Yoga Guru Baba Ramdev : पेप्सी, कोका कोला, के.एफ्.सी., मॅकडोनाल्ड्स आदी अमेरिकी आस्थापनांवर बहिष्कार घाला ! – योगऋषी रामदेवबाबा

अमेरिकेच्या आयात शुल्कावरून योगऋषी रामदेवबाबा यांचे भारतियांना आवाहन !

योगऋषी रामदेवबाबा

नवी देहली – अमेरिकी आस्थापने आणि त्यांची उत्पादने यांच्यावर बहिष्कार घाला. एकाही भारतियाने पेप्सी, कोका कोला पिऊ नये; के.एफ्.सी. आणि मॅकडोनाल्ड्स या ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यासाठी जाऊच नका. या सगळ्या आस्थापना आणि त्यांची उत्पादने यांवर असा बहिष्कार टाका की, अमेरिकेत हलकल्लोळ माजला पाहिजे. तिथे महागाई इतकी वाढेल की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प स्वतःहून भारतावरील आयात शुल्क मागे घेतील, अशी प्रतिक्रिया योगऋषी रामदेवबाबा यांनी व्यक्त केली. अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क लागू केल्यानंतर ते बोलत होते. ‘अमेरिकेने ही राजकीय गुंडगिरी चालू केली आहे’, असेही  योगऋषी रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.

रामदेवबाबा पुढे म्हणाले की, कुठल्याही आव्हानांना भारताने घाबरून जाऊ नये. त्याऐवजी त्या आव्हानांचा आपण सामना करावा. भारत या आव्हानाला समर्थपणे तोंड देऊ शकतो. आज आपल्याकडे बहिष्कार घालण्याची संधीही आहे. भारत हा कमकुवत देश नाही. भारताशी दादागिरीने वागून ट्रम्प यांनी मोठी चूक केली आहे. अमेरिका एक सभ्य देश मानला जात होता; मात्र ट्रम्प यांनी सगळी मूल्ये उद्ध्वस्त केली. ट्रम्प सरड्याप्रमाणे रंग पालटत आहेत.

संपादकीय भूमिका

  • नाक दाबल्याविना तोंड उघडत नसते, हेच आता भारतियांनी दाखवून दिले पाहिजे !
  • विदेशांची आक्रमणे उलटवण्यासाठी आता प्रत्येक भारतियाने स्वदेशीचा अंगीकार केला पाहिजे. त्याच वेळी भारतीय आस्थापनांनी टिकाऊ, स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांनी निर्मिती केली पाहिजे !