मालेगाव, मुंबई बाँबस्फोट आणि डॉ. दाभोलकर प्रकरणांतील राजकीय हस्तक्षेप मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. अशोक गुरव, श्री. दीपक देसाई, बोलतांना श्री. चेतन राजहंस, श्री. शिवानंद स्वामी, डॉ. मानसिंग शिंदे आणि श्री. निरंजन शिंदे

कोल्हापूर, २३ ऑगस्ट (वार्ता.) – मालेगाव बाँबस्फोट, मुंबईत ११ जुलै २००६ या दिवशी झालेले साखळी बाँबस्फोट आणि दाभोलकर हत्या या प्रकरणांचे नुकतेच निकाल लागले. ‘या प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप होता’, असा सनसनाटी निर्माण करणारा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला होता. आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी राजकीय हस्तक्षेप करणार्‍या ‘त्या’ राजकीय नेत्यांची नावे घोषित करावीत, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते कोल्हापूर येथील प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतीदिनानिमित्त ‘महाराष्ट्र अंनिस’च्या वतीने पुण्यातील ‘साने गुरुजी स्मारक’ येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी बोरवणकर यांनी आरोप केला होता. या पत्रकार परिषदेतून बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांचे श्री. राजहंस यांनी खंडण केले.

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर

या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा सहसंयोजक श्री. अशोक गुरव, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक देसाई, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी  उपस्थित होते.

श्री. चेतन राजहंस यांनी मांडलेली महत्त्वाची सूत्रे

श्री. चेतन राजहंस

डॉ. दाभोलकर हत्येनंतर सनातनच्या साधकांचा अन्वेषणाच्या नावाखाली झालेला छळ राजकीय हस्तक्षेपामुळे झाला का ?

श्री. राजहंस पुढे म्हणाले की, बोरवणकर यांचे म्हणणे आहे की, पीडितांना न्याय मिळालेला नाही. असे आहे, तर तर ती कुठली राजकीय व्यक्ती होती, ज्यांच्यामुळे त्यांना न्याय मिळालेला नाही, तेही त्यांनी सांगणे अपेक्षित होते. या घटना ज्या काळात घडल्या, त्या वेळी महाराष्ट्रात कुणाचे सरकार होते ? दाभोलकर प्रकरणात काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हत्येच्या घटनेनंतर अन्वेषण चालू होण्यापूर्वीच ‘ही हत्या गोडसेवादी प्रवृत्तींनी केली’, असे जाहीर सांगितले आणि यानंतर सनातनचे सहस्रो साधक, हिंदुत्वनिष्ठ यांचा अन्वेषणाच्या नावाखाली छळ करण्यात आला. ‘हा छळ राजकीय हस्तक्षेपामुळे होता’, असे मीरा बोरावणकर यांना म्हणायचे होते का ?

आज कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जामीन मिळालेला असतांना तो रहित केला जातो, याचप्रकारे खालचे न्यायालय अन्य संशयितांना जामीन नाकारते, तर तो मिळवण्यासाठी वरिष्ठ न्यायालयाचे द्वार ठोठवावे लागते. अनेक निष्पापांना केवळ संशयाच्या कारणावरून १०-१० वर्षे कारागृहात रहावे लागते ! यात नेमका कुणाचा हस्तक्षेप आहे ? कुणाचा दबाव आहे ? एखाद्या परिवाराचा दबाव आहे का ? याचे उत्तर कोण देणार ?

आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्यावरही राजकीय दबाव होता, असे त्या म्हणाल्या. त्यातून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर्.आर्. पाटील कि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी हस्तक्षेप केला, असे बोरवणकर यांना म्हणायचे आहे का ?, हे त्यांनी स्पष्ट करावे.

खाकीने डावे आणि उजवेही असता कामा नये !

पुणे येथे दाभोलकरांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (‘अंनिस’च्या) कार्यक्रमात मीरा बोरवणकर म्हणाल्या की, खाकीने हिरवे, भगवे वा पांढरे होणे, हे अत्यंत घातक आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, खाकीने डावे आणि उजवेही असता कामा नये. ज्या संघटनेचे कार्यकर्ते नक्षलवादी म्हणून अटक होत आहेत, ज्या संघटनेचे नाव काँग्रेसच्या काळात आर्.आर्. पाटील हे गृहमंत्री असतांना महाराष्ट्र गुप्तवार्ता विभागाच्या नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍या संघटनांच्या सूचीत आहे, त्या संघटनेविषयी वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेल्या बोरवणकर यांना ठाऊक नव्हते का ?

