बाराक्षार चिकित्सा-(Biochemic System of Medicine)

डॉ. शुझ्लर यांचा जन्म २१ ऑगस्ट १८२१ या दिवशी झाला. त्या निमित्ताने…

‘बाराक्षार चिकित्सा ही सोपी आणि सुलभ अशी उपचारपद्धत असून ती जर्मनीस्थित डॉ. शुझ्लर यांनी जगाला दिलेली एक देणगी आहे. ‘बायोकेमिक’, हे नाव जर्मन शब्द ‘बायोस (Bios)’ + ‘केमिस्ट्री (Chemistry)’ यांपासून आलेले आहे. बायोस म्हणजे जीवन आणि केमिस्ट्री म्हणजे पदार्थांचे गुणधर्म अन् त्यांच्या क्रिया, प्रतिक्रिया यांच्याशी संबंधित असलेले शास्त्र, म्हणजेच बायोकेमिस्ट्री हे जीवनाशी संबंधित असे रसायनशास्त्र, म्हणजेच जीवनरसायन आहे.

बाराक्षार चिकित्सापद्धतीचा शोध वर्ष १८३२ मध्ये लागला. ही एक विशिष्ट उपचारपद्धत असून ती ‘लॉ ऑफ डेफिशियन्सी (उणिवांचा नियम)’ या तत्त्वावर आधारलेली आहे. प्रोफेसर मोलेशॉट (Moleschott) यांच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रियांची रचना आणि चेतनाशक्ती या त्यांमध्ये असलेल्या अजैविक पदार्थांच्या (Inorganic substances च्या) प्रमाणावर अवलंबून असतात. अजैविक पदार्थांच्या उणिवेमुळे पेशींचे कार्य सुसंवादितपणे चालत नाही आणि ते अजैविक पदार्थ योग्य प्रमाणामध्ये दिल्यानंतर पेशींचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे बाराक्षार पद्धतीप्रमाणे आवश्यक ते क्षार दिल्यानंतर रोग नैसर्गिकपणे बरा करण्याच्या शरिराच्या प्रक्रियेला चालना मिळते.

(भाग १)

डॉ. शुझ्लर

१. डॉ. शुझ्लर यांचा परिचय

डॉ. शुझ्लर यांचा जन्म २१.८.१८२१ या दिवशी जर्मनीतील अल्डेंबर्ग येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव ‘डॉ. वुईलहेल्म हेन्रिच शुझ्लर’ असे आहे. त्यांना लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, इंग्रजी, स्पॅनिश आणि इटालियन या भाषा अवगत होत्या. त्यांच्या काळामध्ये ‘होमिओपॅथी’ उपचारपद्धत लोकमान्य झाली होती. त्यामुळे त्यांनी ‘होमिओपॅथी डॉक्टर’ होण्याचे ठरवले. त्यांनी बर्लीन येथे मेडिसीनचा अभ्यास केला आणि १४.८.१८४७ या दिवशी ‘एम्.डी.’ ही पदवी मिळवली. त्यांनी होमिओपॅथी डॉक्टर म्हणून वैद्यकीय व्यवसायाला आरंभ केला; परंतु त्यांना काही तत्त्वे मान्य न झाल्याने त्यांनी नवीन पद्धतीचा शोध घेण्यास आरंभ केला. त्यांनी क्षारांचा होमिओपॅथीप्रमाणे औषध म्हणून उपयोग करण्यास आरंभ केला आणि त्यातूनच ‘बाराक्षार पद्धती’चा उगम झाला.

२. बाराक्षार औषधांचा इतिहास

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

डॉ. हानेमान यांनी होमिओपॅथीचा शोध लावला. त्यांनीच अजैविक पदार्थ हे औषध म्हणून उपयुक्त असल्याचे शोधून काढले. डॉ. शुझ्लर यांनी त्या विषयाचा आणखी अभ्यास केला. आरंभीच्या काळात डॉ. शुझ्लर होमिओपॅथीच्या औषधांचा उपयोग करत असत; परंतु नंतर त्यांनी केवळ बाराक्षारांचाच औषध म्हणून उपयोग करण्यास आरंभ केला.

