‘पितृपक्षात ‘श्राद्ध-पिंडदान’ हे पितृऋण फेडण्याचे एक माध्यम आहे. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. असे असले, तरी हिंदुविरोधक त्यावर ‘श्राद्ध म्हणजे ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठीची सोय, तसेच मृत्यूनंतर पितरांसाठी दान-विधी करण्यापेक्षा गरिबांची सेवा करा, त्यांना अन्नदान करा’, असे म्हणून टीका करतात. पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संकल्पना केवळ भारतातच नाही, तर विदेशांतही पितरांच्या शांतीसाठी विविध पारंपरिक कृती करण्यात येतात. त्यांत पूर्वजांच्या मुक्तीसाठीची शास्त्रोक्त संकल्पना नसली, तरी किमान ‘पूर्वजांविषयी कृतज्ञ रहायला हवे’, एवढी भावना तर निश्चितच असते. तसेच विदेशात अन्य पंथांत जन्मलेले अनेक पाश्चिमात्य त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी, या हेतूने भारतात येऊन पिंडदान आणि तर्पण विधी करतात. त्यामुळे श्राद्धविधींवर टीका करणार्यांना उत्तर देता यावे, यासाठी माहिती देणारा लेख येथे देत आहोत. १४ सप्टेंबर या दिवशीच्या लेखात आपण ‘अन्य पंथांमध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी केल्या जाणार्या पारंपरिक कृती’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/956432.html
संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

४. आशिया खंडातील देशांमध्येही पितृपूजेची प्रथा !

आशिया खंडातील भारत वगळता अन्य देशांमध्येही पितृपूजेची ही प्रथा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रचलित आहे. तसेच बहुतांश सर्व ठिकाणी पितरांसाठी आवाहन करतांना विशेष कृती केल्या जातात.
४ अ. चीन : चीनच्या ‘हान’ परंपरेनुसार गेल्या २ सहस्र ५०० वर्षांपासून ‘क्विंगमिंग’ किंवा ‘चिंग मिंग’ उत्सव पूर्वजांच्या स्मरणार्थ केला जातो. चीनच्या सूर्यपंचांगानुसार हा काळ ठरवला जातो. साधारणपणे ४ ते ६ एप्रिल या कालावधीत हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने पूर्वजांच्या थडग्याची स्वच्छता केली जाते. तेथे पूर्वजांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ ठेवणे, सुगंधी अगरबत्ती लावणे, तसेच ‘जॉस पेपर’ जाळणे, अशा कृती केल्या जातात. हा उत्सव चीन, तैवान, मलेशिया, हाँगकाँग, सिंगापूर, इंडोनेशिया या देशांतही साजरा केला जातो.
४ आ. जपान : जपानमध्ये याला ‘बॉन फेस्टिव्हल’ म्हणून ओळखले जाते. ‘बुद्धीस्ट-कन्फ्युशियस’ परंपरेत हा पूर्वजांच्या सन्मानाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. याविषयी मान्यता आहे की, या काळात पूर्वजांचे आत्मे मूळ घरातील पूजास्थानी येतात. त्यामुळे संपूर्ण परिवार मूळ घरी जमतो आणि पूर्वजांची थडगी स्वच्छ करून तेथे धूपबत्ती लावतात. प्रतिवर्षी ८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात हा उत्सव ३ दिवस साजरा केला जातो. हा महोत्सव जपानमध्ये ‘दीपोत्सवा’सारखा साजरा केला जातो. जपानी लोकांची मान्यता आहे की, जोपर्यंत ते पूर्वजांना हा प्रकाश दाखवणार नाहीत, तोपर्यंत पूर्वजांना त्यांच्या वंशजांच्या घरांचा मार्ग शोधण्यास अडचण येईल. त्यामुळे या काळात थडग्यांच्या चारही बाजूंनी उंच बांबू भूमीत रोवून त्यावर रंगबेरंगी कंदील लटकवतात आणि त्याखाली मेणबत्तींच्या प्रकाशात बसून लोक त्यांच्या पूर्वजांना आवाहन करतात.
हा उत्सव मूळ संस्कृत भाषेतील ‘उल्लंबन’ (उलटे टांगणे) या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘ओबॉन’ किंवा ‘बॉन’ या नावाने आता ओळखला जातो. या काळात ‘बॉन ओदोरी’ हे नृत्य केले जाते. या नृत्यपरंपरेच्या संदर्भात कथा आहे की, गौतम बुद्धाचे एक शिष्य महामुद्गलायन (मोकुरेन) याने त्याच्या दिव्य दृष्टीने पाहिले की, त्याची मृत आई मुक्त न होता भुतांच्या तावडीत सापडली असून दुःखी आहे. तो अत्यंत चिंतित होऊन बुद्धाकडे जातो आणि ‘आईला यातून कसे मुक्त करू’, असा प्रश्न विचारतो. तेव्हा बुद्ध त्याला अनेक बौद्ध भिक्खूंना दान करण्यास सांगतो. मोकुरेन त्याप्रमाणे कृती करतो आणि त्याला त्याची आई त्या भुतांच्या तावडीतून मुक्त होतांना दिसते. त्यामुळे अतिशय आनंदित होऊन तो नृत्य करतो. तेव्हापासून या काळात ‘बॉन ओदोरी’ किंवा ‘बॉन डान्स’ करण्याची प्रथा चालू झाली.
हिंदु धर्मातील सिद्धांत वैश्विक असल्याने त्यांना पंथांचे बंधन नसणे आणि अन्य पंथियांनाही त्याचा लाभ होणे

