Crimson Crescent : सौदी अरेबिया इस्लामची ‘कट्टर’ ही प्रतिमा पालटणार ?

  • ‘क्रिमसन क्रिसेंट – द लास्ट क्वार्टर’ प्रसारित : माहितीपटातून विचारण्यात आला प्रश्‍न !

  • प्रसिद्ध पत्रकार मयंक जैन यांनी केले लेखन आणि दिग्दर्शन !

नवी देहली – ‘क्रिमसन क्रिसेंट – द लास्ट क्वार्टर’ नावाचा माहितीपट नुकताच प्रदर्शित झाला. राजधानीतील ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ येथे पावणे दोन तासांच्या या इंग्रजी भाषेतील माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले. ‘सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान (एम्.बी.एस्.) हे इस्लामी जगात सर्वांत महत्त्वपूर्ण वैचारिक परिवर्तन शांतपणे घडवून आणू शकतील का ?’, असा प्रश्‍न या माहितीपटात विचारण्यात आला आहे.अनेक दशके आफ्रिका, दक्षिण आशिया, तसेच दक्षिण पूर्व आशिया येथे मदरशांमधून कट्टर वहाबी विचारसरणी (वहाबी विचारसरणी ही कुराण आणि सुन्नत यांच्यातील मजकुराच्या शब्दशः अर्थांवर जोर देते.) प्रसृत करणारा सौदी अरेबिया आज एम्.बी.एस्. यांच्या नेतृत्वाखाली कट्टर इस्लाममध्ये सुधारणा करणार का ?, असा विचारही या माहितीपटातून प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्रकार मयंक जैन यांनी ठेवला आहे. ते या माहितीपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. या माहितीपटाचे प्रसारण रॉबर्ट स्पेंसर यांचे ‘जिहाद वॉच’, ‘संगम टॉक्स’, ‘सुदर्शन न्यूज’, नीरज अत्री यांची ‘पोलिटिकली इन्करेक्ट’, ‘अपवर्ड’, ‘पोलिटिकल अड्डा’ आदी विविध प्रसिद्ध यूट्यूब वाहिन्यांवरून करण्यात आले असून त्याला सहस्रो लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

मयंक जैन

अधिकाधिक लोकांपर्यंत ‘क्रिमसन क्रिसेंट’ माहितीपट पोचवण्याचे दिग्दर्शक मयंक जैन यांचे
हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आवाहन !

‘सनातन प्रभात’ने माहितीपटासंदर्भात श्री. मयंक जैन यांच्याशी संपर्क साधला. या वेळी जैन म्हणाले की, हा माहितीपट अधिकाधिक समाजापर्यंत पोचवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुढे यायला हवे. माहितीपट समाजजागृतीचे उत्तम माध्यम आहे. मी या माहितीपटासाठी दिवसरात्र एक करून कार्य केले आहे.

माहितीपटासंदर्भातील महत्त्वपूर्ण पैलू !

१. निओम : वाळवंटातील पालटाचा आरसा ?

वर्ष १९८९ मध्ये बर्लिनची भिंत पाडून साम्यवादी असलेली पूर्व जर्मनी आणि लोकशाही असलेली पश्‍चिम जर्मनी एक झाले. त्याप्रमाणे सौदी अरेबियाच्या वाळवंटात ‘निओम’ नावाची अतीमहत्त्वाकांक्षी नि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणारी ‘स्मार्ट सिटी’ बांधून सौदी अरेबिया कट्टर इस्लामच्या भिंतीला भेग पाडणार का ?, असा खोल प्रश्‍न या माहितीपटातून विचारण्यात आला आहे. या ‘स्मार्ट सिटी’च्या उभारणीवर तब्बल दीड ट्रिलियन डॉलर, म्हणजेच १३१ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. यामुळे वहाबी विचारसरणीच्या प्रसारणासाठी सौदी अरेबियाकडे पैसा राहिलेला नाही, असा दावा ‘क्रिमसन क्रिसेंट’द्वारे करण्यात आला आहे. जैन सांगतात की, यामुळे ‘निओम’ हे केवळ एक शहर न रहाता ते एक क्रांतिकारी साधन बनते, तसेच शांतता आणि तंत्रज्ञान यांना एकत्र बांधते.