‘रक्त आणि पेशीसंग्रहामध्ये असलेले अजैविक पदार्थ (Inorganic substances) हे रोग बरे करण्यासाठी पुरेसे असून त्यांच्या वापराने रोग बरा होऊ शकतो’, यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी त्यांच्या उपचारपद्धतीला ‘ॲब्रिज सिस्टिम ऑफ थेरॉप्युटीक्स (Abridge System of Therapeutics)’, असे नाव दिले. ‍वर्ष १८७३ मध्ये त्यांनी ‘ॲन ॲब्रिज थेरॅपी बेस्ड ऑन फिजिऑलॉजी अँड सेल्युलर पॅथॉलॉजी (An Abridge Therapy based on physiology and cellular pathology)’, या नावाने होमिओपॅथीच्या जर्नलमध्ये एक लेख प्रसिद्ध केला. त्यानंतर त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध झाले. हळूहळू या पद्धतीला प्रसिद्धी मिळून ती लोकमान्य झाली.

३. बाराक्षार उपचारपद्धतीचा सिद्धांत (Theory of Biochemic System)

इंद्रियांची रचना आणि चेतनाशक्ती या शरिराला आवश्यक असणार्‍या काही घटकांच्या योग्य प्रमाणावर अवलंबून असते. ते घटक, म्हणजे पेशीसंग्रहामध्ये असलेले अजैविक पदार्थ होय. त्यामुळे इंद्रियांचे कार्य आणि अखंडत्व योग्य प्रकारे संतुलित केले जाते. १०८ घटक आणि त्यांचे क्षार विश्वाचे संतुलन करत असतात.

डॉ. शुझ्जलर यांच्या म्हणण्यानुसार मृत्यूनंतर मानवाचे दहन केले असता १२ खनिजे शेष रहातात आणि त्यांनाच त्यांनी ‘टिश्यू सॉल्टस् (Tissue salts)’, असे म्हटले आहे. यांच्यामुळेच शरिराचे जिवंतपण आणि नैसर्गिक संतुलन राखले जाते. शरिरामध्ये निरनिराळे अजैविक पदार्थ निरनिराळ्या प्रमाणामध्ये असून त्यांचे एक विशिष्ट कार्य असते. यांतील कोणत्याही क्षाराचे प्रमाण न्यून झाले असता रोग उत्पन्न होतो आणि ते क्षार योग्य प्रमाणामध्ये दिले असता व्यक्तीचे स्वास्थ्य पूर्ववत् होते.

या क्षारांच्या उणिवेमुळे उतींमधील (उती : समान रचना आणि कार्य असलेल्या पेशींचा समूह) क्षारांच्या आण्विक हालचालींमध्ये (Molecular motion मध्ये) बाधा उत्पन्न होते आणि त्यामुळे सरतेशेवटी रोग उत्पन्न होतो. हे क्षार योग्य प्रमाणात दिल्यानंतर क्षारांची आण्विक हालचाल योग्य होऊन उतींचे आणि पर्यायाने इंद्रियाचे कार्य सुधारते. डॉ. शुझ्लर यांनी या क्षारांचे सामर्थ्य (Potentised) वाढवून बाराक्षारांची निर्मिती केली.

हे झाडाच्या उदाहरणावरून समजून घेऊया. शरिराला जशी रक्ताची आवश्यकता असते, तशी झाडाला मातीची आवश्यकता असते. झाडाची वाढ चांगली होण्यासाठी त्याच्या मुळाजवळील मातीत चांगली पोषणमूल्ये योग्य प्रमाणामध्ये असणे आवश्यक असते. मातीत एखादा घटक अल्प असेल, तरी झाडाची वाढ चांगली होत नाही. तो घटक खताच्या माध्यमातून दिला असता झाडाची वाढ चांगली होते. त्याचप्रमाणे मानवाच्या रक्तामध्ये काही घटक न्यून झाले, तर त्यामुळे रोग उत्पन्न होतो आणि त्या व्यक्तीला योग्य ते क्षार योग्य त्या प्रमाणामध्ये दिले असता रक्तामधील ती उणीव भरून येऊन रुग्णाईत व्यक्ती चांगली होते.

३ अ. शरिराचा निरोगीपणा : जिवंत पेशींमध्ये असलेल्या अजैविक क्षारांच्या आण्विक हालचालींचे (Ionic movement चे) स्थिर संचलन, म्हणजे निरोगीपणा होय. जर्मन पॅथॉलॉजिस्ट व्हर्चाे यांनी केलेल्या व्याख्येनुसार ‘निरोगीपणा म्हणजे ‘पेशींचे सामान्य रूपांतरण’ (Normal cell metamorphosis), म्हणजेच जुन्या पेशींचा नाश आणि नवीन पेशींची निर्मिती.’

