अर्नाळा येथील महालक्ष्मी हॉस्पिटलला संस्थानच्या वतीने रुग्णांच्या सेवेकरता प्रतिवर्षी १० लाख रुपये अर्थसाहाय्य केले जाते.

७. मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय !

फाटलेल्या जीन्स, स्कर्ट, असभ्य, अशोभनीय आणि उत्तेजित करणारे कपडे घालून मंदिरात प्रवेश न करण्याचे आवाहन श्री जीवदानीदेवी संस्थानकडून करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीचे पालन करणारी सात्त्विक वेशभूषा करूनच मंदिरात प्रवेश करण्याचे आवाहन श्री जीवदानीदेवी संस्थानकडून भाविकांना करण्यात आले आहे. याविषयीचा फलक देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी लावण्यात आला आहे. ‘मंदिराचे पावित्र्य टिकून रहावे आणि भाविकांनाही आध्यात्मिक लाभ व्हावा’, या उद्देशाने देवस्थानाने वस्त्रसंहिता लागू केली आहे.

८. वृक्षारोपणाचा उपक्रम

विद्यार्थ्यांच्या साहाय्याने वृक्षारोपण

श्री जीवदानीदेवीच्या डोंगरावर संस्थानकडून आतापर्यंत २ लाख रोपांची लागवड केली आहे. त्याचा परिणाम, म्हणजे हा डोंगर पूर्णपणे हिरवागार आहे. महाविद्यालयीन युवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागाने आजूबाजूच्या परिसरात सहस्रो वृक्षारोपण केले जाते. श्री जीवदानीदेवी संस्थानने कार्यालयाजवळ, तसेच येथील पापडखिंडी धरणाजवळ स्वत:ची रोपवाटिकाही केली आहे. यामध्ये देशी रोपांची निर्मिती केली जाते. इच्छुक व्यक्ती, सामाजिक संस्था, तसेच गृहनिर्माण संस्था यांना लागवडीसाठी रोपे विनामूल्य दिली जातात. कै. भास्कर वामन ठाकूर शिक्षण संकुलातील विद्यार्थी, वसई विरार शहर महानगरपालिका आणि श्री जीवदानीदेवी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी देवीच्या डोंगरावर झाडांची लागवड केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाला सामाजिक वनीकरणासाठी १ कोटी रुपयांहून अधिक निधी संस्थानच्या वतीने देण्यात आला आहे.

भाविकांसाठी देवस्थानने केलेला भारतातील २ रा ‘फ्युनिक्युलर’ प्रकल्प !

‘फ्युनिक्युलर’ प्रकल्प

श्री जीवदानीदेवीच्या दर्शनाला १ सहस्र ४४० पायर्‍या चढाव्या लागतात. देवीचे स्थान उंचावर असल्यामुळे वृद्ध, आजारी, अपंग भाविकांना देवीच्या दर्शनासाठी जाणे  कठीण होते. हे लक्षात घेऊन देवस्थानाने स्वत:ची ‘फ्युनिक्युलर’ यंत्रणा (रेल्वेप्रमाणे ट्रॅक करून त्यावरून छोट्या बोगीने भाविकांना घेऊन जाणे. या बोगी बळकट लोखंडी दोरखंडाद्वारे विद्युत शक्तीने ओढल्या जातात.) देवस्थानाने स्वत: निर्माण केलेला भारतातील दुसरा ‘फ्युनिक्युलर’ प्रकल्प आहे. पहिला प्रकल्प (१८० मीटर) महाराष्ट्रातच श्री सप्तश्रृंगीगडावर आहे, तर श्री जीवदानी गडावरील प्रकल्प ४१५ मीटर लांबीचा आहे. यामुळे अवघ्या ३ ते साडेतीन मिनिटांत गडावर पोचता येते. यामध्ये गडावर जाणारी आणि वरून खाली येणारी अशा २ बोगी आहेत. एकाच वेळी १०५ भाविक बोगीतून गडावर जाऊ शकतात आणि तेवढेच भाविक गडावरून खाली येऊ शकतात. ‘फ्युनिक्युलर’साठी एकच ट्रॅक आहे; मात्र वरून येणार्‍या आणि खालून जाणार्‍या बोगी एकमेकांना पास होण्यासाठी मार्गाच्या मध्यभागी ‘पासिंग’ची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे दुरुस्तीचे काम असल्यास रात्रीच्या वेळेत ती पूर्ण करून ३६५ दिवस ही यंत्रणा चालू ठेवण्यात येते. अपंगांसाठी ‘फ्युनिक्युलर’ची सेवा विनामूल्य दिली जाते.

