पितरांच्या शांतीसाठी विविध देशांमध्ये करण्यात येणार्‍या पारंपरिक कृती !

श्राद्धपक्षाच्या निमित्ताने महत्त्वाची माहिती !

‘पितृपक्षात ‘श्राद्ध-पिंडदान’ हे पितृऋण फेडण्याचे एक माध्यम आहे. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. असे असले, तरी हिंदुविरोधक त्यावर ‘श्राद्ध म्हणजे ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठीची सोय, तसेच मृत्यूनंतर पितरांसाठी दान-विधी करण्यापेक्षा गरिबांची सेवा करा, त्यांना अन्नदान करा’, असे म्हणून टीका करतात. पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संकल्पना केवळ भारतातच नाही, तर विदेशांतही पितरांच्या शांतीसाठी विविध पारंपरिक कृती करण्यात येतात. त्यांत पूर्वजांच्या मुक्तीसाठीची शास्त्रोक्त संकल्पना नसली, तरी किमान ‘पूर्वजांविषयी कृतज्ञ रहायला हवे’, एवढी भावना तर निश्चितच असते.

तसेच विदेशात अन्य पंथांत जन्मलेले अनेक पाश्चिमात्य त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी, या हेतूने भारतात येऊन पिंडदान आणि तर्पण विधी करतात. त्यामुळे श्राद्धविधींवर टीका करणार्‍यांना उत्तर देता यावे, यासाठी माहिती देणारा लेख येथे देत आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झोल्या लेखात आपण ‘अन्य पंथांमध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी केल्या जाणार्‍या पारंपरिक कृती आणि आशिया खंडातील देशांमध्येही पितृपूजेची प्रथा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.     

(भाग ३)

संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/956753.html

५. रशियाचे दिवंगत नेते बोरिस येल्तसिन यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी रशियन साम्यवादी नेत्या साझी उमालातोवा यांनी भारतात येऊन तर्पण आणि पिंडदान करणे

रशियाचे दिवंगत नेते बोरिस येल्तसिन आणि रशियन साम्यवादी नेत्या साझी उमालातोवा

५ अ. कट्टर विरोधक असणारे येल्तसिन हे उमालातोवा यांच्या स्वप्नात येणे आणि ते असंतुष्ट असल्याची त्यांना जाणीव होणे : मार्च २०१० मध्ये रशियन साम्यवादी नेत्या साझी उमालातोवा यांनी रशियाचे माजी राष्ट्रपती बोरिस येल्तसिन यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी भारतात तर्पण आणि पिंडदान केले होते. उमालातोवा रशियाच्या माजी संसद सदस्य असून त्या ‘पार्टी ऑफ पीस ॲण्ड युनिटी’च्या संस्थापक अध्यक्षा राहिल्या आहेत. त्या साम्यवादी (कम्युनिस्ट) विचारसरणीशी संबंधित नेत्या होत्या. उमालातोवा या गोर्बाचेव्ह आणि येल्तसिन यांच्या कट्टर विरोधक होत्या. त्यांचा सोव्हिएत संघाच्या विघटनाला तीव्र विरोध होता. सोव्हिएत संघाच्या विघटनावरून त्यांच्यात तीव्र मतभेदही झाले होते. उमालातोवा यांचे म्हणणे होते की, येल्तसिन पुनःपुन्हा त्यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि त्यांच्याशी राजकीय सूत्रांवर वाद करतात. कधी ते अपराधी भावनेमुळे दु:खी वाटतात. असे वाटते की, येल्तसिन यांचा आत्मा असंतुष्ट आणि अशांत आहे.

५ आ. उमालातोवा यांच्याकडून येल्तसिन यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी यज्ञ आणि तर्पण करण्याची इच्छा प्रदर्शित : उमालातोवा यांनी त्यांच्या या स्वप्नाविषयी हरिद्वार येथील ‘देव संस्कृति विश्वविद्यालया’च्या विदेश विभागाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मिश्र यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याकडे येल्तसिन यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी यज्ञ अन् तर्पण करण्याची इच्छा प्रदर्शित केली.

५ इ. उमालातोवा यांना श्राद्ध-तर्पण केल्यापासून पुष्कळ सहजता जाणवणे आणि त्यांनी वैदिक धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेणे : उमालातोवा यांच्या इच्छेनुरूप हरिद्वारमध्ये पंडित उदय मिश्र आणि पंडित शिवप्रसाद मिश्र यांच्या मार्गदर्शनानुसार हे विधी पूर्ण करण्यात आले. तेथे त्यांनी येल्तसिन यांच्यासाठी तर्पण केले. तसेच त्यांनी त्यांचे आई-वडील आणि अफगाणिस्तानमध्ये मारले गेलेले त्यांचे दोन भाऊ यांच्यासाठीही यज्ञ अन् पिंडदान केले, तसेच शांतीसाठी प्रार्थना केली. यानंतर उमालातोवा म्हणाल्या, ‘‘श्राद्ध-तर्पण केल्यापासून मला पुष्कळ सहजता जाणवत आहे. मला वाटते की, माझ्यावर काही ऋण होते, जे उतरले आहे.’’ त्यानंतर उमालातोवा भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांमुळे इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी वैदिक धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

– श्री. रमेश शिंदे

६. भारतामध्ये शास्त्रांनुसार अमावास्या पितरांसाठी ‘सर्वाधिक प्रिय तिथी’ असण्यामागील कारण आणि त्या तिथीचे महत्त्व

या संदर्भात मस्त्यपुराणात एक कथा आहे. मस्त्यपुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोद नदीचा उल्लेख आहे. सरोवर आणि नदी काश्मीरमध्ये आहेत.