मानवी शरीर हे सेंद्रिय आणि अजैविक पदार्थांपासून बनले आहे. सामान्य उतींच्या बांधणीसाठी दोन्ही घटकांची आवश्यकता असते. पेशींच्या सामान्य कार्यासाठी या घटकांची आवश्यकता असते आणि पेशींच्या पोषणासाठी रक्ताच्या माध्यमातून त्याचा पुरवठा केला जातो. रक्त हे माध्यम असून त्यात साखर, चरबी आणि ‘अलब्युमिन’, हे सेंद्रिय घटक, तसेच पाणी, क्षार, उदा. क्लोराईड ऑफ सोडियम, क्लोराईड ऑफ पोटॅश (पोटॅशियम) इत्यादी अजैविक घटक असतात.

अजैविक क्षार हे प्रत्येक भागाची वाढ आणि विकास यांसाठी महत्त्वाचे आहेत. सर्वसाधारण स्थितीमध्ये काही कारणामुळे हे घटक न्यून झाले, तर आपण घेत असलेले अन्न आणि पेय यांमधून त्याची न्यूनता भरून काढली जाते. त्यामुळे क्षारांच्या आण्विक हालचालींमध्ये असंतुलन रहात नाही.

दैनंदिन क्रियांमुळे ‘नवीन पेशींची निर्मिती, जुन्या पेशींचा नाश करणे आणि शरिरातील कचरा बाहेर टाकणे’, या क्रिया केल्या जातात; म्हणून निरोगीपणा म्हणजे ‘पेशींचे सामान्य रूपांतरण (Normal cell meta morphosis)’ होय.

३ आ. रोगाची संकल्पना : रोग म्हणजे अजैविक क्षारांच्या सर्वसाधारण आण्विक हालचालींमध्ये निर्माण झालेली असुविधा होय. व्हर्चाे यांच्या म्हणण्यानुसार रोग म्हणजे पेशींची पालटलेली स्थिती. याचे कारण अजैविक क्षारांच्या आण्विक हालचालींमध्ये निर्माण झालेले असंतुलन हे असते.

सर्वसाधारणपणे प्रत्येक पेशी सामान्यपणे ‘पदार्थ शोषून घेणे अथवा उत्सर्जित करणे’, हे कार्य करत असते. पेशीमधील एक किंवा अनेक क्षार न्यून झाले असता पेशीचे हे कार्य काही काळासाठी खंडित होते किंवा न्यून होते. त्यामुळे निर्माण झालेल्या असामान्य स्थितीला ‘रोग’, असे म्हणतात.

विशिष्ट क्षारांच्या उणिवेप्रमाणे निरनिराळ्या लक्षणांच्या माध्यमातून रोगाचे प्रकटीकरण होते. ‘लक्षणे म्हणजे क्षारांच्या उणिवेमुळे विशिष्ट अवयवाला धोका निर्माण झाला असून त्याच्या सुरक्षततेसाठी विशिष्ट घटकांची आवश्यकता आहे’, असा निसर्गाने दिलेला संकेत असतो. ही क्षारांची न्यूनता भरून काढली असता पुन्हा निरोगी स्थिती निर्माण होते. बाराक्षार पद्धतीनुसार ‘जीवजंतूंमुळे रोग होतो’, असे नाही, तर क्षारांच्या उणिवेमुळेही रोग निर्माण होतो आणि त्यानुसार औषधे दिली जातात.

३ इ. रोग बरा करण्याची संकल्पना : पेशींच्या आण्विक हालचालींचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेले अजैविक क्षार योग्य प्रमाणामध्ये दिले असता रोग बरा होतो. अल्प असलेले अजैविक क्षार अल्प प्रमाणामध्ये देणे आवश्यक आहे. त्यामुळे पेशींमधील खंडित झालेली आण्विक साखळी पूर्ववत् होऊन पेशींचे कार्य सुरळीत होते, उदा. ‘मुडदूस’ (लहान मुलांना होणारा एक रोग) या रोगामध्ये हाडामधील ‘फॉस्फेट ऑफ लाइम’ या क्षाराच्या आण्विक हालचालीमध्ये असंतुलन निर्माण झालेले असते. हा क्षार योग्य प्रमाणात दिला असता असंतुलन जाऊन पेशी पुन्हा पूर्ववत् होतात आणि त्यामुळे ‘मुडदूस’ हा रोग बरा होतो.

