सनातन संस्थेचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ७ वर्षे) यांची सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री मधुरा भोसले यांनी वर्णिलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

‘या लेखातून आपण पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांना संतपदापर्यंत नेणार्‍या त्यांच्या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांचा शेवटचा भाग जाणून घेणार आहोत.        

(भाग ४)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/955244.html

पू. वामन राजंदेकर

७. पू. वामन राजंदेकर यांची विविध जन्मांतील आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

टीप १ – कुंडलिनीनाड्या : चंद्रनाडीमुळे रजोगुण आणि सूर्यनाडीमुळे तमोगुण न्यून होतो, तर सुषुम्नानाडीमुळे सत्त्वगुणाची वृद्धी होते. ध्रुवबाळाने जेव्हा साधना आरंभ केली, तेव्हा त्याच्या बालस्वभावानुरूप असणारी चंचलता न्यून करण्यासाठी प्रथम चंद्रनाडी कार्यरत झाली. त्याचप्रमाणे ध्रुवबाळाने सतत भगवान श्रीविष्णूचे स्मरण केल्यामुळे त्याची सुषुम्नानाडी जागृत होऊन त्याची सात्त्विकता पुष्कळ वाढली. त्यामुळे त्याला भगवान श्रीविष्णूचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले. वामदेवऋषी तपसाधना करत असतांना त्यांचा रजोगुण न्यून करण्यासाठी चंद्रनाडी, तमोगुण न्यून करण्यासाठी सूर्यनाडी आणि तपातून श्रीविष्णूशी अनुसंधान साधल्याने सत्त्वगुणाची वृद्धी झाली. पू. वामन जन्मतःच सात्त्विक असल्यामुळे त्यांची अधिक वेळ सुषुम्नानाडी चालू असते.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

टीप २ – वाईट शक्तींशी लढण्याची क्षमता : ध्रुवबाळामध्ये सूक्ष्मातील जाणून घेण्याची क्षमता अल्प, वामदेवऋषींमध्ये मध्यम आणि पू. वामन यांच्यामध्ये अधिक आहे, तसेच त्यांच्यावरील श्री गुरुकृपेचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे त्यांची वाईट शक्तींशी लढण्याची क्षमता प्रत्येक जन्मात आधीच्या जन्मांपेक्षा वाढत गेली.

टीप ३ – विस्मयानंद (उदा. ध्रुव) : चित्तात होणार्‍या भगवंताच्या प्राकट्याने ‘विस्मय’, म्हणजे आश्चर्य वाटल्यावर येणारी आल्हाददायक अनुभूती म्हणजे विस्मयानंद ! ध्रुवबाळाची नामसमाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा भगवान श्री विष्णूने त्याला प्रत्यक्ष सगुणातून प्रगट होऊन दर्शन दिले, तेव्हा त्याच्या दिव्य दर्शनाने ध्रुवबाळाला विस्मय, म्हणजे आश्चर्य होऊन त्याच्या हृदयात आनंद प्रकटला. त्यामुळे या आनंदाला ‘विस्मयानंद’ असे संबोधले आहे.

टीप ४ – सानंद : सतत भगवंताचे अस्तित्व जाणवल्याने सातत्याने येणारी आल्हाददायक अनुभूती म्हणजे सानंद ! वामदेवऋषींच्या स्वरूपाने ध्रुवतार्‍यावर बसून श्रीविष्णूचे अखंड तप केले. तेव्हा हे तपरूपी भगवंताशी अनुसंधान अनुभवत असतांना ते सुषुप्ती अवस्थेतील समाधीत लीन असतांना त्यांना सतत आनंदाची अनुभूती आली. त्यामुळे या आनंदाला ‘सानंद’ असे संबोधले आहे.

टीप ५ – अत्यानंद : भगवंताच्या आनंदस्वरूप रूपाशी काही काळ एकरूप झाल्याने येणारी ही अत्याधिक आल्हाददायक अनुभूती आहे.

पू. वामन राजंदेकर यांना जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रथम दिव्य दर्शन झाले, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यामुळे या आनंदाला ‘अत्यानंद’ असे संबोधले आहे.

टीप ६ – प्रतिभा आणि प्रज्ञा : जेव्हा सात्त्विक बुद्धी सूक्ष्म स्तरावर कार्यरत होते, तेव्हा तिचे प्राकट्य असामान्य असल्यामुळे तिला ‘प्रतिभा’ म्हणतात. तसेच जेव्हा सात्त्विक बुद्धी सूक्ष्मतर स्तरावर कार्यरत होते, तेव्हा तिचे प्राकट्य दिव्य असल्यामुळे तिला ‘प्रज्ञा’ म्हणतात. ध्रुवबाळाची प्रतिभा जागृत असल्यामुळे मायेत असतांना बालवयातच त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण झाले. त्याचप्रमाणे देवर्षि नारदांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्याची प्रज्ञा जागृत झाल्यामुळे त्याने वैरागी वृत्तीने अखंड समाधी लावून भगवंताच्या अनुसंधानात रहाण्याचा निर्णय घेतला. त्याने श्रीमन्नारायणाला प्रसन्न करण्यासाठी सहस्रो वर्षे भगवंताचे अखंड स्मरण करत नामसमाधी घेतली.