९. कोरोना महामारीच्या काळातील अमूल्य योगदान !

कोरोना महामारीच्या काळात भोजन वाटपासाठी डबे भरतांना कर्मचारी

कोरोना महामारीच्या काळात श्री जीवदानीदेवी संस्थानद्वारे समाजातील गरीब आणि गरजू नागरिकांना २ वेळेचे भोजन विनामूल्य पुरवण्यात आले. या काळात कोरोना केंद्रातील रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांनाही संस्थानच्या वतीने सकाळची न्याहारी अन् २ वेळचे भोजन विनामूल्य देण्यात आले. या काळात सवा कोटीहून अधिक जणांना विनामूल्य भोजन पुरवण्यात आले. गरीब कुटुबांमध्ये देवस्थानाच्या वतीने धान्याचे वाटपही करण्यात आले. महानगरपालिकेच्या साहाय्याने श्री जीवदानीदेवी संस्थानकडून वसई, विरार, रेल्वेस्थानक आदी भागांमध्ये जाऊन भोजनाची पॅकेट वितरित करण्यात आली. या काळात खेडोपाड्यात जाऊन देवस्थानकडून औषधांचे वाटप विनामूल्य करण्यात आले. आवश्यक ठिकाणी रुग्णवाहिनीची सुविधाही देण्यात आली. कोरोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी श्री जीवदानीदेवी संस्थानच्या वतीने पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात श्री जीवदानीदेवी संस्थानच्या वतीने सलग २ वर्षे अशा प्रकारची सेवा केली.

१०. शैक्षणिक कार्य

श्री जीवदानीदेवी संस्थानने कै. भास्कर वामन ठाकूर शिक्षण संकुल उभारले आहे. या ६ मजली संकुलात ३ सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेचे शुल्क अल्प ठेवण्यात आले आहे. शाळेच्या विस्तारित इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. भविष्यात पालघर येथे आवश्यक ठिकाणी शाळा चालू करण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे.

११. शून्य कचरा व्यवस्थापन

देवस्थानाकडून निर्माल्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती केली जाते. २० रुपये किलो दराने या खताची विक्री केली जाते. यामुळे देवस्थानाच्या उत्पन्नात भर पडते. स्वयंपाकघरातील शिल्लक भाजीपाल्याचे अवशेष, खरकटे आदींवर प्रक्रिया करून खताची निर्मिती केली जाते. संस्थानमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र आहे. यामध्ये नियमित ६-७ टँकर, म्हणजे ८० ते ९० सहस्र लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. हे पाणी प्रसाधनगृहात आणि झाडांना घालण्यासाठी वापरले जाते.

जलशुद्धी प्रकल्पामुळे नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टळते. प्लास्टिकच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी संस्थानने मंदिराच्या परिसरात ‘क्रशर’ यंत्रे ठेवली आहेत. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे प्रदूषण देवस्थानामुळे होऊ नये, याची संस्थान काळजी घेते.

संस्थानमध्ये सेवारत असतांना देवीचे स्मरण रहावे, यासाठी सर्वजण एकमेकांशी संवाद साधण्यापूर्वी ‘जय जीवदानी’ असा जयघोष करतात. भविष्यात गुरुकुल शिक्षणपद्धत चालू करण्यासाठीही संस्थान प्रयत्नरत आहे. श्री जीवदानीदेवी संस्थान हे आध्यात्मिक, राष्ट्रविषयक, सामाजिक सर्वच स्तरावर आपल्या परीने कार्यरत आहे.