हिंदु धर्मातील सिद्धांतांना चिरंतन आणि वैश्विक सिद्धांत समजले जाते. हिंदु असो वा अन्य कोणत्याही पंथाची व्यक्ती असो, जी धर्मशास्त्रांचे पालन करील, तिला त्याचा निश्चित लाभ होईल. ज्याप्रमाणे एखादे औषध घेणार्या व्यक्तीला, मग ती कोणताही पंथ, जात, धर्म यांची असो, तिला त्याचा लाभ होतो, त्याप्रमाणे हिंदु धर्मशास्त्रानुसार कृती केल्याने सर्वांनाच लाभ होतो. सध्या विदेशातील प्रगत देशांत बहुतांश (६० ते ८० टक्के) लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. अमेरिकेतही पाच व्यक्तींपैकी एका व्यक्तीला मानसिक आजार आहे, तर त्या तुलनेत भारतासारख्या विकसनशील; परंतु आध्यात्मिक देशात त्यांचे प्रमाण अल्प का, याचा अभ्यास का केला जात नाही ? केवळ आधुनिक विज्ञान आणि भौतिक प्रगती यांच्या आधारे सर्व समस्यांवर उपाय मिळत नाही. याच कारणामुळे गया (बिहार) या तीर्थक्षेत्री अनेक विदेशी नागरिक श्राद्ध-पिंडदान, तर्पण आदी करण्यासाठी येतात.
– श्री. रमेश शिंदे
४ इ. कंबोडिया : बौद्ध परंपरेतील ‘पचूम बेन’ (Pchum Ben)ला ‘पूर्वजांचा दिन’ (अँसेस्टर्स डे) म्हणून देखील ओळखले जाते. ख्मेर परंपरेतील दिनदर्शिकेच्या १० व्या मासातील १५ व्या दिवशी हा विधी केला जातो. (२३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत हा विधी केला जातो.) या दिवशी सार्वजनिक सुटी घोषित केली जाते.
यात साधारणत: ७ पिढ्यांपर्यंतचे मृत नातेवाइक आणि पूर्वज यांचा सन्मान करतात. प्रतिवर्षी १५ दिवस कुटुंबे अन्न शिजवून ते त्यांच्या स्थानिक प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी आणतात. त्यानंतर भाताचे गोळे (पिंड) करून ते मोकळ्या शेतात, तसेच हवेत फेकले जातात.
प्रत्येक कुटुंब बौद्ध भिक्खूंना स्वतःकडील अन्न (सहसा शिजवलेला भात) दान करतात. भिक्खूंना अन्नदान करून मिळवलेले पुण्य सूक्ष्म जगतातील दिवंगत पूर्वजांकडे हस्तांतरित होते, असे समजले जाते. ते भिक्खूदेखील संपूर्ण रात्र जप करून आणि पितृपूजेचा एक कठीण विधी करून त्यात स्वतः सहभागी होतात.
हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलॉन यांनी त्यांच्या मृत मुलाच्या शांतीसाठी हरिद्वार येथे पिंडदान आणि श्राद्ध करणे

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलॉन यांना त्यांच्या मृत मुलाच्या आत्म्याची सतत जाणीव होत होती. त्यामुळे त्यांनी मुलाच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी कुटुंबाला भारतात पाठवून हरिद्वार येथे पिंडदान अन् श्राद्ध विधी करवून घेतले. या विधीनंतर एकातरी हिंदूने म्हटले का की, ते ख्रिस्ती असल्यामुळे त्यांचे पिंडदान होऊ शकत नाही ? म्हणजेच हिंदु धर्मातील श्राद्धविधींचा पंथाशी कोणताही संबंध नाही.
– श्री. रमेश शिंदे
४ ई. श्रीलंका : येथील बौद्ध परंपरेनुसार व्यक्ती मृत झाल्यावर ७ व्या दिवशी, ३ मासांनी आणि वर्षपूर्तीच्या दिवशी त्या मृतात्म्यांना अन्नदान केले जाते. याला ‘मतकदानय’ असे म्हटले जाते. ‘अन्नदान करून मिळवलेल्या पुण्याच्या तुलनेत त्या मृतात्म्यांना त्यांच्या लोकांत योग्य त्या वस्तू मिळतात’, असे समजतात. जे मृतात्मे त्यांच्या लोकांत पोहोचू शकत नाहीत, ते तरंगत राहून विविध प्रकारचे आजार, तसेच आपत्ती आणून जीवित व्यक्तींना त्रास देऊ शकतात, अशी त्या परिवाराची धारणा असते. त्यामुळे बौद्ध भिक्खूंना आमंत्रित करून त्या आत्म्यांपासून सुरक्षित रहाण्यासाठी विधी केले जातात.
(क्रमशः उद्याच्या अंकात)
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
| लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/956998.html |
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !