‘मुळात नक्षलवाद ही भारतातील संकल्पना आहे. पशुपती ते तिरुपती हा जंगलाचा पट्टा आहे. त्या जंगलातील आदिवासींना चिथावणी देऊन हिंसक कारवाया करणारा ‘माओवाद’ होय. त्यालाच दुसरे नाव ‘नक्षलवाद’ आहे. त्यांना शहरात राहून विविध माध्यमांतून साहाय्य करणारा उच्च शिक्षित वर्ग, म्हणजे ‘शहरी नक्षलवाद’ होय. ते जंगलातील नक्षलवाद्यांना आर्थिक किंवा न्यायालयीन साहाय्य करणे, प्रशासनात त्यांना अपेक्षित धोरणे राबवणे, तसेच प्रसारमाध्यमांमधून कथानक (नॅरेटिव्ह) सिद्ध करणे इत्यादी कामे करतात. बाह्यतः ते सामान्य लोकांसारखे दिसतात, सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरतात. शिक्षणव्यवस्था, न्यायव्यवस्था, मनोरंजन, उद्योग, सांस्कृतिक, इतिहास इत्यादी क्षेत्रांमध्ये शिरकाव करून ते त्यांना वाळवीसारखे पोखरून टाकतात. या क्षेत्रांमध्ये राहून त्यांच्या पदांचा वापर जंगलात रहाणार्या हिंसाचार्यांसाठी करतात आणि त्यांना संरक्षण देतात.

‘नक्षलवादा’च्या अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी आणि नक्षलवादाचे खरे स्वरूप उघड करण्यासाठी ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक पुणे येथील श्री. अभिजित जोग यांच्याशी वार्तालाप करण्यात आला. त्यावर आधारित लेख येथे देत आहोत.
शब्दांकन : श्री. भूषण कुलकर्णी, फोंडा, गोवा.
१. ‘क्लासिकल’ साम्यवाद आणि सांस्कृतिक साम्यवाद
अ. ‘क्लासिकल’ साम्यवाद : या यंत्रणेचे २ पदर आहेत. एक बंदुकीच्या नळीतून येणारा जंगलातील नक्षलवाद आणि दुसरा संभावितपणे; पण अतिशय धोकादायक असा शहरी नक्षलवाद. त्याला ‘अर्बन नक्षलवाद’, असेही म्हणतात. त्याच्या मुळाकडे गेलो, तर ‘क्लासिकल साम्यवाद’ आणि ‘सांस्कृतिक साम्यवाद’, असे २ प्रकार आहेत. मार्क्स, लेनिन, माओ यांनी जो साम्यवाद कार्यवाहीत आणला, त्याला आपण ‘क्लासिकल साम्यवाद’ म्हणू शकतो, तसेच त्याचे थोडक्यात ‘बंदुकीच्या नळीतून येणारी हिंसक क्रांती’, असेही वर्णन करू शकतो. समाजाला विविध गटांमध्ये विभाजित करायचे, एका गटाला ‘शोषक’ आणि दुसर्या गटाला ‘शोषित’ म्हणायचे, या दोन्ही गटांमध्ये सतत संघर्ष भडकवत ठेवायचा, त्या संघर्षातून अराजक निर्माण करायचे आणि त्यातून हिंसाचार माजवून विध्वंस करायचा, हा त्यांच्या विचारांचा मूळ गाभा आहे.

असे म्हणतात की, त्यांना सहस्रो वर्षांपासून निर्माण झालेली मानवी सभ्यता पूर्णपणे संपवून कोर्या पाटीवर नव्या समाजाची निर्मिती करायची आहे. हे ऐकायला चांगले वाटते; पण जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्यांना कोणतीही नवनिर्मिती करणे शक्य झाले नाही. ते केवळ एकच करू शकतात आणि ते म्हणजे अराजक किंवा हिंसाचार !
‘क्लासिकल’ साम्यवादामध्ये संघर्षाचा आधार हा आर्थिक आहे. ‘गरीब विरुद्ध श्रीमंत’, ‘भांडवलशाही विरुद्ध कामगार’ या आधारांवर ते संघर्ष निर्माण करतात. कालांतराने पाश्चिमात्य जगतातील इंग्लंड, अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी या देशांमध्ये भांडवलशाहीतून समृद्धी निर्माण झाली. त्या समृद्धीचा लाभ तेथील कामगारांना झाला. त्यांचे वेतन वाढून उत्पन्नात भर पडली. त्यामुळे त्यांनी साम्यवादाकडे पूर्णपणे पाठ फिरवली. लोकांचे उत्पन्न वाढले की, ते क्रांतीकडे वळत नाहीत, तेव्हा ‘आर्थिक आधारावर संघर्ष निर्माण करणे फार दिवस शक्य नाही’, असे त्यांच्या लक्षात आले.