श्री. रमेश शिंदे

अच्छोदा नाम तेषां तु मानसी कन्यका नदी ॥
अच्छोदं नाम च सरः पितृभिर्निर्मितं पुरा ।
अच्छोदा तु तपश्चक्रे दिव्यं वर्षसहस्रकम् ॥ – मत्स्यपुराण, अध्याय १४, श्लोक २ आणि ३

अर्थ : भगवान मरिचीचे वंशज जेथे रहात असत, तेथेच अच्छोदा नामक नदी वहाते, जी पितृगणांची मानसकन्या आहे. प्राचीन काळी पितरांनी तेथे अच्छोद नावाचे एक सरोवर निर्माण केले होते. पूर्वी अच्छोदाने (अग्निष्वात्तची मानसपुत्री) १ सहस्र वर्षे घोर तपश्चर्या केली होती.

काश्मीर भारतातील प्राचीन राज्य आहे. मरिचीचा पुत्र कश्यप यांच्या नावाने पूर्वी काश्मीरचे नाव ‘कश्यपमर’ किंवा ‘कशेमर्र’ होते. मत्स्यपुराणामध्ये म्हटले आहे की, सोमपथ नावाच्या ठिकाणी मरिचीचा पुत्र अग्निष्वात्त नावाच्या देवतेचे पितृगण निवास करत होते. कालांतराने तेथेच अग्निष्वात्तची मानसपुत्री अच्छोदा हिने १ सहस्र वर्षे घोर तपस्या केली. तिच्या तपस्येने प्रसन्न होऊन देवतासम सुंदर आणि कांतीवान पितृगण वरदान देण्यासाठी अच्छोदाजवळ आले. सर्व पितर मनाला मोहून टाकणारे होते. त्यांचे सौंदर्य आणि रूपबळ यांनी प्रभावित होऊन अच्छोदा ‘अमावसु’ नावाच्या एका पितरावर आसक्त झाली. पितृगणाविषयी अशा प्रकारची इच्छा मनात बाळगणे, हा मोठा अपराध होता. तेव्हा अमावसु याने तात्काळ अच्छोदाच्या याचनेचा अस्वीकार करत तिला शाप दिला. ज्या पुण्यतिथीला अमावसु याने अच्छोदाच्या वासनेचा अस्वीकार केला होता, त्याच्या मर्यादाप्रियतेमुळे ती तिथी त्याच्या नावानेच ‘अमावास्या’ या नावाने प्रसिद्ध झाली आणि तेव्हापासून आमच्या पितरांची ती सर्वाधिक आवडती तिथी आहे.

७. विदेशात रहाणार्‍या भारतियांनी दूरभाषद्वारे पुरोहितांकडून श्राद्ध आणि तर्पण विधी करणे अयोग्य !

गेल्या काही वर्षांपासून विदेशात रहाणारे भारतीय त्यांच्या पितरांचे तर्पण आणि पिंडदान हे विधी करण्यासाठी उज्जैन अन् गया येथील पुरोहितांच्या साहाय्याने दूरभाषद्वारे आगाऊ नोंद करून घेत आहेत. काही आचार्यांनी याला मान्यताही दिली आहे. ते दूरभाषवरून आगाऊ नोंद करतांनाच यजमानाकडून संकल्प करून घेतात. त्यानंतर यजमानांनी सांगितलेल्या नावाने पुरोहित तर्पण आणि पिंडदान करतात. आपद्धर्माच्या काही परिस्थितीमध्ये ब्राह्मणाकडून तर्पण करवून घेता येते; परंतु केवळ धनाच्या लोभापायी विदेशात राहून अशा प्रकारे दूरभाषद्वारे संकल्प करून श्राद्धाचा विधी करणे अयोग्य आहे. पितरांच्या मुक्तीसाठी व्यक्तीने स्वत: तीर्थस्थानी देवतांच्या साक्षीने आपल्या पितरांचे तर्पण आणि पिंडदान केले पाहिजे. यामुळे पितरांची तृप्ती होऊन त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होतो.

हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलॉन त्यांच्या मृत मुलाच्या शांतीसाठी संपूर्ण कुटुंबाला भारतात पाठवून हरिद्वारमध्ये त्याचे पिंडदान आणि श्राद्ध करवून घेतात अन् विदेशस्थित हिंदू आम्हाला यासाठी वेळ नसल्याचे सांगतात, हे अयोग्यच !