बाराक्षार औषधांमुळे पेशींमध्ये न्यून असलेले क्षार त्यांना पुरवण्याच्या शरिराच्या नैसर्गिक क्रियेला चालना मिळते. बाराक्षार औषधे क्षारांची उणीव थेट नीट करतात, तर इतर उपचारपद्धतींमध्ये (पॅथींमध्ये) विषम औषधे देऊन रोग अप्रत्यक्षपणे बरा केला जातो.

४. बाराक्षार औषधे सिद्ध करण्याची पद्धत

पेशींना औषधी पदार्थांनी समृद्ध करण्यासाठी ते औषध सूक्ष्म प्रमाणामध्ये आणि छोट्या आकाराच्या गोळ्यांच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे अन् त्यासाठी ‘ट्रायचुरेशन’ ही पद्धत उपयोगात आणली जाते. त्यामुळे सर्व बाराक्षारांची औषधे ही होमिओपॅथीच्या औषधांप्रमाणे ‘ट्रायचुरेशन’ पद्धतीने सिद्ध केली जातात. यासाठी होमिओपॅथीच्या ‘डेसिमल स्केल’ या पद्धतीचा उपयोग केला जातो.

५. औषधाची निवड आणि औषध देण्याची पद्धत

औषधाची निवड ही लक्षणांच्या आधारे केली जाते. रुग्णाची लक्षणे बाराक्षार औषधांमधील ज्या औषधाच्या लक्षणांशी जुळतात, ते औषध दिले असता चांगला परिणाम दिसून येतो.

बाराक्षार औषधाच्या गोळ्या जिभेवर ठेवल्या असता त्या विरघळून ते औषध रक्तामध्ये मिसळले जाते. ही औषधे गरम पाण्यात विरघळवूनसुद्धा दिली जातात. गोळ्यांचा चुरा करून तो नवजात बालके आणि लहान मुले यांच्या जिभेखाली ठेवावा. गोळ्या पाण्यात विरघळल्या असता प्रवाही पोटॅन्सी (शक्ती) सिद्ध होते.

५ अ. बाह्योपचार  : ही औषधे जशी पोटात घेतली जातात, तसाच त्यांचा बाहेरून उपयोग करण्यासही डॉ. शुझ्लर यांनी सांगितले आहे. जखमा, गळवे (गळू : जीवाणूंमुळे त्वचेखाली तयार होणारी पू भरलेली एक दुखरी गाठ) आणि मूळव्याध या आजारांमध्ये या औषधांचा बाहेरून उपयोग केला जातो.

१. मलम : ही औषधे व्हॅसलिनमध्ये मिसळून मलम सिद्ध केले जाते.

२. गुळण्या करणे : घशाच्या आजारांमध्ये या औषधाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.

५ आ. औषधाचे प्रमाण आणि वेळा

१. प्रौढ व्यक्तींना ३ ते ५ गोळ्या दिवसातून ३ ते ४ वेळा द्याव्यात, तर लहान मुलांना २ ते ३ गोळ्या आणि नवजात बालकांना १ गोळी द्यावी.

२.  जुनाट रोगांमध्ये निवडलेले औषध योग्य त्या पोटॅन्सीमध्ये ३ ते ४ वेळा देणे. सर्वसाधारणपणे आरंभी काही काळ ६ x पोटॅन्सीचे औषध देऊन नंतर १२ x पोटॅन्सीचे औषध काही मास द्यावे.

३. तीव्र रोगांमध्ये (Acute diseases मध्ये) रोगाची तीव्रता जशी असेल, त्याप्रमाणे भागाची पुनरावृत्ती प्रत्येक २ घंट्यांनी, १ घंट्याने, अर्ध्या घंट्याने किंवा १५ मिनिटांनी लक्षणे न्यून होईपर्यंत करत जावी.

४. ही औषधे जेवणाच्या आधी अर्धा घंटा किंवा नंतर घ्यावीत.

५. दोनपेक्षा अधिक औषधे घ्यायची असतील, तर ती आलटून पालटून घ्यावीत. मुख्य औषध अगोदर देऊन नंतर दुसरे औषध द्यावे.

६. ही औषधे मिश्रण स्वरूपामध्येही उपलब्ध आहेत.’

(क्रमशः)

संकलक : होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे (१२.४.२०२५)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/948924.html