
नागपूर – येथील श्री. वासुदेव घुगल (वय ७७ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे आनंदवृत्त सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी १३ जुलै या दिवशी त्यांच्या निवासस्थानी दिले. या वेळी सनातन संस्था निर्मित शिवाची प्रतिमा देऊन पू. पात्रीकरकाका यांनी त्यांचा सत्कार केला. पातळी घोषित केल्यानंतर घुगलकाकांचा भाव जागृत झाला होता. या वेळी श्री. वासुदेव घुगल यांच्या पत्नी सौ. शारदा घुगल उपस्थित होत्या, तसेच फोंडा, गोवा येथून सौ. वैशाली धवस (मुलगी), श्री. जितेंद्र धवस (जावई) आणि श्री. अनिकेत धवस (नातू) हे ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे जोडलेले होते.
श्री. वासुदेव घुगल यांचे मनोगत !
‘केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मला हा क्षण अनुभवता आला. त्यामुळे मी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे’, असे घुगलकाकांनी सांगितले.
श्री. वासुदेव घुगल यांची कुटुंबियांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

१. सौ. वैशाली धवस (श्री. वासुदेव घुगल यांची मुलगी), फोंडा, गोवा.
एकदा माझे वडील श्री. वासुदेव घुगल (वय ७७ वर्षे) आणि आई सौ. शारदा घुगल (वय ६८ वर्षे) हे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या ५ दिवसांच्या कार्यशाळेत प्रथमच सहभागी झाले होते. कार्यशाळेनंतर त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी गुरुदेवांनी त्यांना रामनाथी आश्रमातच येऊन रहाण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्या मनात गोव्यात निवासाला येऊन पूर्णकालीन साधना करण्याचे विचार येत होते; मात्र त्याविषयी योग्य निर्णय घेता येत नव्हता.
नंतर काही मासांनी पुन्हा एकदा त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी गुरुदेवांशी बोलतांना माझ्या वडिलांनी सांगितले, ‘‘माझी पूर्णकालीन साधना करण्याची इच्छा आहे; मात्र निर्णयक्षमता नसल्याने मला योग्य निर्णय घेता येत नाही.’’ ते ऐकून गुरुदेव म्हणाले, ‘‘हे साधकत्वाचे लक्षण आहे. जेव्हा आपण मनाने ‘काय करायचे ?’ हे ठरवतो, तेव्हा तेथे अहं असतो; मात्र जेव्हा ‘काय करायचे ?’, हे लक्षात येत नाही, तेव्हा आपण इतरांना विचारून निर्णय घेतो, हेच साधकत्व आहे.’’
त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला माझ्या आई-वडिलांचे छायाचित्र काढून त्यांची गुणवैशिष्ट्ये लिहून द्यायला सांगितली. त्यानुसार माझ्या वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहे.
१ अ. शिवभक्त असणे : माझे वडील शिवभक्त असून ते नेहमी शिवाचा नामजप आणि स्तोत्रपठण करतात. दिवसातून काही वेळ ते दत्ताचाही नामजप करतात. सनातन संस्थेच्या वतीने गुरुवारी घेण्यात येणारा भक्तीसत्संग ते नियमितपणे ऐकतात.
१ आ. नियमित योगासने करणे : आम्ही लहान असतांना बाबा आम्हाला शाळेच्या जवळ असलेल्या बागेत घेऊन जात आणि तेथे गवतावर अनवाणी चालायला सांगत अन् आमच्याकडून नियमित योगासने करून घेत. ‘हे सर्व आरोग्याला लाभदायक आहे’, असे ते सांगत असत. ते अजूनही प्रतिदिन योगासने करतात आणि इतरांनाही योगासने शिकवतात.
१ इ. सदाचरणी जीवन : माझे वडील महाराष्ट्र राज्य वीज मंडळात एका चांगल्या पदावर चाकरी करत असत. येथे नवीन वीजजोडणी अथवा देयकाचे मूल्य न्यून करण्यासाठी म्हणून पुष्कळ लोक त्यांना लाच देण्याचा प्रयत्न करत असत; मात्र त्यांनी नेहमी नियमांनुसार कार्य केले आणि कोणाकडून कधीही लाच घेतली नाही.
१ ई. स्वावलंबी आणि नियोजनशीलता : ते या वयातही दुचाकी चालवतात आणि स्वतःची कामे स्वतः करतात. तसेच घरातील कामांमध्ये आईला साहाय्य करतात. त्यांचे नियोजन आणि गणित उत्तम आहे.
१ उ. कष्टाळू वृत्ती : महाराष्ट्र राज्य वीज मंडळात चाकरी करण्यापूर्वी माझे वडील ६ – ७ वर्षे ‘मिलिट्री इंजिनीयरिंग’मध्ये कार्यरत होते. त्यांची बुद्धी कुशाग्र आहे. सेवानिवृत्तीनंतर ते स्वतः रहात असलेल्या गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांची कर, मालमत्ता आणि अधिकोष यांच्या संदर्भातील कामे करून देतात.
१ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या प्रथम भावभेटीचे प्रतिदिन त्यांना स्मरण होऊन त्यांची भावजागृती होत असते. ‘मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगातच आहे’, असे त्यांना नेहमी वाटत असते. या भेटीत ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे सूर्य असून ते स्वतः काजवा आहेत’, असे त्यांना वाटत होते.
१ ए. श्रद्धाळू : आम्ही लहान असतांना बाबा नेहमी आम्हाला प्रत्येक कृती करतांना नामजप करण्याचे महत्त्व सांगत. रात्री झोपण्यापूर्वी देवाला प्रार्थना करून दिवसभरातील कर्मे त्याच्या चरणी अर्पण करायला सांगत आणि ‘उद्या दिवसभर माझ्याकडून चांगली कर्मे करून घे’, अशी प्रार्थना करण्यास सांगत. ‘देवतांना दोन हात असतात. एक आशीर्वाद देण्यासाठी आणि दुसरा असुरांना नष्ट करण्यासाठी असतो’, असे सांगून त्यांनी लहानपणीच माझ्या मनात देवाप्रती भाव निर्माण केला.’
२. श्री. जितेंद्र धवस (श्री. वासुदेव घुगल यांचे जावई), फोंडा, गोवा.
अ. ‘सौ. वैशालीच्या वडिलांना जी साधना कळली, ती त्यांनी अनेक वर्षे नियमितपणे केली आहे.
आ. त्यांच्यात परिस्थिती स्वीकारणे आणि कोणत्याही प्रसंगांत स्थिर रहाणे, हे गुण आहेत. त्यांच्या या स्वभावामुळे ते आश्रमात रहायला आल्यास ‘त्यांना आश्रमजीवनाशी जुळवून घेणे जमू शकेल’, असे मला वाटते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ५.३.२०२५)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’
वैचारिक प्रगल्भता आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या दैवी बालिका कु. आराधना धाटकर अन् कु. शर्वरी कानस्कर !