काही संतांना ‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि काही संतांना ‘पुन्हा जन्म घ्यावा’, असे वाटणे यांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि ‘तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।’ असे वाटणे, या संतांच्या विचारांच्या संदर्भात माहिती हवी. संतांच्या मनात किती टक्के आध्यात्मिक पातळीला कोणता विचार येतो ?

१. ‘काही संतांना ‘देहत्याग करावा’, असे वाटणे’, यामागील कारणे

श्री. राम होनप

१ अ. त्रास सहन न होणे : ‘संत सतत आनंदावस्थेत असले, तरी त्यांना कधीकधी तीव्र शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रास होत असतो. हे शारीरिक त्रास असह्य असतात. तेव्हा संतांच्या मनात देहत्याग करण्याची इच्छा निर्माण होते.

१ आ. कार्यात यश न मिळणे : संतांनी विशिष्ट कार्य हाती घेतलेले असते. ते पूर्ण होण्याची शक्यता काही कारणास्तव अल्प असते किंवा त्याला पूर्ण होण्यास दीर्घकाळ लागणार असेल, तेव्हा काही संत त्या कार्यापासून अलिप्त होऊन देहत्याग करतात.

१ इ. कार्यपूर्ती झालेली असणे : काही संतांना ‘स्वतःचा जन्म विशिष्ट कार्यासाठीच झालेला आहे’, याचे ज्ञान असते. ते कार्य पूर्ण झाले की, संत आणखी जीवन न जगता देहत्याग करतात.

१ ई. मायेचा प्रभाव टाळणे : काही संतांना ‘ईश्वराचे कार्य आणि मायेचा प्रभाव’, यांचे ज्ञान असते. संतांनी पुष्कळ साधना करून अध्यात्मातील उच्च स्थिती साध्य केलेली असते. त्यांना ‘मायेच्या प्रभावामुळे आपली आध्यात्मिक स्थिती ढळू नये’, असे वाटत असते; म्हणून ते देहत्याग करतात.

१ उ. प्रतिकूल काळाचा प्रभाव असणे : संतांना कधीकधी कार्य करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल काळ असतो. अशा परिस्थितीत संतांना कार्य करणे अवघड असते. तेव्हा ते संत देहत्याग करण्याचा विचार करतात.

१ ऊ. ईश्वरी संकेत असणे : काही संतांना कार्यपूर्ती झाल्याचा ईश्वरी संकेत सूक्ष्मातून प्राप्त होतो. तेव्हा त्या संतांच्या मनात विचार येतो, ‘ज्या उद्देशासाठी मी जन्माला आलो, ते पूर्ण झाले आहे. आता जीवन जगण्यात अर्थ नाही.’ त्यानंतर ते संत लगेच देहत्याग करतात.

१ ए. पूर्णत्वाची ओढ लागलेली असणे : काही संतांना पूर्णत्वाची, म्हणजे ईश्वरप्राप्तीची ओढ लागलेली असते. तेव्हा त्यांना देहत्याग करण्याची इच्छा होते.

२. संतांना ‘कार्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा’ असे वाटण्याची कारणे

२ अ. संत तुकाराम महाराज यांच्या ‘तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी’ ।।  या ओवीचा अर्थ : ‘तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।’ (तुकाराम गाथा, अभंग २२९६, ओवी ३) म्हणजे ‘(तुझा विसर पडणार नसेल, तर) आम्हाला खुशाल पुन्हा गर्भवास (जन्म) दे’ असे वाटणे. ‘गर्भवासी’ याचा अर्थ भगवंताचा वास असलेली पृथ्वी. संत तुकाराम महाराज यांनी पृथ्वीला माता आणि भगवंताला पिता मानले आहे. तुकाराम महाराज भगवंताला विनवतात, ‘तू मला पृथ्वीवर तुझी भक्ती आणि सेवा यांसाठी पुन्हा जन्म दिलास, तरी मला काहीच अडचण नाही.’

२ आ. संतांचा अहंलय झालेला असणे : काही संतांचा अहंलय झालेला असतो. त्यांनी ईश्वराची सर्वश्रेष्ठता अनुभवलेली असते. त्यामुळे त्यांना ‘सर्वकाही ईश्वरी नियोजनाने आणि ईश्वरेच्छेने घडत असते’, याचे ज्ञान झालेले असते. अशा संतांनी सर्वकाही ईश्वरावर सोपवलेले असते. त्यांच्या मनात  ‘पुन्हा जन्म घेणे, अथवा न घेणे’, याविषयी कुठलीच अपेक्षा नसते. तेव्हा त्या संतांना ‘जर ईश्वराची इच्छा असेल, तर मी भक्ती आणि सेवा करण्यासाठी पुन्हा जन्म घेईन’, असे वाटत असते.

२ इ. संतांमधील विनम्रता आणि उच्च कोटीची कृतज्ञता : उच्च आध्यात्मिक पातळीला संतांमधील अहंचा लय झाला असल्याने ते ईश्वरापुढे विनम्र झालेले असतात, तसेच त्यांच्या मनात ईश्वराविषयी उच्च कोटीचा कृतज्ञताभाव असतो. अशा संतांची ईश्वरसेवेसाठी पुन्हा जन्म घेण्याची सिद्धता असते.

२ ई. संतांना स्वतःतील अवतारत्वाची जाणीव होणे : काही संतांना पुष्कळ साधनेमुळे स्वतःतील अवतारत्वाची जाणीव होते. अवतार केवळ साधकांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी पुनःपुन्हा जन्म घेतो. हे अवतारांचे कर्तव्यकर्म असते. उच्च कोटीच्या संतांतील अवतारत्व जागृत झाल्याने त्यांना ‘केवळ ईश्वराची भक्ती आणि सेवा करणे’ यांसाठी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेण्याची प्रेरणा होते.

२ उ. संतांना पुढील जन्मातील विशिष्ट कार्याविषयी अंतर्ज्ञान होणे : काही संतांनी उच्च आध्यात्मिक पातळी गाठल्यावर ‘त्यांचा पुढील जन्म विशिष्ट ईश्वरी कार्य करण्यासाठी होणार आहे’, हे त्यांना अंतर्ज्ञानाने समजते. तेव्हा असे संत या ईश्वरी नियोजनाचा स्वीकार करतात, तसेच त्यात कुठलाही हस्तक्षेप करत नाहीत.

३. संतांच्या मनात येत असलेले विचार आणि त्यांची आध्यात्मिक पातळी

८० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे संतांमधील कर्तेपणा न्यून झालेला असला, तरी त्यांच्यात ‘देहाची जाणीव आणि त्याविषयीचा सूक्ष्म अहं’ हा शेष असतो. त्यामुळे त्यांच्या मनात देहत्यागाविषयी विचार येतो.

९० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे संतांतील ‘कर्तेपणा आणि देहाविषयीचा सूक्ष्म अहं’ हे संपुष्टात येण्याची प्रक्रिया चालू झालेली असते. अशा संतांची स्थिती अत्यंत आनंदमय असते. त्यामुळे त्यांच्या मनात देहत्यागाविषयी विचार येत नाही. याउलट त्यांना ‘ईश्वराची इच्छा असल्यास, मला पुनर्जन्म घेण्यात काहीच अडचण नाही’, असे वाटत असते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(ज्ञान मिळण्याचा दिनांक : १३.२.२०२६, वेळ : सकाळी १०.३० आणि कालावधी : २० सेकंद)