आ. सांस्कृतिक साम्यवाद : साम्यवाद्यांना संघर्ष सतत भडकवायचा असतो. त्यासाठी त्यांनी ‘आर्थिक आधारापेक्षा सांस्कृतिक आधारावर संघर्ष पेटवत रहायचे’, ही संकल्पना शोधून काढली. पाश्चिमात्य जगातील जे शोषित, कामगार किंवा गरीब लोक आहेत, ते साम्यवादाकडे आकर्षित होत नाहीत; कारण ते पाश्चिमात्य सभ्यतेला त्यांची सभ्यता समजतात आणि तिला त्यांची संस्कृती समजतात, असे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी ‘जोपर्यंत आपण ही संस्कृती संपवत नाही, तोपर्यंत हे लोक आपल्याकडे आकर्षित होणार नाहीत’, असा सिद्धांत मांडला. ही संस्कृती संपवण्यासाठी त्यांनी तिला बळ देणार्या विविध संस्थांमध्ये घुसखोरी करून त्या आतून पोखरायचे ठरवले.

२. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत घुसखोरी करण्याचे साम्यवाद्यांचे धोरण
हे करण्यासाठी ते मानवी मनावर प्रभाव टाकू शकणार्या संस्थांमध्ये घुसखोरी करतात. पहिले शिक्षणव्यवस्था ! कारण माणसाचे मन हे शिक्षणव्यवस्थेतून घडते. दुसरे प्रसारमाध्यमे आणि तिसरे करमणूक ! प्रसारमाध्यमे, चित्रपट, नाटक, साहित्य यांतून व्यक्तीची मानसिकता घडत असते. पुढे प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांच्यात घुसखोरी करायची. त्यानंतर जवळपास जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत घुसखोरी करायची, ही त्यांची पद्धत आहे.
त्यांची अनेक तंत्र आहेत. मध्येच त्यांनी ‘पॉलिटिकली करेक्टनेस’ ही संकल्पना काढली, म्हणजे ‘तुम्ही त्यांना हवे ते बोलले की, ते राजकीयदृष्ट्या योग्य’. त्या बाहेरचा एकजरी शब्द आपण काढला, तरी ते आपल्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे या सर्व क्षेत्रांत प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांचा एवढा प्रभाव वाढलेला असतो की, त्या चौकटीच्या बाहेर गेले की, ते आपल्याला समाजाच्या परिघाच्या बाहेर फेकून देतात. आपली नोकरी जाईल किंवा बढती थांबवली जाईल. आपल्या विरोधात सामाजिक माध्यमांतून चळवळ राबवली जाईल आणि आपले सामाजिक अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न होईल. त्यांनी लिहून ठेवले, ‘आम्ही अनिर्बंध स्थलांतराला प्रोत्साहन देऊ.’ त्याचे परिणाम आपण युरोपमध्ये पहात आहोत. इस्लामी स्थलांतरामुळे तेथे सर्व संपत चालले आहे. या सर्व घातक गोष्टी आपोआप घडत नाहीत, तर हे सर्व जाणीवपूर्वक घडवण्यात येते.
३. सुधारणांच्या आडून हिंसा आणि संघर्ष निर्माण करणे
सांस्कृतिक साम्यवादाचे प्रकटीकरण, म्हणजे शहरी नक्षलवाद आहे. ही उच्चभ्रू लोकांची विचारसरणी आहे. शहरी नक्षलवादी हे अत्यंत उच्चशिक्षित लोक आहेत, उदा. न्यायालयात एका वेळी उभे रहाण्यासाठी ५ लाख रुपये घेणारे अधिवक्ते, राजदीप सरदेसाई यांच्यासारखे प्रसारमाध्यमांतील उच्चपदस्थ संपादक इत्यादी. शहरी नक्षलवाद अतिशय धोकादायक आहे. सध्या जंगलातील बंदुकीच्या नळीतून येणारा नक्षलवाद पुष्कळ आटोक्यात आलेला आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल, तर त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येते; पण शहरी नक्षलवादाकडे लक्ष दिले नाही, तर ते पुन्हा ती व्यवस्था निर्माण करू शकतात. त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठिंबा असतो. त्यांच्याकडे मोठी संपर्कयंत्रणा (नेटवर्कींग) असते. त्यामुळे ‘सांस्कृतिक साम्यवाद’ समजून घेणे आवश्यक आहे.
सुधारणावाद हा त्यांनी पांघरलेला मुखवटा असतो. त्यांना मुळात संघर्ष आणि विध्वंस करायचा असतो. लोकांनी त्यांना स्वीकारावे, यासाठी ते सामाजिक न्याय, पर्यावरणवाद, स्त्रियांचे अधिकार, सर्वसमावेशकता, सर्वांना समान न्याय, अशा विषयांचे मुखवटे लावतात. सध्या ‘ट्रान्सजेंडरिझम्’चे (लिंगपालटाचे) प्रचंड प्रमाणात उदात्तीकरण केले जात आहे. ‘ट्रान्सजेंडरिझम्’ ही भावना ०.०२ टक्के लोकांमध्ये नैसर्गिकरित्या असते; पण आता त्याचा वापर कुटुंबव्यवस्था मोडकळीस आणण्यासाठी करण्यात येतो. भारतातील उच्चभ्रू हे अमेरिकी लोकांची नक्कल करतात आणि उच्चभ्रू लोकांची नक्कल सामान्य लोक करतात. सांस्कृतिक साम्यवाद आणि शहरी नक्षलवाद एकच असून त्यांचा पाठिंबा हा हिंसक चळवळींना आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून धर्मावर आघात

‘शहरी नक्षलवाद’ हा सांस्कृतिक साम्यवादाचाच एक अविष्कार आहे. ‘संस्कृतीवर आक्रमण करणे’, हा सांस्कृतिक साम्यवादाचा मूळ उद्देश आहे. त्यातील धर्मावर आघात करणे, हा एक पैलू आहे. धर्म हा श्रद्धेवर चालतो; पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा कोण ठरवणार ?, हा मोठा प्रश्न आहे. ज्या उघड उघड अंधश्रद्धा आहेत, त्या थांबल्या पाहिजेत, उदाहरणार्थ मुलाचा बळी देणे इत्यादी. त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. अंनिसवाले अंधश्रद्धेपुरते मर्यादित असते, तर त्यांना कदाचित् सर्व समाजाने स्वीकारले असते; पण त्यांनी त्यांच्या चळवळीला समाजवादी चळवळीचे स्वरूप दिले आहे. समाजवाद हा साम्यवादी विचार आहे आणि साम्यवादी विचारांमुळे अराजक आहे. त्यामुळे साम्यवाद मान्य नसेल, तर समाज अंधश्रद्धा निर्मूलन समिती कशी मान्य करणार ? एखादी अराजकीय संघटना असेल आणि ती खर्याखुर्या अन् सर्व धर्मातील अंधश्रद्धांविरुद्ध चळवळ करत असेल, तर त्याला आपण मान्य करू शकतो. अंनिसच्या संदर्भात तसे म्हणू शकत नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची व्याख्या ठरवल्या गेली नाही. त्यामुळे ते धर्माच्याच मुळावर येते. ‘धर्म नष्ट करणे’, हेच त्यांचे उघड उद्दिष्ट आहे. त्यामुळे मनात शंका निर्माण होणारच आहे. साम्यवाद्यांनी उघडपणे सांगितले, ‘त्यांना धर्म संपवायचा आहे.’ त्यामुळे यांची चळवळही धर्म संपवण्याच्या दिशेने आहे का ?, ही शंका मनात येणे स्वाभाविक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही लोकांना ‘शहरी नक्षलवादी’ म्हणून कह्यात घेण्यात आले होते. जेव्हा ते म्हणतात की, ते समाजवादी आहेत, तेव्हा समाजवादी, साम्यवादी आणि नक्षलवादी हे दुसरेच होत जाते. एकदा विचार स्वीकारला की, तुम्ही त्याच्या कुठल्या स्तरापर्यंत जाल, हे सांगता येत नाही.
– श्री. अभिजित जोग
४. नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी पोलीस आणि सरकार यांना विशेषाधिकार देणारे कायदे आवश्यक !
नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात ‘जनसुरक्षा कायदा’ आणला आहे. न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव आहे. त्यामुळे विद्यमान कायदे काय आहेत आणि त्यातून कशी सुटका करून घ्यायची, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. जेथे साम्यवादी किंवा इस्लामी जिहादी यांचे राज्य आहे, तेथे लोकशाही औषधालाही नसते; पण लोकशाही देशातील कायदे आणि स्वातंत्र्य यांचा वापर करून त्याच लोकशाहीला नष्ट करण्यात ते पटाईत असतात.
लोकशाहीत तत्त्व आणि व्यक्तीस्वातंत्र्य यांचा लाभ कसा घ्यायचा, तसेच त्यातून लोकशाहीच नष्ट कशी करायची, याची योजना ते आखतात. त्यामुळे त्यांच्या निर्मूलनासाठी विद्यमान कायदे पुरेसे होतील, असे नाही. हे लक्षात घेऊन पोलीस आणि सरकार यांना विशेष अधिकार देणारे महत्त्वपूर्ण कायदे करणे आवश्यक ठरते. अशा कायद्यांविरुद्ध हेच लोक ‘लोकशाहीचा गळा घोटला’, ‘विशेष अधिकार कशाला हवेत ?’, अशी ओरड करतात. माध्यमांतही त्यांचेच प्रभुत्व असल्याने त्याला चांगली प्रसिद्धी मिळते. भारतीय प्रजासत्ताक नष्ट व्हावे, हे नक्षलवादाचे मुख्य उद्दिष्ट आहे. नक्षलवाद्यांची चळवळ ही साधी नसून राज्यघटना आणि प्रजासत्ताक यांच्या विरोधातील युद्ध आहे. युद्धात लोकशाही तत्त्व वगैरे लागू करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या गदारोळाला ठामपणे उत्तर देणे आवश्यक आहे.
५. देश आणि धर्म यांच्या विरोधात काँग्रेस अन् साम्यवादी यांचे समान धोरण
काँग्रेस पक्ष हा नेहमीच मध्यम मार्गाकडून थोडा साम्यवादाकडे झुकणारा होता; पण सोनिया आणि राहुल गांधी यांच्या काळात तो अतिरेकीपणे साम्यवादाकडे झुकला आहे. त्यामुळे आता साम्यवादी आणि काँग्रेस यांच्यात भेदच राहिला नाही. काँग्रेसमध्येही काही चांगले लोक आहेत; पण त्यांनाही गप्प बसावे लागते. ‘इंडी’ आघाडीत (विरोधी पक्षांची आघाडी) असल्यामुळे विरोधी पक्षांना राहुल गांधीच्या मागे फरफटत जाण्यापासून गत्यंतर नाही. सरकार किंवा मोदी यांना विरोध करणे, हे विरोधी पक्षाचे कामच आहे; पण देशाला विरोध करणे चुकीचे आहे. त्यामुळे मोदी आणि देश विरोध यांच्यातील सीमारेषा धुसर होत चालली आहे, असे दिसते.
६. साम्यवादी सामाजिक कार्यकर्त्यांचा देशाच्या आर्थिक प्रगतीत अडथळा !
‘नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्याचे कायदे अपुरे आहेत. त्यामुळे पाहिजे तेवढे यश मिळत नाही. या लोकांना आवरण्यासाठी विशेष कायदा हवा’, असे दिवंगत माजी गृहमंत्री रा.रा. पाटील यांनीही म्हटले होते. ‘तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांमुळे देशाचा ‘जीडीपी’ (सकल देशांतर्गत उत्पादन) २ ते ३ टक्क्यांनी न्यून होत आहे, तसेच साम्यवादी सामाजिक कार्यकर्ते हे देशाच्या प्रगतीतील सर्वांत मोठा अडथळा आहेत’, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही म्हटले होते. त्यामुळे जनसुरक्षा कायदा केल्याने नक्षलवादाला आळा घालण्यास निश्चित लाभ होईल. यापूर्वी ४ राज्यांनी असे कायदे केले आहेत. त्यामुळे तेथील माओवाद न्यून होण्यास साहाय्य झाले आहे.
शहरी नक्षलवादी समस्येवर उपाययोजना

‘सरकार त्यांचे असले म्हणून काय झाले, ‘सिस्टम’ (यंत्रणा) तर आमची आहे’, असा संवाद एका हिंदी चित्रपटात आहे. ही ‘सिस्टम’ त्यांनी १०० वर्षे प्रयत्न करून उभी केली आहे. आपण आता कुठे जागे होत आहोत, अजूनही संपूर्ण जागे झालेलो नाहीत. त्यामुळे आपल्यालाही सतत प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपली अतीतत्त्वनिष्ठता नडते. त्याचाही विचार होणे आवश्यक आहे. काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. त्यांच्याप्रमाणे आपलीही माणसे सर्व क्षेत्रांमध्ये असली पाहिजेत. त्यांनी सर्व गोष्टी कह्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तरही तशाच प्रकारे द्यावे लागेल. आता ‘परसेप्शन इज न्यू रिॲलिटी’ (धारणा ही नवीन वास्तव आहे), याला महत्त्व आहे. आपल्याला समज निर्माण करता आली पाहिजे. सर्वच क्षेत्रांत स्वतःची ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) सिद्ध करणे आवश्यक आहे.
यांची यंत्रणा कशी काम करते, याविषयी सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्त्या मोनिका अरोरा यांनी फार चांगले उदाहरण दिले. त्यांनी सांगितले, ‘एखादी घटना घडल्यानंतर त्यांचे काही लोक याचिका करण्याच्या मागे लागतात आणि १ सहस्र पानांची याचिका प्रविष्ट करतात. त्या लोकांचे तेवढेच काम असते, काही लोक सामाजिक माध्यम ‘एक्स’वर वादळ निर्माण करतात, तर काही विद्यापिठांमध्ये जाऊन निषेध नोंदवतात. त्यासाठी वलयांकित लोकांना पैसे देऊन बोलावतात, तर काही लोक रस्ते अडवतात. प्रत्येकाचे काम वेगवेगळ्या स्वरूपाचे असते. प्रत्येक जण ठरवून दिलेले काम करत असतो.’
त्यांच्यासारखी यंत्रणा उभी करता आली पाहिजे. प्रत्येक स्तरावर तज्ञ असले पाहिजेत. ही यंत्रणा आपल्याकडे नसल्याने निराश होण्याचे कारण नाही; कारण १०० वर्षे विरुद्ध ५-१० वर्षे असा हा सामना आहे. हे कार्य करण्यास वेळ लागणार आहे; पण त्यात सातत्य हवे. हा पल्ला गाठण्यासाठी त्यांनी १०० वर्षे काही पिढ्या खपवल्या. त्या पिढ्यांचेही मतपरिवर्तन केले. त्यांनी त्यांचे लढवय्ये निर्माण केले. त्याप्रमाणे आपल्यालाही लढवय्ये सिद्ध केले पाहिजेत !
