अतृप्त पितरांचा त्रास दूर करण्यासाठी करायचे आध्यात्मिक स्तरावरील विविध उपाय !

१. कलियुगातील बहुतांश मनुष्यांना अतृप्त पितरांचा त्रास होण्यामागील कारण काय आहे ?

उत्तर : ‘पूर्वीच्या काळी ‘ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास’, असे चार आश्रम होते. त्यामुळे जेव्हा व्यक्ती गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमात आणि संन्यासाश्रमात जात असे, तेव्हा ती कुटुंबाला सोडून वनामध्ये एकांतात निवास करत असे. त्यामुळे तिची कुटुंबीय, नातेवाईक, भूमी, तसेच घर यांच्याविषयीची आसक्ती हळूहळू न्यून होऊन तिला वैराग्य प्राप्त होत असे. त्यामुळे ती निर्माेही बनून निरिच्छ होत असे. जेव्हा तिचा मृत्यू होत असे, तेव्हा तिच्या काहीही इच्छा-आकांक्षा उरलेल्या नसल्यामुळे तिला मरणोपरांत सद्गती, म्हणजे चांगली गती मिळून ती सर्व बंधनांतून मुक्त होत असे.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

 कलियुगातील वैज्ञानिक जीवनात मनुष्याकडून आश्रमव्यवस्थेचे पालन करण्याचे धर्माचरण लोप पावल्यामुळे मनुष्य मरेपर्यंत घरात किंवा कुटुंबातच असतो. त्यामुळे तो मोहमायेतून मुक्त न होता त्याच्या अनेक इच्छा आणि आकांक्षा मरणाच्या वेळीही प्रबळ असतात. त्यामुळे जेव्हा त्याचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या अतृप्त राहिलेल्या इच्छांमुळे त्याला सद्गती न मिळता तो अतृप्त लिंगदेहाच्या स्वरूपात राहू लागतो. हेच अतृप्त राहिलेले पितर त्यांच्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी त्यांच्या वंशजांना त्रास देत असतात. त्यामुळे कलियुगातील ९० टक्के मनुष्यांना त्यांच्या अतृप्त पितरांचा पुष्कळ त्रास होतो.

२. पितरांचे त्रिगुणांनुसार असणारे प्रकार

ज्या पितरांमध्ये तमोगुण प्रबळ होता, त्यांची गणना ‘तामसिक पितरांमध्ये’ होते. तसेच ज्या पितरांमध्ये रजोगुण प्रबळ असतो, त्यांची गणना ‘राजसिक पितर’ आणि ज्यांच्यामध्ये सत्त्वगुण प्रबळ असतो त्यांची गणना ‘सात्त्विक पितर’ यांच्यामध्ये होते. अशा प्रकारे ‘तामसिक, राजसिक आणि सात्त्विक’ या त्रिगुणांनुसार पितरांच्या तीन प्रकारच्या श्रेणी आहेत. या तिन्ही श्रेणीतील पितरांची तुलना केल्यावर त्यांची लक्षात आलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

टीप १ – व्यक्तीच्या मनातील वासना तीव्र असल्या, तर तिला सतत अतृप्त असल्याची जाणीव असते. मृत्यूच्या वेळी जर व्यक्तीची खाणे, पिणे, कपडे, दागिने, पैसे, वास्तू, व्यक्ती इत्यादींविषयी तीव्र आसक्ती असेल, तर मृत्यूनंतर ती व्यक्ती अतृप्त रहाते आणि तिच्या लिंगदेहाचे रूपांतर अतृप्त पितरांमध्ये होते.

टीप २ – जेव्हा सात्त्विक पितरांची आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अधिक होते, म्हणजे त्यांना संतत्व प्राप्त होते, तेव्हा त्यांची गणना देवतागणांमध्ये झाल्याने त्यांना ‘पितरदेवता’, असे संबोधले जाते. त्याचप्रमाणे काही पितरांची गणना ऋषींमध्ये झाल्यामुळे त्यांना ‘ऋषिपितर’ असेही संबोधले जाते. अशा प्रकारचे मनुष्याचे ‘देवपितर आणि ऋषिपितर’, म्हणजे सात्त्विक श्रेणीतील पितर  हे आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत पितर आहेत.

३. कलियुगातील व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीनुसार तिचा पितरांशी असणारा संबंध आणि विविध श्रेणींतील पितरांशी असणार्‍या तिच्या देवाण-घेवाण हिशोबाचे प्रमाण

टीप – कलियुगातील बहुतांश व्यक्तींची आध्यात्मिक पातळी २० ते ५९ टक्के, इतकी असल्यामुळे त्यांचा देवाण-घेवाण हिशोब तामसिक पितरांशी अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे कलियुगातील ९० टक्के व्यक्तींना अतृप्त पितरांचा त्रास होतो. साधनेला नव्याने प्रारंभ करणार्‍या व्यक्तींनी ऐहिक आणि पारमार्थिक उन्नतीसाठी कुलदेव किंवा कुलदेवी यांचा नामजप अधिकाधिक करण्यासह त्यांना होणारा अतृप्त पितरांचा त्रास न्यून करण्यासाठी ‘ ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’, हा नामजप प्रतिदिन न्यूनतम १ घंटा करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमितपणे साधना करणार्‍यांनीही ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’, हा नामजप प्रतिदिन न्यूनतम १ घंटा करणे आवश्यक आहे.

सनातन-निर्मित दत्ताचे चित्र

४. दत्तगुरु पितरांना सद्गती देण्याचे कार्य करतात

अतृप्त पितर पृथ्वी, म्हणजे भूलोक आणि स्वर्गलोक यांच्या मध्ये असणार्‍या भुवर्लाेकात वास करतात. या लोकाचे अधिपत्य ‘अर्यमा’ या सूर्यदेवाच्या एका मुख्य रूपाकडे असले, तरी पितरांचा त्रास न्यून करून त्यांना सद्गती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी प्रचंड तपोशक्ती आणि संकल्पशक्ती यांची आवश्यकता असते. ही शक्ती त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप असलेल्या दत्तगुरूंकडे असल्यामुळे ते पितरांना सद्गती देण्याचे कार्य करतात.

५. ‘पितरांसाठी श्राद्ध करणे, दत्ताचा नामजप करणे’, यांसारखे प्रयत्न केल्यावरच वंशजांचे पितृऋण फिटणे

प्रत्येक मनुष्याला ऋषिऋण, देवऋण, पितरऋण आणि समाजऋण, ही चार ऋणे फेडावी लागतात. अतृप्त पितरांना गती देण्याचे कार्य त्यांच्या वंशजांनी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे अतृप्त पितर वंशजांना त्रास देऊन त्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून स्वतःला गती मिळण्यासाठी ‘श्राद्धादी धार्मिक विधी करणे, नामजप करणे’ इत्यादी प्रयत्न करण्यास वंशजांना उद्युक्त करतात. अशा प्रकारे ‘पितरांसाठी श्राद्ध करणे, काळानुसार लागू होणारा ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप करणे’, यांसारखे प्रयत्न केल्यावरच वंशजांचे पितृऋण फिटते.’

(क्रमशः उद्याच्या अंकात)

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)(सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०२५)

या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/958578.html

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.