बाराक्षार चिकित्सा (Biochemic System of Medicine)

बाराक्षार चिकित्सापद्धतीचा शोध वर्ष १८३२ मध्ये लागला. ही एक विशिष्ट उपचारपद्धत असून ती ‘लॉ ऑफ डेफिशियन्सी (उणिवांचा नियम)’ या तत्त्वावर आधारलेली आहे. प्रोफेसर मोलेशॉट (Moleschott) यांच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रियांची रचना आणि चेतनाशक्ती या त्यांमध्ये असलेल्या अजैविक पदार्थांच्या (Inorganic substances च्या) प्रमाणावर अवलंबून असतात. अजैविक पदार्थांच्या उणिवेमुळे पेशींचे कार्य सुसंवादितपणे चालत नाही आणि ते अजैविक पदार्थ योग्य प्रमाणामध्ये दिल्यानंतर पेशींचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे बाराक्षार पद्धतीप्रमाणे आवश्यक ते क्षार दिल्यानंतर रोग नैसर्गिकपणे बरा करण्याच्या शरिराच्या प्रक्रियेला चालना मिळते. २२ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बाराक्षार औषधांचा इतिहास, बाराक्षार औषधे सिद्ध करण्याची पद्धत, औषधाची निवड, औषध देण्याची पद्धत आणि बाराक्षार औषधांची मिश्रणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे दिला आहे.

(भाग ३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/949601.html

८. विशिष्ट क्षार अल्प झाले असता ते कोणती इंद्रिये, तसेच उती (टिशू) यांवर परिणाम करतात ?

८ अ. कल्केरिआ फ्लोरिका (Calcarea fluorica) : ‘उती, हाडे, रक्तवाहिन्यांच्या भिंती, स्नायूबंध (Tendons), स्नायू, दाताचे एनॅमल (दातांचा सर्वांत कठीण आणि पांढरा थर, जो दातांचे संरक्षण करतो), घसा, स्वरयंत्रात असलेली कंठातील पोकळी (Larynx) आणि गलग्रंथी (Thyroid gland).

८ आ. कल्केरिआ फॉस्फोरिका (calcarea phos) : हाडे, स्नायू, दात, पाठीचा कणा, रक्त, हाडांचे आवरण (Periosteum), कूर्चा आणि ग्रंथी.

८ इ. कल्केरिआ सल्पुरिकम् (Calcarea sulph) : यकृत, पित्ताशय, हृदयाचे स्नायू, पेशीजाल जोडपेशी (Connective tissue), ग्रंथी, श्लेष्मल त्वचा, हाडे आणि त्वचा.

टीप – श्लेष्मल त्वचा : शरिराच्या आतल्या पोकळ्यांमध्ये आढळणारे एक पातळ, ओले आणि संरक्षक आवरण, जे श्लेष्मा (चिकट द्रव mucus) सिद्ध करते.

८ ई. फेरम फॉस्फोरिकम् (Ferrum phos) : रक्त, रक्तवाहिन्या, मोठे आतडे, घशातून मध्यकर्णाकडे जाणारी नलिका (Eustachian tube), हृदय, श्लेष्मल त्वचा आणि हाडे.

८ उ. काली मूर (Kali mur) : ग्रंथी, श्वासनलिका, घसा, घशातून मध्यकर्णाकडे जाणारी नलिका (Eustachian tube), कान, स्नायू आणि सांधे.

८ ऊ. काली फॉस (Kali phos) : प्लीहा, नसा, स्नायू, श्लेष्मल त्वचा आणि त्वचा.

८ ए. काली सल्फ (Kali sulph) : स्वादुपिंड, यकृत, त्वचा, श्लेष्मल त्वचा, ग्रंथी आणि श्वासोच्छ्वासाची इंद्रिये.

८ ऐ. मॅग फॉस (Mag phos) : हृदय, मोठे आतडे, नसा आणि स्नायू.

८ ओ. नेट्रम मूर (Nat mur) : मूत्रपिंडे, रक्त, श्लेष्मल त्वचा, कूर्चा, मेंदू, हृदय, प्लीहा आणि यकृत.

८ औ. नेट्रम फॉस (Netrum phos) : पोट, उती, लसिका ग्रंथी, जननेंद्रिये आणि आतडे.

८ अं. नेट्रम सल्फ (Netrum sulph) : यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड आणि आतडे.

८ क. सिलिशिआ (Silicea) : जोडपेशी (Connective tissue), त्वचा, नसा, केस, नखे, ग्रंथी, हाडे, घशातून मध्यकर्णाकडे जाणीरी नलिका (Eustachian tube) आणि कूर्चा.

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

९. क्षार न्यून झाले असता निर्माण होणारी लक्षणे

९ अ. कल्केरिआ फ्लोअर (Calc fluor) : डोळ्याच्या बाहुलीच्या पारदर्शक पडद्याच्या (Cornea च्या) तक्रारी, त्वचा खरखरीत होऊन भेगा पडणे, पोकळी (Cavity) निर्माण होणे, उदा. दातांमध्ये पोकळी निर्माण होणे, रक्तवाहिन्या फुगणे, हाडांची झीज होणे (Osteoporosis) आणि दातांची झीज होणे.

९ आ. कल्केरिआ फॉस (Calcarea phos) : हाडांची झीज होणे, नाकातून रक्तस्राव होणे, हाडाची वाढ होणे, दात उशिरा येणे, हृदयाचे ठोके वाढणे, नाकामध्ये मांस वाढणे (Nose polyp), डोकेदुखी (मुलांमध्ये) आणि वाढत जाणार्‍या वेदना.

९ इ. कल्केरिआ सल्फ (Calcarea sulph) : जुना पू, उघड्या जखमा, तंतूमय वाढ (Fibroid), पिवळ्या रंगाचा श्लेष्मल (चिकट) स्राव आणि गळू.

