PM Modi China President Meet : विश्वास, आदर आणि संवेदनशीलता यांद्वारे दोन्ही देशांमधील संबंध वाढवण्यासाठी वचनबद्ध ! – पंतप्रधान

  • चीनमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांचा चीनशी संवाद

  • जिनपिंग यांची ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

नवी देहली / बीजिंग – दोन्ही देशांमधील संबंध परस्पर विश्वासावर आधारित असले पाहिजेत. भारत-चीन संबंध सशक्त करण्याची आवश्यकता आहे. सीमा व्यवस्थापनाविषयी आमच्यात करार झाला आहे. परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलता यांच्या आधारावर आमचे संबंध पुढे नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीसाठी पंतप्रधान मोदी चीनच्या तियानजिन शहरात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ३१ ऑगस्टच्या सकाळी द्विपक्षीय चर्चा झाली. त्या वेळी पंतप्रधान बोलत होते.

अमेरिकेने भारतावर लादलेल्या भरमसाठ आयातशुल्काच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा तब्बल ७ वर्षांनी केलेला चीनचा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अनुमाने एक तास चाललेल्या या बैठकीत सीमावाद, कैलास मानसरोवर, व्यापार आणि परस्पर संबंध सशक्त करणे, यांसारख्या सूत्रांवर चर्चा झाली. उभय नेत्यांची शेवटची भेट ऑक्टोबर २०२४ मध्ये रशियातील काझान येथे झालेल्या ‘ब्रिक्स शिखर परिषदे’त झाली होती.

पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा चालू झाली आहे.

२. दोन्ही देशांमधील थेट उड्डाणेसुद्धा पुन्हा चालू होत आहेत.

३. आमचे सहकार्य दोन्ही देशांच्या २.८ अब्ज लोकांच्या हिताशी जोडलेले आहे. ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्गही मोकळा करतील.

‘ड्रॅगन’ (चीन) आणि ‘हत्ती’ (भारत) एकत्र येणे, हा दोन्ही देशांसाठी योग्य पर्याय ! – जिनपिंग

शी जिनपिंग

पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करतांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की,

१. चीन आणि भारत या दोन प्राचीन संस्कृती आहेत. आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत आणि आपण ‘ग्लोबल साऊथ’चे (दक्षिण गोलार्धाचे) महत्त्वाचे सदस्यसुद्धा आहोत.

२. आपल्या लोकांचे जीवन सुधारण्याचे, विकसनशील देश म्हणून एकतेचे, तसेच मानवी समाजाच्या प्रगतीला चालना देण्याचे ऐतिहासिक दायित्व आपल्या दोघांवर आहे.

३. चांगले शेजारी आणि सौहार्दपूर्ण संबंध असलेले मित्र बनणे, एकमेकांच्या यशाला सक्षम करणारे भागीदार बनणे, तसेच ‘ड्रॅगन’ आणि ‘हत्ती’ यांनी एकत्र येणे, हा दोन्ही देशांसाठी योग्य पर्याय आहे.

४. आज जग शतकातून एकदाच होणार्‍या पालटांमधून जात आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर आणि अराजकसदृश आहे. या वर्षी चीन-भारत राजनैतिक संबंधांचा ७५ वा वर्धापनदिनसुद्धा आहे. दोन्ही बाजूंनी संबंधांना धोरणात्मक उंची आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून पहाण्याची अन् हाताळण्याची आवश्यकता आहे.

५. बहुपक्षीयता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या वक्तव्यातून जिनपिंग यांनी ट्रम्प यांचे नाव न घेता टीका केली.

६. बहुध्रुवीय जगात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांत लोकशाही बळकट करण्यासाठी एकत्र काम करण्याची आवश्यकता असून ते दायित्व आपण पार पाडले पाहिजे.

शांघाय सहकार्य संघटनेविषयी थोडी माहिती !

शांघाय सहकार्य संघटनेचे १० देश सदस्य आहेत. यांत चीन आणि भारत यांच्याव्यतिरिक्त बेलारूस, इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. याखेरीज अनेक संवाद भागीदार आणि निरीक्षक देश आहेत.