Chhattisgarh Hindu Rashtra Adhiveshan : छत्तीसगडमध्ये कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू करणार ! – विष्णुदेव साय, मुख्यमंत्री, छत्तीसगड

  • छत्तीसगडमध्ये राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

  • अधिवेशनाला २५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, संत आणि धर्मप्रेमी उपस्थित

डावीकडून पू. अशोक पात्रीकर, श्री. रणजीत सावरकर, पू. रामबालकदास महात्यागी महाराज, पू. युधिष्ठिरलाल महाराज, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय, महामंडलेश्वर सर्वेश्वर दास महाराज व श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमधील धर्मांतराची वाढती समस्या रोखण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. येत्या विधानसभेत कठोर धर्मांतरविरोधी कायदा सादर करून तो कार्यान्वित करण्यात येईल. तसेच नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्याचा आमचा निर्धार आहे, असे आश्‍वासन छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी येथे दिले. ते पूज्य शदानी दरबार तीर्थ (रायपूर) आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलै या दिवशी येथे आयोजित छत्तीसगडमधील राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलत होते. या अधिवेशनाला राज्यातील २५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, संत, धर्मप्रेमी नागरिक, अधिवक्ता, व्यापारी आणि राजकीय नेते उपस्थित होते.

डावीकडून पू. रामबालकदास महात्यागी महाराज, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय, पू. युधिष्ठिरलाल महाराज व महामंडलेश्वर सर्वेश्वरदास महाराज

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या भाषणातील महत्त्वाची सूत्रे 

छत्तीसगडमध्ये धर्मांतरविरोधी कायद्याचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. येत्या विधानसभेत तो मांडण्यात येणार.

मुख्यमंत्री विष्णुदेव साय

१. छत्तीसगड राज्यातील मंदिरांचा जीर्णोद्धार व्हावा, यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात आर्थिक साहाय्य करत आहे.

२. भाजप सत्तेत येण्याआधी राज्यातील गोशाळांना प्रतिदिन २५ रुपये अनुदान देण्यात येत होते. ते वाढवून आता ३५ रुपये करण्यात आले आहे.

३. मोकाट गायींचे संगोपन करण्यासाठी सरकार कार्यरत आहे.

हिंदु राष्ट्र अधिवेशनात उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर मंडळी

कार्यक्रमात पू. युधिष्ठिरलाल महाराज, पू. रामबालकदास महात्यागी महाराज, महामंडलेश्‍वर सर्वेश्‍वरदास महाराज, पू. वेदप्रकाशाचार्य महाराज, सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर या संत-महंतांसह सर्वश्री प्रबल प्रताप सिंह जूदेव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच स्वा. सावरकर यांचे नातू तथा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी त्यांचे विचार मांडले.

डावीकडून पू. युधिष्ठिरलाल महाराज, पू. रामबालकदास महात्यागी महाराज, पू. अशोक पात्रीकर, श्री. रणजीत सावरकर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय, महामंडलेश्वर सर्वेश्वर दास महाराज, श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव व श्री. सुनील घनवट

गजवा-ए-हिंदला प्रत्युत्तर देण्यासाठी भगवा-ए-हिंद चळवळ राबवणे आवश्यक ! – सुनील घनवट

श्री. सुनील घनवट

छत्तीसगडमधील नक्षलवाद मार्च २०२६ पर्यंत संपवणार असल्याचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी घोषित केले आहे. सरकारने पावले उचलल्यामुळे नक्षलवाद आटोक्यातही येत आहे. यासाठी मी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे अभिनंदन करतो. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद हळूहळू आटोक्यात येत असला, तरी ‘शहरी नक्षलवाद’ अजूनही समाजात अस्तित्वात आहे. धर्मांतर करणार्‍या शक्ती आणि नक्षलवादी विचारसरणी यांच्यात भेद नाही. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून कठोर धर्मांतरविरोधी कायदा त्वरित लागू करणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद, गोहत्या, हलाल जिहाद यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे हाच एकमेव पर्याय आहे. छत्तीसराज राज्यात हिंदु राष्ट्राची चळवळ जोर धरत आहे. देशात धर्मांध आणि देशविघातक शक्ती यांच्याकडून लागू करण्यात आलेल्या ‘गजवा-ए-हिंद’ला (भारताचे इस्लामिस्तान करणे) प्रत्युत्तर देण्यासाठी भगवा-ए- हिंद जी चळवळ राबवणे आवश्यक आहे.

संस्कृती आणि धर्म यांचे रक्षण करणे, हाच राजधर्म ! – प्रबल प्रताप सिंह जूदेव

श्री. प्रबल प्रताप सिंह जूदेव

गोवा येथे पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मुळे हिंदूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे. राज्यातील बस्तरमध्येही लवकरच धर्मांतरित हिंदूंना स्वगृही आणण्याचा (घरवापसीचा) उपक्रम प्रारंभ केला जाईल. तसेच ‘छद्म हिंदूं’ना (वाईट हेतूने कार्यरत असलेल्या जन्महिंदूंना) उघड करण्यासाठीही कायदा लागू केला पाहिजे.

