US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !

  • वैध कागदपत्रे नसल्याने कारवाई

  • कायदेशीर बाजू मांडण्याचीही संधी नाही

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने वैध कागदपत्रांविना वास्तव्यास असलेल्या १८ सहस्र भारतीय नागरिकांना अमेरिकेबाहेर काढण्याची (सीमापार करण्याची) सिद्धता चालू केली आहे. संबंधितांना कायदेशीर बाजू मांडण्याचीही संधी मिळणार नाही.

अशांना देशाबाहेर पाठवण्यासाठी पुन्हा सैनिकी विमानांचा वापर केला जाणार आहे. कागदपत्रांविना वास्तव्यास असलेल्यांच्या शोधासाठी सरकारी यंत्रणा विविध ठिकाणी धाडी घालत आहेत. ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे नाहीत; म्हणून सीमापार पाठवण्यात येणार आहे, अशा स्थलांतरितांसाठी एल् पासो आणि कॅलिफोर्निया येथे नवीन ‘ताबा केंद्रे’ उभारण्यात आली असून त्यांसाठी अनुमाने १६ सहस्र ५०० कोटी भारतीय रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या केंद्रांमध्ये अनुमाने १२ सहस्र स्थलांतरितांच्या रहाण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क, टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यू जर्सी येथे केलेल्या पहाणीत अशा भारतीय नागरिकांचे जीवन विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. ‘ताबा केंद्रां’मधील काही व्यक्तींशी गैरवर्तन झाल्याच्याही तक्रारी करण्यात आल्या आहेत.

वर्ष २०२५ मध्ये ३ सहस्र ५६७ भारतियांना अमेरिकेतून सीमापार करण्यात आले होते !

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार वर्ष २०२५ मध्ये अमेरिकेतून ३ सहस्र ५६७ भारतीय नागरिकांना सीमापार करण्यात आले होते. जून २०२६ पर्यंत १ सहस्र ७६ भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवण्यात आले आहे.

५ फेब्रुवारी २०२५ या दिवशी अमेरिकेने पहिल्यांदाच सैनिकी विमानाने १०४ भारतियांना अमृतसरला पाठवले होते. या वेळी अनेक लोकांना हातकड्या आणि पायात बेड्या घालण्यात आल्या होत्या. याची छायाचित्रे समोर आल्यानंतर देशभरात वाद निर्माण झाला. संसदेतही गदारोळ झाला होता.

संपादकीय भूमिका

  • अमेरिका घाऊक प्रमाणात अवैधरित्या देशात रहाणार्‍या सहस्रो लोकांना  विमानाद्वारे त्यांच्या देशात परत पाठवते, तर भारत हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना देशाबाहेर हाकलू शकत नाही !
  • भारतात ५ कोटी बांगलादेशी घुसखोर रहात असतांना त्यांना हाकलवून लावण्यासाठी आता भारताने अमेरिकेकडून धडा घेतला पाहिजे !