महालयश्राद्ध

८. हिंदु धर्मामध्ये श्राद्धातील महत्त्वाचा घटक असलेल्या पवित्र दर्भाचे महत्त्व

महाभारतातील कथेनुसार गरुडदेव स्वर्गातून अमृत कलश घेऊन आले असता त्यांनी काही वेळासाठी तो कलश दर्भावर ठेवला होता. दर्भावर अमृत कलश ठेवल्याने दर्भाला पवित्र समजले जाते.

श्राद्धाच्या वेळी दर्भापासून बनवलेली अंगठी अनामिकेत धारण करण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की, दर्भाच्या अग्रभागी ब्रह्मा, मध्यभागी विष्णु आणि मूळभागी भगवान शिव निवास करतात. श्राद्धकर्मात दर्भाची अंगठी धारण केल्याने ‘आम्ही पवित्र होऊन आमच्या पितरांच्या शांतीसाठी श्राद्धकर्म आणि पिंडदान केले’, असा त्याचा अर्थ आहे.

९. सुवर्णदानापेक्षा आपल्या पितरांसाठी पिंडदान आणि अन्नदान करणे श्रेष्ठ असल्याचे कर्णाच्या उदाहणावरून लक्षात येणे

एका प्रचलित कथेनुसार कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा स्वर्गामध्ये पोचला, तेव्हा त्याला भोजन करण्यासाठी पुष्कळ प्रमाणात सोने आणि आभूषणे देण्यात आली. हे पाहून कर्णाच्या आत्म्याला प्रश्न पडला. तेव्हा त्याने इंद्रदेवाला विचारले की, त्याला भोजनाच्या ऐवजी सोने का देण्यात आले ? तेव्हा इंद्राने कर्णाला सांगितले, ‘तुम्ही जिवंत असतांना संपूर्ण जीवन सुवर्णदानच केले; परंतु कधीच तुमच्या पितरांना अन्नदान केले नाही.’ तेव्हा कर्णाने सांगितले, ‘मला माझ्या पूर्वजांविषयी माहिती नव्हती. त्यामुळे मी त्यांना काही दान करू शकलो नाही.’ कर्णाला त्याची चूक सुधारण्याची संधी देण्यात आली आणि त्याला पितृपक्षाचे १५ दिवस पृथ्वीवर परत पाठवण्यात आले. तेथे त्याने त्याच्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध केले आणि अन्नदान केले, तसेच त्यांच्यासाठी तर्पण केले.

या प्रचलित कथेतून आपण समजू शकतो की, सुवर्णदानापेक्षा आपल्या पितरांसाठी पिंडदान, अन्नदान आणि तर्पण करण्याचे महत्त्व अधिक आहे !

१०. धर्मशास्त्राचा अभ्यास न करता हिंदुविरोधकांनी श्राद्धासारख्या महत्त्वाच्या विधींवर आरोप करणे अज्ञानमूलक !

हिंदुविरोधक श्राद्धाच्या संदर्भात ब्राह्मणांना लक्ष्य करून विविध आरोप करतात. श्राद्धादी विधी करवून घेण्याच्या संदर्भात ब्राह्मणांविषयी जो उल्लेख येतो, त्यासंबंधी जाणून घेतल्यास या आरोपांतील खोटेपणा उघड होतो .

उदाहरणार्थ श्राद्धकर्म करणार्‍या ब्राह्मणांच्या संदर्भात शास्त्रग्रंथात काही नियम सांगितले आहेत, उदा. ब्राह्मण वेदज्ञानी असायला हवेत. ते पतितपावन असावेत. ते शांतचित्त, नियम-धर्माने वागणारे, तप करणारे, धर्मशास्त्रावर श्रद्धा असणारे, पित्याचा आदर करणारे, आचारवान आणि अग्निहोत्री असावेत. जर अशा योग्यतेचे ब्राह्मण मिळाले नाहीत, तर तत्त्वज्ञानी योग्याला बोलावून श्राद्धकर्म करावे. असे योगीही मिळाले नाहीत, तर एखाद्या वानप्रस्थीला अन्नदान करून श्राद्धकर्म करावे. वानप्रस्थीही मिळाले नाहीत, तर मोक्षाची इच्छा ठेवणार्‍या, अर्थात् साधकवृत्ती असणार्‍या गृहस्थाला अन्नदान करावे.

जो ब्राह्मण ध्यान-पूजा, यज्ञ आदी नियमित कर्म करत नाही, त्याला बोलावून श्राद्धकर्म केल्याने पितरांना आसुरी योनी प्राप्त होते. एवढेच नाही, तर मद्यपी, वेश्यागमन करणारा, असत्य बोलणारा, माता-पिता, गुरु यांचा आदर न करणारा, चरित्रहीन, वेदांची निंदा करणारा, ईश्वरावर विश्वास न ठेवणारा, तसेच उपकार न मानणारा अशा ब्राह्मणांना श्राद्धकर्म करण्यास बोलावू नये, तसेच त्यांना दक्षिणाही देऊ नये. जे दान सदाचारी व्यक्तीला दिले जाते, त्यालाच ‘दान’ म्हटले जाते. दान देतांना कुटुंबाची उपेक्षा करून दान देऊ नये.

शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या या नियमांमुळे विरोधकांच्या आरोपांमधील खोटेपणा स्पष्ट होतो.

(समाप्त)

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.