९ ई. फेरम फॉस (Ferrum phos) : तापाची प्रथमावस्था (९९ ते १०१ अंश फॅरनहाइट), थाड थाड उडणारी डोकेदुखी, दाह, रक्तस्वल्पता, रक्तस्राव होणे, घशाला सूज येणे, नाकातून रक्त येणे, सर्दी आणि इन्फ्लुएंझा.

९ उ. काली मूर (Kali mur) : तापाची द्वितीयावस्था (१०१ ते १०३ अंश फॅरनहाईट), खोकला, कानात दडे बसणे आणि पांढर्‍या रंगाचा श्लेष्मल (चिकट) स्राव.

९ ऊ. काली फॉस (Kali phos) : श्वासाला दुर्गंधी येणे आणि नसांच्या अन् झोपेच्या तक्रारी.

९ ए. काली सल्फ (Kali sulph) : तापाची तृतीयावस्था (१०३ ते १०५ अंश फॅरनहाईट), मोकळ्या हवेमध्ये जावेसे वाटणे, त्वचेवर कोंडा होणे, घट्ट पिवळसर स्राव आणि सतत पालटणारी लक्षणे.

९ ऐ. मॅग फॉस (Mag phos) : चॉकलेट खावेसे वाटणे, टोचल्याप्रमाणे वेदना होऊन पेटके येणे आणि स्नायूंचा पक्षाघात.

९ ओ. नेट्रम मूर (Netrum mur) : डोक्यामध्ये रक्तसंचय होऊन डोके थंड पडणे, पाण्यासारखा स्राव, सूर्यप्रकाश सहन न होणे आणि नागीण (हर्पिस सिंप्लेक्स).

९ औ. नेट्रम फॉस (Netrum phos) : मुरमे, तेलकट अन् सहज तुटणारे केस, केसांची दुभंगलेली टोके आणि पित्तामुळे जळजळणे अन् उलट्या होणे.

९ अं. नेट्रम सल्फ (Netrum sulph) : दुर्गंधीयुक्त वायू सरणे, हात किंवा पाय सुजणे, डोक्याला मार लागणे, थंड अन् दमट हवेमध्ये लक्षणांत वाढ होणे.

९ क. सिलिशिआ (Silicea) : उजेड सहन न होणे, खुब्यामध्ये (कमरेखालच्या सांध्यात) वेदना होणे, त्वचा नाजूक होणे, त्वचेवर डाग पडणे, अंतर्गळ (Hernia) आणि हाता-पायांना घाम येणे.

१०. क्षारांचा स्रोत असलेले खाद्यपदार्थ

१० अ. कल्केरिआ फ्लोअर (Calcarea flour) : संपूर्ण धान्ययुक्त अन्न (Whole grain food), दुग्धजन्य पदार्थ, कच्ची फळे, सोयाबीन (प्रथिनांचा उत्तम स्रोत असलेले गळिताचे एक पीक), तीळ, पालक, ब्रोकोली (एक प्रकारची हिरवी फूलभाजी) आणि मशरूम (अळंबी).

१० आ. कल्केरिआ फॉस (Calcarea phos) : बदाम, काकडी, ओट्स, सोयाबीन, पांढरे बीज धान्य, चेरी, पालक, दुग्धजन्य पदार्थ आणि खजूर.

१० इ. कल्केरिआ सल्फ (Calcarea sulph) : ओट्स, बदाम, काकडी, मसूर, शेंगदाणे, सोयाबीन आणि कॉलीफ्लॉवर.

१० ई. फेरम फॉस (Ferrum phos) : पालक, बिनसडीचा तांदुळ, तीळ, टोमॅटो, ओट्स, ‘रेड अँड ब्लू बेरीज’ (लाल आणि निळ्या रंगाची गोल आकाराची, रसदार अन् बिया असलेली छोटी फळे) आणि हेजलनट्स.

१० उ. काली मूर (Kali mur) : काकडी, शेंगदाणे, हेजलनट्स, मसूर, पालक, डुकराचे मांस, सोयाबीन, तीळ आणि बटाटे.

१० ऊ. काली फॉस (Kali phos) : पांढरे बीज, सोयाबीन, काकडी, बदाम, पालक, डुकराचे मांस, शेंगदाणे, मसूर आणि हेजलनट्स.

१० ए. काली सल्फ (Kali sulph) : डुकराचे मांस, हेजलनट्स, शेंगदाणे, बदाम, पालक, मसूर आणि वाटाणे.

१० ऐ. मॅग फॉस (Mag phos) : ब्राझील नट्स, पांढरे बीज, गहू, सोयाबीन, मका (कॉर्न), अक्रोड, शेंगदाणे आणि वाटाणे.

१० ओ. नेट्रम मूर (Netrum mur) : लाल बीट, मसूर, मुळा, टोमॅटो, सागरी मीठ, दूध, ओवा आणि ओवा बी.

१० औ. नेट्रम फॉस (Netrum phos) : मसूर, डुकराचे मांस, शतावरी, पालक, हिप गुलाब (गुलाबाचे फळ), ओट्स, ऑलिव्ह आणि गाजर.

१० अं. नेट्रम सल्फ (Netrum sulph) : मसूर, डुकराचे मांस, पालक आणि ओट्स.

१० क. सिलिशिआ (Silicea) : बाजरी, बिनसडीचा तांदुळ, ओट्स, संपूर्ण धान्य, गहू, शेंगदाणे, गाजर, काकडी, स्ट्रॉबेरी आणि ओवा.

टीप : वरील औषधे वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.’

(क्रमशः)

संकलक : होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे (२५.४.२०२५)