– श्री. अभिजित जोग
७. शहरी नक्षलवादाचा भारताच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेला धोका
अनेक उच्चशिक्षित लोक शहरी नक्षलवादाकडे जोडले गेले आहेत. अनेक लोकांना वाटते की, ते सामाजिक न्यायासाठी काम करतात. ‘ट्रान्सजेंडरिझम्’ एवढा का पसरतो ? ते म्हणतात, ‘तृतीय पंथियांमध्ये भेद करू नका. त्यांना तुमच्यात सामावून घ्या.’ हे लोकांना पटकन पटते; पण ते खरच तृतीय पंथीय कि त्यांना तसे बनवले जाते ?, याचा कुणी विचार करत नाही. त्यांना ‘मी ट्रान्सजेंडर आहे’, हे म्हणायला भाग पाडले जाते.
८. अमेरिका आणि युरोपमधील देशांमध्ये यादवी युद्धाला प्रारंभ
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या आंदोलनजीवीप्रमाणे हे कलहजीवी लोक आहेत. समाजात सतत कलह किंवा संघर्ष पेटत राहिला पाहिजे, असे त्यांना वाटते. संघर्ष, अराजक, हिंसाचार आणि विध्वंस ही त्यांची पद्धत आहे. या ४ गोष्टींना प्रोत्साहन मिळत असेल, तर त्यातून देशाला धोका निर्माण होणार आहे. अमेरिकेसारखा शक्तीशाली देश आज १०० टक्के विभाजित झाला आहे. ५० टक्केच लोक म्हणतात, ‘ते उर्वरित लोकांसमवेत राहू शकत नाहीत.’ उर्वरित लोक म्हणतात, ‘ते या लोकांसमवेत राहू शकत नाहीत.’ थोडक्यात पाहिले, तर अमेरिकेत ट्रम्प समर्थक आणि विरोधक असे २ तट पडले आहेत. या संघर्षातून हा देश संपणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक देश विभाजित करण्यात येत आहे. आता युरोपमध्ये स्थलांतरित झालेले लोक दंगे करत असतात. त्यामुळे फ्रान्स आणि इंग्लंड यांसारख्या शक्तीशाली देशांची वाट लागली आहे. आता लंडनचा महापौर मुसलमान आहे. उद्या कदाचित् न्यूयॉर्कचाही महापौर मुसलमान होईल. इंग्लंडमधील अनेक शहरांचे महापौर मुसलमान आहेत. तेथे त्यांना पुष्कळ अधिकार आहेत. मुसलमान व्यक्ती महापौर बसला की, तो त्यांची संख्या आणखी वाढवत असतो. त्यामुळे हे चक्र असून ते अंताकडेच घेऊन जाणार आहे. त्याचा प्रारंभ झाला आहे.
९. हिंदु धर्मावरील साम्यवादी आक्रमणावर उपाययोजना
ज्यांनी मुलांना धर्म समजावून सांगायचा आहे, त्यांना आधी समजून घेतले पाहिजे. आपल्याकडे दुर्दैवाने आईवडिलांनाच धर्माविषयी काही माहिती नाही. हिंदूंनी गेल्या ६०-७० वर्षांपासून धर्म, संस्कार आणि धर्मग्रंथ सोडून दिले आहे. ‘धर्मग्रंथांचे वाचन करणे किंवा त्यांना मानणे, म्हणजे प्रतिगामीत्व किंवा जुनाटपणा आहे आणि ते सोडून देणे, म्हणजे पुरोगामित्व अन् आधुनिकता आहे’, असे सांगण्यात आले. हे आजचे नाही, तर गेल्या अनेक वर्षांपूर्वीपासून हा विचार रुजवण्यात येत आहेत, ‘आधुनिक बनायचे असेल, तर जुने सोडून द्या.’ हे काटे फिरवायचे असतील, तर त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी नवीन पिढीतील आईवडिलांना खरा धर्म, संस्कृती माहिती करून देणे आवश्यक आहे.
नक्षलवाद संपला, असे समजणे धोकादायक !

‘नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, म्हणजे तो संपला’, असे गृहीत धरणे अतिशय धोकादायक ठरेल; कारण हे लोक कधीच संपणार नाहीत. ते रक्तबिजासारखे आहेत. एक रक्ताचा थेंब पडल्यावर त्यातून अनेक राक्षस निर्माण होत होते, तसे ते आहेत. वर्ष १९९१ मध्ये सोव्हिएत संघ कोसळला, तेव्हा सर्वांना ‘साम्यवाद संपला’, असे वाटले होते; पण तसे झाले नाही. फ्रान्सिस फुकीयामा नावाचा एक लेखक आहे, त्याने ‘एन्ड ऑफ हिस्ट्री अँड द लास्ट मॅन’, असे पुस्तक लिहिले. त्याच्या मते दोन विचारसरणीमध्ये संघर्ष होतो, तेव्हा इतिहास निर्माण होतो. तो म्हणतो, ‘सर्व विचारसरणी संपल्या आहेत. आता पाश्चिमात्य, लोकशाही, उदारमतवाद आणि खुली अर्थव्यवस्था याच विचारसरणी शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यामुळे यापुढे त्यांचेच राज्य चालणार आहे. ते किती चुकीचे आहे’, हे दिसत आहे.
