पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman

पाक सैन्यावर ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल’ पक्षाचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांची कठोर टीका

मौलाना फजलुर रहमान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तुमच्या दृष्टीने हुतात्म्यांची काय किंमत आहे, ते सांगू शकता का ? कारगिलमध्ये किती सैनिक हुतात्मा झाले आणि तुम्ही तिथून किती सैनिकांचे मृतदेह परत आणले, हे तुम्ही जनतेला सांगू शकता का ? तुम्ही तुमच्या हुतात्मा सैनिकांचे मृतदेह हिंदूंकडे सोपवले आणि भारतातून एक विधान आले की, ‘आम्ही त्यांच्यावर इस्लामी पद्धतीने अंत्यसंस्कार केले.’ त्यांची संख्या वेगवेगळी सांगितली जात आहे; पण ती शेकडोंमध्ये आहे. तुम्ही तुमच्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले. कर्नल शेर खान आपल्याला मिळाले, तर ते भारताने जोर दिल्यानंतर मिळाले. भारताने सांगितल्यानंतर तुम्ही त्यांच्या मृतदेहाचा स्वीकार केला. तुमच्या हुतात्मा सैनिकांचा अपमान तुम्ही केला आणि स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी तुम्ही त्यांचा आडोसा घेण्याचा प्रयत्न करता, अशी कठोर आणि परखड टीका पाकमधील जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल पक्षाचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पाक सैन्यावर केली.

ते पुढे म्हणाले की, सर्व शक्ती केवळ राजकीय पकड भक्कम करण्यासाठी लावली जात आहे. पाकिस्तान हा एक संस्थात्मक देश असून तिथे प्रत्येक संस्थेचे अधिकार क्षेत्र स्पष्टपणे ठरलेले आहे.

संपादकीय भूमिका

मौलाना रहमान यांनी सत्य तेच सांगितले आहे. आतंकवाद्यांच्या रूपात पाकच्या सैनिकांनी कारगिलमध्ये घुसखोरी केली होती आणि त्यांना भारतीय सैन्याने ठार मारले होते; पण ‘ते आमचे सैनिक नाहीत’, असे सांगून पाकने त्यांचे मृतदेह स्वीकारले नव्हते आणि मग भारतीय सैन्याने ते मृतदेह पुरले होते !