२. विविध सर्वेक्षणांद्वारे मदरसे हिंसाचाराला कसे उत्तेजन देतात ?, यावर प्रकाश !

‘सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान

‘क्रिमसन क्रिसेंट – द लास्ट क्वार्टर’ एक कठीण प्रश्‍न विचारतो. तो म्हणजे – मदरशांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी धर्माच्या नावाखाली हत्या करण्याची शक्यता अधिक आहे का ? ‘कॉम्बॅटिंग टेररिझम सेंटर अँड इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुप’ने (आतंकवादाला तोंड देणारे केंद्र आणि आंतरराष्ट्रीय संकट गटा’ने) प्रसारित केलेल्या अहवालानुसार इंडोनेशियाच्या मदरशांमध्ये ९१ टक्के विद्यार्थ्यांनी धार्मिकदृष्ट्या प्रेरित मुसलमानेतरांच्या हत्येचे उघडपणे समर्थन केले. हे सर्व मुख्य प्रवाहातील इस्लामी मदरसे आहेत. ही हिंसाचारी मानसिकता वर्गापुरती मर्यादित नसून थेट भूमीवरील हिंसाचाराशी जोडली गेली आहे. माहितीपटात वर्ष २०२४ मध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी भारतातील १७ शहरांमध्ये मिरवणुकांवर झालेली १७ समन्वित आक्रमणे मदरशांतील कट्टरतावादी शिक्षणाचा पुरावा आहेत, असा दावा माहितीपटातून करण्यात आला आहे. हे अमूर्त अतिरेकी नसून शिक्षणाचे शस्त्र आहे.

३. मुसलमानच बळी !

जिहादी आतंकवादी आक्रमणांत मारल्या गेलेल्या लोकांपैकी ९१ टक्के हे मुसलमानच आहेत. यातून माहितीपट ‘इस्लामचे रक्षण करण्याचा दावा करणार्‍या विचारसरणीने खरेतर मुसलमान जगावरच खोल राजकीय, आध्यात्मिक आणि लोकसंख्याशास्त्रीय जखमा केल्या आहेत’, ही वस्तूस्थिती समोर आणतो.

४. उघूर नरसंहारावर इस्लामी जगताचे मौन म्हणजे नैतिक दायित्वाचे पतन ! 

माहितीपटातील सर्वांत मार्मिक भागांपैकी एक म्हणजे चीनच्या शिनझियांग प्रांतातील १ कोटीहून अधिक उघूर मुसलमानांना चिनी राजवटीकडून सहन कराव्या लागणार्‍या अनन्वित अत्याचारांवर मुसलमानबहुल देशांचे मौन ! माहितीपटात याला राजकीय चूक नाही, तर नैतिक दायित्वाचे पतन म्हटले आहे.

५. जिहादी आतंकवादामुळे भारताला झालेल्या हानीचे अवलोकन !

माहितीपटात ‘असोचेम’, ‘एशिया इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूट’ आणि ‘इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस’ या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिलेली आकडेवारी सांगितली आहे.

५ अ. एकट्या मुंबईतील २६/११ च्या आक्रमणामुळे भारताने ९ लाख कोटी रुपये गमावले : २६/११ च्या मुंबई आक्रमणामुळे भारताला १०० अब्ज डॉलर्सचा (९ लाख कोटी रुपयांचा) तोटा झाला. यात भारताने २० अब्ज डॉलर्सची (१.८ लाख कोटी रुपयांची) परकीय गुंतवणूकही गमावली.

५ आ. ‘पीपीपी’ स्तरावर अब्जाधी रुपयांचा तोटा : वर्ष २०१७ मध्ये आतंकवाद आणि सांप्रदायिक हिंसाचार यांमुळे भारताला ‘पीपीपी’च्या संदर्भात जवळपास १ ट्रिलियन डॉलर्सचा (८७ लाख ५० सहस्र कोटी रुपयांचा) तोटा झाला. हा आकडा ‘जीडीपी’च्या (सकल देशांतर्गत उत्पादनाच्या) अनुमाने ९ टक्के होता. वर्ष २०२० मध्ये ६४६ अब्ज डॉलर्स (५६ लाख २३ सहस्र कोटी रुपये) तोटा झाला. (पीपीपी म्हणजे पर्चेजिंग पॉवर पॅरिटी, म्हणजेच विविध देशांत अमुक वस्तू घेण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात ?, याचा अभ्यास करून त्या माहितीच्या आधारे चलनांची वस्तूनिष्ठ तुलना करण्याची पद्धत. यावरून देशाची आर्थिक उत्पादकता आणि रहाणीमान ठरवता येत असते.)

५ इ. सौदी अरेबिया हानीभरपाई करणार का ? : माहितीपटातून हा युक्तीवाद मांडण्यात आला आहे की, जर सौदी अरेबिया खरोखरच वहाबी विचारसरणीला यापुढे निधी पुरवणार नसेल, तरी गेल्या अनेक दशकांत या विचारसरणीमुळे भारताला झालेल्या हानीची भरपाई तो करणार का ?

६. ‘क्रिमसन क्रिसेंट’ २० वर्षांपूर्वीच्या ‘द बांगला क्रिसेंट’ माहितीपटाचा पुढील वैचारिक भाग !

‘क्रिमसन क्रिसेंट – द लास्ट क्वार्टर’ माहितीपट मयंक जैन यांनीच २ दशकांआधी दिग्दर्शित केलेल्या ‘द बांगला क्रिसेंट – आय.एस्.आय., मदरसे आणि घुसखोरी’ या माहितीपटाचा पुढील वैचारिक भाग आहे. ‘बांगला क्रिसेंट’ने काय घडणार, याची माहिती दिली होती, तर ‘क्रिमसन क्रिसेंट’ने काय घडले आणि आता शेवटी काय पालटत आहे, याचे दस्तऐवजीकरण केले आहे. निर्भय पत्रकारिता आणि सखोल ‘ग्राऊंड रिपोर्टिंग’ हे या दोन्ही माहितीपटांचे महत्त्वपूर्ण पैलू असल्याचे म्हणता येईल.

राजधानी देहलीतील एका मदरशात ‘काफीर’ शब्दाविषयी विचारणा केल्यावरून दिग्दर्शकाला धमक्या !

माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी दिग्दर्शक श्री. मयंक जैन यांनी हरियाणातील नूह, राजधानी देहलीतील सुंदरनगरी, तसेच बंगाल आणि आसाम येथील काही भागांत प्रवास केला. या वेळी त्यांनी घरे, मदरसे आणि शहराच्या अंतर्गत परिसरात कॅमेर्‍यातून संभाषणे टिपली. अनेक मुलाखतींमध्ये मदरशांतील विद्यार्थ्यांनी मुसलमानेतरांचा ‘काफीर’ (अल्लाला न मानणारे) म्हणून स्पष्ट उल्लेख केला, तसेच ‘दावत’ (दावाह, म्हणजेच मुसलमानेतरांना इस्लाममध्ये आमंत्रित करण्याचे कार्य) आणि ‘जिहाद’ (मुसलमानेतरांच्या विरोधातील युद्ध) यांविषयीही विद्यार्थी बोलले. सुंदरनगरी येथे जैन एका मदरशाच्या शिक्षकाची आणि विद्यार्थ्यांची ‘काफीर’च्या संकल्पनेवरून मुलाखत घेत असतांना गर्दी जमू लागते. लोक आरडाओरडा करू लागतात. त्यामुळे मुलाखत अचानक थांबवावी लागते. जमावाचा पवित्रा धमकीचा असला, तरी संदेश स्पष्ट असतो : ‘असे प्रश्‍न विचारता कामा नयेत’ या घटनेचे चित्रणही माहितीपटात दाखवण्यात आले आहे.

माहितीपट पहाण्यासाठी भेट द्या :