आता भांडवलशाहीचे माहेरघर असलेल्या अमेरिकेतील समाज संपूर्णपणे साम्यवाद्यांच्या कह्यात गेला आहे. इतके धोकादायक लोक आहेत ते. शासनकर्त्यांनी कदाचित् नक्षलवाद संपला, असे घोषित केले, तरी समाजातील विचारवंतांनी ते खरे समजता कामा नये. यामागील विचार संपवायला हवा आणि तो पराभूत केला पाहिजे. त्यांचे विचार अद्यापही शक्तीशाली आहेत. त्यांना वाटते की, हे लोक सामाजिक न्यायासाठी करतात.
– श्री. अभिजित जोग
१०. भांडवलशाही आणि साम्यवाद यांमुळे संकटात सापडलेल्या जगाला वाचवण्याची क्षमता केवळ हिंदु धर्मात !
सध्या जगासमोर भयंकर प्रश्न उभे आहेत. डावा आणि उजवा विचार किंवा भांडवलशाही अन् साम्यवाद हे अयशस्वी झाले आहेत. जगासमोरील प्रश्न सोडवण्यात भांडवलशाही अयशस्वी ठरली आहे. गळेकापू स्पर्धा, पर्यावरणाचा विध्वंस, ओरबाडून घेण्याची वृत्ती या भांडवलशाही वृत्तीमुळे जगासमोर फार मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. यासमवेतच साम्यवादी विचारांपासूनही प्रचंड मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात व्यक्ती स्वातंत्र्य गमावतो, तसेच गरिबी आणि भूक यांखेरीज काहीच मिळत नाही. त्यातून हिंसा आणि अराजकता हेच निर्माण होत आहे. आज सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. ‘डीप स्टेट’ (जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशाचे सरकार आणि त्या देशाची अर्थव्यवस्था स्वतःच्या मुठीत ठेवण्यासाठी धडपडणारा प्रभावशाली लोकांचा गट) आणि सांस्कृतिक साम्यवाद या उच्चभ्रू लोकांच्या ‘इन्स्टिट्यूशन्स’ झाल्या आहेत. त्या दोघांची एकमेकांशी युती आहे. सर्वसामान्य लोकांना त्यांचा वाली उरला नसल्याचे वाटत आहे. अनेकांना ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता), ‘बायोटेक्नॉलॉजी’ यांमुळे आपल्या नोकर्या जातील का ?, हा प्रश्न भेडसावत आहे.
‘कोविड’सारखी महामारी मुद्दाम आणली गेली का ?; कारण जगाची लोकसंख्या १५ टक्क्यांनी न्यून झाली पाहिजे, असे ‘डीप स्टेट’चे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी नवनवीन महामार्या आणि युद्ध चालू केले असेल तर ? इस्रायल-पॅलेस्टाईन, रशिया-युक्रेन, व्हिएतनाम-कंबोडिया-थायलंड अशी युद्धे चालू असून एका पाठोपाठ एक युद्धे भडकत चालली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मनुष्य हवालदिल झाला आहे. हिंदु संस्कृतीत सांगितले आहे, ‘जेव्हा लोक आपला धर्म सोडतात, तेव्हा ‘मत्स्यन्याय’ येतो, म्हणजे मोठे मासे लहान माशांना खातात.’ तशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून जगाला बाहेर काढण्याची शक्ती केवळ हिंदु धर्माच्या विचारांमध्ये आहे.
संस्कृती संपवण्यासाठी कुटुंबव्यवस्था, धर्म आणि देशप्रेम यांच्यावर आक्रमण

वर्ष १९२० च्या दशकात साम्यवाद्यांनी लिहून ठेवले, ‘या संस्थांमध्ये आम्ही घुसखोरी करू आणि त्या संस्थांना हळूहळू आतून पोखरून टाकू. एक दिवस या सगळ्या संस्था कोसळून पडतील आणि त्याच्यासमवेत संस्कृतीही कोसळून पडेल.’ त्याला त्यांनी ‘लाँगमार्च थ्रू द इन्स्टिट्यूशन्स’ हे नाव दिले. कम्युनिस्ट पक्षाचा ॲन्टोनिओ ग्राम्सकी नावाचा एक अध्यक्ष होऊन गेला. त्याने हा सिद्धांत मांडला. ‘हे प्रदीर्घ काळ चालणारे आहे’, हेही त्याने सांगितले होते. त्याने सांगितले, ‘ही बंदुकीच्या गोळीतून येणारी रक्तरंजित क्रांती नसेल, तर हळूहळू ‘स्लो पॉयझन’ देऊन त्यांना संपवून टाकू.’