प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी स्वर्गीय दिलीपसिंह जूदेव यांच्या घरवापसी मोहिमेचा उल्लेख करत, ‘संस्कृती आणि धर्म यांचे रक्षण करणे, हाच राजधर्म आहे’, असे ठामपणे सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांचा अधिवेशनात सन्मान करण्यात आला. पू. अशोक पात्रीकर यांनी त्यांना श्रीकृष्ण प्रतिमा भेट दिली. श्री. सावरकर यांनी महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात चालू केलेल्या ‘ॐ प्रमाणपत्र’ मोहिमेची माहिती दिली आणि ही चळवळ छत्तीसगडमध्येही चालू होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

धर्मांतरविरोधी कायद्यावर परिसंवाद

‘धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात श्री. सुनील घनवट, पत्रकार योगेश मिश्र, माजी पोलीस महासंचालक श्री. सुशील द्विवेदी, अधिवक्ता आशीष शर्मा आणि श्री. कमल बिस्वाल यांनी मार्गदर्शन केले. कायदा लागू होईपर्यंत सातत्याने कार्य करत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

छत्तीसगडमधील विविध समस्या सुटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिंदूंच्या हिताचा कायदा आणावा ! – पू. रामबालकदास महात्यागी महाराज

पू. रामबालकदास महात्यागी महाराज

हिंदु जनजागृती समिती राष्ट्रजागृतीचे कार्य करीत आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राची चळवळ राष्ट्रव्यापी झाली आहे. याचा मी साक्षीदार आहे. समितीचे प्रेरणास्थान असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची मी भेट घेतली आहे. त्यांच्या प्रेरणेने राज्यात कार्य होत आहे. राज्यात गोरक्षकांवर आक्रमणे होत आहेत, तसेच धर्मपरिवर्तनाची समस्याही सुटलेली नाही. राज्यात धर्मांतरविरोधी कायदा अद्याप लागू झालेला नाही. संत समाज राजसत्तेकडे मागणी करत नसून आम्ही आदेश देत आहोत की, या सर्वांच्या समस्या सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा आणावा.

हिंदूविरोधी कारवाया रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! – सुशील द्वीवेदी, निवृत्त पोलीस महासंचालक, छत्तीसगड

राज्यात हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकार घडत आहेत. त्यासाठी हिंदुविरोधकांनी इकोसिस्टीम (एखादी विचारसरणी पद्धतशीरपणे पुढे रेटणारी यंत्रणा) कार्यरत आहे. अशा हिंदुविरोधी कारवाया रोखण्यासाठी हिंदूंची व्यवस्थाही निर्माण करणे आवश्यक आहे. छत्तीसगडमधील हिंदूविरोधी कारवाया रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हिंदुत्वाच्या कार्यासाठी शदानी दरबारचे द्वार नेहमीच खुले ! – पू. युधिष्ठिरलाल महाराज

पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज

पू. युधिष्ठिरलाल महाराज यांच्या वतीने त्यांचे भक्त, तसेच राज्य मीडिया प्रमुख श्री. अमित चिमनानी यांनी विचार मांडले. शदानी दरबार हे हिंदुत्वाच्या कार्यासाठी सदैव खुला आहे. हिंदुत्वाचे कार्य निश्‍चितपणे विश्‍वव्यापी झाल्याविना रहाणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या माध्यमातून चालू झालेले हे अभियान पुढे वाढत जावे, हीच अपेक्षा !

क्षणचित्रे

मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे अधिवेशनाला २ घंटे उपस्थित होते. त्यांनी आपुलकीने सर्व माहिती जाणून घेतली.

डावीकडून पू. युधिष्ठिरलाल महाराज, पू. रामबालकदास महात्यागी महाराज, पू. अशोक पात्रीकर, श्री. रणजीत सावरकर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय, महामंडलेश्वर सर्वेश्वर दास महाराज, श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव व श्री. सुनील घनवट

मुख्यमंत्री विष्णुदेव साय करत असलेल्या हिंदुत्वाच्या उल्लेखनीय कार्याविषयी सनातन संस्थेचे धर्मप्रचाक पू. अशोक पात्रीकर यांनी त्यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार केला.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय संबोधित करतांना

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांच्या भाषणामध्ये राज्यातील जशपूर येथील धर्मांतराच्या कारवायांविषयी माहिती दिली. मुख्यमंत्री साय यांनी त्यांच्या भाषणात ही वस्तूस्थिती असल्याचे सांगून ‘हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे’, असे सांगितले.

राज्यातील ३०-३५ धर्मप्रेमींनी सक्रीयपणे अधिवेशनाच्या आयोजनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी श्री. आशीष परिडा, श्री. रोहित सिंह आणि श्री. कमल बिस्वाल यांचे विशेष साहाय्य लाभले.

अधिवेशनात धर्मशिक्षण फलक, अध्यात्म, आयुर्वेद आणि राष्ट्ररक्षा विषयक ग्रंथांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.