धमकी आल्यानंतर मीरा बोरवणकर यांनी पोलीस तक्रार का प्रविष्ट केली नाही ?

श्री. राजहंस पुढे म्हणाले की, नुकताच प्रशांत कांबळे उपाख्य सुनील जगताप या कट्टर नक्षलवाद्याला रायगडमध्ये अटक झाली. तो अंनिसचा कार्यकर्ता आहे. हे बोरवणकर यांना ठाऊक नाही का ? स्वतःला विवेकाचा आवाज म्हणवणार्‍या अंनिसबद्दल आम्ही नव्हे, तर सातारा येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी कडक ताशेरे ओढत यांच्या ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची, तसेच विशेष लेखापरीक्षण करण्याची शिफारस केली आहे, हे त्यांना ठाऊक नाही का ? अशा संघटनेच्या व्यासपिठावर जाणे योग्य कि अयोग्य, हे कुणालाही वाटू शकते; पण याविषयीही ‘या कार्यक्रमासाठी जाऊ नये’; म्हणून मीरा बोरवणकर यांना २० दूरभाष म्हणे ! त्यात एक धमकीचा फोनही आला, असे त्या म्हणाल्या. माजी पोलीस आयुक्तांना धमकी आली, इतकी गंभीर घटना घडूनही एक साधी बातमी आली नाही. बोरवणकर यांनी याविषयी पोलीस तक्रार केली आहे ना ? दाभोलकर प्रकरणातही हमीद दाभोलकर यांनी माझ्या वडिलांना ‘तुमचा गांधी करू’, अशी धमकी आल्याचा सनसनाटी आरोप करून वारेमाप प्रसिद्धी मिळवली होती. प्रत्यक्षात न्यायालयात याविषयी विचारणा केल्यावर त्यांना काहीच सांगता आले नाही. त्यांनी त्याविषयी साधी पोलीस तक्रारही केलेली नाही, हे समोर आले. ‘यातून जनतेने काय ते समजून घ्यावे’, असेही श्री. राजहंस यांनी सांगितले.

मीरा बोरवणकर हिंदुत्वनिष्ठांच्या भावना कधी समजून घेणार ? – चेतन राजहंस

ज्याप्रकारे मीरा बोरवणकर यांना ‘हत्या झालेल्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे’ असे वाटते, त्याचप्रकारे या प्रकरणात जे हिंदुत्वनिष्ठ नाहक भरडले गेले त्यांच्याही भावना; विशेषत: पानसरे-दाभोलकर हत्या प्रकरणात सहस्रो सनातनच्या साधकांचा छळ करण्यात आला, तो त्यांनी समजून घेतला पाहिजे. शहरी नक्षलवादी म्हणून ज्यांचे कार्यकर्ते सापडतात त्यांच्या व्यासपिठावर मीरा बोरवणकर जातात आणि तेथे जाऊन वक्तव्य करतात, तर त्याच मीरा बोरवणकर यांना विनंती आहे की, त्यांनी सनातनच्या आश्रमात येऊन ‘साधकांचा छळ का झाला ?’, ‘आम्ही का पीडित आहोत’, याही भावना समजून घेतल्या पाहिजेत. मीरा बोरवणकर या हिंदुत्वनिष्ठांच्या व्यासपिठावर येऊन कधी त्या बोलणार आहेत का ? आमच्यावर होणार्‍या अन्यायाच्या मागे कुणाचा हस्तक्षेप आहे, हेही त्यांनी घोषित करावे, असे आवाहन श्री. चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत केले.

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘मीरा बोरवणकर यांनी एक दायित्व असलेल्या अधिकारी म्हणून काम केले आहे, त्यामुळे त्यांनी केवळ आरोप करू नयेत, तर त्या बोलतात त्यासाठी पुरावे देणे अपेक्षित आहे. केवळ वातावरण निर्मिती करून कुणालातरी अथवा कोणत्या एका पक्षाला खूश करण्यासाठी बोरवणकर यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत.’’