Mandya Stone Pelting : मद्दूरू येथील विसर्जन मिरवणुकीवरील आक्रमणाची घटना पूर्वनियोजित ! – कर्नाटकाचे गृहमंत्री

मद्दूरू ‘मिनी पाकिस्तान’ बनले आहे ! – स्थानिक हिंदूंचा आरोप

कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्‍वर

मद्दूरू (कर्नाटक) – येथील गणेशोत्सव मिरवणूक मशिदीजवळून जात असतांना मुसलमानांनी दगडफेक केल्यावरून दंगल झाली होती. या प्रकरणी आतापर्यंत २२ दंगलखोर मुसलमानांना अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, ही दगडफेकीची घटना पूर्वनियोजित होती, अशी माहिती मिळाली आहे. याविषयी पोलीस अन्वेषण करून योग्य ती कारवाई करतील. मंड्या जिल्ह्याचे पालकमंत्री एन्. चेलुवरायस्वामी यांनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. मिरवणुकीच्या वेळी वीजही घालवण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. वरवर पहाता ही घटना पूर्वनियोजित असल्याचे दिसते, असे ते म्हणाले.

काँग्रेसला निवडून दिले, ही आमची मोठी चूक ! – पोलिसांकडून मारहाण सहन करणारी हिंदु महिला ज्योती

७ सप्टेंबरला मिरवणुकीवर झालेल्या आक्रमणानंतर ८ सप्टेंबरला हिंदूंनी केलेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. या वेळी एका पोलीस हवालदाराने ज्योती नावाच्या एका हिंदु महिलेवरही काठी उगारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्योतीने रस्त्यावरच आक्रोश व्यक्त करत म्हटले की, ‘दोन सहस्र रुपयांच्या गॅरंटी’ योजनेमुळे आम्ही काँग्रेसला निवडून दिले. (कर्नाटक सरकार दारिद्र्यरेषेखालील लोकांना प्रतिमहिना २ सहस्र रुपये देते.) ही आमची मोठी चूक होती.

ज्योती पुढे म्हणाली की, मुसलमान ‘भगवा ध्वज काढा’, ‘मूर्ती लवकर विसर्जित करा’ असे म्हणाले. त्याप्रमाणे हे सर्व केले, तरीही आम्हाला शांततेत जगू दिले जात नाही. मुसलमान लोक आमच्या मंदिरासमोरून जाऊ शकतात, नाचू शकतात; पण आम्हाला तसा अधिकार नाही. दंगलीत ‘लोकांनाच नाही, तर पोलिसांवरही आक्रमण झाले आहे. आमचा परिसर जणू ‘मिनी पाकिस्तान’ बनला आहे. मशिदीसमोर आम्हाला फिरूही दिले जात नाही. रात्रीच्या वेळी येथील तरुणांच्या हातात तलवारी आणि काठ्या दिसतात. आम्ही भीतीच्या वातावरणात जगत आहोत.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून घटनेचे अन्वेषण करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

बेंगळुरूचे हिंदुत्वनिष्ठ नेते तेजस गौडा यांनी म्हटले की, गेल्या वर्षी मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे विसर्जन मिरवणुकीत पेट्रोल बाँब फेकण्यात आला होता. यंदाही जिल्ह्यातील मद्दूरू शहरात मिरवणुकीत दगडफेक करून हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर केंद्रीय गृह विभागाने तातडीने हस्तक्षेप करून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे या घटनेचे अन्वेषण करावे.

संपादकीय भूमिका

  • पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांना हा पूर्वनियोजित कट आधीच का समजला नाही कि तो कळूनही काँग्रेसने त्यावर काही न करण्याचा आदेश दिला होता ?