संस्कृतीला बळ देणार्या संस्थांमध्ये ‘कुटुंबव्यवस्था’ ही सर्वांत मुख्य संस्था आहे. घरामध्ये किंवा कुटुंबात व्यक्तीवर संस्कार होतात. या संस्कारांमधून संस्कृतीचा जन्म होतो. ‘कुटुंबव्यवस्था नष्ट झाली, तर संस्कृती संपणार आहे’, हे माहिती असल्याने कुटुंबव्यवस्था संपवण्यावर त्यांचा अधिक भर आहे. दुसरी आहे धर्मसंस्था ! संस्कृती धर्मावर आधारित असल्यामुळे धर्मसंस्था संपवण्याकडे त्यांचा कल असतो. ते पाश्चिमात्य जगामध्ये ख्रिश्चॅनिटीवर आणि भारतामध्ये हिंदुत्वावर आक्रमणे करतात.
ते संस्कृतीतील मुख्य धारेवर (‘मेन स्ट्रीम कल्चर’वर) आक्रमण करतात, तसेच परिघाबाहेरील लोकांना चिथवतात, ‘तुम्ही सांस्कृतिकदृष्ट्या शोषित आहात. सांस्कृतिक शोषण हे अमूर्त (इंटँजिबल) असते आणि आर्थिक शोषण हे मूर्त (टँजिबल) असते. एखाद्या २५ सहस्र वेतन असलेल्या दलिताला ‘तू दलित आहेस; म्हणून ते तुझ्याशी वाईट वागतात. तुझ्याकडे पैसे आहेत; पण तू दलित आहेस; म्हणून हे तुला महत्त्व देत नाहीत’, असे सांगितले की, त्याला ते पटायला लागते. मग तो त्याचा कुठे अपमान होतो, हे शोधायला लागतो आणि त्याला खरेच वाटायला लागते की, त्याचा अपमान होत आहे.
या प्रकारातून शोषक आणि शोषित यांच्यातील ‘फिनामेनॉन’ (घटना) कधी संपतच नाही. आर्थिक आधारावर तो संपतो; पण त्यातील शोषक-शोषित हे नातेसंबंध कधीच संपत नाहीत. जे तथाकथित शोषित आहेत, त्यांच्या मनात सतत पीडित असल्याची मानसिकता निर्माण करायची, हा त्यांचा प्रयत्न असतो. ‘तू शोषित आहे’, हे सांगितले की, त्याला ‘मी या सामाजिक व्यवस्थेचा पीडित आहे’, हे पटायला लागते. यासह ते तथाकथिक शोषकांमध्ये ‘अपराधी’ भावना निर्माण करतात. त्यामुळे सर्व समाजच कमकुवत होतो. निम्मे लोक अपराधित्वाची भावना घेऊन जगतात आणि निम्मे लोक पीडित्वाची मानसिकता घेऊन जगतात. अशा प्रकारे समाज पंगू झाला की, साम्यवाद्यांना उद्दिष्ट साध्य करणे शक्य होते.
ही गोष्ट त्यांनी वर्ष १९२० च्या दशकातच लिहून ठेवली आहे. त्याप्रमाणे सर्व सुनियोजितपणे घडवले असून वर्ष २०२० पर्यंत पाश्चात्त्य सभ्यता ही अक्षरश: कोसळण्याच्या मार्गावर पोचली आहे. तेथील सामाजिक आणि कुटुंब व्यवस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पाश्चात्त्य जगतात चर्चमध्ये कुणी जात नाही. चर्च ओस पडत चालली आहेत. तेच आता भारतात करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या उदाहरणातून आणि अनुभवातून आपण शिकलो नाही, तर आपल्याला आपल्या व्यवस्थेचा बळी देऊन हे शिकावे लागणार आहे. हे व्हायचे नसेल, तर आपण त्यातून काहीतरी शिकणे आवश्यक आहे. हा आहे सांस्कृतिक साम्यवाद !
वर्ष १९२० ला याचा प्रारंभ झाला. कार्ल मार्क्सने तेव्हा सांगितले होते की, जेथे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले आहे, अशा देशांमध्ये (इंग्लंड आणि जर्मनी येथे त्या वेळी सर्वाधिक औद्योगिकीकरण झाले होते.) क्रांती होईल; पण तसे काहीच झाले नाही. रशियात जमीनदारी अर्थव्यवस्था होती. मार्क्सने असेही सांगितले होते, ‘देशादेशांमधील सीमा नष्ट होतील. सर्व देशांतील कामगार एकत्र येतील आणि ते भांडवलशाही नष्ट करतील.’ तसेही काही झाले नाही. प्रथम आणि दुसर्या महायुद्धात अमेरिका, इटली, जर्मनी, फ्रान्स या सर्व देशांतील कामगार त्यांच्या देशांसाठी लढले. त्यांनी त्यांच्या देशासाठी प्राणही दिले. याचा साम्यवाद्यांनी विचार केला, तेव्हा हे लोक साम्यवादी क्रांतीसाठी सिद्ध होत नाहीत; कारण ते पाश्चात्त्य संस्कृतीला त्यांची संस्कृती समजतात, असे त्यांच्या लक्षात आले.