टीप ७ – मेधा : जेव्हा सात्त्विक बुद्धी सूक्ष्मतम स्तरावर कार्यरत होते, तेव्हा तिचे प्राकट्य दिव्यतर असल्यामुळे तिला ‘मेधा’ म्हणतात. त्यामुळे जेव्हा ध्रुवबाळापासून वामदेवऋषींची निर्मिती झाली, तेव्हा वामदेवऋषींनी श्रीमन्नारायणाच्या अखंड अनुसंधानात रहाण्यासाठी ध्रुवलोकावर कठोर तप करून स्वतःच्या मेधावी बुद्धीचा उपयोग भगवंताला समाधीतून जाणून घेण्यासाठी केला. यातूनच त्यांची समाधी अवस्थेत असतांना ध्यानयोगासह ज्ञानयोगानुसार साधना झाली.

टीप ८ – ऋतंबरा : जेव्हा सात्त्विक बुद्धी सूक्ष्ततम स्तरावर कार्यरत होते, तेव्हा तिचे प्राकट्य दिव्यतम असल्यामुळे तिला ‘ऋतंबरा’ म्हणतात. पू. वामन यांची ऋतंबरा प्रज्ञा कार्यरत असल्यामुळे त्यांना माया आणि ब्रह्म यांचे संमिश्र दर्शन न होता निरनिराळ्या स्वरूपांत दर्शन होते. त्यामुळे त्यांच्यावर मायेचा काहीच प्रभाव पडत नाही आणि त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सतत ब्रह्मस्वरूपी श्रीमन्नारायणाच्या स्वरूपात दर्शन होते. त्यामुळे ते नेहमी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘नारायण’ असे संबोधत असतात.

टीप ९ – जागृत ध्यान :  जेव्हा अंतर्मन केवळ स्वप्नातच नव्हे, तर जागृत अवस्थेतही कार्यरत होऊन मन निर्विचार होते, तेव्हा सुषुप्तीसह ‘जागृत ध्यानावस्था’ प्राप्त होते. या अवस्थेत ध्रुवबाळ जागृत असूनही भगवंताच्या अखंड ध्यानात मग्न होता.

टीप १० – सुषुप्ती : जेव्हा जिवाच्या बाह्य मनासह अंतर्मनाच्या अंशात्मक स्वरूपापेक्षा अधिक प्रमाणात अंतर्मनही कार्यरत असते, तेव्हा त्याला ‘सुषुप्ती’ अवस्था प्राप्त होत असते. ही अवस्था वामदेवऋषींना प्राप्त झाली होती.

टीप ११ – तुर्या : जेव्हा अंतर्मनाची शुद्धी होऊन चित्तशुद्धी आरंभ होते, तेव्हा ‘तुर्यावस्था’ प्राप्त होते. पू. वामन सध्या सतत ‘तुर्या’ अवस्थेत असून त्यांच्या चित्तासह कारणदेहाची, म्हणजे बुद्धीच्या सूक्ष्मतर स्तरावरील शुद्धीची प्रक्रिया चालू झाल्याने ते काही काळ ‘तुर्यगा’ ही समाधी अवस्थाही अनुभवत आहेत.

टीप १२ – प्रकाशमंडल : प्रभावळीतून प्रकाशाचे मूळ प्रकाशमान असणारे स्वरूप प्रगट होणे

टीप १३ – आभामंडल : प्रभावळीतून तेजाचे सूक्ष्म दिव्य स्वरूप, म्हणजे ‘आभा’ प्रगट होणे

टीप १४ – प्रभामंडल : प्रभावळीतून तेजाचे सूक्ष्मतर दिव्य स्वरूप, म्हणजे ‘प्रभा’ प्रगट होणे

टीप १५ – समष्टी साधना : या जन्मात पू. वामन हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या अवतारी कार्यात महत्त्वाचे योगदान देणार असल्याने त्यांच्या मागील जन्मांच्या तुलनेत या जन्मातील समष्टी साधनेचे प्रमाण सर्वाधिक आहे.

८. सारांश 

अशा प्रकारे कौमुदी गदेने सत्ययुगात ध्रुवबाळाच्या रूपात, त्रेतायुगात आणि द्वापरयुगात वामदेवऋषींच्या रूपात अन् कलियुगात पू. वामन राजंदेकर यांच्या रूपात अंशावतार घेऊन साधनाप्रवास पूर्ण केला. कौमुदी गदेची श्रीविष्णूच्या अवतारी कार्यात देह धारण करून सहभागी होण्याची मनोकामना पू. वामन यांच्या स्वरूपात पूर्ण होणार आहे. त्यानंतर पू. वामन यांना याच जन्मी मोक्ष मिळाल्यावर पू. वामन यांचा आत्मा श्रीविष्णूच्या हातातील कौमुदी गदेच्या मूळ स्वरूपात कायमचा विलीन होणार आहे.

कृतज्ञता : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे पू. वामन राजंदेकर यांच्या संदर्भातील गतजन्मांचे स्वरूप, त्यांची साधना आणि त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये या ज्ञानसूत्रांतून उमजली. यावरून ‘कौमुदी गदेचे अंशावतार असणारे बालसंत पू. वामन किती थोर आहेत’, याची थोडीफार कल्पना येते. पू. वामन यांच्याप्रमाणे आम्हा साधकांचीही तळमळीने, चिकाटीने आणि भक्तीपूर्ण साधना होवो’, ही श्री गुरूंच्या चरणी आर्त प्रार्थना आहे.’

(समाप्त)

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १.८.२०२५)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.