हेच त्यांना भारताविषयीही वाटते. भारतातील हिंदु संस्कृती संपत नाही, तोपर्यंत भारतीय लोक साम्यवादाला स्वीकारणार नाहीत. त्या त्या देशातील मुख्य धारेतील संस्कृती संपवणे, हीच पद्धत त्यांची सगळीकडे आहे. त्यासाठी ते आपल्या संस्कृतीविषयी भ्रम किंवा प्रश्न निर्माण करतात. उदा. भारतात प्रभु श्रीरामाची पूजा का करायची ? तो पुरुषसत्तावादी होता. त्यामुळे त्याने सीतेचा त्याग केला. याला उत्तर आहे; पण याविषयी आपल्या आईवडिलांनाच माहिती नसल्याने त्यांची मुलेही याचे उत्तर देऊ शकत नाहीत. त्याला समाधानकारक उत्तर दिले नाही, तर त्यांना ते पटायला लागते. याला तरुण पहिले फसतात.
‘देशविरोधी भावना निर्माण करणे’, हे साम्यवाद्यांचे उद्दिष्ट असते. ‘अमेरिकेची ओळख केवळ गुलामगिरी आहे’, असे तेथील तरुणांना सांगितले गेले. त्यामुळे ‘आपल्या देशाचे हे काही योग्य नाही’, असे त्यांना वाटू लागले. अमेरिकींनी आफ्रिकेतील लोकांना गुलाम म्हणून राबवले असेल; पण त्यांची तेवढीच चूक नाही. त्यांनी इतरही चांगल्या गोष्टी केल्या आहेत. भारतात साम्यवादी हे ‘जातीयवाद, पुरुषसत्ताक पद्धत, अल्पसंख्यांकांवर अत्याचार, ही आपली ओळख आहे’, असे सांगतात. अनेक भारतीय तरुणांना हे खरे वाटायला लागते. उच्चनीचतेची भावना यावरच आपला देश आधारित आहे, असे त्यांना वाटते. हा विचार काही लोकांच्या डोक्यात भिनवला की, नंतर तो संपूर्ण देशात पसरवला जातो. अशा प्रकारे कुटुंबव्यवस्था, धर्म आणि देशप्रेम संपवले की, संस्कृती संपते.
– श्री. अभिजित जोग
हिंदु धर्मात ‘प्रत्येकाने आपले कर्तव्य सदाचाराने आणि नैतिकतेने पार पाडणे, म्हणजे धर्म’, असे म्हटले आहे. जोपर्यंत ही नैतिकता नाही, तोपर्यंत जगाचे प्रश्न सुटणार नाहीत. ही नैतिकता देण्याची शक्ती केवळ भारताकडे किंवा हिंदु परंपरेत आहे, हे लोकांना सांगता आले पाहिजे आणि त्यांचा त्यावर विश्वास बसला पाहिजे. आज हा विश्वास बसण्यासारखी परिस्थिती आहे; पण ते आपल्याला पटवून देता आणि स्पष्ट करता आले पाहिजे. जेव्हा आपण लोकांना ‘साम्यवादाच्या नादाला लागून काय झाले ?’, ‘जगात एकतरी देश आहे का, ज्याची साम्यवादाने प्रगती झाली ?’, ‘लोकांना समाधान मिळाले किंवा तो देश भरभराटीला गेला का ?’, ‘त्यांच्या विचारसरणीत तथ्य असेल, तर एकतरी उदाहरण दाखवा’, असे विचारू, तेव्हा त्यांना पटेल. भांडवलशाहीमुळे अनेक देशांमध्ये सुबत्ता आली खरी; पण मानसिक शांती मिळाली नाही. सर्व निराश आणि घाबरलेले आहेत. त्यामुळे कधी नव्हे, एवढे हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात येत आहे. ‘केवळ भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला वाचवण्याची शक्ती हिंदु संस्कृतीत आहे’, हे आपण अतिशय आत्मविश्वासाने मांडले पाहिजे आणि हे घराघरांतून झाले पाहिजे. सर्व विचारसरणी अयशस्वी झाल्या असून त्याला ‘हिंदु धर्म हे एकच उत्तर’ आहे. घराघरांत धर्माचरण पोचले पाहिजे. त्यासाठी आधुनिक साधनांचा वापर झाला पाहिजे. साम्यवादाचा प्रश्न भयावह असल्याने तो सोडवण्याचा प्रयत्नही मोठ्या स्तरावर होणे आवश्यक आहे.

भारतात जातीव्यवस्था ही व्यवसायावर आधारित होती, तेव्हा ती फार मोठी शक्ती होती. भारत १ सहस्र वर्षे महाशक्ती होता. त्याचे मूळ जातीव्यवस्थेत होते. पिढ्यान्पिढ्या काम केल्याने त्यात कौशल्य निर्माण होत होते. भारत जागतिक दर्जाचे लोखंड निर्माण करायचा. जन्मावर आधारित जातीव्यवस्था चुकीची आहे. स्त्रियांना साम्यता देणारा भारत हा एकमेव देश होता. पूर्वीच्या काळी स्त्री आणि पुरुष बरोबरीने वाद-विवाद करायचे. ही खरी हिंदु संस्कृती आहे.’
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, कोथरुड, पुणे.

दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !